डोंगरात फिरताना अनेक माणसांचा साथ-सहवास-अनुभव मिळत असतो, कधी त्यांच्या सोबत फिरताना तर कधी त्यांच्या कडून ऐकताना. अशाच या डोंगरातल्या नात्याला बहर येते ती याच माणसांबरोबर डोंगरात भटकंती करताना. संस्थामक दृष्टीने फिरत असताना, संस्थेच्याच कार्यक्रमात समाविष्ट होत असल्याने अशा इतर संस्थातल्या या मित्र परिवारासोबत फिरण्याचा योग मात्र सहजासहजी येत नाही, त्यांच्या बाबतीत देखील असच.
"Journey is better than destination !!!" |
त्यामुळेच करू करू म्हणत अखेर योग जुळून आला आणि निसर्गमित्र-पनवेल(विश्वेश, वरद, पराग, रवी, राहुल, राम, कौस्तुभ, मी), आम्ही गिर्यारोहक-डोंबिवली(अभिषेक,राज,पल्लवी, सुमुख, स्पृहा, तेजस, प्रवीण) , ऑफ बीट सह्याद्री-मुंबई(प्रीती, राजस, यज्ञेश, आदी) - अशा तीन संस्थांचा मिळून आणि अजून एक विश्वेशचा मित्र अक्षय लाड असा गळत-पडत-कलटी देत 20 जणांचा चमू तयार झाला. ट्रेक ठरला शुक्रवारी रात्री प्रवासाला सुरुवात करून शनिवारी पहाटे शिवथर घळीच्या अलीकडे शेवते गावात उतरून शेवत्या घाटाने वर चढत केळद ला पोचायचं आणि रविवारी केळद वरून अंधारीच्या वाटेने शिवथरला येऊन परतीचा प्रवास.
![]() |
| याच एकेरी रस्त्यावरून रात्री बस आणली होती |
२७ जुलै शुक्रवारी रात्री 10 वाजता डोंबिवली वरून बस निघाली, शनिवारसाठी सर्वांना भाकरी घेऊन मी आणि रवी देखील थोड्याच वेळात बाईकने उलव्यावरून पनवेल ला पोचलो. एव्हाना डोंबिवली वरून बस आली होती, पनवेलचे पण सगळे जमले होते. मुंबई वरून येणाऱ्या राजस आणि यज्ञेशची वाट बघत थोडीफार पोटपूजा करून पावणेबाराच्या सुमारास आम्ही पनवेल सोडलं. खड्डयांनी रस्त्याची अशी दुर्दशा झाली होती की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करतोय की एखाद्या दगड खाणीचा कच्चा रस्ता(तो सुद्धा बरा असेल एक वेळेस). भरपूर दिवसांनी सगळे भेटल्यामुळे बस मध्येच रंगलेल्या गप्पा, रस्त्यात वाकण ला घेतलेला कटिंग ब्रेक, आणि खड्ड्या-खड्ड्यातून आदळत-आपटत चाललेला प्रवास.
रात्रीचा प्रवास असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी मजबूत ट्रेक करायचा असल्या कारणाने मिळेल तेवढा आराम या उद्देशाने बस मध्येच झोपी गेलो. मी, पराग,वरद, राहुल, अभिषेक मागच्या सीट वर बसलेलो असल्यामुळे खड्डे जरा जास्तच जाणवत होते, मध्येच एका ठिकाणी मोठ्या खड्ड्यामुळे मी एकदम अधांतरी गेलो नशीब म्हणावं वरद आणि पराग ला पटकन धरायला मिळालं नाहीतर माझा पार्श्वभाग आणि मी गेलोच होतो समजा. अनुभवातून आलेलं शहाणपण म्हणा की आणखी काही तिथून तडक उठलो आणि ड्रायव्हरच्या केबिन मध्ये विश्वेष सोबत जाऊन बसलो. विश्वेश आणि मुस्तार (ड्रायव्हर) ची बऱ्यापैकी जमलेली दिसत होती. मुस्तार हा बिहारी बाबू, तोंडात आपला मस्त चूर्ण टाकून फुल बिहारी टोनिंग मध्ये एक एक सूर भिडवत बोलत होता.
रात्री साडेतीन च्या आसपास महाड सोडलं आणि महाड MIDC मार्गे शिवथर कडे निघालो, रात्रीचा तो निबिड अंधार, एकेरी रस्ता,त्यावर चाललेली आमची एकच बस, MIDC क्षेत्र असे पर्यंत रस्तावर लाईट होती, नंतर दूर दूरवर पसरलेला काळोख, आणि त्या काळोखातली भयाण शांतता, वळणा-वळणाचा घाट चढत एक-एक गाव मागे टाकत गाडी चालू होती. एव्हाना यज्ञेश पण पुढे आला होता कारण शिवथर च्या अलीकडे कुठे थांबायचं हे त्यालाच माहीत होत. शेवते गावात आम्ही उतरणार हे तेव्हा कळलं. शेवतेच्या थोडं अलीकडे असताना विश्वेश ड्रायव्हर ला सांगू लागला की "हम लोग अब यहाँसे निकलेंगे, आपको हमे लेने के लिए दूसरें गाँव आना हैं", अगोदरच हा असा रस्ता बघून तो ड्रायव्हर कावरा-बावरा झाला होता, आणि विश्वेश ते टाकलेल्या गुगली वर त्याची अशी काही तंतरली की तो जे काही बोलला ते अजूनही कानात गुंगतय. तर त्याच म्हणणं अस पडलं(बिहारी स्टाईल ने, एकदम सुर लाऊन)-"नहीं, नहीं...ऐसा कैसा...हम अकेले नहीं जाएँगे... आप में से कोई एक को तो हमारे साथ आना ही पड़ेगा .." . अखेर त्या ड्रायव्हरला सांगत-समजावत पहाटे ४:५० ला गाडी शेवते गावात पोचली. शाळेजवळ थांबून बाजूच्या एका घरात आम्ही आल्याची वर्दी दिली, बाहेर पाऊस पडत असल्याने बस मध्येच झोप घ्यायचं ठरलं. विश्वेश, मी आणि तेजसने भल्या पहाटेच भूक भूक करत तेवढ्या सकाळी दुपार साठी आणलेल्या ठेचा-भाकरीतली एक-एक भाकरी खाऊन डोळ्यांची पापणी लववली.
![]() |
| सूर्रर्रर्र के पीओ ... |
पावणे सात वाजता जाग आली खरी पण कोणीच उठण्याच्या मनःस्थितीत नव्हता, काय करावं म्हणत मोबाईल मध्ये गजर लावला आणि वर बॅग ठेवतात तिथे मोबाईल ठेऊन मी सुद्धा झोपण्याच नाटक केलं. तो कर्कश गजर वाजायला लागल्यावर जाग तर आलीच पण इतका वाजून सुद्धा कोणी बंद करत नाही म्हणून सगळे वैतागून अखेर डोळे चोळत तयारीला लागले. त्या बाजूच्या घरातल्याना चहा सांगितलाच होता, फ्रेश होऊन, चहाचा घोट घेईपर्यंत वाटाड्याशी देखील बोलणं झालं होत. दोन्ही वाटाड्यांचे नाव दगडू कचरेच, त्यातल्या एकाने आमच्या साठी ताजा खरवस आणला होता, दुसऱ्या दादांनी देखील लगेच आमच्यासाठी ताज्या ताकाची कळशी समोर केली.
| शेवते घाटाच्या दिशेने निघालेली टीम |
सकाळी सकाळी दिवसाची अशी दमदार सुरुवात झाल्यावर ट्रेक करायला पण आता उत्साह आला होता. शेवते गावातून दोन वाटा केळदला पोहोचतात, एक मढे घाट जो अवघ्या चार तासात केळद ला पोहोचतो, तर दुसरा शेवते घाट ज्याला सहा ते सात तास लागतात. आम्ही आता सगळे बऱ्यापैकी चालणारे असल्याने आणि चांगला ट्रेक करायच्याच उद्देशाने आलेलो असल्याने शेवते घाटातून जायचं ठरलं होत. सकाळी नऊ च्या आसपास ट्रेक सुरू झाला, मस्त धुकं आणि ढगांचा चाललेला मिलाप त्यामध्ये हिरव्या रंगांच्या विविध छटांची झालेली लयलूट, त्यावरून सूर मारणाऱ्या त्या जलसरी आणि या सर्वांवर मध्येच येणारी पांढरी शुभ्र चादर. उन्हाळ्यात रांगडा दिसणारा काळाकभिन्न सह्याद्री आता मात्र नव्या नवरीप्रमाणे नटला होता. लाजर बावर त्याच रूप मनाला मोहून टाकत होत.
![]() |
| दुर्गाचा कडा |
पहिलच टेपाड वर चढून गेल्यावर आजूबाजूची डोंगररांग खूप काही सांगायचं प्रयत्न करीत होती, पण संपूर्ण वातावरण पांढऱ्या ढगांनी भरून गेल्यामुळे पंधरा-वीस फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नव्हतं, तेजाचा धनी दिसण्याची तर लक्षणच नव्हती, मध्येच थोडे ढग निवळल्यावर जे मिळतंय ते डोळ्यांत साठवण्याचा अतोनात प्रयत्न आम्हा सर्वांचा चालू होता. एक सरळसोट कडा थेट नभांना भिडला होता दगडू दादाला विचारता कळलं की त्याला दुर्गाचा कडा म्हणून संबोधतात. विलक्षण गोष्ट म्हणजे हा दुर्गाचा कडा पाहून आम्हाला नाणेघाटातल्या नानाच्या अंगठ्याचीच आठवण झाली. घाट वाटांचा ट्रेक जास्त कोणी करत नसल्यामुळे आणि पावसाळी बेडकांप्रमाणे उगवणाऱ्या नवख्या ट्रेकर्स कम पर्यटकांना अशा जागांचा मागमूसही नसल्याने हे निसर्गाचं नितांतसुंदर रूप मुक्तहस्तपणे वेगवेगळ्या दृष्यांची उधळण करत होता. एक बारीकशी मळलेली वाट, कचऱ्याचा कुठेही लवलेश नाही, ना मानवाचा कुठल्याच प्रकारे हस्तक्षेप त्यामुळे एक वेगळीच अनुभूती मिळत होती आणि दोन दिवस आम्ही याच सुखाचा उपभोग घेणार होतो.
![]() |
| धुक्यातून चाललेला प्रवास |
घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पावलांचा वेगही चांगला होता, पावसाची रिप रिप देखील चालू होती. या वाटेत चालताना मध्ये-मध्ये वाड्या-वस्त्या लागत होत्या, घरांची संख्या देखील बऱ्यापैकी असायची परंतु रोजगारासाठी या वाड्यांमधील सर्वच लोकांनी आपली राहती घरे सोडली होती. पांगारी ही त्यातलीच पहिली वाडी. काही महिन्यांपूर्वी राजस, प्रीती ताई, यज्ञेश आणि त्यांच्या टीम ने पांगारीमध्येच अशाच एका ओसाड घरात मुक्काम ठोकून त्या भागातली रोज एक अशा प्रकारे इथल्या सगळ्या घाटवाटा पिंजून काढल्या होत्या. एक घाटवाट करायची आणि रात्री मुक्कामाला त्या घरात परतायचं,
| वाडीतील ओसाड घरे |
दुसऱ्या दिवशी दुसरी घाटवाट आणि परत मुक्कामी असा मस्त प्लॅन त्यांनी यशस्वी केला होता. पांगारी नंतर पिशवी ही वाडी देखील आम्ही आता मागे टाकली होती, सकाळपासून पोटात जास्त काही गेलं नव्हतं आणि न थांबता चालही बऱ्यापैकी झाली होती त्यामुळे पोटातल्या आतड्यांची चलबिचल चालू झाली होती. मी, विश्वेश, तेजसने सकाळीच भाकरींवर ताव मारलेला असल्याने आम्ही अजून लांबवत होतो, पण जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा थांबायचा निर्णय झाला आणि थांबलो देखील पण पावसाच्या सरीने आम्हाला तेथून हुसकावून लावले. थोड्या अंतरावर वाडी आहे तिथे थांबूया म्हणत चाल धरली, परंतु बहुतेक सर्वांनीच सूर धरल्यामुळे पुढची(गुगुळशी) वाडी येण्याच्या अगोदरच एक ओढ्याच्या किनारी थांबलो. मस्त घरून आणलेल्या भाकरी, सोबतीला ठेचा, चटणी यथेच्छ ताव मारून पोटाची क्षुधा भागवून पुढच्या वाटेला लागलो.
उभ्या-उभ्याच भर पावसात ठेचा-भाकरीवर यथेच्छ मारलेला ताव
| मानवी साखळीने ओढा पार करताना |
| ओढ्यातल्या पाण्यात चाललेला कल्ला |
एव्हाना दिवसाचा प्रहर मध्यानाच्या पुढे गेला होता, गुगुळशी वाडी सुद्धा आता मागे टाकली होती, वाटेत एक ओढा होता, पाऊस नसल्यामुळे ओढ्याला पाणी कमी होत, साखळी करून तो ओढा सर्वजण लिलया पार करू शकलो.
का कुणास ठाऊक पण तिथे सर्वांचं बालमन जिवंत झालं आणि मग काय एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, पाण्यात एकमेकांना पाडून, भिजवून मस्त मजा चालू होती, राहुल एका बाजूला राहून आम्हा सर्वांचे फोटो देखील काढत होता. ओढ्यातली मजा आटोपती घेऊन पुढचं राहिलेलं अंतर कापायला सुरवात केली. चिरा या वाडीची हद्द पार करून अखेर अडीच च्या सुमारास आम्ही केळदच्या वेशीवर पोहोचलो.
![]() |
| दोन्ही वाटाड्यांसोबत आमच्या बाकरे बाई ... |
वेळेचं गणित आता आमच्या बाजूला असल्याने मढे घाटातल्या धबधब्याकडे जायचं ठरलं. तिथल्याच एका टपरीवजा हॉटेल मध्ये गरमागरम चहाचे घोट घेऊन धबधब्याकडे जायला निघालो, आमच्या सोबतचे दोन्ही वाटाडे आता याच मढे घाटातल्या वाटेने शेवते ला जाणार होते, त्यांना निरोप देत आम्ही धबधब्याच्या पॉईंट ला पोचलो, तिथे जमलेली MH 12 पब्लिक आणि त्यातली काही हिरवळ न्याहाळत तो परिसर धुंडाळून काढला. आपल्याकडे लोणावळ्याला जशी लोक जावीत ना तेवढी नाहीत पण तशीच थोडीफार लोक इकडे मढे घाटातल्या धबधब्यावर येतात. रिमझिम पडणारा पाऊस, आणि गार गार थंडी आणि या सर्वात भाजलेल्या मक्याच्या कणीसाची मजा अनुभवली नाही तर या असल्या मस्त मौसमाचा अपमानच समजावा लागेल. एका हिरवळीचा अंदाज घेत तिकडून काढता पाय घेतला. वाटेत वडापाव-कांदाभजीवर हात मारून मुक्कामाच्या दिशेने पावले वळवली.
![]() |
| रात्री रंगलेला मेंढीकोटचा डाव |
सकाळी नऊ वाजता सुरू झालेला पहिल्या दिवसाच्या ट्रेकचा टप्पा संध्याकाळी पाचच्या आसपास कुठे संपायला आला. दिवसभर भिजलेल्या, गारठलेल्या, आणि दिवसभराच्या तंगडतोडीनंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोचून ओले कपडे, शूज काढून, घातलेले सुके कपडे, आणि त्यात हाफ पॅन्ट हे सर्व म्हणजे दुग्धशर्करा योगच. अजून एक, सोबतीला चहा हवाच! सर्वांचं आवरून झाल्यावर चहा घेत दिवसभराचा घेतलेला आढावा आणि दुसऱ्या दिवसाचं थोडंफार नियोजन करून बैठक थांबवत आता आम्ही आमचा वेळ देण्यास मोकळे झालो होतो. भरपूर दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना अक्षरशः उधाण आलं होत. एकमेकांची खेचत, एकमेकांवर खिदळत, हा पिकलेला हशा या सर्वांमुळे दिवसभराच्या ट्रेक चा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. जेवणाची वेळ झाली आणि लगेच ताटं वाढायला घेतली, संतोष दादा आणि वहिनींनी आमच्या साठी मस्त बेत बनवला होता. चिकन, भाकरी, पनीरची भाजी, डाळ, भात, लोणचं, पापड, श्रीखंड अहाहा! एक प्रकारे हा आमचा रॉयल ट्रेकच होता. यथोचित जेवण करून दिवसभराचा थकला भागला जीव शांत केला.
बसल्या जागी काहीतरी उद्योग म्हणून पत्ते काढून मेंढीकोटच्या रंगलेला डावात आमच्यावर(मी, सुमुख, राज, विश्वेश, अभ्या) आलेल्या चार कोटांचा बंगला मोडून समोरच्या(पल्लवी, स्पृहा, राहुल, पराग,प्रवीण) टीमवर सहा कोटांची बांधलेली बिल्डिंग हे समीकरण खूप काही हास्यकल्लोळ पिकवून गेलं. प्रीती ताई आणि आदी हे दोघे रात्री येऊन आम्हाला मिळणार होते, त्यांना आणायला संतोष दादा गेले होते. घड्याळाचे काटे एक वर कधी गेले कळलेच नाही, एव्हाना बाकी सगळे निद्रेच्या अधीन झाले होते, आम्ही देखील आमच्या डावाचा समारोप घेतला आणि स्लीपिंग बॅग मध्ये शिरलो. अशा प्रकारे आमचा संपूर्ण दिवस खूप काही आठवणींनी,अनुभवांनी मार्गी लागला होता.
क्रमशः
"घाटवाटांच्या मार्गे(शेवते घाट, मढे घाट,अंधारीची वाट) भाग-२ अंतिम " (वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
फोटो क्रेडिट्स -राहुल खोत, रवी खोसे, वरद पवार, पराग सरोदे, राजस देशपांडे
कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा, वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची...
सह्याद्रीचा भटकभवान्या...
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.








सुंदर
ReplyDeleteधन्यवाद काका...
Deleteसुंदर वर्णन .. संपूर्ण चित्र शब्दांमधून व्यक्त झाले आहे,
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteसुंदर.
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteMastach!
ReplyDeleteधन्यवाद मित्रा ...
Delete👌👌👌Mast...Dusra Blog Lavkar Purn Kar...Vaat Baghtoy...Can't Wait
ReplyDeleteहोय, लवकरच करतो पब्लिश...
DeleteKhup mast 👍👍
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteछान blog लेखन.... वाचतांना स्वतः अनुभूति घेतल्याचा अनुभव
ReplyDeleteधन्यवाद...
Delete