Friday, August 17, 2018

घाटवाटांच्या मार्गे(शेवते घाट, मढे घाट,अंधारीची वाट) भाग-२ अंतिम

"हिरवी चादर ल्यालेलं, पांढऱ्या धुक्यात, धुक्यातल्या त्या नभात गुडूप होणारं, आणि मेघसरींनी न्हाऊन निघणार, मध्येच कुठे मातकट चिखलाचे शिंतोडे,तर कुठे  गवतावर पडलेले गुरांच्या शेणाचे ढिगारे, आणि तृण-पाती-वल्ली-वृक्षांच्या अगणित हिरव्या छटा! अहाहा! अरे काय पाहिजे या जीवाला अजून? आमच्या सुखाची व्याख्या हीच! डोंगरात जाणं, डोंगरात जगणं आणि डोंगर अनुभवणं... बास!!!"
          घाटवाटांच्या ट्रेकचा पहिला दिवस खूप चांगल्या प्रकारे वर्णी लागला होता, दिवसभराच्या त्याच आठवणींना गोंजारत थकला जीव आडवा होऊन कधी निपचित झाला ते कळलं सुद्धा नाही. रात्री तीन साडेतीनच्या आसपास प्रीती ताई, आदी आणि त्यांच्यासोबत अजून एक पवन म्हणून आमच्या घोरण्यात सूर मिळवत आम्हाला सामील झाले.

आमच्या सुखाची व्याख्या हीच! डोंगरात जाणं, डोंगरात जगणं आणि डोंगर अनुभवणं... बास!!!
 सकाळी जाग आली उठून बसलो बहुतेक सगळेच आडवे होते, अक्षयही लगेच उठला होता. कोणी उठले नाही तर पटकन आपला सकाळचा कार्यक्रम उरकून घ्यावा म्हणत तिकडे पळालो. थोड्याच वेळात उठ रे उठ रे, आरडाओरडा करत सर्वानी एकमेकांना उठवले. झोप बऱ्यापैकी मिळाली होती आणि आराम देखील चांगला मिळाला होता,त्यामुळे कुणाची चिडचिड नव्हती, लगेच सगळी आवराआवर करून चहा-नाश्त्यासाठी एकत्र जमलो. प्रीती ताईने बॅग भरून खायचं सामान आणलं होतच त्यात पवन ने पराठे आणले होते आमच्याकडेदेखील थोडाफार खाऊ होताच. या सर्वांचा फडशा पाडत चहाचे घोट घेऊन दहाच्या सुमारास बॅगा पाठीला लावून पुढची तंगडतोड करण्यासाठी सज्ज झालो.
पावलाला पाऊल जोडत निघालेली हीच ती मांदियाळी 
दूर-दूरवर दिसणारा किचकट डांबरी रस्ता 

           आजच्या दिवसाच्या सुरुवातीचा ट्रेक थोडा कंटाळवाणा होता कारण सुरुवातीचं सहा-सात किलोमीटरच अंतर हे डांबरी रस्त्यावरून कापायचं होत. प्रत्येक ट्रेकर च्या बाबतीत हे असच असतं डोंगरातल्या वाटा-पायवाटा तुडवताना, मोठ-मोठाले चढ चढताना किंवा दिवसभर तंगडतोड करताना काही वाटत नाही पण तेच जर का डांबरी रस्त्यावरून चालायचं असेल तर ते एक किचकट काम होऊन बसत. रस्त्याला लागलो आणि जो तो ज्याच्या त्याच्या वेगाने अंतर कापत होता यामध्ये आमचेच तीन ग्रुप झाले होते, पुढला मधला आणि मागचा. या कंटाळवाण्या रस्त्यात मध्येच येणारी सर उगाचच अंग चिकट करून जायची.

  मध्ये एका ठिकाणी दगडखाणीच्या खड्ड्यात पाणी साचलं होतो त्यामुळे त्यात पोहण्याच्या इच्छेला आवर घालता आला नाही. मधले आणि मागचे आम्ही तिथे एकत्र आलो होतो, आमचा तिथे एक स्विमिंग ब्रेकच झाला होता, पुढचे तर एव्हाना दृष्टिपल्याड गेले होते. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, फोटो काढत आमची मस्त मजा चालू होती. सकाळचे अकरा जरी वाजले असले तरी वेळेची मर्यादा होतीच. पोहणं लगेच आवरत घेऊन पुढे गेलेल्यांना गाठायचं ठरवत पावलांना गती दिली. दहा एक मिनिटं चालून झाल्यानंतर तेजसच्या अस लक्षात आलं की त्याचा मोबाईल पोहत होतो तिथेच राहिला, साहेबांनी लगेच तिकडे धूम ठोकली. तेजस येईपर्यंत आम्ही आमचं बास्तान रस्त्यातच मांडून चकाट्या पिटत बसलो होतो. तेजस आला आणि आम्ही पुढची वाट धरली.
रस्त्यात चाललेली मस्ती
          केळद वरून शिवथरला जाण्यासाठी दोन वाटा आहेत पहिली कर्णावाडीमार्गे बोप्या  घाटातून उतरून शिवथर गाठता येतो तर दुसरी कुंबळे, वाघमाची मार्गे होडीने नदी पार करून, सांघवी  अंधारीच्या वाटेने सह्याद्रीवाडी गाठत पुढे शिवथरला पोचता येतो. पहिली वाट बऱ्यापैकी सोपी आणि कमी अंतरात होणारी होती तर दुसरी वाट याच्या उलट म्हणजे थोडी adventures आणि thrill देणारी होती त्यात पुन्हा होडीची मजा म्हणून आम्ही अंधारीच्या वाटेने खाली उतरायचा निर्णय घेतला होता. केळद वरून डांबरी रस्त्याने निघाल्यावर चार एक किलोमीटर अंतर कापल्यावर या दोन्ही वाटा फुटणारा फाटा आला. साहजिकच ठरल्याप्रमाणे आम्ही बोप्या घाटाची वाट सोडून वाघमाचीकडे जाणारी वाट धरली. एकवीस जणांचं टोळकं आपल्या पाठीवर गाठोडं घेऊन गाड्यांवर जायचं सोडून वाट तुडवीत चाललीत बोलल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष आपसूकच आमच्याकडे वळायचं आणि त्यातले काही जण विचारायचे सुद्धा की कुठे चाललात म्हणून. 
पल्लवी बाई 🤣🤣🤣🤣
अशाच एका आजीने विचारलं तर त्यांना सांगितलं की शिवथरला चाललोय म्हणून, त्यावर आज्जी आणि आमच्यात झालेलं संभाषण-
आज्जी : "पोरांनो कुठं चाललात?"
आम्ही : "शिवथर"
आज्जी : "हितनं कुठं चाललात म? त्यो रस्ता शिवथरला जातो"(त्या आम्हाला बोप्या घाटातून जाण्याबद्दल सांगत होत्या)
आम्ही : "आमची माणसं पुढं गेलीत याच वाटेने , त्यांना माहित आहे रस्ता "
आज्जी : "आर पोरांनो, तो रस्ता लांबचा हाय, या रस्त्याहुना जा" 
आम्ही : "आम्ही वाघमाचीतून सांघवी वरून जाणार आहोत"(आम्ही आमचंच घोड दामटवत होतो)
आज्जी: " तिकडं तुम्हाला होडी न्हाय मिळाची, ऐका पोरांनो" (खूप काळजीपोटी त्या आम्हाला सांगत होत्या, पण तरी आम्ही मात्र पुढेच चाललोत)
आम्ही: "होडीसाठी बोलणं झालंय आमचं अगोदरच"
(आमच्या या उत्तराने आजीचं देखील समाधान झालं होत, तसच त्यांच्या या काळजीबद्दल आम्हीदेखील थोडं कृतकृत्य झालो आणि पुढे चालू लागलो)
          रस्त्यात असच पुढे गेल्यावर दुचाकीस्वाराने देखील गाडी थांबवून विचारपूस करून बोप्या घाटातून जाण्याचा सल्ला दिला पण त्यांना सुद्धा पुढचं गणित सांगितल्यावर त्यांनी देखील आम्हाला शुभेच्छा देत आमचा निरोप घेतला. सव्वाबाराच्या आसपास कुंबळे गावाच्या इथे प्रीती ताई, राजस आणि बाकीच्यांनी देखील आम्ही येईस्तोवर ब्रेक घेतला होता, उभ्या उभ्याच बोलणं झालं की - आपला वेग खूप कमी आहे, जर वेग वाढवला नाही तर खाली उतरायला अंधार होईल. अंधाराची भीती नव्हती पण खाली लवकर उतरलेल आणि लवकर घरी पोचलेलं आपल्याला आणि आपल्या घरच्यांनाही खूप सुखदायक असत(तसही रोज घरी लेट येतो म्हणून घरच्यांच्या बोंबाच असतात, असो!).कुंबळे तुन पुढे जात वाघमाची हे गाव गाठलं. वाघमाची मध्ये होडीसाठी प्रीती ताईने अगोदरच बोलणं करून ठेवलं होत, नावाडी आले आणि आम्ही नदीतीराकडे चालू लागलो.
ट्रेकमध्ये होडीचा प्रवास म्हणजे जणू चार चांद 
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा !!!
आमची सर्वांची संख्या आणि होडीचे आकारमान बघता आमचे दहा आणि अकरा असे दोन ग्रुप केले. वीसएक मिनिटांचा होडीचा प्रवास असेल त्यामुळे त्याच वेळात जेवण करता येऊ शकतं म्हणून आणलेल्या जेवणाची विभागणी करून पहिला गृप होडीत बसला तर आम्ही दुसऱ्या गृपने तिथेच आणलेल्या शिध्यावर ताव मारायला सुरुवात केली. प्रीतीताईने रात्री येतानाच सर्वांसाठी भाकरी, पुरणपोळी, आणि चटण्या आणल्या होत्या त्यात सकाळी केळद वरून निघताना भाजी घेतली होती. सोबतीला दही देखील होतच. खरंच, या ट्रेक मध्ये जणू आमचा राजेशाही थाटच होता. अर्ध जेवण होतंय ना होतंय तोच पैलतीरावरून अभ्याने आवाज दिला पोचलो म्हणून. आँ!( वीस मिनिट होडीचा प्रवास म्हटलं होत, आणि हे 5 मिनिटात पोचले देखील...). नावाडी आता कधीही येतील म्हणून पटापट जेवण उरकायला लागलो तोच नावाडी मामांनी आवाज दिला. बाहेर काढलेलं जेवणाचं सगळं सामान तसच हातात घेऊन आम्ही होडीत बसलो. या इथेच जेवण हातात घेऊन होडीत चढताना मी विचित्र प्रकारे पडलो. 
          अजून एक इथे घटना घडली ती म्हणजे कसा कोण जाणे पण होडीला दिशा देणारा नांगर अचानक पाण्यात पडला. वरद आणि यज्ञेशने पाण्यात खाली जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मग नावाडी मामांनी तशीच होडी वल्हवत त्यांच्या जोडीला यज्ञेश, वरद, राजसने उगाचची कसरत करून आमचा होडीत बसण्याचा वेळ तेवढा वाढवला, आणि आम्हाला दुसऱ्या तीरावर पोचवलं. आम्ही दुसऱ्या तीरावर पोचेपर्यंत अगोदर पोचलेल्या ग्रुपने देखील जेवायची सुरुवात केली होती.
लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ।।-संत तुकाराम 
          मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे केळद वरून निघाल्यापासून आमच्यासोबत एक कुत्रा आलेला, आतापर्यंतच्या बहुतेक ट्रेकचा अनुभव असा की प्रत्येक ठिकाणी येणारा कुत्रा हा ट्रेकच्या शेवटपर्यंत सोबत असायचा. पण इथे मध्ये अचानक नदी लागल्यामुळे त्याला आम्ही पुढे घेऊ शकलो नाही. पैलतीर गाठून आम्ही त्याच्याकडे बघतच होतो. त्याने इकडे-तिकडे काही रस्ता आहे का बघायचा अंदाज घेतला आणि थेट पाण्यात सूर मारला. कुत्र्याच्या एकनिष्ठतेबद्दल बद्दल खूप ऐकलं होत,एखाद-दुसरी भाकरी आणि दोन-चार बिस्कीट काय दिली आम्ही त्याला आणि त्याने पोहत येऊन आमच्यासोबत पुढे केलेला ट्रेक हे सर्व डोळ्यात पाणी आणणारच होत.
नांगरणीला आलेला वेग 
समाधी शिळा 
          आता पुढची चाल धरली, घड्याळाने दोनचे ठोके दिले होते. शेतांच्या बांधावरची वाट धरून काही ठिकाणी चाललेली नांगरणी, काही ठिकाणी चाललेल्या लावणीच्या कामांचा वेग हे बघून लहानपणी काकाच्या शेतावर जाऊन चिखल तुडवायचे दिवस आठवले. तिथून थोडं वर गेल्यावर एक समाधीवजा दगडी चौथरा दिसला, शेतात काम करणाऱ्या माणसांकडे विचारपूस करून पल्लवीने सांगितलं की- जे लोक इच्छा व्यक्त करतात त्यांच्या नावाने त्यांचे वारस अशी शिळा उभी करतात. त्या शिळेच्या पुढे आम्हाला नागमोडी वाट लागली ही वळणावळणांची वाट पार करून आम्ही एका ट्रॅव्हर्सला(डोंगराला असलेला तिरपा रस्ता) लागलो. 
निसर्गाची किमया मनात भरून घेताना 
जुलैचा शेवटचा आठवडा असल्याने आणि वरुण राजाची चांगली कृपा बरसल्याने हा दुरदूरवर पसरलेल्या गिरीधारींनी नटलेला सह्याद्री, खळाळणाऱ्या जलप्रपातांच्या माळा लेवून वनराईच्या साक्षीने चांगलाच भाळला होता. हळूच मध्ये कुठे होणारा तुषारांचा शिडकाव, वातावरण कस मदमस्त झालं होत. या अशा धुंद वातावरणात चालताना भान हरपून जात होत, पण मध्येच कुठे पाय घसरून लटपटल्यावर भानावर यायला व्हायचं.  एक डोंगरधार उतरत असताना दुरूनच काही मोठमोठाले घरांचे शेड्स दिसू लागले. काही कारखाने किंवा फॅक्टरी आहे असच थोडंफार भासल, लोकवस्तीची अशी काही चिन्ह दिसत नव्हती. अंदाज आला पोल्ट्रीफार्म असू शकतात, पण लांबून अंदाज बांधणे चुकीचेच. जवळ गेलो असता कॉक-कॉक-कोकॉक च्या आवाजाने पोल्ट्री फार्मच असल्याची पुष्टी मिळाली. फार्म बऱ्यापैकी मोठं होत आणि इथे गाड्यांची येजा असल्याने आताची पायवाट ही पायवाट नसून हायवे झालेली होती.सांघवी गावाच्या हद्दीतील तो भाग होता.  
 
अंधारीच्या वाटेची सुरुवात 
        एव्हाना अंधारीच्या वाटेच्या वरपर्यंत आलो होतो आता पुढचं महत्वाचं काम म्हणजे अंधाराची वाट शोधून त्या वाटेला लागण. एव्हाना दिवसाचा तिसरा प्रहर अर्ध्यावर आला होता. आम्हाला लांबून अंधारीच्या देवाचा दगड आणि तिथला झेंडा दिसला, तिथल्या एका नाल्यातून आम्ही वर चढलो, या नाल्याचं आश्चर्य म्हणजे फक्त नाल्याच्या भागात तेवढा दगडांचा सडा पडला होता, त्या सड्यातून वाकडे-तिकडे पाय टाकत एक वाट धरली आणि एका पठारावर पोचलो. पठार कसलं स्वर्गच म्हणा! हिरवी चादर ल्यालेलं, पांढऱ्या धुक्यात, धुक्यातल्या त्या नभात गुडूप होणारं, आणि मेघसरींनी न्हाऊन निघणार, मध्येच कुठे मातकट चिखलाचे शिंतोडे,तर कुठे  गवतावर पडलेले गुरांच्या शेणाचे ढिगारे, आणि तृण-पाती-वल्ली-वृक्षांच्या अगणित हिरव्या छटा! अहाहा! अरे काय पाहिजे या जीवाला अजून? आमच्या सुखाची व्याख्या हीच! डोंगरात जाणं, डोंगरात जगणं आणि डोंगर अनुभवणं... बास!!! (ट्रेक संपून आज पंधरा दिवसांनी लिहितोय हे, पण असं वाटतंय कि त्या पठारावर जाऊनच लिहितोय)
स्वर्ग 

सांगाती 
अंधारीची वाट 
 
अंधारीची वाट, जणू अवघड घाट 
        मस्त फोटोसेशन करून दहाएक मिनिटे पठारावर आराम करून आम्ही आता अंधारीच्या वाटेला लागलो, वाटेची सुरुवात थोड्या अवघड पॅचवरून उतरून झाली. पुढची चाल ही घळीतून होती, अजस्त्र पडलेली दगडे, वरून बरसणारा पाऊस तर आमच्यासोबत घळीतून उतरणार धबधब्याचं पाणी. या सर्वांवर मात करत एकेकाला आवरत-सावरत, तिथे देखील एकमेकांची खिल्ली उडवत हळू हळू एक एक पाऊल आम्ही पुढे सरकत होतो. घळीतून उतरताना आमच्या सोबत असलेल्या कुत्र्याला काही ठिकाणी उतरायला जमत नव्हतं,पण त्याला मध्येच कुठे सोडायच नाही, म्हणून त्याला देखील उतरायला आम्ही मदत करत होतो.
 
बांधा-बांधावरून चाललेली भटक्यांची वारी 
         २१ जणांचं आमचं टोळकं २२ जणांचं कधी झालं हे कुणाला कळलं देखील नव्हतं. अंधारीच्या वाटेने उतरताना मध्ये मध्ये अंधारीच्या धबधब्याचही दर्शन होत होतं. घळीतला अवघड टप्पा करून आता सपाटीला लागलो होतो, सायंकाळ झाल्याची चिन्ह दिसत होती. पावलांचा प्रवास अखंडित होता. पुन्हा शेतांच्या बांधावरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो सह्याद्री वाडीत. हो सह्याद्री वाडीत! इतक्या वर्ष सह्यवाऱ्या करताना त्याच्याच नावाची एखादी वाडी असेल अस कधी वाटलं पण नव्हतं. आमच्या सोबत आलेल्या कुत्र्याला या वाडीतल्या एका काकांनी आणि त्यांच्या मुलाने बांधून घेतला, चला, आपल्यासोबत सकाळपासून फिरत असलेल्या आपल्या सवंगड्याला घर मिळालं हे पाहून आम्हालाही आनंद झाला. आणि त्या सह्याद्री वाडीतून पुढे चालते होत आम्ही त्या कुत्र्याचा आणि अंधारीच्या वाटेचा निरोप घेतला. 


 
ट्रेक पूर्ण झाल्यानंतर अंघोळ म्हणजे दुग्धशर्करा योगच 
       शिवथर हे आता आमच्यापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर होत, पावलांनीदेखील चांगली गती घेतली होती, ट्रेक आता आमचा पुर्णत्वासच आला होता. सांजेचा राजा काही दिसत नव्हता, घड्याळात साडेसहा झाले होते. आता चिंता फक्त एकच, आमचा बसचा ड्रायव्हर आम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोचलेला असण अपेक्षित कारण अंधाराची वाट सोडल्यापासून आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्याशी कसलाच कॉन्टॅक्ट होत नव्हता, आणि ट्रेक संपवून त्याला आता शोधणं हे एखाद्या चक्रव्यूहात पडल्यासारखंच होत. बांधावरच्या चालीनंतर आता एका नदीच्या पुलावरून चालताना त्या नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह कुणाला आवरता आला नाही, आणि अंगावरचे कपडे भिरकावत त्या नदीपात्रात डुंबण्याचा मनमुराद आनंद आम्ही घेतला. त्या हौसेला मुरड घालतच विश्वेशने तीन-चार वेळा सांगितल्यानांतर आम्ही आमचं पोहणं आवरत घेतलं आणि पुन्हा वाटेला लागलो. काळोख पडायला लागलाच होता, सातच्या सुमारास गावात जेव्हा पोचलो तेव्हा आमचा ड्रायव्हर बस घेऊन आमच्या सेवेसाठी अगोदरच हजर झाला होता, त्याला पाहताक्षणी आमच्या जिवात जीव आला, कारण कुठल्या अग्निदिव्यातून जाता जाता आम्ही वाचलो याचा प्रत्यय त्याच्या कालच्या दिवसाच्या त्याला एकट्याला जाण्याच्या संभाषणावरून आला असेलच. पटापट कपडे बदलून बसमध्ये बसलो आणि बस रवाना झाली ती पनवेलकडेच, मध्ये जेवणासाठी आणि चहासाठी थांबून रात्री दीडच्या आसपास आम्ही पनवेल गाठलं आणि तिथून तडक बुलेटला स्टार्टर मारून मी आणि रवी रात्री दोनच्या सुमारास घरी पोचलो.
स्वर्गानुभूती ... 
        एक अविस्मरणीय अनुभवांचं गाठोडं कनवटीला बांधून या घाटवाटांच्या ट्रेकची सुयोग्य सांगता झाली.

        समाप्त.

फोटो क्रेडिट्स -राहुल खोत, रवी खोसे, वरद पवार, पराग सरोदे, राजस देशपांडे,विश्वेश महाजन 
कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची, भेटूयात पुढच्या ट्रेकला.

साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या... 

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

6 comments:

  1. khup chan...as vatl ki mi suddha tumchyasobt trek kela...

    ReplyDelete
  2. वाघवाडी असे गावाचे नाव नाही तर ते वाघमाची असे आहे तसेच शांघवी असे नसून सांघवी असे गावाचे नाव आहे. यातील वर्णन केलेल्या कुंबळे या गावात माझे घर आहे, त्यामुळे पुन्हा कधी आलात तर माझ्याघरी नक्की या !!

    ReplyDelete
  3. वाघवाडी असे गावाचे नाव नाही तर ते वाघमाची असे आहे तसेच शांघवी असे नसून सांघवी असे गावाचे नाव आहे. यातील वर्णन केलेल्या कुंबळे या गावात माझे घर आहे, त्यामुळे पुन्हा कधी आलात तर माझ्याघरी नक्की या !!

    ReplyDelete