Saturday, November 30, 2024

प्रतिज्ञेपासून राज्याभिषेकापर्यंत

"सॉरी, बॉडी जाम होत चाललीय, मी नाही येऊ शकत..."        नोटिफिकेशन बार मध्येच अलंकारचे हे मेसेजेस बघून पुढच्या 8 दिवसांचे स्वप्न डोळ्यांसमोर कोलमडताना पाहिले. इन मिन तीन जण जंबो ट्रेक साठी दरवर्षी जातो, यावर्षी अलंकार आणि मी आम्ही दोघे पूर्ण वेळ तर हर्षल भट पहिले चार दिवस तर सागर पुढचे चार दिवस असं प्लॅनिंग ठरलं होतं. आणि निघायच्या आदल्या दिवशी हा असा मेसेज बघून मेसेज रीड करण्याची इच्छाच उडून गेली. दोघांत ट्रेक करणं कितपत योग्य? एवढा वर्षाचा एक प्लॅन तो पण आयत्या वेळी कॅन्सल करायचा का? तिसरा पार्टनर कोणी मिळेल का? साऱ्या अनुत्तरित प्रश्नांनी मनात एकदम काळ्या ढगांचं साम्राज्य पसरवलं होतं. विचार केला, एक दोन-जणांची मतं घेतली, हर्षल दादाशी बोललो, आणि निघुया यावर शिक्कामोर्तब झाला.
सकाळी सकाळी मतदानाचा हक्क बजावून त्रास होत असताना देखील थोडफार काही तरी सहाय्य म्हणून अलंकार आम्हाला सोडायला आला होता. खेड शिवापुरच्या ट्रॅफीकमुळे लांबूनच केंजळगडाच्या टोपीकडे बघत रायरेश्वराकडे कूच करत तिसऱ्या जंबो ट्रेकला सुरुवात झाली.
स्वराज्य स्थापनेची ठिणगी जेथे चेतवली गेली ते रायरेश्वर मंदिर तेथील जंगम वस्ती आणि पुढे निसर्गाचा चमत्कार म्हणजे सात रंगांची माती अन पुढे कावळ्याच्या धारेवरचा पहिला अनवट मुक्काम. पुढचा दिवस राम्याच्या दऱ्याची भिववणारी उतरण, अमृतानुभव देणारा नैसर्गिक जलस्रोत, पुढे कमंडलू खिंडीपर्यंत करवीतून वाकून, बॅग अडकून एका किलोमीटरसाठी सव्वादोन तास चाललेला ओणवा प्रवास.
कोयता चालवून दुखलेले हात आणि उभा पॅच चढून अखेर संधीप्रकाशात गाठलेला कोळेश्वर माथा.
दोन लिटर पाण्यात मुक्काम आटोपून पुढची चाल सुरू केली. सलूच्या दऱ्याने जोर खोऱ्यात उतरताना जंगली श्वापदांच्या अस्तित्वाच्या खुणा जंगल जिवंत असल्याची ग्वाही देत होत्या.
जोरच्या खोऱ्यातून बहिरीची घुमटी पुढे सापळखिंड आणि मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब चंद्रगडाला वळसा मारणारी ढवळे घाटाची पायवाट, शेलरवाडीतला सखारामचा पाहुणचार खासच होता.
पुढे ढवळे खोऱ्यातून महादेव मुराची चढाई- उतराई पलीकडे कामथे खोऱ्यातून मंगळगड उर्फ किल्ले कांगोरीची चढाई-उतराई.
वाटेत लागलेली खांडज,शेंबी, वडघर, पाटीलवाडी, पिंपळवाडी, गोठीवली नवनवीन गावे-वाड्या वस्त्या हसऱ्या चेहऱ्याने आणि आमची चाल बघून अचंबित होऊन आमचं स्वागत करत होते.
चार दिवस कसे पालटले समजलंच नाही आता हर्षल दादाची जायची वेळ तर सागर ची यायची घाई, नवा गडी येतोय त्याच स्वागत करू की एक जण अर्ध्यातून जाणार त्याच दुःख काही कळायला मार्ग नव्हता. सागर सोबत प्रिसिलिया आली, चला दोनाचे तीन जण असणार हे एक जरा सुखद होत. पाचवा दिवस उजाडला तो चोरकण्याचा भर्राट रानवारा अनुभवण्यासाठी.
बाजूची चिकणा घाटाची वाट पुन्हा कधी तरी येण्यासाठी आवाज देत होती. मोहनगडाला वळसा मारत किल्ल्याचा गाठलेला माथा वरंधा घाटाचं विहंगम दृश्य दाखवत होता.
मध्येच डोकावलेला कावळ्या किल्ला आणि आजूबाजूच्या डोंगररांगा विविध दुर्गसाज लावून बसल्या होत्या. नीरा देवघर डॅमच्या बाजूच्या शिरगावच्या जननीच्या मंदिरात 3 वर्षांपूर्वी केलेल्या मोहनगड ट्रेकच्या आठवणींना उजाळा देत पुढची वाट धरली.
शिरगावच्या निबिड अरण्यात लपलेलं निरबावी(नीरा नदीचं उगम)स्थान एक वेगळीच ऊर्जा देत होत, तेथील मुक्काम खरंच चैतन्यलहरींनी भारलेला होता.
धारमंडप जवळ नागमोडी वळणे घेत कावळ्या किल्ल्याचे विविध बाजूनी दर्शन घेत अशिंपी, शिळिंब, ही गावे पार करत कुंड गावातील मुक्ता आजींनी खुट्याच्या वाटेला लावलेच वर आम्हाला पुढे जाण्यासाठी भरभरून आशीर्वादही दिले.
ही वाट म्हणजे कारवीतून घसाऱ्या(स्क्री)वरून घसरत, पडत, सरपटत उतरवत होती. सबंध ट्रेक मध्ये या वाटेवर पोटभरून हसलो देखील आणि ढुंगण झिजवत चाललो देखील एक वेगळाच अनुभव या वाटेने दिला. पुढे चेराववाडी आणि समर्थांची भुमी म्हणजे दिव्य अशी शिवथरघळ.
नंतर कुंभे शिवथर, आंबे शिवथर आणि कायम स्मरणात राहील अशी आंबेनळी वाडी तेथील बरेचसे गावकरी आणि त्यांची आपुलकी.
आमचे तांदूळ संपले हे समजताच किती जण मदतीला आले काय सांगू. आम्हाला अजून काय सामान हवं नको हे देखील विचारू लागले. कित्येक वर्षे गावकऱ्यांनी वापरायचा सोडून दिलेला आंबेनळी घाट आम्ही इतक्या लवकर चढू असं वाटलं देखील नव्हतं.
घाटावर आल्यावर वेळवंडी नदीचे खोरे ओलांडून पुढची वाडी आणि केळदला अंकुशच्या घरचा पाहुणचार सुंदरच. केळडखिंडीतून न संपणारी डांबरी रस्त्याची चाल अंगावर आली होती. कुसारपेठेच्या अलीकडे सिंगापूरच्या दिशेने एक टेम्पो भेटला आणि आमचा जीव भांड्यात पडला.
लिंगण्याच्या साक्षीने तेजोनिधी रंगाविष्कार करण्यात गुंतला असता चहाला मस्त आधण आले आणि चहाचे घोट घेत शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणाची तयारी सुरू झाली.
आठवा दिवस उजाडला तो मुळात घराच्या ओढीने नव्हे तर रायगडाच्या ओढीने. सिंगापूरची नाळ उतरताना मध्ये पाण्याच्या जागी नाळेचे सौंदर्य जे काही खुलले होते त्याला शब्दादीत करूच शकत नाही.
पुढे दापोलीतील सुंदर घरे आणि वाळणकुंडच दर्शन घेऊन पुन्हा टाररोड धरला तो जणू काही न सोडण्यासाठीच.
पाने, वाघेरेवाडी,वाघेरे, वारंगी, बौद्धवादी, छत्री निजामपूर, रायगडवाडी आणि अखेर साडेचार वाजता रायगड पायथा गाठला. दरवाजा बंद होईल या भीतीने बॅगा एका दुकानात टाकून सागर आणि मी पळतच पायऱ्या चढू लागलो. वाटेत भेटलेल्या अवकिरकरांसोबत गप्पा मारत दरवाजा गाठला आणि म्हणता म्हणता शिरकाई मंदिर, होळीचा माळ आणि नगारखाना पार करून राजसदरेवर आम्ही डेरेदाखल झालो.
मधला दिवस आणि उशिरा आल्यामुळे आम्ही दोघेच आणि तेथील एका कोपऱ्यात मोबाईलवर मग्न गार्ड याव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं.
हाच तो क्षण, हीच ती वेळ समोर मेघडंबरी मध्ये आसनस्थ छत्रपती महाराज मागे अस्ताला चाललेल्या सहस्त्ररश्मीच्य रंगसाजाने अभिषिक्त होत होते, त्याने चढवलेला रंगसाज, संपूर्ण आसमंतात पसरलेली शांतता या सगळ्या गोष्टींनी वातावरण असं काही भारलं होतं की समोर पाहताना डोळे मिटले खरे पण मिटलेल्या डोळ्यांसमोर जे जे काही आलं त्यानं श्वास थांबला, मन तृप्त झालं आणि आत्मा परमात्म्याच्यी भेट झाली. मन गहिवरून आले, आलेला हुंदका दाबून धरला पण डोळ्यातील पाणी काही अडवू शकलो नाही, अश्रुधारा गालांवरून ओघळल्या,थांबलेल्या श्वासाची घुसमट होऊ लागली, उसंत मिळाली तसा तो बाहेर यायला वाट शोधू लागला तो बाहेर आलाच, सोबत दबलेला हुंदका देखील आलाच! एक अनामिक, अद्भुत अनुभूती होती ती, शब्दांत सांगण्याचा तोडका प्रयत्न केलाय, असो. मी आपला वेगळ्याच दुनियेतून भानावर आलो आता घाई करायला हवी,पावले माघारी वळली ती जगदीश्वर आणि समाधीस्थळावर माथा टेकवायला जाण्यासाठी. समधीसमोर देखील असच काहीसं.
सिक्युरिटी गार्ड ने दरवाजा बंद करायचा आहे अशी वर्दी दिली आणि परतीच्या विचाराने आम्ही गडउतार झालो.    
      सह्याद्रीतला हा आठ दिवसांचा पायी प्रवास थकवणारा असला तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत स्मृतीपटलावर कायम कोरला जाणार यात शंकाच नाही. इथे भेटलेली माणसे,जनजीवन, वनसंपदा, आडवाटा, अरण्यवाटा, किल्ले, घाटवाटा सारं काही विलक्षण. इथला भूगोल जितका संपन्न त्याहून भारदस्त इथला इतिहास या सगळ्यांची सांगड घालत एक वेगळा अध्याय आमच्याकडून लिहिला गेला हीच या ट्रेकची धन्यता. समोर आम्ही दिसत असलो तरी आमच्या मागे आम्हाला मदत करणारे बरेच जण होते, या सर्वांना मनापासून धन्यवाद, तुम्ही केलेली प्रत्येक मदत ही लाखमोलाची होती आणि म्हणूनच आम्ही हा "प्रतिज्ञेपासून राज्याभिषेकापर्यंत" प्लॅन यशस्वी करू शकलो. 
























फोटो साभार -हर्षल भट, सागर बामणे, प्रिसिलिया मदन, विशाल पाटील 
 धन्यवाद 
सह्याद्रीचा भटकभवान्या.




30 comments:

  1. छान लिहितोस. पण मग, एवढी दीर्घ भटकंती नि इतकं आटोपतं लिखाण? एवढी भागम भाग का व कशासाठी? मन भरलंच नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. बऱ्याच गॅपनंतर ब्लॉग लिहायला घेतला, मोठा लिहायला घेतल्यावर पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती नाही...त्यामुळे धावता आढावा फक्त घेतला🙏🙏

      Delete
    2. खूप छान शब्दांकन आणि मनोरम छायाचित्रे

      Delete
  2. वाह !! 😍😍😍🔥🔥🔥

    ReplyDelete
  3. सुंदर रे ! शेवटी रायगड वरचे क्षण! वाह! वेळ मिळाला तर या ट्रेकच आणखी लिही या ट्रेक बद्दल!

    ReplyDelete
  4. We didn't feel, we missed something ❤️

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर लिहिले आहे. मात्र एकंदरीत आटोपते घेतल्या सारखे वाटते आहे. अजून थोडे सविस्तर वाचायला आवडले असते. अगदी दोन तीन भाग झाले असते तरी चालले असते.

    ReplyDelete
  6. सुंदर लिखाण 💕

    ReplyDelete
  7. बाळाराम पाटीलNovember 30, 2024 at 3:49 PM

    अप्रतिम ट्रेक व वर्णन पण तितकेच सुंदर😍.

    ReplyDelete
  8. khupach chaaan. Lekh vachtana Ghara(sahyadri) pasna lamb aslyachi univ chatkan basli. ❤️👌

    ReplyDelete
  9. फारच छान ...आम्हीही इच्छुक अशा मोहिमांसाठी...ह

    ReplyDelete
  10. Beautiful discription about your journey n write up 👌👌

    ReplyDelete
  11. अप्रतिम लिखाण , व्वा…कमी शब्दात पुर्ण ट्रेकचा अनुभव सांगितला.

    ReplyDelete
  12. सुदंर मस्त मोहिम

    ReplyDelete
  13. अफलातून ट्रेक रे 👌
    अतिशय सुंदर पण थोडक्यात केलेला वर्णन, शेवट काळजाला भिनून गेला. सुर्याच्या उगवतीपासून सुरू आणि मावळतीला संपवलेल्या या तुमच्या प्रवासाला सलाम 🙏🏻 प्रतिज्ञेपासून राज्याभिषेकापर्यंत 🙌

    ReplyDelete
  14. Hats off🙌🏻
    खुप छान लिहीलं आहेस🙏🏼

    ReplyDelete
  15. सुंदर लिखाण! अजून सविस्तर नक्की लिहिले जावे, वाचायला आवडेल!

    ReplyDelete
  16. सुंदर लिखाण! अनुभव अजून सविस्तर नक्की लिहा

    ReplyDelete
  17. बऱ्याच गॅपनंतर ब्लॉग लिहायला घेतला, मोठा लिहायला घेतल्यावर पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती नाही...त्यामुळे धावता आढावा फक्त घेतला🙏🙏

    ReplyDelete
  18. खूपच छान, भन्नाट आयडिया प्लानिंग व परिपूर्ण ट्रेक..

    ReplyDelete
  19. खूप छान 👌

    ReplyDelete
  20. थरारक, साहसी पण तितकेच हृदयस्पर्शी लिखाण आणि अनुभवाची शिदोरी आहे हा ब्लॉग म्हणजे.
    गडकिल्ले भटकंती म्हणजे सह्याद्री, शिवाजी महाराज यांना वाचणे आणि वाचवणे हा दृष्टिकोन मिळण्यास, समजण्यास अत्यंत उपयुक्त.
    चला मिळून अशीच डोळस भटकंती करू. मनमुराद आनंद मिळवू आणि हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आणि आपला दैदिप्यमान इतिहास जपू.

    ReplyDelete
  21. खूपच छान, अतिषय सुंदर शब्दांकन, अप्रतिम आणि हृदयस्पर्शी लिखाण👌👌🙏🙏

    ReplyDelete
  22. अप्रतिम सुंदर!!!!!!!!!

    ReplyDelete
  23. खूप छान, छान सह्याद्री आणि शब्द प्रवास.
    शेवटची वाक्ये गलबलून गेली. 👌👌🚩🚩

    ReplyDelete
  24. अप्रतिम ट्रेकवर्णन प्रत्येक वाक्यागणिक मी तुमच्यासोबत चालतोय असे वाटत होते सुंदर लिखाण तितकेच सुंदर फोटो परंतु मन अतृप्त राहिले ते धावत्या शब्दांमुळे अजून वाचावेसे वाटतं असतानाच पुढचे वर्णन सुरु होत होते त्यामुळे अतृप्तता राहिली बाकी थीम खरोखरच खूप सुंदर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्या ठिकाणापासून स्वराज्याची राजधानी रायगड पर्यंतचा प्रवास मंत्रमुग्ध करणारा आपल्या पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  25. खूपच छान, सुंदर लिखाण, अंगावर काटा आला वाचताना डोळे सुद्धा पानावले.

    ReplyDelete
  26. सर्व वर्णन सुंदर परंतू फारच आटोपशीर केलय. छायाचित्र ही सर्व सुंदर आहेत.सह्याद्रीचा भटकभवान्या ही उक्ती फारच साजेशी आहे. एकंदर सर्वच आवडले.मस्त

    ReplyDelete