गडकोट भ्रमंती नामक स्वानंदाच्या सुखराशीत लोळताना अशीच चार पाच टोळकी जमवून निघावं एखाद्या दुर्गभ्रमंतीला, जर का ते दुर्ग आडवाटेवरचे असतील आणि अचानक ठरले असतील तर ती भटकंती जबरीच होणार हे निश्चित! कारण ठरवून केलेल्या प्लॅनिंगला इतक्या मांजरी आडव्या येतात न बोललेलंच बरं! तर झालं अस संस्थेचा प्रबळगड प्रदक्षिणा हा ट्रेक काही कारणास्तव बदलून प्रबळगडाच्या काळ्या बुरुजापर्यंत न्यायचा म्होरक्यांनी ठरवला आणि वर मलई नसलेल्या लस्सीच होत तसच काहीसं वाटू लागलं आणि दुसरीकडे कुठे तरी जावं असे विचार मनात घोळवू लागले. हर्षल दादाशी बोलता बोलता फोनवरच आम्ही मल्हारगड, पुरंदर, वज्रगड असे एक एक किल्ले ठरवता ठरवता सातारा विभागाकडे वळलो आणि नांदगिरी, वर्धनगड, महिमानगड हे दुर्गत्रिकूट फायनल केलं. स्वतःची गाडी असेल तर एका दिवसात हे तीन किल्ले फिरून होतात, तरी देखील जास्त वेळ आपल्या हातात असावा या हेतूने रात्रीच नांदगिरीचा पायथा गाठायचं ठरवलं.
![]() |
शनिवारी संध्याकाळीच पनवेल सोडत प्रिसी आणि मी ५:३० च्या प्रगती एक्सप्रेस(अर्धा तास लेट आलेली) मध्ये कसे बसे उभे राहिलो(कारण बसायला जागाच नव्हती). सागरने देखील उल्हासनगर वरून कर्जतला येऊन ट्रेन पकडली. सागर ला मुद्दामुन GN2 मध्ये बसलोय सांगून त्याला तिकडे एकट्याला पाठवला. तिथे गेल्यावर तो आम्हाला शोधतोय तेव्हा त्याला कळलं की आम्ही त्याला येडं बनवलय, आम्ही GN3 मध्ये होतो . दीड तास उभे राहिल्यानंतर बसायला जागा मिळाली सागरने मात्र आमच्या अगोदरच तिकडे सीट गरम करायला सुरुवात केली होती. अर्ध्या तासाचा गॅप भरून काढताना मोटरमनने पंधरा मिनिटांच दान आमच्या पदरात टाकलं होत. लागलीच बस स्टँड गाठून पौडफाट्याला जाणारी ९४ नंबर बस पकडून SNDT ला उतरून हर्षलदाच्या घराच्या दिशेने निघालो. अर्ध्यावर गेल्यावर तो देखील खाली आम्हाला घ्यायला आला होता. आज नेमका त्याला ऑफिसवरून यायला उशीर झाल्याने आम्ही पोचलो तरी त्याने बॅग रेडी केली नव्हती. त्याच्या घरची वारी पहिल्यांदाच असल्याने आमच्या आजच्या पोटपूजेचा भार त्याच्यावर टाकून आम्ही मोकळे झालो होतो. वहिनींनी केलेल्या पंचपक्वानांवर जो काही आडवा हात मारला होता आणि सोबतीला असलेल्या अनलिमिटेड गुलाबजामांमुले जो काही तृप्तीचा ढेकर दिला होता की आता आपण उद्याच निघू सध्या इथेच पडी टाकतो अस झालं होतं.
![]() |
भरल्या पोटाने बॅग पाठीला मारली आणि सव्वादहाच्या आसपास दादाच घर सोडलं.
रथाचं सारथ्य एकट्या दादावरच होतं. आमची पोटं फुल झाली होती तसच गाडीला देखील फ्युल देऊन तिची टाकी पण फुल केली आणि निघालो. सुरुवातीला ठरवलं होत की नांदगिरीच्या पायथ्याला जाऊन उद्या पुढे जाऊ पण अचानक बदल करून सर्वात शेवटी असलेल्या महिमानगडाच्या पायथ्याला जाऊ म्हणजे उद्या येताना मागे मागे येता येईल आणि तेवढंच अंतर वाचेल. १४० किलोमीटर च अंतर कापताना गप्पांचा मस्त ओघ चालू होता. NH48 ने चाललेला प्रवास भुईंज वरून डावीकडे वळून सातारा पंढरपूर मार्गावरील कोरेगावला निघून पुसेगाव मार्गे महिमानगडाच्या पायथ्याशी आम्हाला पोचायचं होतं. भुईंज वरून निघून कोरेगावच्या इथे जाताना एका ठिकाणी रस्त्यात एक प्राणी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबला होता आणि आम्ही जवळ जात असताना तो आम्हाला क्रॉस करून झाडीत घुसला, हर्षल दादा आणि मी एकमेकांकडे बघून "तरस होता ना" , मागून सागर पण "हो, हो तरस होता" . प्रिसी नेमकी तेव्हा खाली वाकून काहीतरी करत होती, तिने मान वर केली आणि "कुठे, कुठे?"आणि तोपर्यंत तो तरस झाडीत गायब झाला होता आणि तिला त्याच काही दर्शन झालं नाही. रस्ता सुनसान आणि गाडीचा वेग शंभरीच्या पार असल्याने थांबणं झालंच नाही आणि त्याच तरसाच्या गप्पा मारत प्रिसी ला सगळे तरसवत(त्रास देत) होते. चहाची लागलेली तल्लफ त्या ओसाड सातारा पंढरपूर रस्त्याने कुठेच न भागवल्याने रात्री दीडच्या आसपास महिमानगड गावात पोचलो. संपूर्ण गाव निद्रेच्या स्वाधीन झालं होत. गाडी घेऊन गावातून फेरी मारून परत माघारी फिरून जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या मंदिरात पथारीसाठी जागा पाहून आडवे झालो. जानेवारी महिन्याचे दिवस असल्याने बोचरी नसली तरी बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. कुत्र्यांना देखील थंडीची हुडहुडी भरली होती बहुधा, म्हणूनच की काय आम्ही आल्याची वर्दी गावकऱ्यांना द्यायचा भानगडीत ते काही पडले नाहीत.
साडेसहाला जाग आली, वातावरणात गारवा असल्याने स्लीपिंग बॅग मधून बाहेर यायची इच्छा नव्हती. काळोखाची दाटी बऱ्यापैकी होतीच, गाव अजून देखील झोपेत होतं, त्यामुळे चहा कुठे भेटेल याची शाश्वती वाटली नाही, मुळात त्यांना सकाळी उठवून त्रास द्यायची इच्छा नव्हती. बाजूच्या घरातून फ्रेश व्हायला आणि जवळच्या बाटल्या पाण्याने भरून घेतल्या सकाळचे सोपस्कर आटपून किल्ल्याकडे प्रस्थान केले. कृष्णसावळा काळोख विरून आसमंतात निळसर गुलाबी शेंदरी छटा उमटायला सुरुवात झाली होती.
![]() |
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वरच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या इथून मार्ग जातो हे माहीत होत. तेवढ्यात सकाळचा विधी उरकायला गेलेल्या दोन मुलांना आवाज देऊन त्यांना वाटेची पुष्टी विचारली. त्या मुलांनी वाटेला लावून दिल्यावर,खुरट्या झाडीतून वाट काढत मुरमाड भाग आणि नंतर मोडकळीस आलेल्या पायरी मार्गाने महिमानगडाच्या दरवाजापाशी पोचलो. इथवर पोचायला अवघा वीस मिनिटांचा अवधी लागला होता. मोडकळीस येऊन अखेरच्या घटका मोजत असलेला दरवाजा तिथे असलेले गजशिल्प आणि दरवाजाचे तुटलेले भाग तिथेच पडलेले बघून खिन्न झालेले मन पुढची वाट चालू लागले.
![]() |
दरवाजाच्या इथे एक भग्न झालेली गणेशमूर्ती आहे अस वाचनात आलं होतं पण ती काही नजरेस दिसली नाही. दरवाजा पडला असला तरी तटबंदी मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत होती. दरवाजातून प्रवेश केल्यावर उजवीकडची तटबंदी बघून डाव्या बाजूला वळून टेपाड चढून किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या मारुती मंदिरापाशी येऊन पोचलो.अंजनी सुताच ते जीर्णोद्धारीत मंदिर समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमुळे संपूर्ण किल्ल्यावर एकमात्र सावलीच ठिकाण.
![]() |
आम्ही एकदम प्रातःकाळी आल्याने सूर्यनारायण अजून त्यांचा आळस झटकत होते, त्याची ती वलयं सृष्टीला जागे करण्यात चांगलीच विलोभनीय वाटत होती.
मधेमध्ये तुटलेले तटबंदीचे अवशेष आणि गडाच्या आजूबाजूचा प्रदेश बघत बघत गडावर असलेले पडक्या जोत्याचे अवशेष आणि एक खोली हाती, त्यात पीराचे थडगे होते. पिराच्या पुढेच दगडांचा चौथरा रचून ध्वजस्तंभ केलेला त्यावर फडकणारा भगवा आणि समोर सुर्यनारायणाने केलेली रंगांची उधळण, त्याच्यासवे सोनेरी किनार घेऊन नाचत आलेले पांढरे ढग तर सावळ्या ढगांआडून लपाछपी खेळत वर येणार तांबूस गोळा. एक फोटो तो इधर बनता है! या अविर्भावात धावतच जाऊन पोझ दिली आणि वर पहिला असलेला फोटो घ्यायला लावला.
![]() |
महिमानगडाने दिलेल्या या अफलातून नजरण्याने पाय तिथेच रोवून ठेवण्यास भाग पडले आणि काही क्षण तो सोहळा अनुभवत इतिहासाची पाने उलगडण्यात हरवून गेलो.आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पुढची वाट धरली बाजूला असलेल एक सुकलेल तलाव वाट तटबंदीत असलेल्या चोर दरवाजाने बाहेर निघून ईशान्येकडे असलेल्या सोंडेवर घेऊन आली. चोर दरवाजातून बाहेर पडताना त्या छोटेखानी आयताकृती दरवाजातून समोर नजरेच्या टप्प्यात उठवलेला लालेलाल गोळा आणि दूर एका जलाशयात त्याच प्रतिबिंब पाहून अंजनीसुत हनुमंताला याला खाण्याचा का मोह झाला असावा हे या एकंदरीत दृष्यावरून मनोमन पटत होते.
![]() |
दरवाजातून बाहेर पडल्यावर त्या धावत गेलेल्या सोंडेला पादाक्रांत करत शेवटी असलेल्या बुरुजाकडे जाताना मागे वळून पाहिलं असता, सोंडेच्या तटबंदीच्या अलीकडे असलेला भगवा, मगाशी पाहिला तो भगवा आणि उत्तरेकडे तटबंदीवर असलेला पिवळा बावटा जणू काही एका विजयी मुद्रेने फडकत होते.
![]() |
अर्धीआधिक गडफेरी उरकली होती. फोटोंचा थोडा(फार) बाजार उठवून पिकवलेला हशा कधी त्या फोटोत अडकला कळलं देखील नाही.
सोंडेवरच्या त्या तटबंदीत अजुन एक दरवाजा आहे ज्याचे दगड ढासळलेत आणि गवताचं रान माजलेल असल्याने जास्त कोणी तिकडे फिरकत नसावं, त्यातूनच वाट काढत आम्ही पुन्हा तटबंदीच्या आत प्रवेश केला.
![]() |
इथे तटबंदी देखील बऱ्यापैकी ढासळली होती. त्यातून मार्ग काढत पुढे आलो. गडावर लावलेल्या झाडांचे खुंटे आणि त्याला नव्यानेच आलेली पालवी बघून आणि त्या प्रत्येक खुंट्याखाली दगड रचून आणि माती ओली दिसल्याने नित्यनेमाने हे व्रत कोणीतरी जोपासतंय त्याला शतशः नमन करू पुढे झालो. महिमानगडावर असलेलं उत्तम स्थितीतलं बांधीव तळं आम्ही शोधत होतो आणि आमची शोधमोहीम संपल्याचा प्रत्यय हे दृश्य पाहून आलं.
![]() |
तटबंदीत वाढलेले वृक्ष आणि त्यामुळे काही ठिकाणी रया गेलेली तटबंदी हे सगळं असलं तरी या सुस्थितीत असलेल्या तलावाने गडाचं गडपण जपण्याचे केलेले यत्न दिसत होते. तासाभरात गडफेरी पूर्ण उरकून पावले दरवाजाजवळ येऊन खाली महिमानगड गावाचा अंदाज घेत गावाच्या रोखीने निघाली, मोजकी लोकवस्ती, हिरवीगार शिवारं, मातीचा रस्ता आणि महिमानगडाचा वरदहस्त याने गाव समृद्ध झालं होतं.
![]() |
मंदिराजवळ आलो, पाणी दिलं त्या माऊलीला आवाज देऊन गावाचा निरोप घेतला आणि गाडीत येऊन पुढच्या टप्प्याच्या रोखीने निघालो.
पुढचा टप्पा आता वर्धनगड, नाही नाही, तो तर आहेच! पण त्याही अगोदर पोटोबा! महिमानगड करताना सोबत नेलेला सुका खाऊ देखील खाल्ला नव्हता जेमतेम पाण्याचा घोट घेतला असणार. पण आता पोटेश्वर देवतेला नैवेद्य दाखवल्याशिवाय पुढचा मार्ग सुकर होणार नाही, हे सर्व जाणून होते.महिमानगड ते वर्धनगड हे २२ किमीच अंतर त्याच्यात आता रस्त्याच्या बाजूच हॉटेल शोधणं हे आमचं टास्क होतं. महिमानगड गावातून बाहेर निघालो आणि पंढरपूर सातारा रस्त्याला लागलो तोच रस्त्याच्या बाजूला एक छोटी टपरी उघडली होती, त्याची सगळी सामानाची मांडामांडी चालू होती. नाश्त्याला काय आहे विचारलं तर बोलतो तेल आता ठेवलंय गॅस वर, चहा तयार आहे. चहा तर आपला जीव की प्राण आणि माझा चेहरा लगेच "अरे काय बोलतोस!" असाच झाला होता. गरमगरम चहाचे घोट तर नरड्याखाली उतरणार म्हणून गाडी साईडला घेऊन टेबलाजवळ आम्ही बैठक मांडली देखील. रस्त्यापासून अवघ्या पाच-सहा फुटांवर असलेल्या टेबलावर बसताना येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे दुर्लक्ष करून चहा बिस्कीट खाताना बिस्किटांच्या जागी कधी खाऱ्या आली आणि चहाचे दुसरे कप आले, पोटेश्वरापुढे आता सार काही माफ होत. एक एक चहाचा कप झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. तोवर तेलाने चिंब भिजलेल्या मोठ्या मोठ्या भजींच्या प्लेट लागल्या. चहामध्ये खारी खाताना अक्षरशः सारी लाज सोडून चहात खारी बुडवून त्याची खीर करून बोटाने वरपण्यात काय मजा होती, अहाहा! (इतक्या महिन्यांनी ब्लॉग लिहिताना देखील जीभ वळवलायला लागली) पुन्हा एक एक चहाचा कप झाला.
![]() |
या सगळ्या धुंदीत जर का एखादा ट्रक रस्ता सोडून आमच्या दिशेने आला असता तर आमच्या पाट्या तिथे नक्की असत्या हे मात्र नक्की. सकाळपासून उपाशी गाड्यांना आता तरतरी आली होती.
गाडी निघाली, सातारा पंढरपूर मार्गावरील पुसेगाव सोडलं आणि वर्धनगडाच्या वेशीवर दाखल झालीदेखील. सातारा जिल्ह्यातील या किल्ल्यांना सरळसोट डोंगररांग नसल्याने मध्येच कुठेतरी उठवलेल्या डोंगरांवर हे किल्ले बांधले आहेत त्यामुळे बहुतेक सारे किल्ले हे सुटसुटीतच आहेत. वर्धनगड देखील असाच एक, आणि रस्त्यावरून जाताना त्याच ते उठावदार दृष्य त्याची एकसलग तटबंदी आणि बुरुजांमुळे हा एक किल्ला आहे हे आपल्याला दुरूनच समजते, वर्धनीमातेचे मंदिर देखील दुरूनच दृष्टिपथात येते.
![]() |
वर्धनगड गावाच्या वेशीवरच जिथे गावात शिरतो तिथे दोन तोफा ठेवण्यात आल्या आहेत, ग्रामपंचायत किल्ले वर्धनगड अस लिहिलेली कमान आपल्या स्वागताला उभीच असते. गावात शिरताच गडाकडे जायचा रस्ता विचारत एका जुन्या पडक्या कुलूपबंद घराशेजारी गाडी लावली, बॅग पाठीला मारली आणि किल्ल्याच्या दिशेने निघालो. वाटेला लागलो आणि जरा चुकल्याचुकल्या सारखं झालं. गडाची पूर्ण वाट सिमेंटच्या पायऱ्यांनी शाकारली होती, त्यात काही ठिकाणी सलग प्रत्येक पायरीवर देणगीदाराच्या नावाची पाटी लावली होती, काही ठिकाणी काम चालू होतं. दहाचे काटे पुढे सरकले असल्याने उन्हाची तिरीप जाणवत होत आणि पायाखालच काँक्रीट देखील तापायला लागलं होत. पूर्ण चढावर एका ठिकाणी असलेलं चिंचेच झाड तेवढी काय ती सावलीची जागा, त्याच्या अलीकडे सावलीसाठी एक झोपडीवजा शेड उभी केली आहे. गावातून दरवाजापर्यंत जायला वीस मिनिटेच लागली पण तोवर अंग चांगलच शेकून निघालं होत, अक्षरशः घाम निघालं होतं.गोमुखी बांधणीचं पुर्वाभिमुख महाद्वार, बाजूचे सुस्थितीत असलेले बुरुज आणि त्यापासून निघालेली एकसंध तटबंदी, दरवाजातच दोन क्षण विसावून पुढे निघालो इतक्यात खालच्याच गावातील एक महिला आपल्या लेकरास घेऊन गडदेवता वर्धनीदेवीच्या दर्शनासाठी आली होती.
![]() |
दरवाजाच्या अलीकडेच काँक्रीटच्या पायऱ्या संपल्या होत्या त्यामुळे दरवाजात येणाऱ्या वाऱ्याच्या थंडगार झोतांमुळे हायस वाटत होतं.
दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करताच समोर दिमाखदार भगवा फडकत होता,तटबंदीच्या थोडं पुढेच गवताचं आणि झाडीचं रान माजल असल्या कारणाने मळलेली जी मूळ वाट आहे त्याच वाटेने वर निघालो, मध्येमध्ये असणाऱ्या दगडाच्या पायऱ्या चढावरच असणाऱ्या शिवमंदिर ज्याचं जुन्या दगडी बांधकामावर प्लास्टर करून जीर्णोद्धार करण्याचं काम चालू होत. बाजूलाच असलेल टाकं, सावलीला विसावलेली काही लोक आणि काही घोडी होती.
![]() |
थोड्याच पुढे मारुतीचं मंदिर होत. मारुतीरायाला नमन करून झाडीतून बाहेर आल्यावर वर्धनगडाची अधिष्ठात्री वर्धनी मातेच मंदिर नजरेत दिसत होत. गडावरचे हेच मंदिर दुरून देखील चांगलं नजरेत येत होत. मंदिराच बांधकाम नवीनच दिसत होतं, तर बाहेरच्या भागात फरशी बसवण्याचं काम चालू होतं. नवसाला पावणाऱ्या वर्धनीमातेच्या दर्शनाला आजूबाजूच्या परिसरातील भाविक येतात, त्यामुळे इथे कायमस्वरूपी पुजारी असतात.
![]() |
सभामंडप एकदम प्रशिस्त आहे, एक गावकरी पुजाऱ्याच्या मदतीने पूजा मांडत होता, त्याने आणलेल्या केळीच्या फण्याकडे आम्हा सर्वांचं लक्ष लागलं होतं, परंतु पूजा झाल्याशिवाय काही मिळणार नाही, म्हणून देवीजवळच्या ताटातील प्रसाद घेऊन गडफेरीला सुरुवात केली. किल्ल्याच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडच्या तटबंदीत एक चोरदरवाजा आहे तोच पहिला बघून घेऊ म्हणून मंदिराच्या टेपाडावरून खाली तटबंदीच्या इकडे येऊन तो दरवाजा शोधू लागलो, तटबंदी धरून चालत गेल्यावर हा दरवाजा लगेच दिसतो. मातीने पूर्ण गाडून गेलेल्या त्या चोरदरवाजाला शिवदुर्गेश्वर दुर्ग संवर्धन संघटनेने श्रमदान करून नवसंजीवनी दिली, यासारखीच अनेक कामे या संस्थेने गडावर केली आहेत. चोरदरवाजाच्या पायऱ्या उतरून आपण तटबंदी च्या बाहेर येतो, दरवाजात येणारे भर्राट वाऱ्याचे झोत स्तब्ध उभे राहू देत नव्हते.
![]() |
पुन्हा माघारी फिरून तटबंदीवरून चाल धरली इथून दिसणारे दृश्य खास होते, खाली दिसणार वर्धनगड गाव आणि लागून असलेला सातारा पंढरपूर मार्ग पंढरपूरच्या दिशेने पाहिलं असता सरळसोट जणू काही निर्वातात गेलाय, असाच भास होत होता, स्वर्गाची वाटच जणू!
![]() |
तटबंदी वरून चालताना काही ठिकाणी तटबंदी किंवा बुरुज ढासळले होते तर काही ठिकणी एकदम उत्तम स्थितीत होते, वर खाली वर खाली अशी पायमोडी गाडी पाण्याच्या टाक्यांच्या इथे आली. अमृताचे हे घट जणू काही नुसती तहान नाही भागवत तर एक नवचेतना देतात, या रहाळग्यात येणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा येण्यास उद्विग्न करतात. काठोकाठ ओतप्रोत भरलेल्या त्या टाक्यांतील थंडगार पाण्याचा एक एक घोट अंतरात्मा सुखावत होते. काही अंतरावर अजून दोन टाके लागले, या टाक्यांच्या बाजूला असलेला मातीचा ढिगारा पाहून मागच्याच वर्षी हे टाकं श्रमदान करून पुनर्जीवित केल्याचं दिसून आलं.
![]() |
चालता चालता पश्चिम बुरुजावर पोचलो देखील. इथे देखील इक ध्वजस्तंभ होता तर दूरवर नजर भिरकावताना दूरवर पसरलेला सपाट मैदानी प्रदेश मध्ये मध्ये दिसणारी गावं, त्या गावांच्या बाजूला असलेली हिरवी पिवळी शेत-शिवारं तर मध्ये मध्ये माना वर काढू पाहणारे छोटे मोठे डोंगर. हे सर्व पाहताना नजर तोकडी पडत होती. हे सर्व पाहत असताना मग्न झालो आणि इतिहासात गेलो. अफजलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला तसेच १६६१ च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराजांनी या गडावर वास्तव्य देखील केलं होतं. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जेव्हा औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा या किल्ल्यावर देखील मुघल सरदार फत्तेउल्लाखानाने चाल करून गेला. या धुमश्चक्रीत आजूबाजूच्या गावातील लोकांनी किल्ल्यात आश्रय घेतला होता. खान किल्ल्याला वेढा घालू शकतो म्हणून त्यावेळी वर्धनगडाच्या किल्लेदाराने एक शक्कल लढवली, ९ जून १७०१ रोजी आपल्या वकिलाला फत्तेउल्लाखानाकडे पाठवून "किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे" असे सांगितले, या गोष्टीला खान राजी झाला. खरंतर किल्लेदाराने इथे वेळकाढूपणा केला होता, आणि माणसांची जमवाजमव केली होती. किल्लेदार आज येईल उद्या येईल शेवटी खानाला मराठ्यांचा डाव समजला त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूचे बरेच सैन्य मारले गेले,४० मराठी सैन्याना कैद झाली. मोगलांनी आजूबाजूच्या परिसरातील गावात जाळपोळ केली. अखेर १९ जून १७०१ या दिवशी मराठ्यांनी गड सोडला. मुघलांनी गडावरील सारी मालमत्ता जप्त करून "सादिकगड" अस किल्ल्याच नामकरण केलं. तीन वर्ष किल्ला मोघलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला, ऑक्टोबत महिन्यात लगेच मोघलांनी किल्ल्यावर वर्चस्व मिळवलं. १७०७ मध्ये किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकला, १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, इतिहासाची सोनेरी झालर लागलेल्या किल्ल्यावर आज आपण आहोत या विचाराने सार अंग शहारून गेलं आणि भानावर आलो. उर्वरित गडफेरी करताना तटबंदीत असलेलं सुस्थितील शौचालय दिसलं, त्याच्या पुढेच उजव्या अंगाला एक तलाव देखील होता, इथे आसपास तोफ आहे अस वाचलं होतं पण ती तोफ काही दिसली नाही, संपूर्ण गडफेरी होऊन दरवाजाजवळ पोचलो, तेवढ्यात खालच्या कुठल्या तरी गावातून आलेल्या पोरांना तोफेबद्दल विचारलं असता त्यांना देखील कुठे आहे ते माहीत नव्हतं, मात्र त्यातील एकाने झाडीत असलेले दगडाच गोल जात दाखवलं.
![]() |
एकंदरीत दोन तासात गडफेरी होऊन दरवाजा ओलांडला आणि पायथा जवळ केला. आता पुढचा टप्पा कल्याणगड उर्फ नांदगिरीचा किल्ला.
रस्त्याने जात असताना पेरू, डांगबोरं, उसाचा रस असे थांबे घेत घेत कोरेगाव-वाठर रस्त्याने नांदगिरीच्या पायथ्याशी असलेल्या जैन धर्मशाळेपाशी पोचलो, गाडी अर्ध्यापेक्षा जास्त वर जाते या तेथील एका दादांच्या सुचनेने गाडी ऑफरोडिंग ला भिडवली. मातीचा रस्ता, मध्ये आलेले गोटे, बाजूला असलेली दरी, फिरवण्यासाठी जागा असेल की नाही या विवंचनेत एका ठिकाणी लागलेली बोलेरो गाडी बघून आम्ही देखील आमचा रथ तिथे उभा केला. या रस्त्याने जरा जास्तच वेळ घेतला होता. गाडीतून बाहेर उतरलो तेव्हा दोन वाजायला आले होते,त्यामुळे उन्हाची प्रखरता चांगलीच जाणवत होती, हवेतला गारवा आता गरम गरम वाफांच्यात बदलला होता, चटके देणाऱ्या त्या उन्हातून चालताना नकोस होत होतं, आता देखील मातीचाच रस्ता होता, परंतु गाडीची खालची उंची कमी असल्याने गाडी टाकू शकत नव्हतो.
![]() |
परिणामतः आमची पायगाडी चालू झाली, भर दुपारच्या रणरणत्या उन्हात दोन अडीच किमीच अंतर कापून एका कपारवजा गुहेपाशी आलो, बाजूलाच असलेल्या विस्तीर्ण वटवृक्षाच्या छायेत विसाव्याला बसलो, इथूनच पुढे किल्ल्याच्या पायऱ्या सुरू होतात. पायऱ्या, पायऱ्यांच्या बाजूला लावलेलं रेलिंग आणि लगेच लोखंडी गेट लावलेला पहिला महिरपी कमान असलेला दरवाजा.
![]() |
हा दरवाजा ओलांडून पुढे आल्यावर एक वाट डावीकडे खाली उतरते तर दुसरी वर जाते, आम्ही अगोदर वर जाण्याचा निर्णय घेतला, पुन्हा एक दरवाजा ओलांडून मारुती मंदिरापाशी आलो, इथून पायऱ्या चढून किल्ल्याचा माथा गाठला होता.
![]() |
वाटेत कल्याणस्वामींच्या समाधीचं स्थान होत.डाव्या बाजूला एक तलाव आणि उजवीकडे एक छोट घर पार करून पुढे आश्रमापाशी सावलीला बसलो असता एक किस्सा झाला. त्या आश्रमात एक बाबा होते, त्यांना विचारावं किल्ल्याची माहिती म्हणून त्यांच्या कडे गेलो असता ते काहीच बोलले नाही, त्यांनी तोंडावर हात दिला. त्यांचं बहुधा मौन व्रत असावं हे आमच्या ध्यानात यायला जास्त वेळ लागला नाही, इतक्यात बाबांचा फोन वाजला आणि बाबा जे काय बोलायला लागले तर आम्ही चौघे एकमेकांकडे हसू दाबून बघू लागलो, फोन झाल्यावर बाबा पुन्हा गप्प. पोटात उफळलेल्या हास्याच्या कारंज्यांना आता गप्प बसवत नव्हतं, तिथून काढता पाय घेतला आणि आश्रमाच्या पुढे येऊन दाबून ठेवलेलं हसू खदखदून बाहेर आलं. "अरे यार! बाबांचा नंबर घ्यायला पाहिजे होता, म्हणजे फोन वर त्यांच्याकडून माहिती समजून घेता आली असती" हे कारण आम्हाला अजून हसवण्यासाठी पुरेस झालं होतं.
आश्रमाच्या पुढे आलो, जोत्यांचे गवतात हरवलेले अवशेष आणि एका झाडाखाली पीर आणि त्याच्याबाजूला दगडावर कोरलेले तलवारीचे शिल्प पाहायला मिळाले. सगळीकडे गवताचं रान माजलं होत आणि जास्त रहदारी नसल्यामुळे किल्ला एकदम ओसाडच वाटत होता. पुढे असलेल्या पाण्याच्या टाक्यात देखील गाळ भरपूर झाला होता तर छोट्या तलावात इकडून तिकडे नाचणारी बेडके दिसत होती.
![]() |
दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला थोडा नैऋत्येस वळला आहे, तिथे असलेला बुरुज आणि बुरुजवरील भगवा बावटा जोमाने फडफडत होता, तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळून पावलं मागे फिरवली. ऊन असलं तरी वाऱ्याचे वाहणारे झोत उन्हाची काहिली कमी करत होते. इ.स. ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असावा अस सातारा येथील ताम्रलेखावरून समजून येते. १६७३ मध्ये सातारा प्रांत काबीज करताना शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्याचा नोंद आहे, १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
माथ्यावर आल्यावर जे घर लागलं होतं त्याच्या इथून एक वाट किल्ल्याच्या उत्तरेला जात होती त्या वाटेला लागून उत्तर बुरुज जवळ केला येथे एक नव्यानेच बांधकाम केलेली छोटी वस्तू होती, त्याचे प्रयोजन काय हे कळत नव्हतं, इथूनच समोरच्या डोंगरावर लावलेल्या भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या लक्ष वेधून घेत होत्या.
![]() |
इथूनच वेडीवाकडी गवतातून वाट काढत मारुती मंदिराच्या वर असलेल्या घुमटाकार वास्तुपाशी आलो, ध्यानधारणेसाठी या वस्तूची निर्मिती होती. गडाचा वरचा माथा सगळा फिरून झाला होता, आता या गडावरील सर्वात प्रेक्षणीय असणाऱ्या भुयाराच्या दिशेने आम्ही वळलो. पहिल्या दरवाजानंतर वर आल्यावर जी वाट खाली उतरते त्या पायरीमार्गाने खाली उतरून भुयाराच्या तोंडावर आलो. आता पाहिलं असता काळाकुट्ट अंधार, पाण्याने भरलेलं ते भुयार आणि दूर एकदम तेवत असणारा नंदादीप. भुयारातील पाण्याची खोली किती याचा अंदाज नसल्याने शूज वगैरे काढून शॉर्टस घालून टॉर्च घेतली आणि आत प्रवेश केला. थोडंफार पावलं गेल्यावर जाणवलं की खाली दोन मीटर रुंदीचा काँक्रीटचा मार्ग केलाय आणि बाजूला रेलिंग पण लावलेत. उंची देखील बऱ्यापैकी असल्याने वर डोकं लागण्याचा प्रश्न येत नव्हता, त्यामुळे एक गंमत म्हणून टॉर्च बंद करून जो समोर नंदादीप तेवत होता त्याच्या प्रकाशाकडे पाहत हळूहळू सरकू लागलो, कुणीही टॉर्च लावायची नाही जे ठरलं होत. मध्येच पायांना लागणारी खडी, समोर कोण आहे याचा अंदाज देखील येत नव्हता, आवाजावरून फक्त परिचय मिळत होता, लांब दिसणाऱ्या त्या मिणमिणत्या प्रकाशाकडे डोळे किलकिले करून एक एक पाऊल सरकत होतो, त्या काळोखमिट्ट अंधारात चालताना मध्येच एका ठिकाणी रेलिंग संपले, डोक्याचा वर कातळ तर नसेल ना त्यामुळे मध्येच हात वर जायचा, पुन्हा एकदा रेलिंग सुरू झाले, इतक्यात मागून एक ग्रुप आल्याचे आवाज आले, आणि त्यांची टॉर्च चालू झाली, त्यांना लांबूनच आवाज देऊन आमच्या उद्योगाबद्दल सांगून पाच मिनिटे थांबण्यास सांगितलं, त्यांनी देखील आमचं म्हणणं मंजूर केलं. चाचपडत चाचपडत अखेर त्या भुयारातील प्रकाश स्रोताजवळ पोचलो. पायांना होणारा थंडगार पाण्याचा स्पर्श, पाण्याचा आवाज आणि समोर तेवणारा नंदादीप एक वेगळीच ऊर्जा त्या भुयारात जाणवत होती, हे सगळं अनुभवत तेथे असलेल्या श्री दत्तात्रेय, पार्श्वनाथ आणि पद्मावती देवीचं मनोभावे दर्शन घेऊन थोडा वेळ तिथेच शांत बसलो.
![]() |
| १. गुहेत दुरून तेवणारा नंदादीप २. पाण्यात पडलेले प्रतिबिंब |
(गुहेत परत जाऊन हा व्हिडिओ काढून आलो)
मागे थांबलेल्या त्या ग्रुपला आमचं सुख काही बघवल नाही आणि त्यांनी भुयारात प्रवेश करून तेथील शांतता भंग करून आम्हाला पाय काढता घेण्यास भाग पाडलं.
गडउतार होऊन पुन्हा तो मातीचा रस्ता तुडवत गाडीजवळ आलो, एव्हाना भूक भरपूर लागली होती, हर्षल दादाच्या घरून घेतलेल्या तीन चपात्या आणि चुंदा पद्धतशीर पाऊण पाऊण चपाती आणि उरलासुरला सुका खाऊ खाऊन जठराग्नीला धीर दिला होता. घड्याळाच्या काट्याने पाचचा आकडा पार केला होता. एकंदरीत तिन्ही किल्ल्याना पाहिजे असा वेळ देऊन या गडभ्रमंतीला चांगला न्याय दिला होता. आता मात्र परतीचे वेध लागू लागले होते, पण थेट घरी जातील ते भटके कसले? गाडीची दिशा वाकडी करून लिंब गावात असणारी बारा मोटेची विहीर पाहून घेऊ या मताला सर्वांनी होकार दिला. शिवकालीन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर म्हणजे एक दर्जेदार कलाविष्कार आहे, जाईपर्यंत सूर्य मावळला होता, आणि काळोख पडू लागल्याने बॅटरी घेऊन, जितक पाहता येईल तेवढ पाहण्यात सगळे गुंगून गेलो होतो. पाण्यात पडणार प्रतिबिंब देखील खूप छान होत. अष्टकोनी विहीर आणि बाजूची उपविहिर आणि यांना जोडणारा एक भुयारी महाल आणि वेगवेगळ्या भागावर कोरलेली वेगवेगळी शिल्प मन भारून टाकत होते.
![]() |
सात वाजून गेले होते आणि अंधार पडायला लागला होता त्यामुळे आता काढता पाय घेणं गरजेचं होत. पोटातल्या भुके ला आता नीट शांत करायचं होतं आणि कोंबडीशिवाय हे कोणी करणार नव्हतं म्हणूनच फक्त तंदुरी नाही या कारणामुळे तीन हॉटेलच्या बाहेर लावलेली गाडी परत काढली, एका हॉटेल मध्ये तर टेबलवर जाऊन बसलेलो उठून बाहेर आलो, अखेर एका हॉटेलात गेलो, तिथे असणारी प्रचंड गर्दी आणि पुढे लागलेली ट्रॅफिक त्यामुळे इथे काय मिळेल ते खाऊ ठरवून तंदुरीवर पाणी फिरवून चिकनच्या दुसऱ्या डिश मागवून एका कोंबडीच्या आत्म्याला मुक्ती देण्याचं काम केलं. सव्वाबारा वाजता पुणे स्टेशन गाठून ग्वालीयर एक्सप्रेसने मी आणि प्रिसीने पनवेल साठी तर सागर ने कन्याकुमारीने कल्याणासाठी तर हर्षलदाने त्याच्या रथाने घराकडे प्रस्थान केले.
महिमानगड, वर्धनगड, कल्याणगड आणि सोबतीला बारा मोटेची विहीर एक चांगल्या आठवणींची भटकंती आमच्या खजिन्यात येऊन सामावली होती.
धन्यवाद.
फोटो साभार:सागर, प्रिसिलिया, विशाल
इतिहास : आंतरजाल
(१९ जानेवारी २०२० या दिवशी ही भटकंती करत असताना आपले सर्वांचे लाडके गिर्यारोहक श्री अरुण सावंत सर यांनी कोकणकडा ट्रॅव्हर्स मोहीम करताना तेथेच त्यांचा अपघाती मृत्य झाला, त्यामुळे त्यांच्या चालू असलेल्या रेस्क्यूच्या सर्व संबंध वार्ता दिवसभर वारंवार कानावर पडत असल्याने घरी आल्यानंतर हा ब्लॉग लिहायला मन धजावत नव्हतं, महाराष्ट्र गिर्यारोहण क्षेत्रातील तो एक काळा दिवसच होता, तरीदेखील आज हा ब्लॉग पूर्ण करून तुमच्यासमोर मांडत असताना अरुण सरांची आठवण काढून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो)
तुमच्या प्रतिक्रियांशिवाय माझ्या ब्लॉगला पूर्णत्व नाही. काही चुकत असेल किंवा काही सूचना असतील त्या जरून कळवा, त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन.
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.
![]() |




























धमाल रे मामा !
ReplyDeleteKhup vhhan
ReplyDeleteMastt blog! Keep going����
ReplyDeleteछान लिहिलंय. ५ महिने उलटून गेल्यानंतरही छोट्या छोट्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत. स्मरणशक्ती छान आहे...
ReplyDeleteसाधुच्या किस्स्यावरून मलाही ही किस्सा आठवला. सप्तश्रृंगी, मार्कंड्या, रवळ्या, जावळ्या ट्रेक केला होता. हर्षल ही होता. मार्कंड्या वर एक साधूची झोपडी दिसली. आम्ही थोडे शांतपणे झोपडीकडे चालत होतो. आतमध्ये साधु महाराज रेडिओ वर गाणे लावुन डोळे मिटून पडले होते आणि रेडिओ वर कारवा चित्रपटातील हेलनवर चित्रीत गाणे चालू होते. "मोनीका... ओ माय डार्लींग,.."
ReplyDeleteस्वतः सर करुन आल्याच भास झालं ❤️🙏🏻🚩
ReplyDeleteबाबांचा नंबर घ्यायचा होता..😂
ReplyDeleteVishal blog as usual khup chan
ReplyDeleteसुंदर वर्णन. चहा खरी च देखील जिभेला पाणी आणणार वर्णन. भुयारी मार्ग अंगावर शहारे आणणारी रोमांचक शब्द रचणा...
ReplyDelete