राजगड - तोरणा - रायलिंग पठार - लिंगाणा - भाग १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा
"मावळतीचा धनी आता रंगांची चौफेर उधळण करीत आमचा निरोप घेत रायगडाच्या मागे गुडूप व्हायला चालला होता. हातात चहाचा प्याला घेऊन एकदम निवांतपणे तो दिनमणी, रौद्रावतारी लिंगाणा आणि पवित्र रायगड यांच्याशी हितगुज साधत एक रम्य संध्याकाळ आयुष्याच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरण्याचं काम करत होतो, कार्तिकी एकादशीचा आजचा दिवस, ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचा आजचा दिवस आणि त्याच दिवशी आम्ही या लिंगण्यासमोर बसलो होतो जणू काही समाधिस्त होण्यासाठीच."
 |
| भट्टी गावातील राम मंदिराच्या बाहेर कोकाटे बंधू आणि आकाश कोकाटे समवेत |
शनिवार उजाडला तो मुळातच दबकत दबकत, कोंबड्याची बांग देखील ऐकू आली आणि सकाळ झाली. स्लीपिंग बॅग मधून बाहेर आलो, पण मंदिराच्या बाहेर कुणी जायचं हा प्रश्नच होता, कारण काल रात्री उशिरा आलो आणि मंदिराला कुलूप असूनदेखील मागच्या दाराने मंदिरात येऊन झोपलो होतो आणि ते देखील गावातल्या कुणालाही न विचारता. बाहेरचा कानोसा घेतला तर कळलं एक बाई आमच्याच नावाने बोंबा मारत बसली होती-"कोण ही, कुठुन आलीत आणि अशी कशी आपल्या मंदिरात झोपलीत?" काय होईल ते बघूया म्हणत अंथरुणातून बाहेर आलो तस कालचा सगळा ट्रेक अंगावर आलेला जाणवत होता, त्या तेरा तासांच्या चालीने मांड्या चांगल्याच भरल्या होत्या, पुढे नकोच जाऊया असा काहीसा सूर त्या आळवीत होत्या. माझ्यासोबत इतरांची देखील तीच परिस्थिती, हर्षलदादा एकटा तेवढा आमच्यात ताज्या दमाचा होता. मंदिरातून बाहेर पडलो, सकाळचा विधी आटोपून गावातल्या कुणाला तरी वाटेबद्दल विचारावं म्हणून शोधाशोध करू लागलो. कोकाटे बंधू म्हणून पन्नाशीचे दोन भाऊ समोर आले हर्षल दादाला त्यांच्याशी बोलायला सांगून मी नाश्त्याची तयारी करायला आलो, एकंदरीत बाहेेर सगळं काही ठीक होत, त्या मावशीही तिथून गेल्या होत्या, कधी नव्हे ते डोंगरात मी मॅगी घेऊन गेलो होतो, मॅगी झाली आणि चहाला देखील चांगलीच उकळी आली होती, चहात टाकलेल्या वेलचीचा वास मस्त दरवळत होता. आकाश कोकाटे म्हणून सातव्या इयत्तेत शिकणारा त्या कोकाटे बंधूंपैकी एकाचा मुलगा आला त्याला देखील बळजबरीच आमच्या सोबत नाश्ता करायला बसवला, तोच आम्हाला वाट दाखवायला येणार होता. पोट भरण्याच काम चालू आहे तर एक आजी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या, आकाशची आजी होती ती, ती माऊली आमची चौकशी करू लागली, तर त्यांना आवाज देऊन चहा प्यायला बसवलं. बोलता बोलता त्या पटकन बोलून गेल्या माझी सुनबाई आज असती तर तुम्हाला जेवायला घरी घेऊन गेली असती.त्यांचे ते बोल ऐकून अंगावर काटाच आला. ती आजी आणि ते कोकाटे बंधू यांनी आम्हाला दुपारचं जेऊनच पुढच्या प्रवासाला सुरुवात करा अस सांगत होत्या. त्यांच्या त्या शब्दांच्याच पाहुणचाराने आम्ही तृप्तीचा ढेकर दिला आणि बॅगा भराभर आवरून पाठीला लावून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो.
 |
| या हसण्याला काही मोल नाही |
भट्टी ते गेळगाणी हे ५-६ किमीच अंतर तार रस्त्याने होत. सुरुवातच अशी भयानक होती आजच्या दिवसाची कि बास! एखादी गाडी मिळावी अशी अपेक्षा आणि कोकाटे बंधूनी तिथे एक गाडी थांबवली देखील. ISUZU आमच्या सेवेत दाखल होती, त्या सद्गृहस्थानी आम्हाला कुठे जायच आहे विचारलं, त्यांना जस मोहरी बोललो तर ते म्हणू लागले चला सिंगापूर पर्यंत सोडतो, आम्ही तिकडेच चाललो आहोत. तेव्हा त्यांना सांगितलं आम्ही तिकडे चाललोत पण चालत चाललोय, पुढे २ किमीवर असलेल्या गेळगाणी फाट्यापर्यंत फक्त आम्हाला सोडवा. गाडी मिळत असून देखील चालत यायची आमची खाज ऐकून त्या माणसाला आमच्या बद्दल काय वाटलं असेल ते तोच जाणे. त्या गाडीत सामान असल्याने आमचं सामान आणि सागर, मनोजला तिकडे बसायला सांगून मागे त्यांनी त्यांचाच टेंपो थांबवून त्यात मी, प्रिसिलिया, हर्षल दादा बसलो आणि भट्टी गावाचा आणि कोकाटे बंधूंचा निरोप घेतला. २ किमीपुरती का होईना पण ती तार रस्त्याची कंटाळवाणी चाल वाचली होती, जाता जाता तोरणा चांगलाच नजरेत भरत होता, काल अंधारात ज्या भयानक कारवीतून उतरलो होतो, ती सोंड ठळक दिसत होती. तोरण्याचं ते रूप न्याहाळेपर्यंत गाडी थांबली देखील, पाहतोय तर गेळगाणी फाट्याला आम्ही पोचलो होतो. पुढचा चमू सामान वगैरे उतरवून आमची वाट बघत बसले होते. टेंपोवाल्या दादाचे आभार मानून बॅगा पाठीला लावल्या आणि आजच्या दिवसाच्या तंगडतोडीला प्रारंभ केला.

दोन किमीची तार रस्त्याची कंटाळवाणी चाल वाचली असली हे सुख असलं तरी अजून गेळगाणी फाटा ते गेळगाणी हे ३-४ किमीचं अंतर आ वासून आमची वाट पाहतच होतं. हा रस्ता धड डांबरीही नव्हता ना धड मातीचा. किती तरी वर्षांपूर्वी रस्त्याचं काम झालं असणार, डांबर आणि बारीक खडी हा प्रकार काही रस्त्यावर दिसत नव्हता. अगदी नामोल्लेख देखील नव्हता. चिखलात बेडकं जशी तोंड वर करून असतात अगदी तसंच कपची आणि दगडगोटे मातीतून वर आलेले दिसत होते. त्यामुळे हा रस्ता अजूनच अवघड झाला होता. कालची झालेली चाल बघता आज सकाळी लवकर उठून ट्रेकला सुरुवात करणं शक्य नव्हतं, त्याच्या मुळेच दहाला झालेली ट्रेकची सुरुवात आपल्याला आज उन्हातून चाल करायला लावणार हे गणित पक्क होत, आणि सुरुवात हि उन्हातुनच झाली होती. रस्त्याच्या बाजूला जास्त काही झाड नव्हती मध्येच कुठे एखादा डेरेदार वृक्ष तर कुठे बांबूची झाड दिसत होती. बिल्डर लोकांनी हा भाग देखील सोडला नव्हता, जागो जागी तारेचे फेन्सिंग लावून सदर मालमत्ता या या मालकाची आहे, असे बोर्ड लावलेले दिसत होते.
 |
| मेंढपाळ |
रस्ता कापतोय पण संपण्याचं नाव काही घेत नव्हता आणि अलगदपणे आम्ही तीन टीममध्ये विभागलो गेलो, मी आणि हर्षल दा पुढे आमच्या मागे मनोज एकटाच तर सर्वात शेवटी सागर आणि प्रिसी. जो तो आपल्या धुंदीत चालत येत होता. वळणावळणांचा रस्ता आणि रस्त्यावरच्या दगडांशी पायाचं गेळगाणी गाव कधी येईल या विषयावर चाललेलं हितगुज संपायला काही वाव दिसत नव्हता.एवढ्यात गेळगाणी २ किमी अशा रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडाने लक्ष वेधून घेतले, तेथेच बाजूला सावलीखाली असलेला मोठा दगड पाहून प्रिसिलियाने मागूनच थांबा असा नारा चालू केला, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढची चाल धरली. शेवटी सागर आणि तिने तेथे थांबा घेतलाच.रस्त्यावरून चालता चालता एक दादा त्यांच्या शेळ्या आणि गुरे घेऊन चरायला आले होते, चालत चालतच त्यांच्याशी गाव कुठवर आहे वगैरे गप्पा मारत त्यांना निरोप दिला आणि पुढे चालू लागलो.

पुढे रस्त्याला एक पूल आणि त्याच्या बाजूला एक छोटासा धबधबा चांगलाच पाझरत होता, त्याचं ते नितळ पाणी बघून त्यात उतरण्याचा मोह होत होता, पण तिथे उतरण्याचा रस्ता चिकट झाला होता आणि वेळ बघता तिथे थांबणं शक्य नव्हतं. पावलं भरभर पुढे रेटत जे गावकरी वाटेवर दिसत त्यांना हसऱ्या चेहऱ्याने उभ्याउभ्याच निरोप देत वाट तुडवत चाललो होतो. असं वाटत होतं कि आपण बहुधा गावाजवळ आलो असू इतक्यात गेळगाणी १ किमी असा दगड दिसला. मागे दिसलेला २ किमी आणि आताचा १किमीचा दगड यातील अंतर १किमीपेक्षा जास्तच होतं हे नक्की, पण म्हणजे अजून तितकंच अंतर कापायचं आहे असा विचार मनात येऊन हे अंतराचे दगड ज्या कुठल्या माणसाने ठेवले असणार त्याच्या नावाने बोटं मोडून पुढची चाल धरली. चढ, वळणावळणाचा तो घाट रस्ता हे पार करता करता एका बाजूला असलेल्या डोंगररांगा, मागे दिसत असलेला तोरणा आणि वेल्ह्याच्या अलीकडे असलेला डॅम हे सर्व चित्र डोळ्यांना सुखावणारे होते. समोरच दृश्य टिपण्यासाठी नजरेची दूर पल्याड चाललेली धावाधाव एका सोंडेवरून वर चढत असलेल्या वीजेच्या खांबांवर जाऊन खिळली, वळसा मारून जसा पुढे आलो तसा लाईटचा डीपी दिसला.
 |
| वर आलेले विजेचे खांब,डॅम आणि आजूबाजूचा परिसर |
गावाच्या अगदी जवळ आलो हे समजलं होतच पण मागे त्या २किमी च्या दगडापासून १किमीच्या दगडापर्यंतच अंतर आणि १किमीपासून ते गावापर्यंतच अंतर हे तफावत दर्शवणारं होतं. लांबून एक झाडीच्या आड असलेलं घर दिसलं, आणि एकंदरीत गावाच्या वेशीवरून गावात प्रवेश केल्याची चाहूल लागली, ते घर ओलांडून पुढे आलो, रस्त्याच्या बाजूला गावाने बांधलेली भली मोठी विहीर बघून पाणी इथे मुबलक असणार अशी वार्ता करत करत गावात प्रवेश केला आणि बूड टेकवण्यासाठी जागा शोधू लागलो.
छोटी छोटी कौलारू घरे, लाल मातीची अंगणी, कुठे गोठा, गावातील मातीचा रस्ता, घरासमोर असलेली झाडी, गुरं दावणीची जागा गावाचं गावपण कसं नजरेत भरत होतं. एका घराच्या बाजूला एका झाडाखाली सावली बघून तिथेचं बॅगा पाठीवरून उतरवल्या पाठण मोकळं केलं आणि आम्ही देखील तिथेच तंगड्या पसरल्या. बाजूच्या घरातून पाणी मागायला गेलो तर तिथे कोणीच नव्हतं मग मोर्चा दुसऱ्या घराकडे वळवला तिथे असलेल्या २ लहान पोरींनी दोन तांबे पाणी आणून दिलं. इतकी तासभर उन्हाची चाल करून आल्यावर घशात गेलेल्या त्या थंडगार पाण्याची तुलना अमृतासमानच होती. त्या पोरींच्या हातावर एक बिस्किटचा पुडा टेकवून वाटून खाण्यास सांगितले आणि आम्ही देखील गुळ शेंगदाण्याची पिशवी काढून जठराग्नी थंड करू लागलो. या अशा वणवण चालीनंतर गुळ शेंगदाणे म्हणजे सुखच होतो.
 |
| गावातील बच्चेकंपनी |
त्या दोन पोरींना दिलेला खाऊ बघून गावातली इतर बच्चेकंपनीने देखील आम्हाला गराडा घातला. ही सगळी फौज जमा झाली पण आमच्या सेनेतल्या दोन जणांचा काही पत्ता दिसत नव्हता, नाही म्हणता म्हणता बरंच अंतर पडलेलं दिसत होतं. अखेर लांबून ही जोडी गावात प्रवेश करताना दिसली, त्या दोन पोरींना परत पाणी आणायला सांगून त्यांच्या दुसऱ्या फौजेच्या हातावर देखील काही ना काही टेकवून आमची पाच जणांची बैठक बसली. गुळ शेंगदाण्याची यथेच्छ मजा घेत आम्ही एकदम निवांत बसलो होतो. हा निवांतपणा खरंतर भट्टी पासून गेळगाणी फाट्यापर्यंत मिळालेल्या गाडीमुळे होता. त्यामुळेच आम्ही इतके निश्चिंत झालो होतो. सर्व पोरांना आम्ही खाऊ दिला होता, तरी एक पोरगा तिथे आम्ही गुळ-शेंगदाणे खात असताना आमच्याकडे बघत होता, त्यावेळी आमचं अस झालं होत आम्ही तुला दुसरा खाऊ देऊ,पण गुळ शेंगदाणे नाही. अखेर तो देखील मागे होत नाही बघून त्याच्या हातावर चार शेंगदाणे टेकवून आम्ही देखील आमचं दुकान उठवलं आणि पुढची चाल धरली.
गेळगाणी पासून पुढे वाट कशी होती याचा कुणालाच अंदाज नव्हता, म्हणून गावातलं कोणी मिळतंय का किंवा वाट दाखवायला तरी कोणी येईल का अशा आशेने बघत होतो, पण मगाशी वाटेवर भेटलेले गुराखी दादा गावात आता कोणी भेटणार नाही असे बोलले होते ते शब्द खरे ठरत होते. तरी त्या दादांकडून वाट समजून घेतली होती, त्या दृष्टीने सरळ गावातून बाहेर पडत प्रत्येक घराचा कानोसा घेत कोणी दिसतय का बघत होतो, इतक्यात एक मावशी दिसल्या त्यांना वाटेबद्दल विचारलं असता त्यांनी घरातील म्हातारीला बोलवलं. आजींनी आम्हाला वाटेबद्दल सरळच जावा अस सांगितलं, वर आजींना जेव्हा विचारलं तुम्ही कधी गेलेलात या वाटेने तर- खूप वर्सा झाली आम्ही तिकडं गेलोच नाय पण आमचे मालक जातात अस सांगितलं. किती वेळ लागेल मोहरीला पोचायला तर आजी बोलतात तासाभरात पोचाल. आजींचं ते उत्तर ऐकून भोवळ यायचीच बाकी होती. माझ्या माहितीप्रमाणे तरी आम्हाला तीन चार तास लागतील अस वाटत असताना आजी म्हणतात तासाभरात! वाटेबद्दलच कोडं थोडंफार का होईना उलगडलं होतं आणि पुढे वाटेत वाड्या वस्त्या आहेत त्यामुळे चिंतेच कारण नव्हतं. विजेच्या तारा आणि खांबांनी आमच्या सोबत वाट धरली होती त्या वाटा आता आपल्याला कुठवर साथ देतात हेच पाहत आम्हाला पुढचं मार्गक्रमण करायच होतं. डांबरी रस्ता, कच्चा रस्ता आणि आता लागलेली गवतातली पायवाट, टेंपो गेलेला असल्यामुळे चाकांमुळे गवतावर झालेले समांतर पट्टे एकप्रकारे पायवाटेची चिन्हे दर्शवीत होते.
 |
| भात झोडणी |
गेळगाणी सोडून अवघे दहा पंधरा मिनिटे चाललो असू तोच पुन्हा घरे दिसू लागली, हरपूड वाडी इतक्या लवकर येणार नाही हे माहीत होतं, पण मग ही घर कोणती असे विचार डोक्यात यायलाच लागले होते. त्या घराजवळ गेलो असता तीन चार बाया बापडे भात झोडणीचं काम करत होते. पाऊस रेंगाळल्याने ही कामे देखील चांगलीच रखडली होती आणि बऱ्याच जणांच्या पिकांचं नुकसान देखील झालं होत. त्यांना विचारलं असता कळलं की ही गेळगाणी वाडी आहे. विजेचे खांब इथून देखील पुढे चालले होते, त्यांचाच माग घेत पुढे अजून दोन-चार घरांची गेळगाणी गावाचीच वाडी आहे तिथवर पोहोचलो. तिथे एक कुटुंब भेटले, त्यांना पुढच्या वाटेबद्दल विचारलं, तर पूर्ण वाटेबद्दल कल्पना आली. दोन दिवसांपूर्वी एका ग्रुपला घेऊन ते मोहरीला गेले होते, त्यामुळे त्यांनी इतंभूत माहिती दिली. प्रिसिलियाचं एक महत्वाचं काम होतं आणि नेटवर्क आल्यामुळे त्या दोघांनी वाटेतच थांबून दहा मिनिटे खाल्ली, त्यांना यायला इतका उशीर का होतोय यावर आमचे तर्क वितर्क चालू होते. या वेळेतच त्या काकांकडून माहिती घेता आली.
 |
| डोंगराला वळसा मारत जाणारी वाट |
पुढची वाट धरली ती डोंगराला वळसा मारत पुढे अशीच प्रत्येक वर आलेल्या डोंगराला वळसा मारत कारवीतून जात होती. आठ-दहा फुटांच्या कारवीतून जाताना मध्येच गायब व्हायला व्हायचं.
एका ठिकाणी वाटेवरून चालताना दूर पठारावर मध्येच एक डेरेदार वृक्ष दिसला हर्षल दादा आणि मी लगेच वाट जर तिकडून जात असेल तर थोडी वाट वाकडी करून तिकडे जायचंच अस ठरवून पुढे चालू लागलो. मागच्यानी काही हे झाड बघितलं नव्हतं. वाटेत एका ठिकाणी पाणी पाझरत होतं तिथे पाण्याचे घोट रिचवत पुढे चालतोय तर कधी त्या झाडाजवळ पोचलो हे कळलं देखील नाही, त्यात आमची वाट याच पठारावरून जात असल्याने वाट वाकडी करण्याचा प्रश्नच आला नाही. शूज सॉक्स काढून त्याच झाडाखाली बस्तान मांडलं, विसाव्यासाठी इतकी सुंदर जागा होती की मुक्काम करण्यास देखील काही हरकत नव्हती, थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं पाणी देखील जवळच होतं.
 |
| १. डोंगरात अस पाझरत पाणी पिणं म्हणजे सुख २. लांबून दिसलेलं पठारावरील झाड ३. झाडाची पडलेली सावली |
 |
| लिंबू सरबतासाठी चाललेले कष्ट |
बसलोच आहोत, जागा पण छान आहे आणि घड्याळात दिड वाजले होते तर मग पोटपूजा देखील करून घेऊ. लिंबू सरबत साठी सागरची लिंबू कापण्याची पद्धत आणि त्याने केलेला सरबत न पिताच दुपारची न्याहारी आटोपती घेतली आणि दोन वाजता ती झाडाजवळची जागा सोडली. त्या पठारावर गुरांची ये जा दिसत होती तसे त्यांच्या पावलांचे ठसेही दिसत होते, आणि एक अंदाज होता की आपण गावाच्या आसपास असू पाहतोय तर खरंच थोड्याच चालीनंतर एक झाप दिसलं आणि पुढे वस्ती देखील लागली होती, मजल दरमजल करत आम्ही हरपूड वाडी गाठली होती.
 |
| टोक वर आलेल्या लिंगाण्याचे पहिले दर्शन (झुम करून पहा) |
तेथे एक आजी भेटल्या त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी आम्हाला त्यांच्या नाचणीच्या शेताच्या एका कोपऱ्यातून लिंगण्याचे दर्शन घडवले, उद्या आपल्याला जिथे जायचे आहे आणि आज आपण ज्याच्या सानिध्यात झोपणार आहोत आणि त्याहून महत्वाचं इतके महिने ज्याच स्वप्न बघितलं होत्या त्या लिंगण्याचं इतकं दुरून दर्शन घेताना मनाला खूप उभारी मिळत होती. आता मात्र पावलांनी लगेच वेग घेतला.नजर जिथवर फेकली जायची तिथवर वेगवेगळ्या डोंगररांगांचे रांगडे रूप पाहून ट्रेक सार्थकी लागत असल्याची प्रत्येक पावलागणिक प्रचिती येत होती.
 |
| नजर जिकडे फेकू तिकडे अशाच डोंगररांगा पसरलेल्या दिसत होत्या |
 |
| हरपुड वाडीच्या पुढे असलेला पाण्याचा डोह |
चालता बोलता हरपूड वाडी पार केली तर डोंगराच्या खाली डाव्या अंगाला हरपूड गाव आणि गावातील मंदिराचा कळस वरूनच दृष्टीस पडत होता. कधी डोंगराच्या सोंडेवरून तर कधी त्या डोंगराच्या टेपाडाला वळसा मारून कधी उन्हात तर कधी कारवीतून असा आमचा लपाछपीचा खेळ चालू होता. वाटेच्या कडेला एक पाण्याचा हौद दिसला, काळा कातळ फोडून त्याचे त्या हौदाच्या कडेला विखुरलेले दगड एखाद्या कोळशाच्या खाणीचा भास देत होते. थंडगार आणि नितळ पाणी घशाची कोरड जी काही घालवायचा की तृषा शांत होऊन मन अगदी तृप्त व्हायचं.
 |
| वाटेचं बदललेलं रूप |
त्या हौदाला पार केलं आणि वाटेच गणित परत बदललं. मातीची मळलेली वाट आता बारीक मुरुमाचा दगड पडलेल्या घसाऱ्याच्या वाटेने घेतली. चढणीवर जितकी मजा यायची उतरणीवर तितकीच फसगत व्हायची. वेगाने पावले टाकायच्या नादात कधी पाय घसरायचा ते कळायचं देखील नाही. काल ढोपर फुटलंय तेवढं पुरे असा विचार मनाशी येऊन जपून जपूनच वाट चालत होतो. कधी हर्षल दादा पुढे कधी मी पुढे तर कधी दोघे एकत्र. डोंगरांचा अभ्यास कमी असल्यामुळे त्या डोंगरांबद्दल काहीही न बोलता ते पाहण्याचं सुख तेवढं आम्ही घेत होतो.
 |
| एकदम मागे धूसर दिसणारा तोरणा |
दहा वाजता चालू केलेली तंगडतोड तीनच्या पल्याड गेली होती मागे वळून पाहिलं असता दूरवर तोरणा आमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच होता. एकंदरीच कालपासून आम्ही कुठून निघालो आणि कुठल्या कुठे पोचलो होतो याची चांगलीच कल्पना येत होती. वाट चालत चालत एका छोटासा झाडीभरला टेपाड वर आला होता त्याला वळसा मारत वर चढलो आणि परत दृष्टीस भरला तो लिंगाणा, तासभारपूर्वी हरपूड वाडीतून किंचित टोक दिसणारा लिंगाणा ते आता लांबून पूर्ण सुळका नजरेत भरत होता, आता मात्र कधी प्रवास संपतोय आणि गंतव्यस्थान गाठतोय अशी मनाची घालमेल चालू झालो.
सोबत साथ करणाऱ्या विविध वेड्यावाकड्या डोंगररांगा होत्याच. पाण्याने काय ते या धारांवरून खाली उतरावं आणि वाऱ्याने ते वर चढावं अशा काही त्या डोंगररांगा होत्या. त्यांचं ते अद्वितीय रूप पाहून पुन्हा इकडे कधी येतोय अशी स्वप्न आमच्या उघड्या डोळ्यांना पडू लागली.
 |
| हेच सह्याद्रीचं रूप आपल्याला त्याच्याकडे खेचून आणत असतं |
त्या डोंगररांगा न्याहाळत चालत असताना नजर एकाकी समोर झाडावर लावलेल्या भगव्यावर खिळली, त्या भगव्याखाली देवाचं ठाणं होतं आणि तिथूनच दोन वाटा फुटत होत्या. आता झाली पंचाईत, कुठल्या बाजूला जायचं हे पक्के कळत नव्हतं. आतापर्यंत वाट एकसंध होती मध्येच कुठे वाट विभागली की एका बाजूने हर्षल दादा तर एका बाजूने मी असे जाऊन पूढे एकच वाट होई पण आता तस होईल वाटत नव्हतं त्यात कारवी पण बऱ्यापैकी दाट होती. लिंगाण्याचं थोड्या वेळापूर्वी झालेलं दर्शन आठवून त्याच्या दिशेवरून जायचं ठरलं आणि आम्ही उजवीकडे वळलो. त्या वाटेवर पुढे एक मावशी गुरांना चरायला घेऊन आलेल्या दिसल्या. या मावशी कुठे वाट वाकडी करून गुडूप व्हायच्या अगोदर त्यांना गाठून पहिला वाट विचारुया या हेतूने पायगाडी जोरात हाकली. त्या मावशी वळून आम्हाला पाठमोऱ्या होतात हे बघून दुरूनच त्यांना आवाज देऊन थांबायला सांगितलं. त्या मावशींना विचारलं असता आम्ही बरोबर वाटेवर आहोत याची पुष्टी झाली होती, त्या डावीकडच्या वाटेबद्दल विचारणा केली असता ती सिंगापूरला जाते हे कळलं, तसेच मोहरी गाव देखील अवघ्या पाच मिनिटांवर आहे हे देखील मावशींकडून समजलं.
 |
| १. देवाचं ठाणं इथून डावीकडे सिंगापूरला तर उजवीकडे मोहरीसाठी वाट जाते २.सिंगापूर गाव ३. मोहरी गाव आणि लिंगाणा |
म्हणजे गावाच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर आहोत हे कळल्यावर पावलांनी आपोआपच वेग घेतला वळण घेऊन पुढे आलो तर खाली डाव्या बाजूला सिंगापूरची लोकवस्ती तर उजवीकडे मोहरी गाव दिसत होता. सिंगापूर पर्यंत येणारा तुळतुळीत डांबरी रस्ता देखील लक्ष वेधून घेत होता.
 |
| या गप्पांचा अंतच होऊ नये |
सकाळी जर त्या गाडीत बसून आलो असतो तर याच रस्त्याने आम्ही आलो असतो. हे सगळं पाहता पाहता पावलं कधी मोहरी गावाच्या हद्दीत आली कळलं देखील नाही, गावात आलो तर बऱ्याच गाड्या लागलेल्या दिसल्या त्यांच्या बद्दल विचारणा केली असता कळलं की रायलिंग पठारावर बरीच लोकं येतात. एवढ्या गाड्यांची गर्दी असणार हे पाहून आम्ही अचंबित झालो. पाण्याचा साठा कुठे आहे, हे पाहूया आणि तिथून पाणी लोड करून घेऊया कारण रायलिंग पठारावर पाणी अजिबात नाही म्हणून डांबरी रस्त्यानेच चालत गावातल्या एका कुडाच्या घराच्या सारवलेल्या अंगणात जाऊन विसावलो. तेथे गेलो असता एक चार जणांचा बाईकवरून आलेला ग्रुप भेटला हा तोच ग्रुप जो सकाळी आम्हाला भट्टी गावात भेटला होता आणि ते आम्हाला मोहरी मध्ये जाण्याचा रस्ता विचारत होते, ते बाईकवरून आले होते आणि आम्ही चालत.
 |
| या माऊलीच्या चेहऱ्यावरील स्मित खूप काही सांगून जातं |
त्या घरातल्या मावशींना पाणी कुठे आहे अस विचारलं असता त्या माऊली त्यांच्या घरातून पाणी देऊ लागल्या पण त्यांना बोललो की आम्हाला जास्त पाणी पाहिजे तुम्ही पाणी कुठून आणता ते सांगा. त्यावर त्या माऊलींचं उत्तर - "अहो दारावर आलेल्याला पाणीही देऊ शकत नाय का". मेहनत करून रापलेला त्यांचा तो चेहरा आणि दारावर आलेल्या माणसांप्रति आदरभाव आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळाळणार हसू मनात कायम घर करून गेलं. एखाद्या घराजवळ थांबलो तर फक्त पिण्यापूरत पाणी घेतो आपल्या जवळच्या बाटल्या भरून घेत नाही कारण त्या लोकांना पाणी कुठून आणायला लागतं याची कल्पना असते. मावशींशी बोलता बोलता कळलं की तासभर लागतो पाणी आणायला, मग तर ठरवलंच इथून पाणी घ्यायचं नाही, आणि माझ्या या निर्णयाला माझा चमू देखील साथ देईल हे माहीतच होतं. पण मावशी देखील खूप आग्रह करू लागल्या त्यांचा पाणी घ्या यासाठी केविलवाणा झालेला चेहरा गावातल्या लोकांच्या माणुसकीचं दर्शन घडवत होता. त्यात मावशींना जस कळलं की आम्ही राजगड तोरणा करून पायी पायीच आलोत त्यामुळे त्या देखील ऐकायला तयार नव्हत्या, त्या मावशी इकडे आलेल्या लोकांना जेवण बनवून देतात तसेच लिंबू सरबत देखील विकतात, तेव्हा हर्षल दादाने लिंबू सरबत पण घेऊया असं म्हणून मावशींच्या आग्रहाचं मान ठेऊन पाणी घेण्यास होकार दिला. अंगणात आता सारे मस्त बसलो होतो, चारच्या घटकेला आम्ही गावात पोचून आमची आजची चाल संपण्यात आली होती. कालच्या तंगडतोडीच्या तुलनेत आजची चाल नगण्य आणि रमतगमत अशीच होती. मावशी लिंबू सरबत घेऊन आल्या आणि सागरने देखील त्याच्या बॅग मधून लिंबू सरबत काढलं, पण आता देखील त्याच्या व्यतिरिक्त त्या सरबताला कोणी हात लावला नाही. मावशींनी दिलेल्या हंडाभर पाण्याने जवळचा कॅन भरला लिंबू सरबत आणि पाण्याचे पैसे बळजबरीच मावशींच्या हातावर टेकवले आणि त्या माऊलींचं निरोप घेतला. जाता जाता मावशींना बोराट्याच्या नाळेबद्दल विचारलं असता नका जाऊ तिकडून गवत फार झालंय आणि कठीण आहे ती वाट त्यापेक्षा सिंगापूरच्या वाटेने जा असा सल्ला दिला. लिंगाणा करायचा आहे आणि ठरवलंय त्याच वाटेने जाऊ असं म्हणून आम्ही आता रायलिंग पठाराकडे प्रस्थान केलं.
मोहरी हे नाव त्या गावाला खरंच सार्थ ठरत होतं कारण अशा चहुबाजुनी वेढलेल्या डोंगररांगांच्या मध्ये अगदी मोहरीच्या दाण्यासमान वाटावं इतकं लहान ते गाव होतं. आणि खरंच गावात प्रवेश करून कधी गावाबाहेर पडलो हे कळलं देखील नाही. मोहरी गावातून रायलिंग पठाराकडे जायला वाट खूप मळलेली आहे यावरून इथे लोकांचा किती राबता आहे हे कळतं. जाता जाता बरीच लोकं पठारावरून परत येताना दिसत होती. एकंदरीत जी काय लोकं आली होती ती परत चाललीत म्हणजे रात्री आपल्या व्यतिरिक्त इथे कोणी नसणार याच मनोमन बरं वाटत होत. पण इतक्यात आमच्या आनंदावर विरजण पडलं, दोन ट्रॅव्हलर गाड्यांमधून आलेली माणसं इथे वस्तीला आहेत हे कळलं आणि आता या लोकांना गाठून त्यांच्या अगोदर पठारावर पोचुया, जेणेकरून एका चांगल्या जागेवर आपल्याला आपला मुक्काम ठोकता येईल.

जस जस पावलांना वेग देऊन त्या माणसांपैकी एकेका माणसाला गाठून पुढे जात होतो तसतसं आमचे डोळे एकदम विस्फारत होते. पाण्याचे जार, मोठी भांडी, आणि प्रत्येकाकडे दोन तीन बॅग किंवा हातात पिशव्या हे सगळं चित्र बघून रात्री पठारावर काय धिंगाणा असेल हे चित्र डोळ्यांसमोर येऊन अंगावर काटाच येत होता. त्या माणसांना बऱ्यापैकी मागे टाकून आता मी आणि हर्षल दादा बऱ्यापैकी पुढे आलो होतो. डोंगरात आता कुठे पाणी दिसतंय का बघत आम्ही चाललो होतो, एका ठिकाणी पाण्याचा छोटा डोह दिसला आणि त्यात खूप चांगलं पाणी होतं, म्हणजे आता कुठे पाणी नाही मिळालं तरी हे पाणी आहे याची शाश्वती मिळाली, तरी पुढे जाताना कुठे अजून पाणी आहे का बघत होतो. एवढ्यात बोराट्याची नाळ जिथे सुरू होते ती वळलेली वाट दिसली, म्हणजे उद्या आपल्याला इथून उतरायचं आहे हे कळलं होतं. वाटेत जाता जाता आता तीन ठिकाणी डोंगरातील पाझरणारं पाणी दिसलं. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली होती.
 |
| वळसा मारून पठारावर पोचताना लिंगाण्याचे हे भेदक रूप जणू अंगावर येत होतं |
पुढे आलो वळसा घातला आणि पाताळ भेदून आभाळाला स्पर्श करणाऱ्या लिंगाण्याचे अक्राळविक्राळ रांगडे रूप समोर आलो, इतकी वर्षे गडकोट फिरताना जाणवलेली स्पंदने आणि हीच गडकोट फिरण्यासाठी जी काही तपश्चर्या केली होती त्याच फलित अस काही समोर दिसत होतं की पावलागणिक समोर येणारा तो लिंगाणा सुळका जणू काही आम्हाला आता मिठीच मारणार आहे अस काहीस चित्र डोळ्यांसमोरून झरझर जात होतं.
पुस्तकात वाचलेलं किंवा लोकांच्या तोंडून ऐकलेलं लिंगण्याचं ते भारदस्त रूप या सह्यकड्याची नव्याने ओळख करून देत होतं. याच्याच सानिध्यात आता पूर्ण रात्र काढायची आहे आणि उद्या याच्यावरच पाय रोवायला जायचं आहे, सुख अक्षरशः पायाखाली लोटांगण घालत होतं. प्रत्येक पावलागणिक जवळ जात होतो तसे त्याच्या कीर्तीचे पोवाडे मनात घर करत होते. नजर थोडी हलवली आणि मागे नेली तर अजून एक साक्षात्कार, या सह्यगिरीच्या सहाय्याने ज्या राजाने हे स्वराज्य घडवले तो आपल्या स्वराज्याचा मानबिंदू किल्ले रायगड लिंगाण्याच्या मागे कणखरपणे उभा होता. एखादं मोरपीस भासावं अस जगदीश्वराचं मंदिर कळून येत होतो. हे सर्व काही अनुभवत असताना पठाराच्या टोकाला पोचलो देखील.
 |
रायलिंग पठारावर बसलेलो मी, समोर लिंगाणा, त्याच्या मागे रायगड आणि
मागे रंगोत्सव साजरा करणारा दिनभास्कर |
पठारावर पोचलो तेव्हा सात आठ जणांचा वावर होता तिथे, त्यातील एकाचा "गोप्रो, टेक अ फोटो, गोप्रो, टेक अ फोटो" असा उद्घोष चालू होता. बॅगा खाली उतरवल्या आणि जवळपास कुठे पाणी आहे का याच्या शोधात मी आणि हर्षल दादा निघालो. एका ठिकाणी उंबराच्या झाडाच्या जवळ पाणी असेल अशा साशंकतेने त्या झाडीत घुसलो तर तिथे वर थोडं पाणी पाझरत होतं, चिखलही होताच, चिखल बाजूला करून तिथे छोटा डोह तयार केला आणि पाणी निवळायला ठेवून माघारी आलो.पठारावर एकदम समोरच्या खडकावर ती लोकं येतील म्हणून त्यांच्यापासून जरा दूर राहूया म्हणत खडकाच्या उजव्या बाजूला ठरवलेल्या जागेवर आम्ही येईपर्यंत प्रिसी, सागर, मनोजने गवत वगैरे साफ करून ताडपत्री अंथरून जागा निश्चित केली होती. एव्हाना पावणे सहा वगैरे झाले असतील. मावळतीचा धनी आता रंगांची चौफेर उधळण करीत आमचा निरोप घेत रायगडाच्या मागे गुडूप व्हायला चालला होता. हातात चहाचा प्याला घेऊन एकदम निवांतपणे तो दिनमणी, रौद्रावतारी लिंगाणा आणि धारातीर्थ रायगड यांच्याशी हितगुज साधत एक रम्य संध्याकाळ आयुष्याच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरण्याचं काम करत होतो, कार्तिकी एकादशीचा आजचा दिवस, ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचा आजचा दिवस आणि त्याच दिवशी आम्ही या लिंगण्यासमोर बसलो होतो जणू काही समाधिस्त होण्यासाठीच. दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळून सृष्टीचं सौंदर्य न्याहाळण्यात मी सागर आणि प्रिसिलिया इतके गर्क झालो होतो, तर तिकडे मनोज आणि हर्षलदादा त्यांच्या सृष्टीला फोन लावून बोलण्यात गर्क होते.
दिवेलागणीची वेळ होऊन खालच्या गावात एक एक दिवा लागताना दिसला, चहाचे घोट कधी संपले, शक्तीचा स्रोत कधी गुडूप झाला आणि त्याच्या रंगांची उधळण संपून काळ्याकुट्ट अंधाराचे साम्राज्य येऊन एक एक चांदणी लुकलुकू लागली, खालची गावं देखील एखाद्या चांदण्यांच्या पुंजक्याप्रमाणे भासत होती तर समोर रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरातील लाईट देखील प्रखरतेने जाणवत होती.
 |
| अशा अब्जावधी चांदण्या पाहण्याचं दान हा सह्याद्री वेळोवेळी आमच्या पदरात घालत असतो (फुल ब्राईटनेस करून हा फोटो पहा) |
संध्यासमय पालटून रजनीने आता सृष्टीचा ताबा घेतला होता. आम्ही देखील निवांत झालो होतो, गप्पा मारता मारताच चूल पेटवली पुन्हा एकदा चहा घेऊन जेवण बनवायला सुरुवात केली. आम्ही ती लोक येतील या हेतून पठाराच्या एकदम कडेला गेलो नाही तर ती लोक देखील मागेच थांबली एकंदरीत आमच्यात आणि त्यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं आणि वाटलं होत तसा काही धांगडधिंगा त्यांचा चालू नव्हता त्यामुळे आम्हालाही एकदम सुखकर वाटत होतं. लोणचं, पापड, चटणी, सलाड, डाळ खिचडी यांचा फक्कड बेत तयार झाला होता. गरमागरम डाळ खिचडीचा आस्वाद घेत रीती पोटे तुडुंब भरून घेतली.
 |
| चांदण्यांनी न्हाऊन निघालेला लिंगाणा |
आणि मग चांदण्यांच्या प्रकाशात मैफिल बसली गप्पांची, एकेकाचे एकेक किस्से, हे चालू असताना मनोज कधी झोपी गेला कळलं देखील नाही. चांदण्या न्याहळत आकाशदर्शनाच ज्ञान बाहेर निघू लागलं मग मोर्चा एक बॅनर उचलून त्या समोरच्या खडकावर नेला. तिथे पथारी पसरून गप्पांचा फड चांगलाच रंगू लागला होता, वाऱ्याच्या झुळकेसरशी बोचणाऱ्या थंडीला स्लीपिंग बॅगमध्ये गुरफटून गुरफटून आडकाठी करण्याचा फोल प्रयत्न चौघे करत होते. आडवे होऊन आता गप्पा मारुया म्हणता जो तो ज्या ज्या कोनात आडवे होता येईल तसे झालो आणि दुसऱ्याच मिनिटाला आमचे आवाज शांत झाले, आडवे झाल्याझाल्या दिवसभराचा थकवा जाणवू लागला आणि पडल्याक्षणी पापणीवर पापणी चिकटायला लागली. इथे आपण झोपलो तर सकाळशिवाय जाग येणार नाही आणि तिकडे मनोज एकटाच आहे म्हणून इच्छा नसताना देखील तिथून उठून ठरल्या जागेवर आलो आणि स्लीपिंग बॅग मध्ये घुसलो, पुन्हा गप्पा रंगल्या पण आता हळूहळू कधी कुणाचा पत्ता गुल झाला आणि झोपी गेला हे कळायला उसंत देखील मिळाली नाही आणि सगळे निद्रेच्या अधीन झाले.
सह्याद्रीचा भटकभवान्या
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.
Nice Vishal
ReplyDeleteThank you DNS
DeleteMast
ReplyDeleteMemeroy recall while reading l've done rajgad torana bortychi nal Raigad last December
ReplyDeleteWah...
Deleteसुरेख वर्णन. अप्रतिम जिद्द जोडीला साहस
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवाचताना पुन्हां एकदा ट्रेक झाल्यासारखे वाटले. आतुरता पुढील भागाची.....
ReplyDeleteहो...☺️
DeleteBhariii...
ReplyDeleteThank you
Delete