गोष्ट तंगड्यातोड ट्रेकची
अखेर लांबून लांबून खूप उशिराने पावसाळा सरला होता आणि आता कुठे चांगल्या मजबूत तंगडतोड करण्याच्या भटकंतीचे दिवस चालू झाले होते, लांबलेल्या पावसामुळे शरदाचं चांदणं वगैरे पार ढगांच्या आडच लपून बसलं होतं. तेच निरभ्र आकाशातील चांदणं अनुभवायला, शेणा मातीने सारवलेल्या अंगणात निजायला आणि दिवसभर एका डोंगर धारेवरून दुसऱ्या डोंगरधारेवर अशी मैला-मैलांची चाल करून वाड्या-वस्त्या-खेडी पार करून ते डोंगर अनुभवायला जायचे हे दिवस. मग अभ्यास सुरू झाला अशाच मस्त मजबूत रेंज ट्रेकचा. तस म्हणायला खूप अगोदर पासूनच अभ्यास झाला होता त्या अभ्यासाला आता मूर्त रूप देत ठरवलं राजगड-तोरणा-रायलिंग पठार-लिंगाणा-वाळणकोंड आणि दिवस ठरले गुरुवार २१ तारखेला रात्री पनवेल सोडून शुक्रवार, शनिवार, रविवार २२,२३,२४ नोव्हेंबरला हे किल्ले आणि त्यांच्या वाटा पालथ्या घालायच्या. पहिल्यांदाच जंबो ट्रेकची आखणी करत असल्यामुळे जितका होईल तितका अभ्यास करत होतो, याचबरोबर अप्पा(धनंजय मदन), ओंकार ओक, राहुल वारंगे यांचं मार्गदर्शनदेखील घेतलं. हो नाही हो नाही करत माणसं ठरली मी, प्रिसिलिया, सागर बामणे, मनोज म्हात्रे आम्ही पनवेल वरून गुरुवारी निघणार आणि हर्षल दादा आम्हाला शुक्रवारी रात्री जॉईन होणार.
 |
| राजगडावरील पद्मावती मंदिराच्या बाहेर (डावीकडून सागर,प्रिसिलिया,मनोज,मी ) |
 |
| शिवशाहीचा शाही प्रवास |
गुरुवारी रात्री ८ वाजता पनवेल स्टँडला भेटून बस पकडायची आणि पुणे गाठायचं. रात्र असल्यामुळे राजगडाच्या पायथ्याशी जायला गाडी मिळणार नाही, म्हणून हर्षल दादाशी अगोदरच बोलून त्याला आम्हाला सोडायला तयार केलं होत. ठरल्या वेळेला मी, मनोज, सागर आलो होतो, प्रिसिलियाने येता येता उशीर केला आणि गाडी मिळेपर्यंत ८:४० झाले, एक मात्र चांगलं होत गाडी मिळाली ती शिवशाहीच... मस्त एसी मध्ये बसून आमच्या शाही ट्रेकची सुरुवात झाली होती, आता मात्र एकच विचार आम्ही आता लेट पोचणार म्हणजे हर्षल दादाला रात्री यायला उशीर होणार त्याला परत घरी येऊन सकाळी ऑफिसला जाऊन उद्या रात्री आमच्यातच सामील व्हायचं आहे, चांदणी चौकात आम्ही उतरणार होतो, तिथून हर्षल दादासोबत पुढचा प्रवास असणार होता, उशीर झाल्यामुळे पुढचं प्रवासाचं गणित कोलमडल, चांदणी चौकात पोचायला सव्वा अकरा आणि पुढे नसरापूर फाट्यावरून गाडी आत टाकल्यानंतर खराब रस्ता आणि मध्येच आलेल्या धुक्यामुळे जे काही पांढरफटक वातावरण झालं होत त्यामुळे पुढचं काहीच दिसेना, गाडी चालवताना देखील अडचण होत होती.ऑफिसची काम उरकून, रात्रीचा प्रवास आणि पुढचे तीन दिवस मोठा टप्पा असल्याने आज जास्तीत जास्त आराम मिळावा या हेतून वाजेघर गाठून पाली दरवाजाने वर चढायचं अस ठरवलं होत, कारण वाजेघर मधून कच्च्या सडकेने गाडी पार आतपर्यंत जाते जेणेकरून आपले चालायचे श्रम वाचतील आणि आपल्याला आराम पण मिळेल. परंतु निघताना झालेला उशीर, आणि आता आम्ही कापत असलेल्या रस्त्याची अवस्था बघून दादाला वाजेघरला गाडी टाकायला न सांगता गुंजवणेत टाकायला सांगितली, खराब रस्त्याचे ते ५-६ किलोमीटर आणि धुक्याची ती चादर यातून त्याला घरी लवकर पोचायला मदत होईल. दोन तासांचा पल्ला गाठून अखेर सव्वा-दिडच्या सुमारास आम्ही गुंजवणे गावात पोचलो, पटापट गाडीतून सामान बाहेर काढून हर्षल दादाला फ्री केलं, निघाल्यापासून काही खाल्लं नव्हतं आणि वाटेत भूक पण फार लागली होती, पण तरीही हर्षल दादाला जास्त उशीर होऊ नये म्हणून कुठेही थांबा न घेता थेट पायथ्याचं गाव गाठलं होत, हर्षल दादाला रामराम केला आणि सोबत आणलेली भाजी-भाकरी काढून त्यावर यथेच्छ ताव मारून सामान चौघांकडे वाटून आता आम्ही मस्त लोडेड बॅग्स पाठीवर मारून पुढच्या तंगडतोडीला तयार झालो होतो.
 |
| चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखालून चालण्याची मजा काही औरच ! |
गुंजवणे गावातून आम्ही चोरदारवाजच्या वाटेने पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिरात जाऊन आराम करणार होतो, चोर दरवाजाची वाट ही संथपणे एका धारेवरून जाते त्यामुळे चढ जरा दमछाक करणारच होता. पाठीवर बॅग लावल्या आणि आमची वारी निघाली, गावातून निघालो, तशी काही कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता, हळू हळू तो आवाज कमी होऊन आम्ही चढ चढायला सुरुवात केली, गावातल्या लाईट्स आता दूर होत चालल्या होत्या, वर चांदण्यांनी भरलेलं निरभ्र आकाश, हवेची मधेच येणारी झुळूक तर कधी, घाम काढणारे चढ, पाठपिशव्या देखील बऱ्यापैकी जड त्यामुळे हा ट्रेक अजून अवघड होत होता. दर पंधरा मिनिटांमागे पाच मिनिटांचा ब्रेक अशा कुर्मगतीने आम्ही चौघे पादाक्रांत करत होतो. मागच्या वर्षी एवढा मोठा ट्रेक केलाच नव्हता, त्यात सागर आणि मनोजचा एवढा मोठा असा पहिलाच ट्रेक, प्रिसीने देखील खूप महिन्यातून लोडसॅक मारली होती. एकंदरीत सर्वांची हवाच होती. मजल दरमजल करत, हळू हळू सरकत पद्मावती माचीच्या खालच्या अंगाला आलो. एव्हाना घडाळ्यात तीन वाजले होते. हर्षल दादाला सांगून ठेवलं होत की घरी पोचशील तेव्हा मेसेज कर, तीन च्या ठोक्याला मोबाईल वाजला आणि लगेच कळलं की हर्षल दादा पोचला असणार, पण परत विचार की येताना दोन तास लागले होते, तर आता इतक्या लवकर कसा काय? मनातील प्रश्नांच्या सरबत्तीला बाजूला सारून मोबाईल काढला तर खरंच त्याने घरी पोचल्याचा मेसेज केला होता. प्रत्युत्तरादाखल आम्ही देखील अर्ध्या-पाऊण तासात पोचू अस सांगून आम्ही देखील ब्रेक घेत घेत अखेर चोर दरवाजाच्या खाली कातळाला भिडलो, रेलिंग लावल्यामुळे हा मार्ग एकदम सोईस्कर झालेला आहे. त्या निबिड रात्री काळोखात चालताना उंचीची वगैरे काही भिती वाटत नव्हती, चांदण्यांचे दर्शन असे काही विलोभनीय होते, की एखाद ठिकाणी येणारी वाऱ्याची गार झुळूक आम्हाला तिथेच आडवे होण्यास प्रवृत्त करत होती. चोर दरवाजात अखेर प्रवेश केला, त्या दरवाजातून वाकून जाऊन पुढच्या पायऱ्या ओलांडल्या आणि अखेर आमचा राजगडाच्या तटबंदीच्या आत प्रवेश झाला होता. उंचावर आल्यामुळे आणि आता कसलाच अडसर नसल्यामुळे वाऱ्याचा झोत जरा जास्तच होता आणि परिणामतः थंडीचे शहारे अंगावर येत होते. आपण कुठून चढलो, वरून दिसणाऱ्या गुंजवणे गावाच्या लाईट्स यांचा कानोसा घेऊन पावले झपाझप पद्मावती मंदिराकडे वळवली कारण आता आरामाची खरी गरज होती. पुरातन खात्याने काम करून गडाची काही ठिकाणी डागडुजी केली आहे त्याचाच भाग म्हणून चोर दरवाजपासून पद्मावती मंदिरापर्यंत केलेल्या पायऱ्या आणि डाव्या बाजूला राहण्यासाठी केलेली निवास योजना. भल्या पहाटेच्या प्रहरी चारच्या ठोक्याला आम्ही पद्मावती मंदिराच्या प्रांगणात पोचलो, मंदिराच्या बाहेर काही बुटांचे जोड दिसत होते यावरून आपल्या व्यतिरिक्त अजूनही लोक इथं आलेली आहेत, हे जाणून त्यांना त्रास न होता बॅग मधील सामान गुपचूप काढून त्या आत झोपलेल्या मंडळींना हळुवार आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगितला. बाहेरच जरा वेळ बसून मोकळे होऊन अखेर आम्ही आमचा संसार आत नेऊन मंदिरातील एक कोपरा गाठला आणि सकाळी आरामात उठायच्या ठरावावर निद्राधीन झालो.

शुक्रवार तसा रात्री ट्रेक सुरू केला तेव्हाच उजाडला होता पण खऱ्या अर्थाने आमच्या ट्रेकचा पहिला दिवस आता सुरू झाला होता. साडेसातच्या आसपास जाग आली ती मुळातच त्या रात्री लवकर झोपलेल्या मंडळींच्या आवाजाने, तरी देखील स्लीपिंग बॅग मधून बाहेर न पडता अजून पंधरा एक मिनिटे लोळत बसलो, पावणेआठच्या सुमारास उठून बसलो पाहतोय तर मनोज बाहेर गेलेला, प्रिसी आणि सागर झोपलेलेच होते, डोळे पुसत मंदिराच्या बाहेर येतोय तोच मंदिराच्या दरवाजाची उंची खूपच कमी असल्याने खाडकन माझा डोका त्या दारकशीला लागला, सायरन वाजावा तसा तो आवाज मंदिरात घुमला आणि प्रिसिलिया तडक उठून बसली झाली, सागरला देखील त्या आवाजाने जाग आली. माझी झोप तर कुठच्या कुठे पळून गेली, डोका चोळत तिथेच जरा थोडा वेळ बसलो. मंदिराच्या बाहेर पडलो सकाळचा प्रातःविधी उरकेपर्यंत मनोजने त्या दुसऱ्या ग्रुप बरोबर ओळख करून कॉफीचे घोट देखील घेतले होते. आम्ही देखील चहा आणि सॅंडविचने दिवसाची सुरवात करून मंदिर सोडायची तयारी करून बाहेर आलो तोच पाहतोय तर सागरच्या शूजचा सोल पार निखळायला आला होता, माझ्याकडे फेविबॉण्ड होता तो काढून चिकटवूया म्हणून बॅग उपसून बाहेर काढला तर खूप महिने तो तसाच राहिल्यामुळे त्याचा खडा झाला होता. आता आली पंचाईत, वेळ ही चालला होता, आणि पुढचा ट्रेक काय होता हे मला माहीत होत, त्यामुळे आता काय करायचं या विवंचनेत असताना मनोज बोलला शिवूया पूर्ण शूज आणि त्याने त्याच किट काढून पद्धतशीरपणे चांभारी करून चांगल्या प्रकारे शूज शिवून दिला. या सर्व गोंधळात पद्मावती मंदिर सोडायला आम्हाला दहा वाजले. प्लॅन आखताना आम्ही दहा वाजता राजगड सोडायच अस ठरवलं होत.
 |
| दुहेरी तटबंदीने पूर्वेकडे पसरलेली सुवेळा माची |
यापूर्वी राजगडावर दोनवेळा येणं झालं होत, परंतु वेळे अभावी सुवेळा माची काही बघता आली नाही, आणि आज पण तेच होत होतं तरी म्हटलं पूर्ण सुवेळा माची नाही परंतु नेढ्या पर्यंत तरी जाऊया अस म्हणत पद्मावती मंदिरासमोरील सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं, रामेश्वर मंदिर देखील ओलांडून पायऱ्या चढून जुने पडके अवशेष पाहत जीर्णोद्धारीत राज सदरेच्या इथे आलो, सदरेच्या द्वाराला कुलूप लावलं होत, बॅग सर्व तिथेच ठेवल्या हातात एक पाण्याची बाटली घेऊन धावत पळत आमचा चमू आता सुवेळा माचीच्या दिशेने निघालो, बालेकिल्ल्याच्या वाटेकडे जायच्या अगोदरच डावीकडे एक वाट जाते ती सुवेळा माचीकडे. तटबंदीला असलेला छोटेखानी दरवाजा ओलांडून आम्ही चाललो होतो, तर त्या दुसऱ्या ग्रुपने देखील गडाचा निरोप घेतला होता, बोलता बोलता लक्षात आलं की ते काल तोरण्यावरून आले होते, म्हणजे आज आम्हाला जी वाट पकडायची होती, ती त्यांनी कालच केली होती, वाटेबद्दल त्यांच्याशी थोडी चर्चा केली असता ते बोलले की वाट एकदम सोपी आहे फक्त बुधल्याच्या इथे जो खडा चढ आहे तिथे जरा सांभाळून.

पुढे वाट चालतच डाव्या बाजूला असलेल्या गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जात त्यांनी आमचा निरोप घेतला आणि आम्ही पुढे उजव्या बाजूने बालेकिल्ल्याला ट्रॅव्हर्स मारून सुवेळा माचीकडे चाललो होतो. वरून जाताना गुंजवणे दरवाजा दिसत होता, त्याच्या बाजूला असलेली ताशीव तटबंदी आणि भरभक्कम बुरुज, तर समोरून लांबच्या लांब पसरलेली सुवेळा माची लक्ष वेधून घेत होती, आणि या सर्वात उजव्या बाजूला मोठमोठाल्या प्रस्तरांनी आच्छादलेला बालेकिल्ला छातीत धडकी भरवत होता, त्याच ते अजस्त्र रूप पाहून अंगावर शहारे येत होते. हे सर्व पाहताना मराठ्यांच्या इतिहासाची पाने झरझर डोळ्यांसमोरून पालटत होती.या गड-किल्ल्याचं हे अजस्त्र रूप पाहून का आपल्या राजांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलाय याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. चालत चालत डुब्याच्या खाली आलो, डुब्याची वाट न पकडता खालच्या अंगाने पुढे सरकलो दाट झाडीतून जाताना पावलांचा वेग दुणावला होता, झाडी पार करतोय तर डाव्या बाजूला पाण्याचं टाक आणि लगेच पुढे मारुतीची मूर्ती होती, दगडी मूर्तीशेजारी कुणीतरी पांढऱ्या मार्बलची मूर्ती देखील आणून ठेवली होती.

झाडातील सावलीचा रस्ता पार करून पुढे चालू लागलो तसा खाली उतरायला एक छोटेखानी दरवाजा देखील दिसला, तटबंदीला असलेली शेंदूर लावलेली गणपतीची मूर्ती देखील लक्ष वेधून घेत होती. सुवेळा माचीवर लक्ष वेधून घेणारा चिलखती बुरुज त्याच्या पायऱ्या आणि दोन्ही बाजूला असलेली दुहेरी तटबंदी हे सर्व न्याहाळत आपण चाललोय हे पाहून उर भरून येत होता. चिलखती बुरुजाच्या पायऱ्या चढून छोटेखानी दरवाजातून बुरुजाच्या वर चढून गेलो. वर्तुळाकार ताशीव बुरुज, अन त्या बुरुजाच्या मध्यभागी अभिमानाने फडकणारा भगवा इतिहासातील स्थापत्यकलेच्या डौलाची साक्ष देत होता. त्या बुरुजावरून पूर्वेला लांब पसरत गेलेली सुवेळा माची, मागे पश्चिमेला उठावलेला बालेकिल्ला, नैऋत्येस धाव घेतलेली संजीवनी माची, तिच्या मागे दिसत असलेला तोरण्याचा बुधला सुळका अन वायव्येकडे विस्तारलेली पद्मावती माची आणि खाली उत्तरेस गुंजवणे गाव देखील त्याच अस्तित्व दाखवून देत होता.
 |
| नेढं |
नको म्हणत असताना देखील त्या बुरुजाला रामराम करत खाली उतरून तटबंदीला असलेल्या दरवाजा ओलांडून सुवेळा माचीच्या पुढच्या बाजूला असलेल्या नेढ्याकडे जाऊ लागलो. नेढ्याच्या खाली जाऊन पुढच्या बुरुजाची वाट सोडून डाव्या बाजूला कातळात चढावं लागत. निसर्गदेवतेनं केलेला एक अद्भुत अविष्कार म्हणजे नेढं. डोंगराला त्या आरपार पडलेल्या भल्यामोठ्या छिद्रात बसून आरपार जाणारे घोंघावत्या वाऱ्याचे सूर आळवीत बसण्यासारखं सुख नाही, अस नेढ सह्याद्रीतल्या रतनगड, इर्शाळगड या किल्ल्याना देखील आहे. वेळेच भान असल्याकारणाने लगेचच तिथून काढता पाय घेत, आलो त्या वाटेने मध्ये पाण्याच्या टाक्याच्या इथे पाणी पिऊन भराभर बॅगा ठेवलेल्या त्या राजसदरेवर पोचलो.
आजचा टप्पा हा राजगडावरून अळू दरवाजाने गडउतार होऊन राजगड तोरणा या धारेने तोरणा किल्ल्याच्या बुधला सुळक्याच्या इथून वर चढून वाळंजाई दरवाजाने उतरून भट्टी गाव गाठणे. आता संजीवनी माची गाठून तसाच राजगडाला निरोप देण्याची वेळ आली होती. यावेळेस राजगडावर पाहिजे असा वेळ देता येत नसल्याने आणि यावेळेच उद्दिष्ट किल्ल्यांपेक्षा त्यांना जोडणाऱ्या वाटा हे असल्याने आपसूकच कुमार गंधर्वानी गायलेल्या गीताच्या ओळी मुखी दाटल्या होत्या-
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी ||
राजसदर सोडून पुढे येउन डाव्या बाजूची सुवेळा माचीची वाट सोडून पुढे येऊन संजीवनी माचीची उजव्या बाजूची वाट धरून बालेकिल्ला डाव्या अंगाला ठेवून वळसा मारताना घड्याळाचे काटे सव्वा अकराच्या पार गेले होते. संजीवनी माचीचे दणकट रूप आणि चिलखती बुरुज थांबण्या सांगत होते, तर समोर दिसणारा तोरणा देखील आम्हाला हाका मारीत होता. सकाळचा हुरूप असल्याने चाल चांगलीच वेगवान होती, बघता बघता संजीवनी माचीवरील चिलखती बुरुज, पाण्याचे टाके पार करून तटबंदीला असलेल्या अळू दरवाजाने किल्ल्यातून बाहेर पडून, पुढे संजीवनी माचीचा ट्रॅव्हर्स मारून राजगड दूर करू लागलो, लवकरात लवकर अंतर कापावं आणि जास्त थांबे घेऊ नये म्हणून मी या तिघांपासून
२००-३०० पावले पुढेच चालत होतो.वाटेत एक गावकरी पाण्याच्या बाटल्यांचा बोजा डोक्यावर मारून गडावर विक्री करण्यासाठी चालले होते, त्यांच्याशी जरा वेळ बोलून निघालो, हा हा म्हणता संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजाखाली आलो. इथून दोन वाटा फुटतात, डावीकडे जाणारी वाट ही भुतोंडे गावाकडे जाते, तर उजवीकडची वाट ही तोरण्याकडे जाते, हीच वाट आम्हाला पकडायची होती. बुरुजाखाली आल्यावर दोन्ही वाटा ठळक दिसत होत्या आणि दोन्ही वाटांवर असलेले मोठे दगड त्यांवरील असलेल्या खुणांमुळे लक्ष वेधून घेत होते.
 |
| झूम करून बघितले असता डावीकडच्या दगडावर बाण तर उजवीकडच्या दगडावर X फुल्ली लांबूनच दिसते |
आम्हाला ज्या वाटेने जायचे होते त्या तोरण्याच्या वाटेवरच्या दगडावर x खूण केली होती, तर भुतोंड्याकडे जाणाऱ्या वाटेच्या दगडाला बाणाची खूण केली होती. स्वाभाविकच वाट मोडली असेल किंवा दरड कोसळली असेल किंवा अजून काही कारणाने त्या वाटेने जाऊ नका असा अर्थ घेऊन आम्ही डाव्या बाजूची वाट घेतली.
वाटेला सुरुवातीला तीव्र उतार आणि घसरण होती, उतरायला मजा येत असली तरी काळजीपूर्वक कारण पाय सरकला की भूमीवर लोटांगण घातलच म्हणून समजा.
 |
| संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजाखालची उतरण |
मागे वळून पाहिलं तर बाकीच्यानी देखील चांगला वेग पकडला होता. राजसदर सोडल्यापासून पाठीवर वजन असूनदेखील कोणीसुद्धा मध्ये थांबलं नव्हतं, दिवसाची सुरुवात चांगल्या गतीने चालू होती. मी यांच्यापासून पुढेच चालतोय, उतार संपला आणि सपाटीला लागणार तोच एका झाडाच्या मुळात पाय अडकून तोल गेला आणि मी जोरात सुपरमॅन सारखा सूर मारून खाली आडवा झालो, पाठीवरच्या बॅगच्या वजनामुळे मला नीट उठता येत नव्हतं आणि मी अडकूनच राहिलो होतो. मागच्यांना आवाज द्यावा म्हणून मागे बघतोय तर हे सर्व लांब होते आणि मी ओरडलो तर धावत येतील, आणि तो रस्ता धावत येण्याचा नव्हता म्हणून तसाच अवघडलेला पडून त्यांची येण्याची वाट पाहू लागलो. ढोपर फुटलं होत, हाताचा कोपरा देखील ठणकत होता. बऱ्यापैकी लागलं असणार पुढचा पूर्ण पल्ला माझ्या नजरेसमोरून झरझर जात होता. एवढ्यात मनोज आला, मस्त फोटो काढून त्याने माझ्या पाठीवरची बॅग काढून मला उठायला मदत केली.

बसून बघतोय तर ढोप्यावर ट्रॅक पॅन्ट फाटली होती, आत ढोपर देखील चांगलंच फुटल होतो, रक्त येत होतो, डाव्या हाताच्या कोपऱ्यावरदेखील खरचटलं होतं, टीशर्ट देखील तिथं फाटलं होत. सह्याद्रीला अखेर नतमस्तक होऊन रक्त वाहील होत. आता पर्यंत लोटांगण आणि नतमस्तक बऱ्याच वेळा झालो होतो, पण रक्त येण्याची ही पहिलीच वेळ. फर्स्ट एड काढून जखम साफ वगैरे करून औषध लावलं आणि पुढचा पल्ला गाठायला चालू केला.
राजगडावरील राजसदर सोडून आता तासभर वेळ झाला होता, आणि मी पडल्यामुळे ब्रेकही चांगलाच मिळाला होता, त्यामुळे परत जोमाने चाल धरली, अजून थोडा वेळ पुढं गेलो असू तर गुगल मॅप बघितला आणि मनात एक शंका आली की आपण वेगळी वाट धरलीय, सागरने मागच्याच वर्षी राजगड तोरणा केला होता म्हणून त्याला विचारलं तुला काय वाटतय वाटेबद्दल तर साहेब म्हणतात- "मला तर हीच वाटते". वाटेवरच्या त्या खुणा आणि सागरदेखील म्हणतोय तर आपण बरोबरच आहोत. वाट मस्त मळलेली आणि बऱ्यापैकी सावलीतून होती आणि आमचं टार्गेट होत चार ते पाच तासात तोरणा गाठायचं.
वाटेने सरळ चालतोय तर आम्ही चालत असलेल्या धारेच्या खालच्या अंगाला डांबरी रस्ता वळसा घालून जात चाललेला दिसत होता, राजगड तोरणा ही रेंज करताना पाली खिंडीत याच रस्त्याला आपण ओलांडतो. त्यामुळे आता आम्ही ठरवलं की पुढे हा रस्ता खाली उतरून डांबरी रस्त्याला मिळेल मग तिथून आपण राजगड तोरण्याचा मुख्य वाटेला लागू. पुढे आलो चालतोय तर एक पठार लागलं, पठारावर एक सायकल आडवी पडलेली आणि एक साडी दिसली, आमच्या चौघांव्यतिरिक्त वेगळ्या मानवी खुणा दिसल्याने आम्हाला जरा हायस वाटलं.
 |
| संजीवनी माची - बालेकिल्ला - सुवेळा माची |
आजूबाजूला हाका मारल्या पण प्रत्युत्तरादाखल काहीच उत्तर न आल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला, त्या पठारावरून मागे नजर फेकली असता राजगडाची संजीवनी माची, बालेकिल्ला आणि सुवेळा माची हे सार एका नजरेत दिसत होतं, यावरून आम्ही कुठुन कुठे आलोत याचा अंदाज येत होता. पावलांना परत गती दिली आणि तीच पायवाट धरून सरळ पुढे निघालो, आता आमचा यत्न होता तो डांबरी सडकेला लागण्याचा. एवढ्यात चालताना त्या वाटेवर एक घर दिसलं, वाटेवरती असं घर, झाप किंवा मानवी वस्तीच्या खुणा दिसणं हे एखाद्या भटक्यासाठी खूप मोलाचं असतं.
 |
| वाटेवर लागलेली २ घरं |
आजी मी ब्रम्ह पाहिले, अस काहीस असतं ते. दोन घर होती, त्यातील एका घराच्या बाहेर चप्पल होती, पण दरवाजा लावला होता, हाका मारतोय पण पलीकडून काहीच आवाज येत नव्हता, वाटलं बहुधा ती सायकल दिसली होती, तिकडेच गेले असावेत, राम भरोसे पुन्हा मग पुढे चालू लागलो. ते घर सोडलं आणि आता वाट जरा कमी मळलेली होती, गवत ढोप्याएवढं वाढलं होत आणि त्यातून बारीक पायवाट दिसत होती. राजगड तोरण्याची मुख्य धार देखील इथून आम्हाला दिसत होती, पण तिच्याकडे जायचा रस्ता मात्र काही कळत नव्हता, डांबरी सडक देखील बहुधा आमच्या धारेला खेटून जात असावी त्यामुळे ती देखील दिसत नव्हती, आमचं उद्दिष्ट आता डांबरी रस्ता हेच होतं. गवतातल्या वाटेतून आता परत झाडीत येणार तोच एक डोंगरतल्या पाण्याचा डोह दिसला, तिथेच थांबा घेत पोटभर पाणी पिऊन घेतलं, मस्त चहाचे घुटके घेतले आणि पुढच्या वाटेला निघालो.
 |
| धारेच्या टोकावर लागलेलं देवीचं मंदिर |
एवढ्यात अप्पांचा फोन आला, चालू घटना अप्पांच्या कानावर घातली त्यांनी सुद्धा आम्हाला डांबरी रस्त्याला उतरण्यास सांगितलं. चालतोय चालतोय, वाट काही मिळत नव्हती एक वाजून गेला होता, सूर्य देखील डोक्यावर आला होता, त्याची प्रखरता एवढी जाणवत नव्हती ते एक आमच्यासाठी चांगलं होत, इतक्यात लांबूनच एका मंदिराचा कळस दिसला पाहतोय तर समोर छान मंदिर बांधलं होत, त्या मंदिराचं बांधकाम स्लॅब टाकून, टाईल्स वगैरे लावून केलेलं, मंदिराच्या पुढे जेसीबी लावून मातीचा मोठा रस्ता केलेला दिसत होता. हे सर्व दिसताच क्षणी आपण आता लगेच डांबरी रस्त्याला लागणार हे पक्क झालं. मंदिराजवळ गेलो, बॅग्स काढल्या आणि अजीबाजूच्या परिसराचा कानोसा घेऊ लागलो, गाव काही जवळजवळ दिसत नव्हतं, आपलं ध्येय असलेलं डांबरी रस्ताही दूरवर कुठे नजरेत येत नव्हता, प्रिसिलिया आणि सागरला तिथेच बसवून मी आणि मनोज त्या कच्च्या रस्त्याने पुढे काही उतरायला दिसतय का बघायला गेलो. पुढे येऊन एका वळणावर थांबलो आणि पाहतोय तर नजर जाईस्तोवर तो कच्चा रस्ताच दिसत होता, गूगल मॅपवर बघतोय, तर डांबरी रस्ता आम्हाला जायच्या अगदी विरूद्ध अंगाला होता, त्यामुळे तिकडे उतरून परत वळसा मारत चालत येणं म्हणजे मुक्काम आम्हाला कुठे तरी रस्त्यातच करावा लागला असता.
तिथून फिरलो मागे आणि ही दोघ बसली होती, त्या मंदिरापाशी आलो आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली होती, एकंदर परिस्थिती सगळ्यांना महिती होती. घड्याळात दीड वाजले होते. त्या बुरुजापासून आता आहोत त्या मंदिरापर्यंत यायला आम्हाला पावणेदोन तास लागले होते. आता आमच्याकडे दोन पर्याय होते, पहिला- ते घर आणि ती सायकल दिसली होती तिथे कोणी आहे का हे शोधून त्यांना वाट विचारायची किंवा दुसरा- आलो त्या मार्गाने पार बुरुजापर्यंत जायचं जिथे वाट सोडली होती तिथूनच वाट पकडायची. मी जेव्हा पडलो आणि त्यानंतर जेव्हा जाणवलं होत वाट भरकटलो तेव्हा तो चढ चढायला लागू नये म्हणून माघारी न फिरता एवढं अंतर कापलं होत. आता परत त्याच वाटेने जायचं म्हणजे अगदी अंगावर आलं होत.
 |
| पाण्याचा डोह |
त्यात तोरणा चढून आम्हाला उतरायच देखील होता, याच कारण म्हणजे हर्षल दादा आम्हाला तोरण्याच्या पायथ्याशी असलेल्या भट्टी गावात भेटणार होता, त्याला देखील यायला रात्र होणार होती, तर त्याला उगाच रात्री का तोरणा चढून दमवायचं, तसाही मागच्या वर्षी त्यानेदेखील राजगड तोरणा केला असल्यामुळे त्याने पहिल्या दिवशी सुट्टी घेणं टाळलं. उद्यासाठी कोणीतरी आपल्यात ताज्या दमाचा असणार या हेतूने सर्वांच एकमत झालं होत. आता भरभर अंतर कापत त्या पाण्याशेजारी आलो, पोटपूजा करून पुढची चाल धरूया म्हणत चटणी भाजी भाकरी लोणचं फरसाण यावर ताव मारला, भरपेट पाणी पिऊन आणि जवळच्या पाणपिशव्या देखील भरून आता समोर काय वाढून ठेवलंय याची चांगलीच कल्पना होती, त्या दृष्टीने पुढची चाल धरली. मंदिर जेव्हा सोडलं तेव्हा संजीवनी माचीचा तो बुरुज आणि त्याच्या खालचा उतार चांगलाच नजरेत भरत होता, त्या उतारावरून तेव्हा एक गुराखी आपल्या गुरांना घेऊन उतरत होते, वाटेत आपल्याला ते मामा भेटू दे, अशी आशा देखील आम्ही बाळगून होतो.
 |
| सीट नसलेली सायकल |
पाणवठा सोडून निघालो, ते घर आलं, घराजवळ पुन्हा आवाज दिले, कोणीच नाही, पुढे चाल धरली पठारावर आलो. ती सायकल तिथेच असुदे, म्हणजे कोणीतरी तिथं असणार असं स्वतःशीच बोलत त्या पठारावर पोचलो, लांबूनच ती सायकल दिसली आणि हायसं वाटलं, त्या साडीवर दगड ठेवले होते, म्हणजे ती साडी देखील वाळत टाकली होती, इथे नक्कीच कोणीतरी असणार, आलो सायकलपाशी आलो, पाहतोय तर सायकलला सीटच नाही, म्हणजे ती सायकल तशीच टाकून दिली होती, पुन्हा हिरमोड! का कुणास ठाऊक पण त्या पठाराच्या पुढे अजून एक पठार आहे, तिथे जाऊन खाली उतरायला काही वाट दिसते का बघूया...अजून खुमखुमी गेली नव्हती अस नाही, तर तो शेवटचा चढ खरंच नको वाटत होता, सागरला तिथे थांबवून बॅग्स सोडल्या आणि आम्ही तिघ काही वाट दिसते का बघायला गेलो. दोन्ही पठारांच्या मध्ये वरच्या बाजुने एक काळा पाईप खाली आला होता आणि पाईपच्या या टोकाखाली एक मोठा टोप पाण्याने भरत ठेवला होता, वरच्या बाजूला एक पाण्याचा डोह होता तेथून तो पाईप आणला होता.आता इथे नक्कीच कुणीतरी आहे याची पुष्टी मिळाली पण कोणी कुठेच दिसत नव्हतं. तिथून पुढे त्या दुसऱ्या पठारावर पोचलो आणि प्रिसी, मनोज ला एका बाजूला पाठवले आणि मी एका बाजूला असे विभागून काही वाट मिळते का शोधु लागलो. थोडा आडबाजूला घुसलो आणि मला दगडावर एक बाण दिसला, आता इथून वाट असणार, या आशेने मी पुढे चालू लागलो, वाटेने चालता चालता पठार संपलं आणि उतारावर जंगल चालू झाल आणि वाट त्या झाडीत जात होती, मघाशी येताना या पठाराच्या अलीकडेच खाली डांबरी रस्ता दिसला होता, म्हणजे ही वाट त्या डांबरी रस्त्याला लागणारच, प्रिसी आणि मनोजला लगेच हाक मारून सविस्तर समजावलं आणि आता पुढे जाण्यापेक्षा इथून उतरुया, अस ठरवून सागरला बोलवायला आणि आमच्या बॅग आणायला गेलो. जाता जाता त्या टोपापाशी आलो त्यात अजून एक छोटी टोपशी होती, त्या टोपशीने तिघांनी पाणी प्यायलं. कोरडा घसा ओला केला, उन्हात असल्यामुळे पाणी गरम झालं होत, पण कोरड्या घशाला हे देखील चालणार होतं.
सागरजवळ पोचलो, बॅग पाठीला मारल्या आणि सागरला आम्ही खोट सांगणार होतो की वाट नाही, आपल्याला त्या बुरुजाजवळच जायचं आहे, इतक्यात त्या बुरुजाखाली दिसलेले गुराखी मामा आमच्यापाशी येऊन पोचले होते, गुरांसाठी डोक्यावर गवताचा भारा घेऊनच ते आले होते. लगबगीने त्यांच्या जवळ आलो, बुरुजाजवळच्या त्या खुणांपासून ते आम्ही पोचलेल्या मंदिरापर्यंतचा इतिवृत्तांत मामांना सांगितला आणि इथून काही वाट आहे का विचारलं, मामा बोलले त्या बुरुजाच्या खालून एक डावीकडे वाट जाऊन त्या तुम्हाला जायचंय त्या सोंडेला मिळते तर इथून या पठारावरून एक वाट खाली जाऊन डांबरी रस्त्याने तुम्ही पाली खिंडीत पोचू शकता.

मामा वाट दाखवायला येता का अस विचारण्यात तसूभरही उशीर केला नाही, हा गवताचा भारा घरला टाकून येतो अस म्हणत मामांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ते येण्याची वाट पाहू लागलो. मामा आले, आमची पावले आता त्या दुसऱ्या पठाराकडेच चालली होती, बोलता बोलता मामा बोलून गेले, सकाळपासून काय खाल्लं नाही, बेक्कार भूक लागलीय. पुढे आलो त्या पाण्याने भरलेल्या टोपापाशी आलो पाहतोय तर टोप रिकामा. अरे! इथे आलं तरी कोण इतक्यात? मामा तर आमच्या समोर आले, आणि सोबतच आहेत, मग कोण? इतक्यात मामांची गुर वरच्या डोहात पाणी प्यायला गेलेली दिसली आणि कळलं की हे पाणी देखील गुरांसाठीच ठेवलेलं होतं. गुरांचं पाणी आम्ही प्यायलं होत अस कळल्यावर आम्ही सगळे एकमेकांकडे बघून मनातल्या मनात ओशाळत होतो. झाल्या घटनेवर दुर्लक्ष करून वाटेवर लक्ष केंद्रित करून मामांच्या मागे मागे चाललो होतो, मामांनी आम्हाला मला जी वाट दिसली होती त्याच वाटेवर आणून सोडलं त्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला पठाराच्या कडेला नेऊन आम्हाला ज्या पाली खिंडीतून मुख्य वाटेला लागायचं होत ती खिंड देखील दाखवली आणि मामांनी आमचा निरोप घेतला, निरोप देताना त्यांचे शब्द मला आठवले आणि आमच्याकडे असलेल्या भाकरी आणि बिस्कीटपुडा त्यांना देऊन त्यांचा रामराम घेतला, मामा म्हणत होते पुढे वाट दाखवायला येऊ का? पण त्यांना तिथेच थांबवत पुढची वाट धरली, मागे वळून बघितलं तर मामा पुढे जाऊन परत आमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. डोंगरातल्या माणसांच्या याच माणुसकीमुळे हे डोंगर आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे येण्यास प्रवृत्त करत होते. लक्ष्मण डेबे हे नाव स्मृतिपटलावर कायमच कोरलं गेलं होतं.
 |
| मामांकडून वाट समजून घेताना |
पुढची वाट ही उतारावरील आणि झाडांच्या सावलीतून आणि महत्वाचं आता योग्य वाटेला लागणार त्यामुळे पुन्हा वेग घेत अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही डांबरी रस्त्याला येऊन भिडलो होतो, इथून दोन अडीच किलोमीटरचा पल्ला मारून आम्ही पाली खिंडीत पोचणार होतो. डोंगरातील पायवाट तुडवताना काही वाटत नाही, पण मध्येच जेव्हा असा डांबरी रस्ता येतो तेव्हा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. डांबरी रस्त्याने जाताना ऊन देखील जाणवत होतं आणि पाठीवरच वजनसुद्धा! एका ठिकाणी सावलीला थांबून काही गाडी मिळते का बघत होतो. एवढ्यात एका बाईकचा आवाज येऊ लागला. आशेचा पहिला किरण होता तो, पण जशी ती बाईक नजरेच्या टप्प्यात आली आणि त्या बाईक स्वाराची बसण्याची पद्धत बघितली, त्यावरून लगेच अंदाज आला की बाईक पंक्चर आहे. तो जसा जवळ येऊ लागला तसा आमचा कल्लोळ वाढू लागला, त्याने आमच्या जवळून जाता जाता आमच्याकडे कटाक्ष टाकला, त्याला देखील हसू आलं होत आणि आम्ही देखील एकमेकांकडे बघून खिदळत होतो, आणि हे सर्व मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो. त्यानंतर अजून एक बाईक वाला आला तर ते दोन जण होते, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. चला उठा आणि वाटेला लागा, बॅग पाठीवर मारली आणि तो डांबरी रस्तादेखील आता आम्ही पायाखालून घालू लागलो.
 |
| तार रस्त्याची कंटाळवाणी चाल |
डांबरी रस्त्याला एका ठिकाणी वळण घेत असताना समोर एकदम संजीवनी माचीचा चिलखती बुरुज एकदम समोर आला, हा तोच बुरुज जिथे आम्ही वेगळी वाट घेऊन चौऱ्याऐंशीचा फेरा मारून चाललो होतो, त्या बुरुजाकडे पाहून तो बुरुज आम्हाला खिजवीत आहे असच काहीस चित्र आमच्या समोर उभं राहत होतं. येणाऱ्या गाड्यांकडे आशेने बघत बघत, मजल-दरमजल करत अखेर त्या पालिखिंडीत पोचलो.
 |
| खिंडीतून वाटेला लागल्यावर वाटेच्या उजव्या बाजूला असलेलं घर |
राजगडावरून येऊन त्या खिंडीत उतरणारी वाट आणि त्या खिंडीतून तोरण्याकडे जाणारी वाट हे दोन्ही फाटे दिसले तिथेच सा.बां. विभाग वेल्हे हद्द सुरू असा बोर्ड देखील लावला आहे. दीड वाजता परत मागे फिरायचा निर्णय घेऊन दोन वाजता जेवून वगैरे निघून साडेचारच्या ठोक्याला आम्ही राजगड तोरण्याचा वाटेच्या मध्ये त्या पालिखिंडीत पोचलो होतो, एकंदरीत त्या बुरुजाकडे न जाता ही वाट मिळून अर्धा पल्ला गाठला हे आता आमच्यासाठी खूप मोठं सुख होत.खिंडीतून वर चढलो, भराभर पावले टाकीत, तोरणा जवळ करत होतो, खिंडीतून वर चढल्यावर कारवीच्या झाडोऱ्यातून गेल्यावर एका ठिकाणी वाटेच्या उजव्या बाजूला घर लागते ही खूण सागरने सांगितली आणि लगेच ते घर लागलं. चला! आता आपण योग्य वाट पकडलीय, अस म्हणत पावलांनी वेग घेतला. थकलो होतो, पण तरीही पुढचा जो काही पल्ला गाठायचा होता त्यासाठी नव्हतो थकलो. भराभर पावलं टाकत मी आता यांच्यापासून परत दूर झालो, कुठे वाट वाकडी झाली असेल तिथेच थांबायचो, मागे मनोज दिसला की माझी गाडी पुन्हा सुसाट. आता न थांबताच जाता येईल तितकं जायचं. सकाळी त्या मुलांनी सांगितलं होत की बुधल्याच्या इथे चढताना वेळ जाईल, म्हणून उजेडातच तो टप्पा मारुया अस ठरवून पावलांना गती दिली होती.
 |
| सुख |
सूर्यनारायण देखील शांत होत चालले होते, तर डोक्यापेक्षा उंच कारवीतून जाताना गारवा लागत होता, त्यामुळे वाट कापण अजून सोईस्कर होत होतं. सूर्याच्या छटा बदलत होत्या तसा माझा वेगही दुणावत होता. माझ्यात आणि मागच्यांमध्ये अंतर वाढत चाललं होत. राजगड तोरणा ही धार चढताना सारख वर खाली वर खाली करावं लागत. एका ठिकाणी आता मला दोन फाटे फुटलेले दिसत होते सरळ जायचं कळत होत, तरी मागच्याना थांबून सागर कडून एकदा पुष्टी करून घ्यावी म्हणून थांबलो. थांबलो, पाहतोय तर माझा वेग जरा जास्तच होता, आणि मला गाठण्याच्या नादात हे तिघेही दमून गेले होते, तिथेच थोडा विसावा घ्यावा म्हणून बसायला सांगितलं, चहा दिला सर्वांना थोडं बर वाटलं आणि पुढे लवकर जाऊया जेणेकरून उजेडात वर पोचलो तर पुढची वाट शोधण्यास चांगला वेळ मिळेल. मोबाईलवर हर्षल दादाचा मेसेज आला होता घडला सर्व वृतांत त्याला सांगितला आणि त्याला भट्टी गावातल्या शाळेतच भेटायचं अस सांगून ठेवलं होत.
पुढे गेल्यावर एक देवाचं ठाण लागलं, त्याच्याच पुढच्या दिशेने कुत्रा भुंकण्याचे आवाज आला, कुठे तरी जवळपास मनुष्यवस्ती आहे, असा भास झाला, थोडं पुढे आल्यावर एक बोर्ड होता त्यावर तोरण्याकडे आणि राजगडाकडे जाणाऱ्या वाटांचे बाण दाखवले होते, आणि रात्र झाली तरी जेवणाची सोय होईल असा आशय त्यावर लिहिला होता. समोरून एक मावशी चालत आल्या, त्या त्यांच्या गुरांना घेऊन चालल्या होत्या, त्यांच्या अगोदर त्यांचा कुत्रा आमच्या इथे येऊन आम्हाला हुंगायला लागला. मावशी चालत येत असलेल्या दिशेने मागच्या बाजूला त्यांचं घर देखील दिसत होत. मावशींना तोरण्याला पोचायला अजून किती वेळ लागेल विचारलं असता अजून तीन तास लागतील अस मावशींनी सांगितलं आणि आम्ही एक प्रकारे आवंढाच गिळला.

सव्वापाच-साडेपाच झालेले असताना तोरण्याला पोचायला अजून तीन तास लागणार बोलल्यावर पेचातच पडलो होतो. किती काही झालं तरी ठरल्या जागी पोचायचंच असा एक निर्धार करून निघालो, तांबूस रंगाचा गोळा आता हवेत विरण्या चालला होता, त्याचीच गती पकडून पावले आपोआप पुढे ढकलली जात होती.बुधला सुळका आमच्या बरोबर समोर उभा राहून, या पोरांनो, लवकर या असच काहीसा खुणावत होता. तर मागे संजीवनी माचीवरील बुरुज आम्हाला खिजवीत होता.
चढ-उतार-कारवी अश्या त्या सोंडेवरून जाताना दिनभास्कर आता त्यांचा कारभार उरकून गुडूप झाले होते, चढायचं उतरायचं एक एक टेपाड मागे सारून बुधला जवळ करायचा हेच काय ते आता उरलं होतं. पाठीवरच्या वजनामुळे आता थकवा जाणवायला लागला आणि काळोख देखील पडायला सुरुवात झाली. बुधल्याच्या फक्त दोन टेपाड मागे असू तर थांबून सर्वाना टॉर्च काढायला सांगून पुढची वाट चालू लागलो. एवढ्यात मी सांगितलं की आता काळोखातच चढायचं आहे तर आता थांबुया जरा जास्त वेळ आणि मग चांगल्या प्रकारे हुरूप मारू, थांबून निघालो आणि समोर आता एकदम उभा चढ लागला, हात टेकत, धापा टाकत तो उभा चढ चढलो आणि वर एकदम बसलो. ही बॅग घेऊन मला काही आता लगेच पुढं सरकण होणार नाही, आता पार थकलो होतो, सकाळी दहा वाजता सुरू झालेली चाल, काटे आता साडेसहाला टेकले होते. आम्ही अजून तोरण्यावर पण नव्हतो पोचलो. मनाशी ठरवलं होत किती काही झालं तरी मी डगमगणार नाही, जे जस ठरवलंय तसच पूर्णत्वास नेईन. एवढ्यात सागरने माझी बॅग घेण्यास तयारी दाखवली, आमच्या चौघांच्यात सागरचा पहिलाच जंबो ट्रेक असल्याने मी त्याच्या बॅग मध्ये आमच्या चौघांच्या तुलनेत कमी वजन भरले होते, त्याचा फायदा आता झाला. जशी सागर ने माझी बॅग आणि मी सागरची बॅग घेतली तस मी स्वतःला एकदम हवेतच उडतोय अस अनुभवायला लागलो. बुधल्याचा तो रॉकपॅच चढताना आता सागर पुढे तर त्याच्या मागे मी मनोज प्रिसी असे आम्ही चढत होतो. त्या मुलांनी सांगितलं तस कठीण वगैरे काही नव्हतं, सुरक्षितपणे आम्ही वर चढून तोरणा किल्ल्यावर प्रवेश केला. बुधला सुळक्याच्या बाजूने जाताना तिथे एक कॉलेज पोरांचा ग्रुप टेंट आणि शेकोटी लावून कॅम्पिंग करत होते. त्यातल्याच एक दोघांनी आमची विचारपूस केली. त्यांना निरोप देऊन आता आम्ही वाळंजाई दरवाजा शोधू लागला. बुधल्या कडून मेंगाई मंदिरच्या दिशेने चालत जाताना डाव्या बाजूला १०० मीटर च्या आत हा दरवाजा आहे असा माझा अभ्यास सांगत होता. त्या दृष्टीने एका ठिकाणी मी उतरलो तिथे तटबंदी ढासळली होती,मला वाटलं इथून वाट असू शकते, तिथे जाऊन नीटस काही दिसत नव्हतं, मग मनोजला सांगितलं पुढे जाऊन डाव्या बाजूला कुठे वाट जाते का बघ, दरवाजा असणार, १०० पावलांच्या आतच तुला दरवाजा दिसला पाहिजे. आतापर्यंत माझ्याकडे सोलार लाईट होती आणि ती हातात घेऊन चालत होतो, सागर कडून त्याची हेडटॉर्च घेऊन आजूबाजूला कुठे वाट दिसतेय का बघू लागलो, इतक्यात मनोजचा आवाज आला की दरवाजा आहे म्हणून. अंधार पडला होता आणि उशिरही इतका झाला होता की आता फोटो काढायचे देखील कुणाच्यात त्राण नव्हते.
रात्री दोन वाजता येऊन पहाटे चार पर्यंत राजगड चढलो, आणि सकाळी राजगडावरून निघून ७ वाजेपर्यंत तोरण्यावर पोचलो होतो, पण खरंतर हा आजचा ट्रेक नव्हताच, कारण ही वाट चांगली मळलेली होती, त्यात दुसरी वाट पकडून भरकटलो ही गोष्ट वेगळी. आजच्या दिवसाचा खरा ट्रेक तोरणा किल्ल्यावरील वाळंजाई दरवाजा शोधून त्या वाटेने भट्टी गाव गाठणं हा होता. कारण ओंकार ओक याच्या म्हणण्यावरून त्या वाटेने जास्त कोणी जात नाही, आणि पावसाळा लांबल्यामुळे कारवी भयंकर झाली असणार. ओंकार बोलला ते खरंच होत, दरवाज्यात पोचेपर्यंतच गवत इतक होत आणि पुढे कोणी गेला असेल अस काही वाटत नव्हतं. दरवाज्यात पोचलो सोलार लाईट आता बॅगला लावली हेडटॉर्च काढून डोक्याला लावली आणि निघालो. दरवाजातून निघून सुरुवातीला उजव्या बाजूने ट्रॅव्हर्स मारत हळू हळू चाललो होतो, तण खूप माजलं होत, त्यातून वाट काढत एक एक पाऊल सरकवत चाललो होतो, मध्ये एका ठिकाणी थांबून कोयता काढला आणि वाटेतील गवत कापत मी पुढे आणि मागे सगळा चमू येत होता. इथून पुढे गेल्यावर वाळंजाई देवीचं ठाणं लागतं,तिथून डावीकडे सरळ वाट खाली जाते, हे मला माहीत होतं. मनोजने जेव्हा तोरणा किल्ला केला होता, तेव्हा तो या ठण्यापर्यंत आला होता, तिथं पाण्याचं टाकं देखील आहे अस मनोजने सांगितलं. सावरत-सांभाळत चालता चालता त्या वाळंजाई देवीच्या ठण्यापर्यंत पोचलोदेखील. टाक्यातील त्या पाण्यात छोटे-छोटे मासे मस्त विहार करत होते, त्या टाक्यातील पाणी पिऊन तृषा शांत केली, थांबाही बऱ्यापैकी झाला होता. माझ्याकडे सागरची बॅग असल्याने मी देखील आता पुढची वाट शोधण्यास तयार होतो. देवीच्या ठाण्याच्या इथून खाली भट्टी गावातील लाईट दृष्टीत येत होत्या खाली उतरलेली वाटही दिसत होती. बॅगा लावल्या आणि खाली दोन पावले उतरलो नसू तोच वाट पूर्ण कारवीने झाकलेली. उजेडात असताना ही वाट उतरायला काही वाटलं नसत, पण काळोखात ही वाट उतरण जिकरीचंच होत. कोयता काढला, सपासप कोयता चालवीत मागच्याना वाट करत मी चाललो होतो, चौघांमध्ये जास्त अंतर न ठेवता हळूहळू आम्ही अंतर कापत होतो, एवढ्यात हर्षलदादाचा कॉल आला, त्याला सांगितलं की - "वाळंजाई देवीचं ठाणं ओलांडून गावाकडे येणाऱ्या धारेवरील वाटेला लागलो आहोत, वाट वरून पूर्ण झाकलेली आहे, पण खाली मळलेली वाट आहे, किती लेट झालो तरी तू शाळेतच थांब, आम्ही शाळेतच पोचू." जेवणाचं विचारलं असता, गावात आल्यावरच आता काय ते जेवण असा विचार असताना दादा बोलला की मीच जेवण घेऊन येतो तुमच्यासाठी. दादा आमच्यासाठी जेवण आणतोय बोलला म्हणजे हा काय अजून निघाला नाही, म्हणजे आपण लवकर पोचू आणि त्यामुळे दादाला आपल्याला शोधायला यावं लागणार नाही, यामुळे त्या तशा वेळेसही जरा हायस वाटलं.
वाट खरंच कारवी मध्ये अक्षरशः झाकून गेली होती, कोयता चालवायची सवय नसल्याने अवघड होत होतं, पण आल्या वाटेवरून फिरून तोरण्याला मुक्काम करून हर्षल दादाला वर बोलावणं शक्य नव्हतं आणि आम्हाला देखील माघारी जाऊन वेल्हा मार्गे उतरण केवळ अशक्यच! त्यामुळे जे काही आहे ते समोर आहे, त्यातूनच मार्ग काढणे हेच जास्त सोपं होत. आलिया भोगासी अस काही आमचं चालू होत. मागच्याना माहीत असेल की नसेल माहीत नाही, पण मला अजूनही खर वाटत नाही की मी त्या वाटेने खाली उतरलोय आणि बाकीच्यांना देखील सुखरूप खाली उतरवलय. सागरने बॅग घेतल्याचा यात खरच फायदा झाला. भट्टी गाव आता आम्हाला दिसत असलं तरी ते आमच्यापासून दूर होत आणि त्यात काळोख आणि ही अशी दाट कारवी भरली वाट. कोयता चालवून चालवून हात दुखायला लागला होता, शेवटी त्या कारवीतच मधल्या मध्ये बसून थांबा घेत, पाणी पीत आम्ही आमची वाटचाल करत होतो, मी इतका थकलोय बोलल्यावर बाकीचे पण जाम थकले असणार पण कोणीही तोंडातून ब्र काढत नव्हता. यामुळे आपल्यासोबत जी काय मोजकी लोक आहेत ती खरंच चांगली आहेत, याच सार्थक वाटलं. कारवी संपून आता मोठी झाडी लागली त्यात देखील वाट कारवीने झाकली होती फक्त जे काही गावाच्या लाईट्स दिसायच्या त्या आता मोठ्या झाडांमुळे दिसत नव्हते, परिणामतः दिशा मिळणं जरा कठीण झालं होत. त्या झाडीतून देखील वाट काढत वाट आता हळू हळू डाव्या बाजूला म्हणजेच गावाकडच्या बाजूला कलू लागली आणि एका ओढ्याला येऊन थांबली. ओढ्याला पाणी वाहत होत, तिथे एक थांबा घेऊन माझ्या लक्षात आलं की भट्टी गावाच्या बाजूने ओढा जातो. बऱ्यापैकी आम्ही आता गावाच्या जवळ आलो होतो, पण ओढ्याच्या इथे आल्यावर पुढे कुठल्या बाजूला जायचं अशी पहिल्यासारखी बरी वाट समजतच नव्हती आलो तीच वाट पकडून गेलो तर ती वाट वर चढू लागली आणि परत ओढ्यात मिळाली आणि ओढ्यात तिथे झाडी अशी वाढली होती की इथून पुढे वाट असेल अस काही वाटत नव्हत, माघारी फिरून परत सागर गेलेला तिकडे गेलो, त्या बाजूला ढोप्याएवढं गवत वाढलं होत आणि खूप साऱ्या बारीक बारीक वाटा फुटलेल्या दिसत होत्या. त्यातल्या त्यात सागरला एक वाट चांगली दिसली, त्याने मला आवाज दिला, ती वाट बघून याच वाटेने जाऊया अस म्हणत त्या दोघांना बोलवायला आणि आमच्या बॅग्स आणायला गेलो. सकाळी दहाला चालू झालेली तंगडतोड रात्रीचे दहा वाजले तरी संपण्याच नाव घेत नव्हती.
ही वाट आता ओढ्याच्या कडेने जात होती, गवत वाढलेलं असल्यामुळे खाली मळलेली वाट आहे किंवा अशीच तात्पुरती वाट आहे काही कळत नव्हतं, चालता चालता एक निवडुंगाच झाड लागलं आणि तिथे मातीवरून गेलेली मळलेली वाट दिसत होती, आणि गावातल्या लाईट्स देखील आमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या दिसत होत्या. वाट आता पठारावर आली आणि संपली. आता कुठे जायचं? गाव समोर दिसतोय पण वाट कुठेच नव्हती पठाराच्या कडेला आलो तर तिकडून उतरून काट्याकुट्यातून जाण त्रासदायक ठरलं असतं, दुसरा पर्याय होता ओढ्यात उतरून ओढ्यातून गावाकडे जाणं. दुसरा पर्याय सोपा वाटत असला तरी त्यात ओढ्यात शूज ओले होणे, एखादा डोह लागणे किंवा धबधबा लागून उतरायला अत्यंत धोकादायक रस्ता लागणे असे संभाव्य धोके येऊ शकतात. इकडे आड तिकडे विहीर अशा गर्तेत असताना ओढ्यातून जाऊया अस ठरवून हळू हळू एक दगड पार करत शूज ओले होण्यापासून वाचवत चौघे एकामागून एक चाललो होतो. आणि अखेर वाटलं तेच झालं आम्ही एक ८-१० फुटी धबधब्याच्या तोंडाशी आलो, आता इथून कुठे जायचं या विवंचनेत असताना आजूबाजूला वाट शोधू लागलो पण गवत इतकं होत की वर चढण नीट दिसत नव्हतं. धबधब्याच्या बाजूला जिथून बॅग घेऊन उतरू शकलो असतो त्या उतारावर निवडुंग चांगलच जोमाने वाढलं होतं, त्यामुळे तिथून उतरायचं रस्ता देखील बंद झाला होता. त्या निवडुंगाच्या थोडं अलीकडे उतरायला जागा होती पण एक दगड सुटावलेला दिसत होता. बॅग काढून तिकडे झुकलो, वर असलेल्या झाडाच्या मुळीचा आधार घेऊन त्या दगडापाशी आलो, पाहतोय तर तो दगड वेगळा झालेला नव्हता, जेणेकरून त्याचा आम्हाला पायरी म्हणून चांगला वापर करता आला. सुरुवातीला सर्वांच्या बॅग खाली उतरवून नंतर एकेकाला हळू हळू खाली उतरवले. बॅग पाठीला लावून पुढे सरकलो तोच स्वागताला एक ३-४ फूट खोलीचा डोह देखील स्वागताला होताच, त्याच्या कडेकडेने जाऊन पुढे आलो. ओढ्यातून चालतोय चालतोय तर एक वाट ओढ्यातून बाहेर निघताना दिसली, ती वाट पकडून ओढ्यातून बाहेर आलो आणि गावाकडे निघालो. आता मनात विचार होत की इतकं खाली उतरलोय आणि बरोबर दिशेने चाललोय तर गाव एकदम समोर येईल.
वाट चालतोय चालतोय आणि अगदी माझ्या मनात विचार चालू होत तसच झालं मंदिराची भिंत माझ्यापासून अवघ्या १०० फुटांवर दिसू लागली, हे मंदिर ओढ्याला अगदी खेटूनच बांधलं होतं, मंदिराची भिंत बघितली आणि जीव भांड्यात पडला. आलो रे! अस मागच्यांना सांगून त्यांच्यात देखील थोडी अजून पावले टाकण्याचं चैतन्य संचारवलं. मंदिराच्या मागच्या बाजूला आलो, तिथूनच मंदिराला अर्धी प्रदक्षिणा घालून पुढे आलो, हे मंदिर गावाच्या बाहेर असलं तरी ते आमच्यासारख्या भरकटलेल्या लोकांसाठी एक प्रकारची संजीवनी असते. आणि आमच्या आजच्या फरफटीवरून तर हे आम्हाला अमृतासमान होतं.
 |
| सकाळी काढलेला राम मंदिराचा फोटो |
मंदिरातील देवाला बाहेरूनच नमस्कार करून गावातून मंदिरापर्यंत आणलेल्या कच्च्या रस्त्याने गावात चालू लागलो, रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबांवर लाईट्स देखील होते, गावाची वेस ओलांडून गावात तर प्रवेश केला, आता शाळा शोधायची होती. हर्षल दादा केव्हाचा येऊन थांबला असेल तो आपली वाट बघत असेल, आपल्याला उशीर झाला म्हणून तो आपल्याला शोधायला वर तर गेला नसेल ना, अशा असंख्य प्रश्नांनी डोकं भंडावून निघालं होतं, तितक्यात एक गावकरी दिसला त्यांना शाळा कुठे आहे हे विचारलं आणि त्यांनी सांगितल्या दिशेने पावले वळवली. गाव बऱ्यापैकी मोठं आणि समृद्ध होतं आणि सुधारलेल देखील दिसत होतं. हळू हळू पावले टाकत गावाच्या मागच्या टोकावरून पुढच्या टोकावर आलो होतो. शाळा आणि रामाचं मंदिर एकाच ठिकाणी होत मंदिराच्या इथे पोचलो, आणि दादाला शोधायला लागलो, दादाची कार दिसत नव्हती, बहुधा ड्रायवर दादाला सोडून गेला असावा, एक ना हजार प्रश्न. मी सर्वात पुढे माझ्या मागे मनोज प्रिसी सागर हे देखील येत होते. हर्षल दादा, हर्षल दादा अशा हाका मारत मी पुढे चालतोय तोच मागून गाडीचे लाईट्स दिसले पाहतोय तर दहा-पंधरा सेकंदाच्या फरकाने दादा देखील आला होता. दादाला बघून आणि दादाने मारलेल्या मिठीने दिवसभर केलेल्या १३ तासांच्या तंगडतोडीचा क्षणभर का होईना पण विसर पडला. पाठीवरून बॅग ठेवली तेव्हा घड्याळ अकराचे टोले देत होता. ठरवलेली मोहीम फत्ते झाली होती, एका प्रकारे पुर्णत्व म्हणजे काय याची अनुभूती आम्ही घेत होतो. शुज सॉक्स काढून जसे मोकळे झालो आणि पहिला आजूबाजूला कुठे पाणी आहे का शोधायला गेलो तर शाळेचा नळ होता, वातावरण थंड झालं होतं तरीदेखील त्या थंड पाण्यात हात-पाय-एकंदरीत सर्वांगचं थरथरत होत तरीही त्या कापऱ्या थंडीत गारेगार पाणी अंगावर घेऊन हुडहुड करत रोबोट सारखी चाल करत इकडे आलो, ढोपर देखील दुखत होतं, मांड्या भरल्या होत्या, खांदे बोलत होते, कोयत्यामुळे उजवा हात देखील ठणकत होता. अंघोळी करून सर्वजण एकत्र आलो, दादाने आणलेल्या चिकन बिर्याणी आणि तंदुरीवर यथेच्छ ताव मारला आणि झोपण्यासाठी जागा शोधू लागलो, शाळेच्या प्रांगणात झोपायचं तर उद्या शनिवार सकाळची शाळा, राम मंदिरात झोपायला मंदिराला कुलूप लावलं होतं, बाजूला एक बंद पण एकदम भारी बंगला होता, त्याच्या दारात जातोय तोच बाहेरचा कुत्रा जोरजोरात भुंकायचा. अजून काही आसरा आहे का हे बघायला हर्षल दादा गेला कारण आमच्यात तर आता कुणाच्यात त्राण नव्हते राहिले, तर त्याला मंदिराच्या मागचा दरवाजा उघडा असलेला दिसला. चला सोयच झाली असं म्हणून सर्व सामान मंदिरात हलवलं. ड्रायव्हर काकांना निरोप दिला तर ते म्हणतात मी आता नाही जाणार या रस्त्याने एकटा, मी सकाळीच जाईन, तुम्ही जा आत, मी झोपतो गाडीतच. त्यांना निरोप देऊन मंदिरात गेलो ताडपत्री टाकली, सामान एका कोपऱ्यात ठेवून स्लीपिंग बॅग मध्ये घुसलो तो सकाळीच जाग येण्यासाठी. थोडावेळ गप्पा चालू होत्या पण नंतर कधी झोपलो कळलंच नाही.
सह्याद्रीचा भटकभवान्या.
Very well narrated. Well done, Vishal.
ReplyDeleteThank you
DeleteBhari re...
ReplyDeleteThank you
Deleteमस्त. आतुरता पुढील भागाची....
ReplyDeleteमामा पुढचा भाग लवकर येवूद्या
ReplyDeleteहो ☺️
DeleteKhupach chhan....
ReplyDeleteDhanyvad
Delete