Monday, October 17, 2016

एक अवचित कोजागिरीरंभ

नमस्कार,
              सर्वाना सविनय अभिवादन आणि या मायबाप सह्याद्रीला साष्टांग दंडवत  घालून "ब्लॉग" नावाचा  एक नवीन पसारा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकल माकल तर आपलाच मानून मोठ्या मनान समजाऊन सांगा. 

              कोजागिरी तशी माझी नेहमी आमची ग्रामदेवता नांदाई माता मंदिरातच होते, इंजिनियरिंग ला असताना तेवढी रूममेट्स सोबत गाजवलेली, पण यावेळेस निसर्गमित्र सोबत जायचं ठरलं. प्लॅन नुसार शनिवारी कोजागिरी करायची आणि रविवारी अवचित गडावर श्रमदान करायला जायचं. कोजागिरीचं ठिकाण होत जयवंत दादाच फार्म हाऊस/शेतातलं घर(आजूबाजूला जयवंतदाच शेत कुठे दिसलं नाही ), मस्त शहरी गोंगाट, किचाट, प्रदूषणापासून लांब, नदीतीरी लागूनच सावरसई, पेण येथे हे शेतातलं घर. घरून निघतानाच सगळ्यांसाठी डझनभर नारळांची चव करून घेतली होती, ती पण सगळ्यांना पुरेल कि नाही याची शास्वती नाही, मस्त बॅग भरली आणि भर दुपारी अडीच  वाजता लाल डब्याने स्वारी मार्गस्थ झाली... 

                 उलव्यावरून निघाल्या पासूनच रस्त्या मध्ये अशा खड्ड्यांच्या पायघड्या होत्या ना कि बोलूच नका. पनवेल गाठलं आणि थोड्याच वेळात कुमार काका, गणेश काका आणि आमच्या छोट्या मालकीण बाई नीता (जयवंत दादाचे धाकटे कन्यारत्न) गाडी घेऊन सेवेस हजर झाले. कोजागिरीसाठी चाळीसेक जणांची टोळी येणार होती, म्हणून सगळ्यांच्या जेवणासाठी भाकरी घेतल्या आणि ट्रेकर्स लोकांचा स्वस्तात मस्त वडापाव आणि चहा हादडून आता आमची चारचाकी खड्ड्यांच्या पायघड्यांचा स्वागत स्वीकारायला निघाली. छोट्या मालकीण बाई आणि कुमार काकांची मस्त जमली होती, त्यात कुमार काका म्हणजे आमच्या निसर्गमित्रमधले असे व्यक्तिमत्व होते, कि यांच्या गोष्टी ऐकाव्याच लागत, समोरच्याला पान  पलटी करायला पण भेटत नसत. मस्त गप्पा टप्पा आणि खड्डे खात खात आम्ही फार्म हाऊस  वर पोचलो(एकदाचे).

               आमच्या अगोदरच आमचं महिला मंडळ आणि मानस, सुरेश काका, राजन काका, जयवंत दादा आणि मंडळी पोचली होती. गेल्या गेल्या एक चहाचा झुरका मारला आणि फार्म हाऊस चा सगळा  भाग पिंजून काढला. मस्त हवेशीर जागा(रात्रभर उकडत होत ), प्रदूषणमुक्त, कसला गोंगाट नाही(आमचा सोडून), खूप छान होत वातावरण. नुकताच नवरात्र उत्सव संपन्न झाला होता त्यामुळे माझ्या रांगोळ्यांची वाहवा चालू होती, त्यातच सगळे मला अक्षरंग अक्षरंग(माझं रांगोळ्या आणि कवितांची ओळख ) म्हणूनच हाक मारत  होते.  मस्त सगळ्यांशी भेटीगाठी झाल्या आणि आता पोटपूजेची तयारी चालू केली, महिला मंडळाने डाळ भात आणि भाजीची तयारी चालू केली, आम्हीही त्यांना मटार सोलायला(सोललेले खायला) मदत केली. दुसरीकडे आम्ही मस्त पातेल्याला बूड लावून चुलीवर कोजागिरी स्पेशल आटीव दूध बनवायला ठेवलं. मस्त बॅनर(नेतेमंडळींनी आमच्यासाठी केलेल्या खास बैठका) टाकून उभे आडवे होत आमच्या गप्पा रंगू लागल्या, राजन काकांनी आणलेल्या चिकनचा मानस, कुमार काका, गणेश काका, राजन काकांनी मस्त फडशा पाडला(बाकी आम्ही उपवास वाले मंडळी गप्पांचा फड रंगवत होतो). हळू हळू एक एक गाडी येत होती,एक-दोन, एक-दोन करत करत बेचाळीस  जण जमले, निसर्गमित्रची  माणसांची आणि गाड्यांचीही(आठ चारचाकी, चार बाईक आणि एक सायकल ) श्रीमंती आज दिसत होती.

              कोजागिरीची  रात्र बोलल्यावर मस्त चांदणं(चांदण्यात चांदणं पिठभर चांदणं ) पडलं होत, मस्त चांदण्यांखालीच ताट वाढली, भाकरी, वरण-भात , मटारची भाजी, पापड, सलाड आणि स्वीट डिश मध्ये नारळाची चव आणि अंजीर बर्फी , व्वा!!! मग काय फुल्ल ताव मारून ना एकदम. खूप दिवसांनी भेटल्यामुळे गप्पा रंगात आल्या होत्या. बच्चा पार्टीही मस्त खेळ खेळत होती, चार-सात च्या खेळाने तर आम्हालाही वेड करून ठेवलं होत. आणि एका बाजूला आमच्या गायकांना उधाण आलं होत, सत्तर, ऐशी मधली अशी एकसोएक गाणी सादर करत होती ना(आणि तीही पूर्ण ) कि बस्स!!! गाणी म्हणता म्हणता कोजागिरी स्पेशल केशर दूध हि आलं, आणि गाण्यांची मैफिल हि उत्तरोत्तर रंगत चालली होती. आता मात्र एक एक गाडी पेंगत चालली होती तरी सुद्धा रात्री दीड  वाजता आम्ही गणाऱ्यानी फार्महीश  सोडली कि भेळ पाहिजे म्हणून,दरेकर काका, किशोर काका, ज्योती काकू, गायत्री काकू आवडीने(बिच्चारे) आम्हाला भेळ बनवून घेऊन आले. किती आनंदात त्यांनी भेळ आणली देव जाणे, पण हि भेळ खाल्ल्यांनंतर आमच्या हि गाड्या आता डुलक्या देऊ लागल्या. आणि तीन साडेतीन च्या  आसपास आम्ही सुद्धा त्या चांदण्यांखाली निद्रिस्त झालो... 

                सकाळी साडेसहा ला जाग आली, मस्त सकाळचा विधी उरकून आमच्यातल्या  काही स्वाऱ्या नदीवर पोचल्या होत्या, त्यांच्या मागोमाग आम्हीही गेलो. नदीत अंघोळीची मजा काही औरच, सगळं उरकलं. नाश्त्यासाठी कोजागिरीचं दूध, चहा, नारळाची चव, चिवडा, कांदेपोहे, खाण्यापिण्याची यावेळेस बहुधा मजाच मजा होती. आता सामानाची बांधाबांधी चालू झाली, अर्धी मंडळी आमचं सगळं सामान गुंडाळून घरी रवाना होणार होती, तर  मी, पराग, मानस, सचिनदादा, ऐश्वर्या, रवी, साखरे, प्रियेश दादा, राहुल, सुरेश काका, किशोरकाका, जयवंत दादा, गणेश काका आम्हा तेरा जणांची टीम अवचितगडावर श्रमदानासाठी मार्गस्थ झाली. रोह्याच्या अलीकडे अष्टमी वरून आत गाडी टाकून आम्ही मेढे(गडाच्या पायथ्याचं गाव ) येथे पोचलो. ट्रेक ला सुरुवात करताना गावातून बाहेर आल्यावर दोन विहिरी दिसल्या, आम्हा सगळ्यांना सैराटच आठवला, अवचितगड तसा छोटा आणि दुर्लशक्षित असल्या कारणाने लोकांची तिथे तेवढी वर्दळ नव्हती,  खूप दिवसांनी ट्रेक करत असल्यामुळे हा छोटा गड  चढायलाही दर  दहा मिनिटांनी ब्रेक घेत चाललो होतो. मध्ये एका ठिकाणी वीरगळ होती, आजूबाजूला शेंदूर फासलेले काही देव होते, तिथेच आम्हाला पहिली न्हानेटी दिसली. झाडी दाट होती, तरीही खूप उकडत असल्याने अंगातून घामाच्या धारा निघत होत्या, अखेर घाम पुसत पुसत गडाच्या महाद्वारापाशी येऊन पोचलो, आणि आमच्या प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात झाली. 

               वाटलं होता लोकांची वर्दळ कमी असल्यामुळे जास्त काही कचरा भेटणार नाही, पण कसले काय वर गेल्यावर मस्त थंडगार हवा, गार सावली, झाडांच्या ठिकाणी प्लॅस्टीक पत्रावळी, ग्लास आणि बाटल्या सापडत होत्या. एका ठिकाणी तर मला पालापाचोळ्याचा ढिगाखाली प्लॅस्टिक  पिशवीत पॅक  करून ठेवलेले ग्लासच भेटले, बहुधा पुढच्या वेळेची तयारी(म्हणजे  मी खूप शिव्या  खाणार, उचक्याही) तटबंदीवर आणि महा दरवाजा वर वाढलेलं गवत काढलं, नंतर पुढे न्हाणीचं हौद, पाली दरवाजा, द्वादशकोनी तलाव , गडावरील मंदिर येथील साफसफाई केली, गडाची साफसफाई करताना आम्हाला ठिकठिकाणी  पणत्या भेटत होत्या, यावरून गडावर दीपोत्सव साजरा होत असल्याचे समजले. गड  भटकत असताना एक, दोन, तीन, चार न्हानेटी दिसल्या. दोन तर पाय पडता पडता वाचल्या.  एक दिवस फिरण्यासाठी अवचितगड हा मस्त पर्याय आहे, हेही आम्हाला जाणवलं. सगळी साफसफाई आटोपून आणि गड फिरून थोडं विसाव्याला बसलो शरीराची गिरण  दोन तास बंद  होती, तिला चालू करून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड उतरत असताना एक चार जणांचा ग्रुप वर जात असल्याचे दिसले,  तेव्हा मनात आले चला, आपण मस्त साफसफाई करून आलो, आता उदघाटन करायला पाहुणे आले ... 


                        झालं, सगळं काम झालं आणि मनात इच्छा होती कि विहिरीत मस्त पोहायला मिळणार, पण एका गावकऱ्याने सांगितलं कि ती देवाची विहिर आहे, त्यात पोहायला बंदी आहे, मग काय "दमलेल्या तोंडावर बाटलीभर पाणी..." दमून भागून गावात आलो, एका गावकऱ्यांच्या ओसरीवर बसलो आणि तेथेच आम्ही आमची ताट मांडलीं, मस्त चवळीची भाजी, भाकरी आणि नारळाची चव(दोन दिवसातला कॉमन पदार्थ तरीही हवाहवासा वाटत होता) यावर ताव मारला, आणि आता सामानाची आवराआवर करून  आमची स्वारी परतीच्या प्रवासाला लागली.  रामवाडीला आमच्या मंडळींनी बाईक ठेवल्या होत्या, म्हणुन तिथेच सर्वांचा निरोप घेत रवी, मी, प्रियेश दादा, साखरेने सर्वांचा निरोप घेतला आणि आम्ही बाईकस्वारही सुसाट निघालो... मी आणि रवी मध्ये एक ज्यूस ब्रेक घेऊन चार वाजता मस्त कोजागिरीच्या गोड आणि अवचितगडावरच्या अभिमानास्पद  आठवणी घेऊन घरी पोचलो. 

                  जो घरी आलो, आणि साडेपाच वाजता झोपलो तो सकाळी साडेआठ लाच उठलो(पंधरा तास झोपणारा कुंभकर्ण )  आणि साडेनऊचा थंब मारायला सिडको मध्ये पोचलो.... 

माझा हा नवीन प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा...
 वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची ... 
भेटूया पुढच्या ट्रेकला...

 धन्यवाद.
आपलाच
सह्याद्रीचा भटकभवान्या   

1 comment:

  1. चांगला प्रयत्न आहे. लिहीत रहा. खुप शुभेच्छा
    ...

    ReplyDelete