Monday, July 23, 2018

विस्मयकारक कुर्डूगड ट्रेक

     कालच्या २२ जुलै च्या कुर्डूगड  ट्रेक बद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद बोलण्यासाठीच हे लिहत आहे. खरं तर आपल्या लोकांना आभार किंवा धन्यवाद बोलायचं नसत, पण कस शब्दाला शब्द जोडत जातात आणि नवनवी नाती फुलत जातात, त्यासाठीच हा ब्लॉग प्रपंच. 
 ढगांमध्ये लपाछपी खेळणारा कुर्डूगड किल्ला... 
     रवी आणि मी आम्ही दोघांनी मिळून हा कुर्डूगड उर्फ विश्रामगड ट्रेक ठरवला आणि ट्रेक ची रेकी देखील करून आलो परंतु धो धो पावसाच्या माऱ्यामुळे आम्ही पायथ्याच्या गावापासून अवघ्या ३ किमी अंतरावरून परत माघारी फिरलो, दुसरे मार्ग देखील बघितले पण निसर्गा पुढे आपण काहीच नसतो, आणि आमची रेकी अपूर्ण राहिली.  ट्रेक च्या दिवशी पण असाच पाऊस पडला तर काय करायचं म्हणून ठिकाण बदलण्या इतपत आम्ही विचार केला होता. परंतु आपल्याच निसर्गमित्र परिवारातल्या सदस्यांनी एक विश्वासार्हता दाखवून हाच ट्रेक ठेवा आपण करू यशस्वी असा विश्वास दिला. त्यामुळे आता कुर्डुगडच करायचा यावर शिक्कामोर्तब झाला.
     पहिली रेकी अयशस्वी झाली होती म्हणून आम्ही परत रेकी ला जाण्याचा निर्णय घेतला, परंतु ऑफिस च्या कामांमुळे मला वेळ काढायला जमत नव्हतं, आणि रवीला ऑफिस च्या कामासाठी इंदूरला जावं लागलं आणि तिकडचा त्याचा मुक्काम लांबला... परिणामी आमची दुसरी रेकी देखील अयशस्वी झाली.  आता जे काही ते वरच्याच्या हवाली करत आम्ही तयारीला लागलो... पहिल्या रेकीच्या अगोदरच रजिस्ट्रेशन फुल झाले होते, परिणामी नवीन रजिस्ट्रेशन साठी नाव नोंदवणाऱ्यांना नाही म्हणताना कसतरीच होत होतो... पण एकंदरीत सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन आकडा ६० च्या वर न्यायचा नाही हे मनाशी दृढ केलं होत(त्यातही एक जण कॅन्सल झाली आणि ५९ जणांची टीम निघाली).
     पराग विश्वेश या दोघांनी ट्रेक रूट बद्दल मला निश्चिंत केलं कारण त्यांनी हा ट्रेक केलेला आहे तर बाकी कामात किशोर काका, राजन काका यांचे सहकार्य मोलाचे पडले. इंदोर ला असल्यामुळे इच्छा असूनही रवीला काही करता येत नव्हतं... अगोदर देखील लीडरशिप घेतली होती, पण तेव्हा काही टेन्शन नव्हतं आलं जितकं टेन्शन यावेळी आलं होती. ट्रेक च्या आदल्या रात्री नीट झोप येत नव्हती मनात विचार काय तर उद्या बस पार्किंग साठी जागा असेल ना, सगळं नीट होईल ना, प्रवासाचा पल्ला लांबचा असल्याने वेळेचं गणित जुळेल ना या अशा अनेक प्रश्नांनी मनात भीतीच काहूर उठलं होत.
     सकाळी ५. १५ ला उठून तयारी करायला लागलो, ५.३० वाजता एक मेसेज आला माझी ट्रेन मिस झाली, मी ६.३० पर्यंत पोचतो मीटिंग पॉईंट ला, मी इथे सर्वाना सांगितलं होत की ६ वाजता भेटून ६.१० ला बस सोडेन आणि अशात पहिलाच मेसेज असा बोलल्यावर काय करू आणि काय नाही अस झालं...पण पुढच्या ट्रेन च गणित बघता त्यांना ६.३० नाही ६.०९ पर्यंत पनवेल स्टेशन आणि तिथून ५ मिनिटात मीटिंग पॉईंट ला येण शक्य आहे...म्हणून जरा हायस वाटलं. मी पोचायच्या अगोदरच पार्टीसिपंट यायला सुरुवात झाली होती,६.२५ पर्यंत ५८ जण आले होते, एक कॅन्सल झाली होती, आणि एक अंकित म्हात्रे(माझाच भाचा ) बाईक वर निघाला होता पण त्याचा अजून पत्ता नव्हता तो फोन देखील उचलत नव्हता.६.३० पर्यंत थांबुया नाहीतर बस सोडू असा निर्णय घेऊन, ५ मिनिट थांबलो . ६.३० झाले तो आलाच नाही म्हणून मग सचिन दादा कडे त्याचा नंबर देऊन तो आला तर त्याला परत पाठव किंवा आम्हाला गाठत असेल तर बाईकने पुढे तसाच यायला सांग अस सांगून मी निघणार तेवढ्यात लांबूनच मामा अशी हाक आली आणि  माझा जीव भांड्यात पडला. 
 

     अखेर 59 जणांना घेऊन अयशस्वी रेकीची सल मनात ठेवून पण तेवढाच आम्हाला विश्वास देणाऱ्या आमच्या परिवारातल्या इतर सदस्यांच्या विश्वासाच्या बळावर ६.३१ वाजता आम्ही कुर्डुगडच्या दिशेने प्रस्थान केलं. बसमध्येच नाश्ता करून गाडीत चाललेली मजा मस्ती करत वाटेत एक ब्रेक घेऊन पनवेल-वडखळ-नागोठणे-माणगाव-जिते हा खड्ड्याखड्ड्यांचा प्रवास १०.५० च्या आसपास संपला. एव्हाना उशीर झालाच होता म्हणून लगेचच सर्वांच इन्ट्रोडक्शन घेऊन ट्रेक बद्दल सर्वाना माहिती देऊन, ट्रेकला सुरुवात केली.

     हिरवाईने नटलेला, धुक्याने भरलेला, मध्येच येणारी पावसाची सर, कुडकूडणारी थंडी, परिचित-अपरिचित चेहरे, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत चाललेली मजा, मध्येच कोणाचा तरी घसरणारा पाय, एक ना अनेक तऱ्हेवाईक पद्धतीने आमचा ट्रेक चालू होता. 

विशेष म्हणून १०-१२ वर्षांचे श्लोक-सुहानी ते ६७ वर्षांचे कॅप्टन तलवार अशी एकंदरीत लहान-थोरांची आमची मांदियाळी कुर्डुगडाची वाट तुडवीत निघाले होते.
 
     निसर्गमित्र परिवारात एक आहे लीडर जरी असला तरी तो फक्त नामधारी असतो बाकी काम करण्यात सगळे सदस्य हिरीरीने पुढाकार घेतात म्हणूनच की काय ट्रेक सुरू झाल्यावर रात्रभर जे काहूर मनात माजलं होत ते शांत झाल होत आणि मी आरामात लास्ट मॅन सोबत आरामात ट्रेक करत चाललो होतो.


     कोसळणाऱ्या त्या जलप्रपातांचे आवाज, बरसणारी पावसाची सर, ओढ्यांना-ओहोळाना मिळालेले ते स्वर, वाऱ्याचा तो घोंगावलेपणा, पानांची सळसळ, आणि आमचा किलबिलाट...सुराला सूर मिळत होत, आणि या सह्याद्रीच्या कुशीतल तेच पण तरीही नवीन संगीत ताल धरत होत. या संगीताचं एक आहे हे ऐकायचं नसत तर ते अनुभवायचं असत, आणि तेच आम्ही करत होतो. किल्ल्यावर जाणारी वाट हि छोटी आणि पावसामुळे जरा निसरडी झाली होती. त्यामुळे एकमेकांना सावरत आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत होतो.


मिशीवाला मारुती
महाद्वार 
     वर असलेली एक आदिवासी वाडी, पुढे लागलेलं मंदिर अशा दोनएक तासांच्या पायपीटी नंतर आम्ही किल्ल्यावर पोचलो. किल्ल्यावर पोचल्यावर  सर्वाना किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती देऊन गडफेरी मारली. सागरी मार्गाने कुंडलिकेच्या खोऱ्यातून होणाऱ्या जलवाहतुकीसाठी तसेच ताम्हिणी घाटाच्या संरक्षणार्थ कुर्डूगड किल्ल्याची उभारणी केली आहे.कुंडलिकेचं पात्र किल्ल्यावरून दिसत, मात्र ढगांची दाटी असल्यामुळे ते सुख काही आमच्या नजरेला पडलं नाही.  
किल्ल्यावर असलेल्या मारुतीच्या मूर्तीच विशेष म्हणजे या मारुतीला मिश्या , कंबरेला हत्यार आहे, तसेच पायाखाली पनवतीला जखडून ठेवलं आहे.  त्याच्यापुढेच एक निसर्गनिर्मित घळ तयार झालेली आहे. त्या घळीतून पुढे जात आम्ही गडाच्या मागच्या बाजूला आलो.
निसर्गनिर्मित घळ 


नेढं
       वर असलेल्या नेढ्यापर्यंत सर्वाना गडफेरी पूर्ण केली आणि खाली मंदिरात जेवायला आलो. पावसाची संततधार चालूच होती, सर्वांनी आणलेल्या डब्यांवर ताव मारून दुपारी सव्वातीनच्या सुमारास किल्ल्यावरून काढता पाय घेतला. पावसामुळे वाट चिकट आणि निसरडी झाली होती, जास्त कुणाचा वावर नसल्यामुळे वाट देखील लहानच होती. त्यामुळे हळूहळू ओळीने काहीही घाई न करता ४.४५- ५.१५ च्या दरम्यान सर्वजण खाली आले, एक गरमागरम चहा घेत ५.३० वाजता  जिते-कोलाड-नागोठणे-पनवेल या मार्गे गाडी काढली. भर पावसात, एक सल मनात राहून सुरु झालेला प्रवास अखेर संपायला आला, सर्वांची पायपीट मस्त झाली होती, उशीर तर झाला होताच पण मनाला मिळालेल समाधान आणि अनुभवांच्या शिदोरीत पडलेला अजून एक ट्रेक गाठीशी बांधत एकाने सुद्धा कोणतीच तक्रार नोंदवली नाही आणि हीच काय ती आमच्या लीडरशिपची आणि आपल्या यशस्वी ट्रेकची पावती, अस म्हणत सुटकेचा निश्वास सोडला. अखेर रात्री १० च्या सुमारास सर्व जण पनवेल मध्ये पोचलो. आणि अशाप्रकारे अयशस्वी रेकी झालेला ट्रेक अखेर यशस्वीरीत्या पार पडला.
     या ट्रेक बद्दल अजून सांगायचं झालं तर रेकी नीट झाली नसली तरी तिथल्याच बाजूच्या भादड गावातल्या कृष्णा जाधव याचा नंबर मिळाला आणि त्याने सुरुवातीपासून फोन वर केलेलं सहकार्य, सकाळच्या नाश्त्यासाठी उशीर होईल म्हणून गाडीपर्यंत वडापाव घेऊन येणारे किशोरकाकांचे भाऊजी, पायथ्याशी चहाची सोय करणारा दर्शन कदम, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी समोसा खाजा घेऊन येणारी मयुरी, आणि आपले बसवाले काका या सर्वांचे मनापासून आभार, यातल्या एकाने सुद्धा ऍडव्हान्स न घेता आपल्याला सर्व काही वेळेवर उपलब्ध करून दिल. आपल्या निसर्गमित्र परिवारातल्या लोकांचे आभार मानले तर सगळे जोड्याने हाणतील तरी सुद्धा त्यांच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा ट्रेक अपूर्णच होता म्हणून त्यांचे पण आभार... आणि माझा पार्टनर रव्या "पुढचा ट्रेक कुठला लावायचा विचार करून ठेव रे...". 
चला, भेटुयात पुढच्या ट्रेकला!!! 


कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा, वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची... 

साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या...



 
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

21 comments:

  1. छान लिहिलंय. मला नाही मिळाली संधी .

    ReplyDelete
  2. विशाल आणि रवी तुमचे खुप आभार, मला एक नवीन किल्ला बघायला मिळाला.
    विशाल, छान माहिती दिली आहेस. व जे काही लिहिलं आहेस ते अगदी मनापासून लिहिलं आहेस.वाचताना पुनरप्रत्ययाचा आनंद मिळाला.

    ReplyDelete
  3. खूपच छान ब्लॉग! मित्रा,मी तुमच्या ट्रेकमध्ये सहभागी नव्हतो पण....निसर्ग मित्रची तुमची सदस्य माझी पत्नी सौ.सविता चौधरी हिच्याकडून ट्रेकबद्दल काल घरी परतल्यावर कानी पडलेल्या वर्णनाने भारावून गेलो होतो त्यात आज लगेचच तुमचा ब्लॉग वाचनात आला.ब्लॉग वाचताना मी सुद्धा त्या ट्रेकचाच एक भाग आहे अशी ब्लॉग पूर्ण वाचून होईपर्यंत जाणीव होत होती.या वेळच्या ट्रेकमध्ये दोन गोष्टी विशेष वाटल्या पहिली निघण्यापूर्वी काय काय सोबत असावे याची थोडक्यात दिलेली माहिती आणि ट्रेक पूर्ण झाल्यावर लागोलाग दुसऱ्याच दिवशी ब्लॉगद्वारे साधलेला संपर्क या दोनही गोष्टी कौतुकास्पद आहेत.पुनःश्च अभिनंदन ! ट्रेक आयोजन आणि ब्लॉग लेखन दोन्ही गोष्टी चालू ठेवा.माझ्या सारख्या न सहभाग घेणाऱ्यांनाही त्यामुळे आनंद मिळू शकतो.
    जगदीश चौधरी, डोंबिवली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...
      पुढच्या वेळी तुम्ही सुद्धा या...वाट बघतो...😊

      Delete
  4. विशाल, रवी, तुम्ही दोघांनी घेतलेली मेहनत, नियोजन आणि शिस्त या गोष्टी मुळे ट्रेक खूप व्यवस्थित पूर्ण झाला. ब्लॉग वाचताना संपूर्ण ट्रेक पुन्हा केल्या सारखा अनुभव आला. खूप सुंदर लिखाण केले तू विशाल.��
    पुढच्या ट्रेक साठी शुभेच्छा... प्रियेश

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा...
      तुम्ही सगळे सोबत असता, म्हणून हे सगळं नीट पार पडत...😊

      Delete
  5. खूपच छान अनुभव होता विशाल दादा... धन्यवाद निसर्गमित्र...

    ReplyDelete
  6. विशाल दादा खूप छान लिहिलं आहेस... पुन्हा सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं...अप्रतिम

    ReplyDelete
  7. मी सतत एका चांगल्या ट्रेकिंग ग्रुप च्या शोधात होतो आणि निसर्गमित्र पनवेल हा तोच ग्रुप आहे याची खात्री पटली.
    विशाल खूप छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...
      तुमचं नाव कळू शकेल का??..

      Delete
  8. विशाल खूप छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete