Monday, November 26, 2018

५० किलोमीटर - एक संयमी पायपीट

     "मनात असंख्य विचार येत, कोणी नाही म्हणून किती तरी कालावधीनंतर मारलेल्या स्वतःशीच गप्पा, विचारांचं माजलेलं काहूर, तरी सुद्धा ध्येयाशी अढळ राहून त्याच्या पूर्णत्वाचा चाललेला ध्यास! नव्हे, तर त्याच्या पूर्णत्वासाठी चालू असलेली तपश्चर्या! खऱ्या अर्थाने संयम म्हणजे काय हेच शिकवीत होती. कित्येक किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत झाला होता, सुरुवातीला घेतलेला वेग ते मध्येच माघारी फिरलेली पावले, गंतव्याच्या जसजसे जवळ येत होतो तसतसं मागील साडे अकरा तासच नव्हे तर या पंचवीस वर्षांतील कितीतरी कडू-गोड विस्मृतीत गेलेल्या आठवणींना उजाळा मिळत होता, कित्येक चेहरे नजरेसमोर येऊन गेले,ही जी काही अनुभूती होती ना तिचे मोल कधीच न चुकणारे होते. या सर्वांमध्ये चालू असलेल्या तंगडतोडीचा अलगद विसर पडायचा. ज्या ध्येयाने ही पायपीट आरंभीली होती त्याच्या उलट आता ही पायपीटच मला ध्येयाकडे नेत होती."
          दैनंदिन जीवनात कितीही व्यस्त रहा, कितीही यशाची शिखरे पादाक्रांत करा, वेळोवेळी तुम्हाला तुमच्या क्षमतांची चाचपणी घेता आली पाहिजे, यासाठी तुम्हाला स्वतःलाच नवनवीन आव्हानं देता यायला हवीत आणि  त्या आव्हानांना खर उतरता आलं पाहिजे. ट्रेक तर आता नेहमीचं झालंय, त्यातच काहीतरी वेगळं करायच्या उद्देशाने सचिन दादाचा ग्रुप वर मेसेज येतो "पनवेल ते कुसुंबळे पायी प्रवास, अंतर ५० किलोमीटर अंदाजे", त्रिपुरारी पौर्णिमेच्या नंतर शुक्रवारी रात्री १० वाजता निघून रात्रीच्या लक्ख प्रकाशात चालायला सुरुवात करून गप्पा-गोष्टी करत ध्येयावर पोचणे.
पायी पालखीचे भोई
          ठरलेल्या दिवशी वेळेप्रमाणे सगळे हजर झाले, या पनवेल ते कुसुंबळे पालखीचे भोई असणार होते प्रियेश दादा, प्रमोद, समिहन जोशी, मी, प्रिसिलिया, त्रिवेणी आणि सचिन दादा, आम्हाला सोडायला म्हणा, चिअर अप करायला म्हणा आमच्या निसर्गमित्र टीम मधला आमचा मित्रपरिवार देखील आला होता, सगळे एकत्र येऊन सगळ्यांना हाय-हॅलो करत, फोटो काढून आम्ही रात्री पावणे अकराच्या आसपास आमच्या प्रवासाला सुरुवात केली.
मैफिल
सुरूवातच, आणि सगळे नवीन ताजे दमाचे असल्यामुळे सगळ्यांच्या पावलांनी चांगलीच गती घेतली होती. हायवेवरच्या गोंगाटापासून सुरू झालेला प्रवास,भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या, धुळीचे लोट तरी देखील आम्ही आमच्या लयीत एकमेकांशी गप्पा मारत चाललो होतो. मुंबई-गोवा रोड हा सर्वांच्याच परिचयाचा आणि सध्या रस्त्याचदेखील बऱ्यापैकी रुंदीकरण झालेलं असल्याने चालताना असा काही धोका नव्हता, सेफ्टी साठी तरी ब्लिंकर लावलेले होतेच आणि मेंढरांच्या रांगेप्रमाणे सर्वजण एका रांगेत चाललो होतो.

          पनवेल-भिंगारी-पळस्पा -शिरढोण-कर्नाळा-कल्हे हे १६ किमीच अंतर नॉनस्टॉप तीन तासात मारत पहिला हुरूप चांगलाच मारला होता. सोबत असलेल्या चहा बिस्किटांनी तोंडसुख घेऊन दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मार्गाला लागलो. खारपाड्याच्या अलीकडे रात्रीच्या वेळी चहाच्या टपरीवर चहाचे घोट घेत पुढे मार्गस्थ झालो.नेहमी गजबजलेला असणारा खारपाड्याचा पूल शांत, निपचित पडल्यासारखा भासत होता, मध्येच एखादा येणार ट्रेलर टी शांतता भंग करून जात असे.
चहा,सात टाळकी आणि मनसोक्त गप्पा,
सुखाची व्याख्या आणखी काय असू शकते! 
खारपाडा-जिते करून चाल चालूच आहे तर माझी अवस्था थोडी दमल्यासारखी झाली, प्रियेश दादा आणि त्रिवेणी हे देखील आता मागे पडायला लागले होते. प्रिसिलिया आणि समिहनने आघाडी घेत छानपैकी अंतर कापण्यास सुरुवात केली . मी, प्रमोद आणि सचिन दादा वेगवेगळे किस्से सांगत मधल्या फळीला आम्ही चाललो होतो, प्रियेश दादा आणि त्रिवेणी मागून येतच होते. कधी सरळ चाल, कधी उलटी चाल, मध्येच धार मारायच्या बहाण्याने घेतलेला ब्रेक अस करत करत आम्ही पेण येण्याची वाट बघत होतो. कल्ह्यापासून निघून आता कल्हा-खारपाडा-जिते-गोविर्ले-तरणखोप हे पुढील १४ किमी अंतर पार करताना प्रियेश दा आणि त्रिवेणी जास्तच मागे पडले होते... पेण पर्यंत १५ किमीच अंतर गाठताना माझी देखील कसरतच चालू होती. सुरुवातीला ताशी ५किमी पडणारा वेग देखील एव्हाना कमी झाला होता. पेण गाठलं आणि पेट्रोल पंपाच्या इथेच आम्ही आमची बैठक मांडली आणि प्रियेश दादा, त्रिवेणी येण्याची वाट बघू लागलो. त्रिवेणीने आता थांबायचा निर्णय घेत पेणमध्ये असलेल्या तिच्या नातेवाईकांकडे ती गेली. पेट्रोल पंपातच चहाचा ब्रेक घेतला आणि पेट्रोल पंपात आम्हाला धुळीवर बसलेले पाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांची आपसांत कुजबुज चालायची. त्याकडे दुर्लक्ष करून मस्त चहाचे घोट घेत गप्पांचा फड रंगवला होता. इथून पुढे आता प्रियेशदादाने देखील आमची रजा घ्यायचं ठरवल.
पेट्रोल पंपावर मारलेली बैठक
या दोघांनी माघार घेतली आता पुढच्या स्टॉपला मीच गळणार अस मला मनोमन वाटू लागलं कारण राहिलेल्या आम्हा पाच जणात माझाच वेग कमी होता. सचिन दादाला मी हे बोललो देखील की पुढचा विकेट बहुधा माझाच, तर दादा बोलतोय आम्ही तुला वजा नाही होऊ देणार, उत्तरादाखल मी-वजा नाही झालो तर वजन होईल...
तिमिरातुनी तेजाकडे 

          पुढची चाल धरली पुढचा टप्पा होता आता वडखळ. पेणपासून वडखळ हे ६-७ किमीच अंतर. प्रमोद आणि समिहनने धावत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. त्यांच्या मागोमाग आम्ही तिघे चालतोय. पूर्वेला सूर्यनारायण तर पश्चिमेला शशिधर आणि मध्ये आम्ही पथकरी, एक छानसा संगम जुळून आला होता. हे सर्व असताना माझ्या तोंडी आपसूकच एक प्रार्थना आली  "इतनी शक्ती हमें दे ना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना..."(😂😂), मी हे बोलताना प्रिसिलिया आणि दादाला हसू आवरत नव्हतं. पावणेपाच वाजता पेण वरून सुरू केलेली चाल तासाभरात आम्हाला वडखळला आणते, वेग जरा वाढला होता आणि चौघांच्या चेहऱ्यावर उत्साहही होताच. वडखळला पोचलो बस स्टँडच्या समोरच बसून जरा आराम केला फ्रेश वगैरे होऊन बॅगेतील थोडंफार पोटात ढकललं. समिहनला घरी काम असल्याने आणि घरून फोनदेखील आल्यामुळे इच्छा नसतानाही त्याला वडखळवरून माघारी फिरावे लागले. 
समिहनला निरोप

         आता उरलो फक्त चार! समिहनला निरोप देत पुढच्या वाटेला लागलो, लांबच्या पायपीटीची माझी ही पहिलीच पाळी, आणि नाही म्हटलं तरी थोडाफार जाणवणारा गारवादेखील हवेत होताच, त्यामुळे पाय देखील बोलायला लागले होते. जित्याच्या अलीकडे सुरुवातीच्या २०-२२ किमीपासूनच माझी भांबेरी उडाली होती, तरी देखील स्वतःशी घेतलेल्या आव्हानाशी प्रामाणिक राहून तो यथोचित पार करण्याचा माझा आटोकाट प्रयन्त चालू होता.
चालतो अखंड मी चालायचे म्हणून 
रात्रभर चालून पोटात भुकेचा कल्लोळ माजला होता, नाश्त्यासाठी थांबायचं - नाही थांबायचं-पुढे जायचं या विचार-विनिमयात वडखळ नंतर jsw च्या पुलाच्या इथे एका घराच्या इथे पार आहे तिथे पाणी प्यायला थांबायचं अस प्रिसिलियाने सांगितलं, चला!अवघ अडीच किमीच अंतर कापायचं आणि मग मनसोक्त पाणी पिणार या हर्षोल्लासाने पावले पटापट पडू लागली, प्रिसिलिया आणि प्रमोद ही जोडी आघाडीवर तर त्यांच्यापासून चाळीसएक फुटांच्या अंतरावर दादा आणि मी आमची जोडी चालली होती, jswच्या अलीकडचा छोटा ब्रिज क्रॉस केला, jswला पण मागे टाकली, धरमतर खाडीच्या पुलावर आलो पण प्रिसिलिया आणि प्रमोद काही थांबायचं नाव घेत नाहीत, ते घर काही येत नाही आणि ते पार काही दिसत नाही , ते पाणी कधी मिळेल माहीत नाही, बॅगेतुन पाण्याची बॉटल काढून त्याचे घोट घेत हे दोघे कधी थांबतील याची अक्षरशः आ वासून वाट बघत होतो, पण जोडी आपली चाललीच आहे, थकली भागली देहे शहाबाजच्या हद्दीत आली, भूक म्हणतेय मी, पाय म्हणतात मी! आता मात्र मी देखील पायांचा वेग वाढवला पुढे चालत असलेल्या तिघांना गाठलं आणि सांगितलं- शेवंटपर्यंत मलाही चालायचं आहे, पण जर का घाई केली तर माझीदेखील विकेट उडेल आणि चार मधले तीनच राहतील.   आणि अस नको व्हायला पाहिजे असेल तर आता खरंच थांबुया, माझ्या हतबलते कडे बघून पुढे असलेल्या एका मोठ्या झाडाखाली थांबुया म्हणत रस्त्याच्या कडेला एका बंगल्याच्या गेटवरच आम्ही फतकल मांडली. पायातले शूज, सॉक्स काढून जितकं मोकळं होता होईल तितके मोकळे झालो. तोपर्यंत त्या बंगल्यातल्या काकांनी पाणी आणून दिल, आमच्या जवळ जो काही उरला सुरला खाऊ होता त्याने थोडीफार पोटातली क्षुधा शांत करून आराम करत होतो. रात्रीच्या वेळी चालताना थंडी लागेल, म्हणून मी जाड टी शर्ट घातला होता, पण सूर्यदेवाच आगमन झाल्यापासून ते टी शर्ट जड व्हायला झाल. बॅग मधून दुसरा टी शर्ट घालण्यासाठी काढला बघतोय तर चुकून मी मोठ्या भावाचा टी शर्ट उचलून आणला होता. आता हे ढगाळपगाळ घालण्यापेक्षा आहे त्यावरच निभावूया म्हणून पुढच्या टप्प्यासाठी तयार झालो.
          आता शेवटचे १०किमी अंतर राहिले, अस जेव्हा दादाने सांगितलं तेव्हा आपल्याकडून ही मोहीम फत्ते होणार या विचारानेच मनात मस्त हुरूप आला. घड्याळाचे काटे एव्हाना ८:३० वर आले होते. पुढची चाल धरण्याकरता उठलो खरा पण कसलं काय गुडघ्यांच्या खाली जणू काही पाय लॉकच झाले होते, हालचाल करताच येईना. कसा बसा आधार घेत उभा राहिलो तोवर या तिघांनी चाल धरली होती, उजव्या पायाने आता तंबीच दिली होती, गुडघ्यातून पाय हलवताच येत नव्हता, मांडीच्या साहाय्याने पाय पुढे सरकवून चालण्याचा प्रयत्न केला. माझी ही वाकडी चाल बघून प्रिसिलिया शूटिंग करत मजा घेत होती.

 पुढे एका झाडाखाली सगळे थांबले होते, माझी अवस्था बघून दादा बोलला की क्रीम लावतो का पायाला, ट्रेक मध्ये असताना असले काही चोचले कधी नसतात. पण आज जरा आक्रीतच करतोय उगाच अंगावर यायला नको म्हणून दादा कडून क्रीम मागितली, पण कसलं काय दादाला बॅगेत ती क्रीम काही सापडेना. संत तुकारामांचा अभंग आठवला "आलिया भोगासी, असावे सादर..." अस मनोमन म्हणत आता शेवटची उरली सुरली चाल धरली. उरल्यासुरल्या चाली बरोबर मी देखील आता उरलासुरला झालो होतो. शहाबाज नंतर प्रिसिलियाने सागींतलेल ते घर आणि पार आलं. मुंबई गोवा हायवेवरून आता कुसुंबळे कडे जायचा वळण घेतला, इथून कुसुंबळे आता ६ किमी.
          शेवट हा गोड असतो तसाच तो घाम काढणारा आणि त्रासदायक असतो,आणि मुळात केलेल्या त्रासाच्या उपरोक्त जर विजयोत्सवाची पताका मिळणार असेल तर तो  त्रास का करून घेऊ नये. माघार घेणं तर आता नव्हतंच, कासवाच्या गतीने सोडा गोगलगाईच्या गतीने का होईना पण आता पल्ला गाठायचाच. पुढच्या पावलांमध्ये आता अंतर पडायला लागलं, मध्येच कुठेतरी दिसेनाशी होत आणि एखाद्या वळणावर थांबलेली असत. माझा वेग आता खूपच कमी झाला होता त्यामुळे सगळ्यांना सांगितलं की तुमच्या चालीने तुम्ही व्हा पुढे फक्त वळण असेल तिथे थांबा. मी काही पडणार किंवा थांबणार नाही पण हळू हळू तुम्हाला गाठत राहील. मी आपला मस्त बोंबलत-कण्हत पाय टाकू की नको टाकू अशा अविर्भावात एक पाऊल टाकायचो आणि त्याच्या साथीला सूर भिडत दुसरं पाऊल आपोआप पुढे रेटायचो. वरून आग ओकणाऱ्या सूर्याची प्रचिती टीशर्ट मुळे जरा जास्तच जाणवत होती, ढगळपगळ का होईना पण जवळ दुसरा टी शर्ट आहे ना तो काढून भर रस्त्यातच मी टीशर्ट बदलला.
          टी शर्ट बदलल्यामुळे वरून हलकं हलकं वाटत असलं तरी खाली पायांचा चाललेला आनंदोत्सव शब्दात कसा मांडायचा हा गहन प्रश्नच आहे. एका तासाहून अगोदर सुरू झालेला शेवटचा ६ किमीचा प्रवास अजून संपायचा नावच घेत नव्हता. आता तर एका सरळसोट रस्त्यावरची चाल पकडली होती, खाडीच्या कडेने असलेला सरळसोट रस्ता,त्या रस्त्याला समांतर असलेली पाईपलाईन, कापलेली भातशेती आणि मध्ये मध्ये वीटभट्टीच्या कामाला लागलेली माणसं. थोडावेळ दिसणारी माझी पुढची सेना आता परत गुडूप झाली. त्या सरळ रस्त्यावर आता मी एकटाच आपले पाय रेटत चाललो होतो, मागे पुढे फक्त सरळ रस्ताच दिसत होता, चुकून एखादी गाडी यायची, बास!  इतकाच काय तो मनुष्यप्राण्याचा आभास(मी काही आता माणूस राहिलो नव्हतो, माझा या शेवटच्या टप्प्यात रोबोट झाला होता).
          कुठल्या गर्तेत अडकलो होतो काही कळत नव्हतं, अखंड चालू असलेली पायपीट आणि पायांची चाललेली वणवण,घरी दिमतीला गाड्या आहेत, घरी असताना चहा जरी मागितला तरी लगेच समोर येतो मग कशासाठी चालू होता हा इतका अट्टाहास तर त्यासाठी इतकंच -न करू शकणाऱ्या आव्हानांना पेलण्याची इच्छाशक्ती, एकट्याने का होईना पण घेतलेला संकल्प पार करता येतो ही शिकवण, मध्येच आलेला एकटेपणा देखील आपण हार मानली नाही तर आपल्याला जिंकण्यापासून परावृत्त करू शकत नाही हा धडा, नेटाने लढत रहा-विजय आपलाच आहे, अशी कितीतरी मूल्ये या अशा मोहिमांमधून शिकायला मिळतात आणि म्हणूनच काय तो हा अट्टाहास!
          मनात असंख्य विचार येत, कोणी नाही म्हणून किती तरी कालावधीनंतर मारलेल्या स्वतःशीच गप्पा, विचारांचं माजलेलं काहूर, तरी सुद्धा ध्येयाशी अढळ राहून त्याच्या पूर्णत्वाचा चाललेला ध्यास! नव्हे, तर त्याच्या पूर्णत्वासाठी चालू असलेली तपश्चर्या! खऱ्या अर्थाने संयम म्हणजे काय हेच शिकवीत होती. कित्येक किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत झाला होता, सुरुवातीला घेतलेला वेग ते मध्येच माघारी फिरलेली पावले, गंतव्याच्या जसजसे जवळ येत होतो तसतसं मागील साडे अकरा तासच नव्हे तर या पंचवीस वर्षांतील कितीतरी कडू-गोड विस्मृतीत गेलेल्या आठवणींना उजाळा मिळत होता, कित्येक चेहरे नजरेसमोर येऊन गेले,ही जी काही अनुभूती होती ना तिचे मोल कधीच न चुकणारे होते. या सर्वांमध्ये चालू असलेल्या तंगडतोडीचा अलगद विसर पडायचा. ज्या ध्येयाने ही पायपीट आरंभीली होती त्याच्या उलट आता ही पायपीटच मला ध्येयाकडे नेत होती.
          पावलाला पाऊल जोडत(सरकवत) माझी पालखी कुसुंबळे गावात पोचली, इथून पुढे आम्हाला मंदिर गाठायचं होतं. या रस्त्याला कुणी सहसा चालत येत नाही कारण गावही तस जास्त माहितीतील नाही, आणि मी तर असा चालत होतो की आपसूकच लोकांचं लक्ष माझ्याकडे जायचं आणि विचारपूस व्हायची, त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देत मी आपला पुढे सरकायचो. गावातील एक एक घर-गल्ली मागे टाकत आम्ही चाललो होतो.रस्त्यावरून एक झेंडा दिसला होता, मला वाटलं होत तेच मंदिर असावं, पण तिथवर पोचल्यावर आमची टीम काही दिसली नाही मग पावले अजून पुढे वळवली. पायांच्या तळव्यांची आता अक्षरशः घासणी झाली होती, वेग गोगलगाईचा झाला होता(यावेळी जर कासव सोडला असता तर खरंच माझ्या पुढेच गेला असता, इतक्या वेगाने मी सरकत होतो). पुढे बघितलं तर हे तिघे जण एका पायरीवर बसले होते. त्यांना तिघांना एकत्र बसलेले बघून मागच्या बारा तासांची चाल सर्रकन डोळ्यांसमोरून तरळून गेली. ध्येय माझ्या पासून आता अवघ ५० पावलांवर असेल, 
पण त्या प्रत्येक पावलागणिक बोलणारा तळवा, डोलणारा गुडघा, पोटऱ्या सार दुखणं समोरच्यांच्या डोळ्यांत बघून विरून जात होती. एका विलक्षण ध्येयपूर्तीचा, एका वेड्या आव्हानाचा, एका वेगळ्याच स्वप्नपूर्तीचा मी मनोमन स्वीकार करत होता. इथे मी ना नाचू शकत होतो, ना उड्या मारू शकत, ना धावत जाऊन कुणाला अलिंगन देऊ शकत होतो, पण तरीही संथपणे, शांतपणे एक विजयोत्सव आम्ही चौघे जण साजरा करत होतो. मॅप मध्ये अंतर मोजल, १२ तासात ५० किलोमीटरची पायपीट आम्ही यशस्वीरित्या पार केली होती. अशक्य वाटणाऱ्या अजून एका स्वप्नाला आमच्याकडून गवसणी घातली गेली होती. 
५० किलोमीटरच्या पायपिटीनंतर फुललेले चेहरे(फुगलेले पाय ) ...
परतीचा  प्रवास आणि स्वप्नांच्या दुनियेतील प्रवासी.
 मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, प्रमोदने छानपैकी सूर निरागस हो या गाण्याने मंदिरात सूर भीडवले, आणि तिथेच आम्ही पडलो होतो. विश्वेशला शहाबाजच्या इथेच असताना फोन करून सांगितलं होत, त्यामुळे तो देखील आम्ही पोचल्यानंतर थोड्याच वेळात आला. आज जो काही विश्वेश आला होता ना तो खरंच जणू काही आमच्यासाठी देव म्हणूनच होता. गाडीत बसलो आणि विसावलो ते पनवेल गाठेपर्यंत जणू बेशुद्धच.
STARVA मध्ये रेकॉर्ड केलेली आमची तंगडतोड
या सर्व प्रवासात दोन गोष्टी प्रकर्षाने शिकलो त्या म्हणजे
१.संयम
२.अंतर कितीही असलं तरी सुरुवात ही पहिल्या पावलानेच होते आणि म्हणूनच ते पहिलं पाऊल टाकायला घाबरू नका, करा हिंमत आणि व्हा पुढे.

(या प्रवासातला खरा शेवट जो काही होता तो एक वेगळाच हास्यास्पद होता, सर्व पायपीट संपवून पनवेलला आलो, तेव्हा घरून घ्यायला यायला कोणीच उपलब्ध नव्हते म्हणून बसने गावातल्या मागच्या स्टॉपवर आलो, तिथुन ते घरच अंतर अवघ अडीच तीन मिनिटांच आहे त्या अंतराला या तंगडतोडीनंतर ११ मिनिटे लागली😂😂)

फोटो क्रेडिट्स- प्रियेश दादा, प्रमोद, प्रिसिलिया.

साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या...

11 comments:

  1. मस्त जुळवलाय हे सगळं,
    स्वतः न येता पण हे सगळं शब्दातून अनुभवलं, असा वाटतंय,

    Keep it up,

    असच पुढे व्हा, माझ्यातला मी शोधण्यासाठी.

    ReplyDelete
  2. Thanks for sharing..... next time varila ja... ;-)

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय.

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय.

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय

    ReplyDelete