Saturday, February 15, 2025

मधमाशांचे हल्ले- पूर्व काळजी आणि हल्ल्या नंतरचे उपाय

     सह्याद्रीत होणारे मधमाशांचे हल्ले याबद्दल सध्या सर्व ट्रेकर वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे, प्रत्येक आठवड्याला कुठे ना कुठे या घटना आपल्या कानावर पडत आहेत, याबद्दल काय पूर्व काळजी घ्यावी आणि हल्ला झाल्यानंतर काय करावं याबद्दल हा लेखनप्रपंच

(फोटो : इंटरनेट वरून साभार)

हल्ला होऊ नये म्हणून....

• ट्रेकला/जंगलात जाताना डिओ/परफ्युम/सेंट/लिपस्टिक/लिपबाम असं काहीही मारून/लावून जाऊ नये, या उग्र वासामुळे माशा आकर्षित होतात.

• गोंगाट, आरडाओरडा, स्पीकरवर गाणी, आवेशपूर्ण घोषणा अशा कोणत्याही प्रकारचा गोंधळ ट्रेकरूट वर करू नये. किंवा घोषणा देताना आसमंतांचे भान ठेवा.

• चूल पेटवताना किंवा लाकडे जाळताना जवळपास कुठे मधमाशांचे/आग्या माशांचे पोळे नाहीत, याची खात्री करून घ्यावी, या धुराने देखील माशा विचलित होतात.

• विडी/सिगारेट/ गॅस stove चा धूर/वास देखील माशांना विचलित करण्यास जबाबदार ठरू शकतो

• ऑफबीट ट्रेकमध्ये वाटांवर लोकांचा राबता नसल्याने कधी कधी अशा वाटांच्या एकदम जवळच मोहोळ असण्याची शक्यता असते, आणि ते पटकन आपल्या नजरेत येत नाही.

• मधमाशांचे पोळे कार्वी मधे जमिनीलगत सुद्धा असू शकते त्यामुळे चालताना लक्ष देऊन चालावे

• पाण्याच्या ठिकाणी कधी कधी माशा घोंगावताना दिसतात, तेव्हा तिथे पाणी भरताना काळजी घ्यावी.

• ग्रुप संख्या मोठी असेल तर लोकांना अगोदरच काय करावे आणि काय करू नये याची कल्पना देऊन ठेवावी.

• आपण ज्या भागात चाललोय, तेथील पायथ्याचा गावातील स्थानिक माणसाचा नंबर किंवा जवळपासच्या रेस्क्यू टीमचा नंबर आपल्या सोबत ठेवावा(आपल्याला सर्वात जलद स्थानिक माणसाचीच मदत पोचू शकते, त्यामुळे ट्रेक सुरू करताना आणि संपल्यानंतर गावकऱ्यांना भेटण्याची सवय ठेवावी).

• मधमाशांचा हल्ला झाल्यानंतर पळण्यासाठी खूप कमी अवधी हातात असतो, त्यामुळे स्वतः जवळच बचावासाठी काही गोष्टी जवळ बाळगाव्यात. उदा- कानटोपी, बंडाना, प्लास्टिक पिशवी, टोपी, टॉवेल, स्लीपिंग बॅग, ताडपत्री या गोष्टी वापरून आपण आपली बॉडी कव्हर करू शकतो. (यातील काही गोष्टी शक्यतो बॅग च्या बाजूच्या कप्प्यात किंवा बॅग मध्ये वरतीच ठेवाव्यात, जेणेकरून त्या लगेच हाताला लागतील.

• ट्रेक चे कपडे Comfort या सुवासिक केमिकल ने धुवू नका, त्याने कपड्यांना चांगला वास येऊन माशा आकर्षित होऊ शकतात.


हल्ला झाल्यानंतर....

• हल्ला झाल्यानंतर आपल्या जवळ असलेल्या कानटोपी, बंडाना, प्लास्टिक पिशवी, टोपी, टॉवेल, स्लीपिंग बॅग, ताडपत्री या गोष्टी वापरून आपण आपली बॉडी कव्हर करावी. विशेषतः कान, नाक, डोळे.

• मधमाश्या चवताळून मागे लागल्याच आणि पळायला जागा नसेल तर,  शक्यतो झुडुपात लपावे अगदी स्तब्ध बसावे. मधमाश्या हलणाऱ्या गोष्टींकडे जास्त मागे लागतात. लपताना कान, नाक व डोळे गुडघ्यात खुपसून बसावे/जाड कापडाने आच्छादुन घ्यावे.

• कोणत्याही परिस्थितीत तोंड उघडे ठेवू नये, तोंडात bite झाले तर सूज येऊन श्वास गुदमरू शकतो. डोळ्यांना सूज येऊन तात्पुरती नजर क्षीण होते, दिसणे बंद होऊ शकते.

• हल्ला झाल्यानंतर जमिनीवर गुडघ्यांमध्ये डोकं घालून बसावं, आरडा ओरडा धावपळ करू नये. (हल्ला इतका जोरदार असतो की भीतीने त्रेधातिरपीट उडून कड्यावरून घसरून पडण्याच्या शक्यता देखील असू शकतात).

• मधमाश्या चावताना डंख मारतात आपण घाबरून त्यांना हाताने मारतो परंतु त्यावेळेस माश्या एक विशिष्ट प्रकारच स्मेल सोडतात . त्याने ओमिटींग सुरु होते  आणि हा वास आपल्या कपडयांना असल्याने ओमिटींग थांबतच  नाही . पोटातील सर्व काही बाहेर पडले तर आतडीही पिळवटून निघतात . म्हणुन जेव्हा हल्ला थांबतो तेव्हा ज्याला बाईट झालेत आणि ओमिटींग होत आहे त्यांचे कपडे काढुन अंग पुसुन घ्यावे , मधमाश्याचे डंख काढता आले तर काढावेत व वेगळे कपडे घालावेत .

• ग्रुप संख्या मोठी असेल तर सोबत आलेल्या लोकांना कंट्रोल करणे अशक्य असते, तेव्हा लोकांना पूर्वकल्पना असली की अर्धे लोकं तरी विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करतील.

• हल्ला होऊन गेल्यानंतर, सुरक्षित जागी पोहचून पायथ्याच्या गावात किंवा रेस्क्यू टीमला संपर्क करून त्यांना सर्व कल्पना द्यावी आपलं लोकेशन त्यांना शेअर करावं( लोकेशन शेअर केल्यानंतर शक्यतो त्याच लोकेशन ला थांबावं, कारण गावकरी/रेस्क्यू टीम येण्याचं आणि आपला जाण्याचा रूट वेगवेगळा असेल तर आपल्याजवळ आलेली मदत आपल्याला मिळू शकत नाही, आणि डोंगरात नेटवर्क नसल्याने त्या शोधाशोधित बराच वेळ जातो.

• शक्य असेल आणि माहीत असेल तर तीक्ष्ण चिमट्याने अथवा ट्वीझर(tweezers) ने मधमाश्यांचे डंख/काटे शरीरातून काढावेत.

• रुग्णाला पाठीवर झोपवावे, पाय वर ठेवावेत व धीर द्यावा.

• हल्ला झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे


विशाल पाटील

निसर्गमित्र पनवेल

6 comments:

  1. खूपच महत्वपूर्ण माहिती 👌👌👌

    ReplyDelete
  2. छान माहिती दिली आहे 👏👌

    ReplyDelete
  3. छान माहिती विशाल👍🏻

    ReplyDelete
  4. छान आणि उपयुक्त माहिती

    ReplyDelete