Thursday, July 11, 2019

गुमतारा- नाम कभी सुना हैं

पठारावरून दिसणारा बालेकिल्ल्याचा भाग हळू हळू जवळ येत होता, वाट ही तेवढीच खडतर होत होती, जंगल संपून आता परत चढ आणि ट्रॅव्हर्स, ट्रॅव्हर्स वरची वाट आता एक पायाची होऊन अजूनच भारी होती, खबरदारी घेऊनच एक एक पाऊल टाकत होतो, कारण एक चूक आणि खाली लोटांगणच! हा ट्रॅव्हर्स संपून घळीत पोचलो , पाऊस पडत असल्यामुळे घळीत पाणी वाहत होतं, दगडांना देखील नुकतीच शेवाळ पकडली होती, आणि कधीही सरकतील पडतील अशा स्थितीतील त्या घळीतील दगडांची रचना त्यामुळे स्वतःच्या पावलांसोबत पुढच्याच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे, कारण आपल्यामुळे नाही पण समोरच्याच्या चुकीमुळे एखादा दगड सरकला तर थेट कपाळमोक्षच! घड्याळाचे काटे बाराच्या पार गेले होते. अर्ध्याहून अधिक घळ चढून झाल्यानंतर पडकी बुरुजवजा तटबंदी दिसली आणि जीव भांड्यात पडला! आणि मुखातून अचानक तुकोबांच्या पंक्ती आल्या- "याचसाठी केला होता अट्टाहास...".
हिरवा शालू परिधान केलेला सह्याद्री.

पश्चिम घाटाने सह्याद्रीच्या रूपाने निसर्गाची जी काही मुक्तहस्त उधळण करून आपली ओंजळ भरली आहे ती कधीही रीती न होण्यासाठीच. घ्यावं तितकं कमीच आणि तितकंच नवं नवीन सामोरं येत जात, किती आणि कसं सामावून घ्यावं हे सर्व काही एका जन्मात, हा जणू यक्षप्रश्नच! आणि म्हणूनच पुन्हा जन्म मिळावा तो या सह्याद्रीच्याच कुशीत असं मनोमन वाटू लागत. याच सह्याद्रीला जोड मिळाली पराक्रमाच्या इतिहासाची, आणि म्हणूनच मागोवा घेत चाललो गडकिल्ल्यांच्या भव्यतेचा आणि त्यांच्या जाज्वल्य पराक्रमाचा. हेच गडकिल्ले फिरताना, सह्याद्रीतील वाटा धुंडाळताना अनुभवी दिग्गजांच्या मार्गदर्शनाची खूप मदत होत गेली, माहितीत भर पडत गेली, आणि माहीत असलेली नसलेली सह्याद्रीची रूपं समोर आली.
निसर्गमित्र परिवारातील रेस्क्यू टीमचे अनुभव ऐकताना असच एक नाव समोर आलं "गुमतारा किल्ला". नावाप्रमाणेच हा किल्ला खूप घुमवणारा आणि जे कोणी इथे जाऊन आलेत त्या सर्वांची एकच शिकवण "पुन्हा जाणे नाही...". घनदाट जंगल, खूप साऱ्या वाटा गावातून येणाऱ्या वाटा, लाकुडतोड्यांच्या वाटा, प्राण्यांच्या वाटा, आणि वाढलेलं गवत यामुळे नेमकी वाट शोधणं जिकरीचे, त्यामुळेच गुमतारा हे नाव या किल्ल्याला साजेसं होत. जीवाला खाज म्हणा की काय तेव्हाच ठरवलं होतं या किल्ल्यावर जायचंच. जेव्हा ठरलं की जायचं तेव्हा सर्वांना सांगितलं आणि चला सोबत म्हणून. तेव्हा अक्षरशः एकेकाने माझी पंचारतीच केली होती. रवी, प्रमोद, अमेय, आणि मी आम्ही चौघांनी जायचं ठरलं(चौघांपैकी अगोदर कोणीही किल्ल्यावर गेलेला नव्हता).
जे अगोदर जाऊन आलेत त्यांच म्हणणं.
विश्वेश : किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी घेऊन सोडायला येईल, पण वर नाही...
पराग : ज्या दिवशी गुमताराचा रेस्क्यू करून आलोय, तेव्हाच ठरवलंय दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण परत या किल्ल्यावर येणार नाही, आपली मैत्री तुटली तरी चालेल.

सचिन दादा : (फक्त हसतोय, चेहऱ्यावरील भाव बघायला मजा आली असती) जाल तेव्हा दिवसभराच लाईव्ह लोकेशन शेअर करून ठेवा.
प्रशांत : (आदल्या दिवशी)बघा जायचा का नाही विचार करा, गेलात नाही तरी कोणी काही बोलणार नाही.

या सर्वांच्या शुभेच्छा घेऊनच आम्ही मार्गस्थ झालो. जाताना आमच्या चर्चेचा एकच विषय, आपल्या मित्रांचे अनुभव बघता आपण वाट चुकणारच. पण ठीक आहे आपण भरकटणारच आहोत हे मनोमन पक्क ठरवूनच पायथ्याच गाव जवळ केल होत. प्लॅन निश्चित झाल्यापासून ते किल्ल्याचा पायथा गाठेपर्यंत जितक या किल्ल्याबद्दल वाचता येईल तेवढ वाचून काढलं होत, किती तरी वेळा मॅप रिडींग चालू होत. दुगाड, घोटगाव, भिवली, वज्रेश्वरी, तुंगारेश्वर या भागातून किल्ल्यावर जायला वाटा आहेत, त्यातल्या त्यात दुगाड गावातून जाणारी वाट थोडी श्रमाची पण कमी वेळात वर चढवणारी आणि आम्ही चौघेही बऱ्यापैकी चालणारे असल्याने त्या वाटेने वर जायचं ठरवलं होत, प्रत्यक्षात वाटेच्या इथे पोचलो आणि कुणाला तरी विचारावं म्हणून बाईकवरून जाणाऱ्या तिथल्या दोन मुलांना थांबवून किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं इथून(दुगाड गावातून) जाणारी वाट कमी वेळात नेणारी असली तरी कठीण आहे आणि तुम्हाला नाही जमणार (जमली असती, नसती किंवा जमवून आणली असती किंवा सोडून दिली असती हे त्या वाटेवर गेल्यावरच कळलं असत). डोंगरात इतकी वर्ष वावरण्याच्या अनुभवावरून स्थानिकांच्या शब्दाबाहेर शक्यतो कधी जायचं नाही आणि म्हणूनच आम्ही त्या दोघांचं(पंकज, राजू) म्हणणं ऐकून ते सांगत होते ती वाट म्हणजे घोटगावातून जायचं ठरवलं. तेव्हाच एक मावशी आम्हाला पास होत होत्या त्यांना त्या मुलांनी सांगितलं की हे किल्ल्यावर चाललेत तेव्हा मावशी बोलल्या "सुऱ्याला सांग, तो घरी आहे, तो घेऊन जाईल..." वाट दाखवायला गावकरी मिळतोय म्हटल्यावर सुंठीवाचून खोकला गेला. तेवढ्यात अजून एक सहा जणांचा ग्रुप दुगाड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आला. त्यांच्याशी बोलून वाटेबद्दल काही माहिती आहे का विचारणा केली, तर कळलं तेदेखील पहिल्यांदाच आलेत. आमच्या अभ्यासावरून आम्ही त्यांना सांगितलं की ही वाट थोडी कठीण आहे,आणि आम्ही वाट दाखवायला गावकरी सोबत घेतोय, तर तुम्ही आमच्यासोबत चला सगळे एकत्रच जाऊ... गावकरी घेण्याबद्दल तर त्यांचा नकारच होता, उलट ते आम्हाला सांगत होते की आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. एक जणही यापुर्वी किल्ल्यावर आलेला नसताना अशा दुर्गम ठिकाणी जाताना गावकरी किंवा वाटाड्या सोबत न घेणे, हे आम्हाला पटलं नाही आणि म्हणूनच तिथेच त्यांचा रामराम घेत पंकज आणि राजुच्या मागोमाग घोटगावाकडे रवाना झालो.आणि हे दोघेच आमच्यासोबत किल्ल्यावर यायला तयार झाले.
राजुने आम्हाला त्याच्या शेतावरच्या घराजवळ थांबायला सांगून ते घरून त्यांना लागणार सामान घेऊन आले. सकाळी साडेसहाला सुरू झालेला प्रवास बुलेट वरून कोपरखैरणेपर्यंत आणि तिथून कारने आणि रवीने गुमतारा किल्ल्यावर जातोय म्हणूनच घुमवून घुमवून आणलेल्या गावा-गावातल्या रस्त्याने पावणे दहाच्या आसपास संपवून आम्ही पायथा गाठला होता. राजुच्या त्या शेतावरच्या घरात लहान मुलं हात-पंपावर मस्त खेळत होती.
दहा वाजता आम्ही वाट धरली आणि किल्ल्याकडे मार्गस्थ झालो. गाडी पार्क केल्या केल्या लगेचच डांबरी रस्ता सोडून मातीच्या रस्त्याला लागलो, शेताच्या बांधावरून, मातीच्या घसाऱ्यावरून तर कधी ओहोळातून चिखलाला सावरत, शेतात उगवलेल्या भाताच्या आवणाची काळजी घेत आमचा सहा जणांचा चमू आता निघाला होता. सुरुवातीला जी आपण वाट चुकणारच आहोत ही खूणगाठ बांधून ठेवली होती ती पंकज आणि राजुच्या सोबत असण्याने कुठल्या कुठेच गायब झाली होती. आता फक्त वेळ किती लागेल आणि वाट लक्षात ठेवण हेच काम आमच्या पदरी होते. सुरुवातीची वाट ही साधी सुलभ असल्याने आजूबाजूचा परिसर न्याहाळता येत होता. वरती मस्त काळ्या सावल्या नभांचा चाललेला लपंडाव, त्यात मधेच येणारी फसवी सर, किल्ल्याच्या अगोदरच्या टेकडीचा पसारा, त्यावरील दाट, गर्द वनराई, त्या खालोखाल समोर पसरलेली शेती आणि त्यातून झुळझुळ करत वाहणारे ओढे, मस्त बांधावरून चाललेली चिखल-मातीची पायवाट त्या वाटेवर उमटत चाललेले आमचेच पायाचे ठसे, वाऱ्याची गाज, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याची खळखळ... निसर्ग संगीताने चांगलाच ठेका धरला होता.
बांधावरून चाललेली वाट संपून एका झोपडीपाशी आली. त्या झोपडीच्या पडवीतच तिथली आजी आपल्या नातवासोबत कसल्यातरी बियांचा पसारा काढून काहीतरी करत होत्या. आजीच्या चेहऱ्यावरील स्मित, आणि सुरकुत्या त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव करून देत होत्या. नातू आपला मस्त रमला होता. आजी-नातवाचं ते नात कॅमेऱ्यात कैद करून पुढची वाट चालायला लागलो. ही झोपडी शेवटची होती आता याच्यापुढे मनुष्यप्राण्याची आमच्या व्यतिरिक्त कोणतीही चाहूल नव्हती. दाट झाडीत प्रवेश करून किल्ल्याच्या आगोदरचा टेकाड उजव्या बाजूला ठेऊन वळसा घालत चढाई चालू होती. चढ जरा बऱ्यापैकी होता, गावकरी, शिकारी, लाकूडतोडे यांचा वावर असल्याने वाट देखील मळलेली होती. दुर्गम आणि दुर्लक्षित किल्ला असल्याने जास्त कोणी इकडे फिरकत नाहीत, त्यामुळे कचऱ्याचा वा निसर्गाच्या हानीचा जास्त काही प्रकार नव्हता. राजू आणि पंकजशी गप्पा मारत असताना कळले की ते देखील इकडे शिकारीसाठी येतात. वृक्षराजी बऱ्यापैकी बहरलेली आणि हा परिसर तुंगारेश्वर अभयारण्याच्या क्षेत्रातच असल्याने जंगली श्वापदांचा देखील इथे वावर असल्याचे समजले. झाडी इतकी दाट होती की काही ठिकाणी दिवसाचा उजेड देखील येत नव्हता. त्या दाट जंगलातील शांतता इतकी भयावह होती की बास! वाऱ्याची झुळूक आल्यावर मध्येच होणारी पानांची सळसळ आणि पक्षांची किलबिल त्या दाट जंगलातील शांतता भंग करीत होती. पावलांच्या आवाजाची एव्हाना सवय झाली होती.
पुढे चालणाऱ्या राजू आणि पंकजच्या मागोमाग आम्ही चालत होतो, आम्ही बऱ्यापैकी ट्रेक करत असलो तरी त्यांचा तो होमग्राउंड असल्याने आम्ही त्यांच्यासमोर काहीच नव्हतो. अमेय तर सहा महिन्यांनी डोंगरात आला होता. रस्ता पूर्ण चढाचाच असल्याने आमची देखीक पुरती हौस झाली होती. पावसाळा असताना देखील घामाच्या धारांनी आम्ही सगळे चिंब न्हाऊन निघत होतो. एखाद्या ललनेने केसांवरची भिजलेली बट सावरत उडवावी आणि त्यातून ते ओले तुषार उडावे तसेच काहीसे घामाचे थेंब मानेला हिसडा दिल्यावर चेहऱ्यावरून उडत होते. एक मात्र खर होत खूप दिवसांनी, महिन्यांनीच म्हणा ना अशा ठिकाणी वावर होत असल्यामुळे मनाला एक वेगळीच उभारी मिळत होती. पंकज वाटेत मिळणारी रान फळे टिपून कुठली खाण्यायोग्य कुठली अयोग्य हे सांगून वेगवेगळ्या चवी जिभेवर टेकवत होता. कुसवा, अळू, केळ, उंबर अशा वेगवेगळ्या फळांचा नजराणा तो समोर पेश करत होता. वाटेत जाताना आम्ही देखील वाट भरकटू नये म्हणून मध्ये मध्ये दगडांचा मनोरा(cairn) ठेवून तसेच झाडांवर खुणा करून वाट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या गर्द हिरवाईच्या जणू काही अंतरंगातच प्रवेश केला होता.
एव्हाना किल्ल्याच्या अगोदरचा टेकाड संपून किल्ल्याच्या माचीवर जाणाऱ्या चढावर चढायला सुरुवात केली. पहिल्या टेकाडापेक्षा हा अजून तिरपा चढ असल्याने छाती अक्षरशः फुलून निघत होती. पावसाचे दिवस होते, पण पावसाची चिन्हे दिसत नव्हती वातावरण नुसतच ढगाळ होऊन राहील होतं, झाडांची पालवी देखील शांत-स्तब्ध, वाऱ्याची झुळूक तर केव्हाची स्पर्शून गेली होती. त्यामुळे अंगाची अजूनच लाहीलाही होत होती. एखादा झरा दिसावा आणि त्यात चिंब भिजावं पण असा झराही कुठे नव्हता. मोठ्या धबधब्याचा आवाज येत होता पण तो खूप लांब असल्याने त्याच्याखाली भिजायला जायचा प्रश्नच नव्हता. शेवटी दमली भागली पावले धिम्या गतीने वर सरकत होती...गाव सोडल्यापासून जो काही चढ लागला होता तो सलग तासभर चढून गेल्यावर रवी, अमेय, पंकज पुढे गेले होते, राजू एका दगडावर बसला होता, मागून मी आणि प्रमोद येत होतो, इतक्या वेळ दाट झाडीतून चालत गेल्यावर एक अर्धवर्तुळाकृती झाडांची कमान झाली होती आणि त्यातून किती तरी वेळा नंतर आम्हाला सुलभ आकाशदर्शन झालं होतो. चढ चढून जस जसा एक एक पाऊल वर येतोय तर समोर पाहतोय तर डोळ्यांचं पारणं फेडणार दृश्य आमच्या स्वागताला उभं होत. हा मोठा पसरलेला मोकळा पठार, त्यावर पसरलेली हिरवी चादर, आजूबाजूला पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, त्यावरील नक्षीदार जलप्रपात, वाऱ्याचा आवेग संगे पांढऱ्या शुभ्र धुक्याला ताल धरायला लावणारा ठेका अन अचानक येणारा रिमझिम शिडकावा, नजर जाईस्तोवर स्वर्ग, स्वर्ग नि स्वर्गच! अरे कोणी पाहिलंय मेल्यानंतर स्वर्ग कसा दिसतो, इथे तर आम्ही जगत होतो,अनुभवत होतो... खडतर असा प्रवास विसरून नेत्रसुखद अनुभवाने आयुष्याच्या सुखद क्षणांच्या झोळीत अजून एक ओंजळ टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो.. पठारावर पोचलो आणि एका खडकावर पाठ टेकवली जणू काही समाधिस्त होण्यासाठीच!
स्वर्ग
दाट  झाडीतून जाणारी वाट 

हा पठार म्हणजेच किल्ल्याची माची, याच पठारावर भिवली, वज्रेश्वरी गावातून येणारी वाट मिळते. रवीने लांबून दगड मारून मला जागे केले, तो आणि अमेय एकमेकांशी बोलत एक बाजूला बसले होते तर प्रमोद,राजू,पंकज यांचं फोटोशूट चाललं होतं. मीही आपला उठून राहिलो दोन-चार फोटो उडवले, थकवा आता कुठल्या कुठे पळाला होता आणि आम्ही पुढची वाट धरली. आताची वाट ही जरा बिकट होती, चढ जरी आता कमी असला तरी झाडी अजून घनदाट झाली होती, पालापाचोळा आणि गवतामुळे काही ठिकाणी तर वाट अक्षरशः गायब झाली होती. चकवा का लागतो किंवा वाट का चुकू शकतो या दिव्यातूनच आम्ही चाललो होतो. किल्ल्याच नाव खरंच सार्थकी लागत होतं. काही वर्षांपूर्वी आमची माणसं इथे रेस्क्यू साठी आली होती त्यांची काय अवस्था झाली असेल याची प्रत्येक पावलावर प्रचिती येत होती. राजू आणि पंकजमुळे आम्ही निर्धास्त असलो तरी पावलागणिक मनात उठणार विचारांचं काहूर थांबवू शकत नव्हतो. सुरक्षितता म्हणून पावलांमध्ये जास्त अंतर न ठेवता एकमेकांच्या नजरेच्या पल्ल्यात राहूनच पुढची तंगडतोड करत होतो. पंकज आणि मी एका ठिकाणी वाट वाकडी करून अळूची फळे सर्वांसाठी घेऊन आलो, आंबट अशी चव घेऊन सगळं तोंड आंबट झालं होत. झाडी आता अजून घनदाट झाली आणि बांबूच्या दाटीतून वाकून-ओणवे होऊन वाट कापत होतो. सरळ उभा राहायला काही जागाच नव्हती. वाट लक्षात ठेवण आता आवाक्याबाहेरच होत होत..कारण वाट असली तर लक्षात राहते, इथे वाटेचा मागमूसही नव्हता, पंकज राजू इथले स्थानिक असले तरी त्यांच्या पदरी सुद्धा इथे चुकल्याचा अनुभव होताच. इतक्यात तेवढ्या दाट जंगलात दोन माणसं आणि त्यांच्यासोबत एक कुत्रा येताना पाहिला. त्यांच्याशी बोलता बोलता समजलं की जो आम्हाला खाली ग्रुप भेटला होता ते भरकटले होते, त्यांना या काकांनी वाट दाखवली, पण तरी सुद्धा वाट बिकट असल्याने त्यांचं काही खरं नाही, हे त्या काकांच्या बोलण्यावरून समजत होतो. निसर्गात फिरण्याच्या अनुभवावरूनच स्थानिक वाटाड्या सोबत घेण्याच्या शहाणपणाचं आम्ही चौघांनी एकमेकांकडे बघून कौतुक केलं आणि परत आपली वाट धरली. दुगाड गावातून येणारी वाट सुद्धा आता आम्हाला मिळाली होती. असाच गप्पांचा ओघ चालू असताना पंकज आणि राजूला आम्ही आमचे मित्रा ५-६ वर्षांपूर्वी एका रेस्क्यू साठी आलेले आणि ती घटना सांगितली तेव्हा कळले की त्यांच्यापैकी पंकजचा भाऊ देखील त्या शोध मोहिमेत सहभागी होता. त्या मृत व्यक्तीचे शरीर जिथे पडले होते, ती जागा देखील त्यांनी आम्हाला दाखवली.
पठारावरून दिसणारा बालेकिल्ल्याचा भाग हळू हळू जवळ येत होता, वाट ही तेवढीच खडतर होत होती, जंगल संपून आता परत चढ आणि ट्रॅव्हर्स, ट्रॅव्हर्स वरची वाट आता एक पायाची होऊन अजूनच भारी होती, खबरदारी घेऊनच एक एक पाऊल टाकत होतो, कारण एक चूक आणि खाली लोटांगणच! एका बाजूला दिसणाऱ्या बालेकिल्ल्याचा भाग, एका बाजूला दूरवर दिसणारा भिवंडी भाग तसेच दुगाड गावातून येणारी वाट सुरुवातीला ज्या टेकडीवर येते ती टेकडी आणू दुगाड गाव आणि पाण्याने भरलेली शेती हे सार विहंगम दृश्य दिसत असलं तरी वाटेवर आणि त्या वाटेवरच्या प्रत्येक पावलावर भान ठेवण तितकंच गरजेचं होत. हा ट्रॅव्हर्स संपून घळीत पोचलो , पाऊस पडत असल्यामुळे घळीत पाणी वाहत होतं, दगडांना देखील नुकतीच शेवाळ पकडली होती, आणि कधीही सरकतील पडतील अशा स्थितीतील त्या घळीतील दगडांची रचना त्यामुळे स्वतःच्या पावलांसोबत पुढच्याच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे, कारण आपल्यामुळे नाही पण समोरच्याच्या चुकीमुळे एखादा दगड सरकला तर थेट कपाळमोक्षच! घड्याळाचे काटे बाराच्या पार गेले होते. अर्ध्याहून अधिक घळ चढून झाल्यानंतर पडकी बुरुजवजा तटबंदी दिसली आणि जीव भांड्यात पडला! आणि मुखातून अचानक तुकोबांच्या पंक्ती आल्या- "याचसाठी केला होता अट्टाहास...".
याचसाठी केला होता अट्टाहास...
तटबंदी पार केली आणि किल्ल्याच्या आवारात प्रवेश झाल्याचे जाणवले, तटबंदीचे दगड इतस्ततः पडले होते. तटबंदीच्या पुढेच एक कोरीव पाण्याचं टाक होत, पावसाळी दिवस असल्याने टाकं एकदम काठोकाठ भरलं होतो. त्याच दिशेने थोडा कडेला गेलो तर समोरून अजून एक खालच्या कुठल्या तरी गावातील पोर अजून एका वाटेने वर येत होती. १५-२० जणांचा तो घोळका पार दंगा करत येत होता.

समोरच त्या टेकडीवर पत्र्याची शेड असलेलं मंदिर होत, वाऱ्यामुळे पत्रे लूज झाले होते आणि फडफड करत असल्यामुळे येणारा कर्णकीर आवाज नैसर्गिक आवजाना नजर लावत होत. त्या घोळक्याला पुढे जाऊदे म्हणून आम्ही होतो तिथेच जरा वेळ थांबलो. लगेच पुढेच मुख्य दरवाजा अस एका दगडावर लिहिलं होतं आणि काही दगड रचले होते जणू काही गतप्राण झालेल्या त्या दरवाजाची साक्ष देत. इतिहासाचे मूक साक्षीदार इतिहासजमाच होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत होते. संपूर्ण गुमतारा किल्ल्याला त्या एका शिळेत सामावून त्याच्यासमोर नतमस्तक होऊन पुढील गडफेरी आरंभिली. दरवाजाच्या पुढेच अजून ५ टाकी होती. ही सगळी टाकी काही वर्षांपूर्वी बुजली होती, त्यातील एकच टाकं सुस्थितीत होतं पण गेल्या वर्षात सह्याद्री प्रतिष्ठानने येथे बरेच श्रमदान घेऊन या टाक्यांचा गाळ काढून टाके साफ केले तसेच बाकी साफसफाईचे काम आणि काही महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक देखील लावण्याची तसदी घेतली आहे. यातील सध्या दोन टाक्यांच पाणी नितळ होत, तर तीन टाक्यांमध्ये थोडी माती वाहून आल्याने पाणी गढूळ झालं होत. तो आलेला घोळका इथेच थांबला होता, त्यांना तिथेच रामराम ठोकून आम्ही गडमाथ्याकडे जायला निघालो.
किल्ल्याचा गडमाथा जास्त विस्तीर्ण असा नाही, पण आजूबाच्या परिसरावर नजर ठेवायला याच्याशिवाय दुसरा माथा या भागात नाहीच. आजूबाजूला दिसणारा तुंगारेश्वर,वज्रेश्वरी,भिवंडी हा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळत केलेल्या कष्टाच चीज झाल्याचं मनोमन वाटत होतं. गडमाथ्यावर असलेल्या झेंड्याजवळच अमेय ब्रम्हानंदी गेला होता. विश्वेश, पराग, सचिन दादा यांना मुद्दामून फोन(व्हिडीओ कॉल) करून वर पोचल्याची पुष्टी दिली, आणि वर डब्याला मटण आणलंय या खायला अस सांगून मुद्दामून जीव देखील जळवला. पंकजने रानकेळीच मूळ आणून आम्हाला खायला दिल होत. जंगलातल्या भ्रमंतीच खर मर्म हेच असतं, विविध प्रकारची रानफळ आपल्याला चाखायला मिळतात. निसर्गाच्या श्रीमंतीचा आणि अगाधतेचा परिचय येथे आल्यावरच आपल्याला कळतो. या निसर्गाशी मैत्री करून त्याच्याकडून खूप काही आपल्याला मिळवता येत. पण त्याच्याशी वैर पत्करून त्याच्या शक्तींना आव्हान देण्याची चूक चुकूनही कधी करू नका, हे बाळकडूच आम्हाला अनुभवातून मिळतं गेलं आहे, त्यामुळे तस करण्याचं धाडसदेखील आम्ही कधी करत नाही. पंचमहाभूतांपैकी अग्नी सोडलं तर बाकी सर्वांचं मनोमिलन अस काही झालं होत की बास! हिरवाईने नटलेली धरा, वायूसंगे फडफडणारा बालेकिल्ल्यावरील भगवा, धवल-पांढर आकाश, त्या आकाशातून बरसणारा मल्हार, सर्व काही विलक्षण आणि अद्वितीय! बालेकिल्ल्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन खालचा परिसर न्याहाळताना किल्ल्याची माची दिसत होती, पंकज राजू इतर माहिती सांगत होते, तिथेच जरा वेळ बसून खाली पठारावर जाऊन जेऊया अस ठरलं. सर्वांचा ग्रुप फोटो घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, बालेकिल्ल्यावरून माचीवर जायला दुसरा एक रस्ता आहे अस पंकज राजुने सांगताच आम्ही त्या वाटेने जायचा आग्रह केला, पहिल्या वाटेपेक्षा दुसरी वाट कशी आहे हे देखील समजेल आणि वेगळं काहीतरी पहायला मिळेल हीच काय ती आस.
एक विजयी भावमुद्रा 
याच कपारीत पाण्याचा झरा आहे 
गडउतार होताना अजून एक ग्रुप वर आला होता, यामध्ये महिला देखील होत्या. खाली उतरत असताना आजूबाजूचा परिसर न्याहाळताना दुगाड गावातून येणाऱ्या वाटेवर जी पहिली टेकडी लागते तिच्या माथ्यावर आम्हाला तो ग्रुप दिसला आणि ती वाट न पकडता स्थानिकांना सोबत घेतलं याच सार्थकी लागलं. पाण्याच्या टाक्यांच्या इथून खाली दरवाजाकडे न जाता मंदिराकडे जात आम्ही दुसऱ्या वाटेने उतरायला सुरुवात केली. दगडांची पडझड आणि त्यावर पडणारे पाणी यामुळे चिकट झालेल्या त्या दगडांनी वाट अजून कठीण केली होती, त्यात वरून पडणारे पाणी. एका बाजूला उभा कातळ, आणि रानकेळीच्या झाडांनी भरलेली वाट. अस वाटत होत जणू काही केळीच्या बागेतच वावरतोय. तुटलेल्या कड्याचे ते दगड धस्स करणारे होते. इथेच एका ठिकाणी बाराही महिने पाझरणारा झरा आहे. वाट काढत काढत अखेर आम्ही पठारावर पोचलो,

पावसाची पिरपीर चालू असल्याने एका झाडाखाली थांबून डबे उघडले. मी सर्वांसाठी मटण-चपाती नेली होती, प्रमोदने आम्लेट आणि चपाती नेली होती. माझा डब्बा उघडायला गेलो तर आक्रीतच झालं. डब्यात फेस आला होता,बघतोय तर मटण खराब झालंय, तो फेस बघून आता आमच्या तोंडाला फेस यायची पाळी आली होती. कारण भूक अशी काही सडकून लागली होती, आणि मटण आणल्याच मोठं मिरवल होतं. क्षणात पूर्ण तंगडतोड आठवली आणि गावात जायला किती वेळ लागेल तोवर पोटातल्या कावळ्यांना कसं शांत ठेवावं हे आणि असे अनेक विचार मनात येऊन गेले. प्रमोदने आणलेल्या आम्लेट बरोबर प्रेत्येकाने लावून लावून एक एक चपाती खाल्ली. तेवढ्यात लक्षात आलं - अरे थर्मास भरून चहा आणलाय आपण आणि चहा बरोबर चपाती खाऊ शकतो. आम्लेटचा डब्बा रिकामा केला त्यातच थर्मास खाली केला आणि यथेच्छ सगळ्या चपात्यांचा फडशा पाडून मटणावरची क्षुधा चहावरती क्षमवली.
आम्ही पोटपूजा करत असताना खालच्या कुठल्या तरी गावातला ग्रुप पठारावर येऊन मातीवर पाणी टाकून चिखलात घसरगुंडी खेळत होते. त्यांचा तो खेळ बघून मला देखील माझे लहानपणीचे दिवस आठवले, आणि पुढचा मोह आवरणे मला शक्य झालं नाही. पटकन हात धुवून मोबाईल, घड्याळ तिथेच ठेवून कपड्यांचा कसलाही विचार न करता त्या पोरांसोबत मी देखील त्या घसरगुंडीवर खेळत राहिलो. हे बाकी सगळे बघ्याचीच भुमिका करत होते. निघायचं असल्याने मनावर मुरड घालत तिथून पाय काढता घेतला. चिखलाने भरलेला अंग धुण्यासाठी तिथेच एक डबक्यात पसरलो होतो. एखादी म्हैस चिखलात जशी निवांत लोळत बसते तसाच मी त्या गढूळ पाण्यात बसलो होतो. घड्याळात २ वाजले होते, आता पावलांना गती देणे भाग होते, भराभर पावले उचलत आता उतार असल्यामुळे वेगाने आम्ही गाव जवळ केल, जाताना वाटेवर ठेवलेल्या एक एक खुणा बघत ती झोपडी कधी आली हे कळलं देखील नाही, याच खुणा बघत बघत एक ठिकाणी वानराचे दर्शन देखील झाले. शेतांच्या बांधावरून जाणाऱ्या वाटेच्या आड छोटासा धबधबा होता, आता याला तरी कशाला सोडा म्हणत पावलं तिकडे रेटली आणि मस्त अंघोळ करून शेवट सुद्धा गोड गेला. पंकज आणि राजू हे दोघे असल्यामुळे आमचा हा आजचा डोंगरप्रवास निर्विघ्न पार पडला होता. काही तासांच्या भेटीनेच आम्हा सगळ्यांच्यात एक वेगळंच नात तयार झालं होत, त्या दोघांनी देखील आम्हाला पुढच्या वेळी परत या अजून तुम्हाला खूप काही दाखवतो अशी आशा लावून ठेवली. या दोघांना भेटण्यासाठी का होईना पण परत यायचंय हा निर्धार मनाशी पक्का करूनच गाडीत बसलो.

ही माती आणि या मातीतल्या माणसांमुळेच आम्हाला जमिनीवर राहायची शिकवण मिळते 




या भटकंती वरून आल्यानंतर काही गोष्टी खास नमूद कराव्याश्या वाटतात-
१) नवीन ठिकाणी जाताना स्थानिक वाटाड्या घेऊन जाणे
२) त्या जागेचा पूर्णपणे अभ्यास करून मगच त्या जागेवर जाण्याबद्दल निश्चित करावे
३) आपण ज्या भागात चाललो आहोत तेथील निसर्गावर व तेथील कुठल्याही घटकावर आपल्या येण्याचा कुठलाही परिणाम, प्रदूषण, हानी होणार नाही याची काळजी घ्यावी

४)आपल्या पावलांव्यतिरिक्त तिकडे काही सोडू नका, आणि तिथल्या आठवणींशिवाय तिकडून काही आणू नका.
५) आपण कुठे आणि कुणासोबत चाललोय याची पूर्ण माहिती घरच्यांना देऊन ठेवा
६) निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही, त्यामुळे तो जिथे थांबवले तिथे थांबा आणि माघारी फिरा.


भेटूया पुढच्या ट्रेकला...
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.


22 comments:

  1. गड फिरून आल्या सारखे वाटतंय। मस्तच लिहिलंय। अप्रतिम

    ReplyDelete
  2. Sahii♥️♥️

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय.
    अप्रतेक्ष दर्शन करून दिलेस. आता आतुरता प्रत्येक्ष दर्शनाची

    ReplyDelete
  4. मस्तच लिहिलंय भावा👌👌👌
    किल्ल्याच्या वाटेवरचा वाटाड्या बोलतोय असं वाटलं 👍

    ReplyDelete
  5. सह्याद्रीचा भटकभवान्या नाव सार्थकी लागतंय.छान लिहिले आहे. खास करून ललनेची उपमा अतिशय सुंदर आहे.

    ReplyDelete
  6. सह्याद्रीचा भटकभवान्या नाव सार्थकी लागतंय. छान लिहिले आहे खास करून ललनेची उपमा अतिशय सुंदर आहे.

    ReplyDelete
  7. खूपच छान. वाचतांना थोडा वेळ का होइना पण मि सुध्दा तुमच्या सोबत भटकण्याचा आनंद घेत होतो. असच छान लिहत रहा आणि आम्हाला सुध्दा अप्रत्यक्ष पणे भटकवत रहा. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...

    ReplyDelete
  8. मस्तच वर्णन.... अगदी तुमच्या सोबत गड भ्रमण केल्या सारखे वाटले

    ReplyDelete
  9. Very well narrated.too good vishal.

    ReplyDelete
  10. Khup sundar lihile aahes ani amhi tyacha pratyaksha anhubhav tuzya sobatach ghetala

    ReplyDelete