Wednesday, March 11, 2020

सातमाळा रेंज(धोडप-इखारा-कांचना-मंचना-कोळधेर-राजधेर) भाग-१

रेंज ट्रेक करायचा म्हणचे पुरेसा अभ्यास आणि वेळ हातात घेऊनच डोंगरात जावं लागतं आणि हेच आजकालच्या आमच्या सारख्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आणि करिअरच्या मागे पडलेल्यांना जमत नाही, यालाच काहीशी बगल देत जुने लोक जसे फिरायचे तसं फिरुया आणि याचीच प्रचिती म्हणून राजगड-तोरणा-रायलिंग-लिंगाणा हा रेंज ट्रेक नोव्हेंबर मध्ये वाटा भरकटत का होईना पण पूर्ण केला. कॅलेंडर बघितलं असता महाशिवरात्रीची सुट्टी शनिवार रविवारला लागून आली होती, मग काय आलेली संधी सोडायची नाही, आणि त्या दृष्टीने हर्षल दादा, मी, प्रिसिलिया नवीन कुठली रेंज करायची या दृष्टीने अभ्यास करायला लागलो.अलंकार ने तर त्याला बोलल्यावर लगेच सुट्टी देखील टाकली, त्याच म्हणणं एकच - "तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मी येईन". प्रमोद, पराग आणि सोबतीला परागचा मित्र आकाश चाकणे(चोको) देखील तयार झाला. हर्षल दादाचं तळ्यात मळ्यात होतं. एकंदरीत सहा जण तर तयार होतो. परागने मध्येच टांग दिली आणि त्याच्या जागी सागर तयार झाला आणि अखेरीस आमचा सहा जणांचा चमू या सातमाळा स्वारीसाठी तयार झाला.


दिवसेंदिवस उन्हाची तिरीप वाढत होती, त्यामुळे ठिकाण बदलण्याचे विचार देखील चालू होते, पण नीट काही जुळत नव्हतं, शेवटी जे ठरवलंय तेच करूया आणि तडीस नेऊया असं म्हणून बॅगा भरल्या आणि घराचा उंबरठा ओलांडला. गुरुवारी रात्री पनवेल-ठाणे- कसारा करत दीडच्या सुमारास कसारा गाठलं, गाडीवाल्याशी अगोदरच बोलून ठेवल्याने ते देखील तिथे गाडी घेऊन हजरच होते. लागलीच प्रवासाला सुरुवात करून धोडपच्या पायथ्याचं गाव हट्टी च्या दिशेने गाडी रवाना झाली. चहासाठी मध्ये थांबा घेऊन साडेचारच्या आसपास हट्टी गावात प्रवेश केला. सार गाव निद्रिस्त झालं होतं अगदी पारावरची कुत्री देखील,त्यामुळे आसमंतात एक वेगळीच निरव शांतता पसरली होती, आमचा काय तो आवाज ती शांतता भंग करत होता. किल्ल्यावर माची आहे तिथेच जाऊन काय तो आराम करूया म्हणून सामान सर्वांकडे सारखं वाटून घेतलं, भाकरी भाजी आणली होती ती थोडीफार पोटात ढकलली आणि ड्रायव्हर काकांना निरोप देऊन आम्ही धोडप किल्ल्याची वाट धरली. गावातून जाणारा रस्ता नंतर माळावर घेऊन गेला.
चांदण्यात न्हाऊन निघालेला धोडप 
त्या माळावरून चांदण्यात न्हाऊन निघालेल धोडपच रूप, विशेषतः नजरेत भरणारी धोडपची खाच पाहण्याजोगी होती. वाट बऱ्यापैकी रुंद आणि मळलेली होती. पाणवठ्याच्या बाजूने जात असताना एक बाईकस्वार त्या रात्रीची शांतता भांग करत गेला. माळ संपून चढाला सुरुवात झाली आणि किल्ला आमच्या एक एक पाऊल जवळ येऊ लागला. त्या किर्र शांततेत चालत असताना मध्येच होणारी पालापाचोळ्याची सळसळ नजर त्या दिशेने खेचून घेत होती. हवेतील गारवा अंगातून घाम येण्यास मज्जाव करत होता, पाठीवरच्या बॅगेमुळे पाठ तेवढी न्हाऊन निघाली होती. तासाभराच्या चालीनंतर तटबंदी लागून माचीवर प्रवेश केला.

अंधारात चालत असताना कुठला तरी शॉर्टकट घेतला आणि सर्वप्रथम लागणाऱ्या दरवाजाला बगल देऊन आम्ही गणपतीची मूर्ती कोरलेल्या टाक्याजवळ प्रवेश केला.
 गड चढत असताना माचीवरच्या मंदिरातून भजनाचा आवाज येत होता, महाशिवरात्री निमित्त मंदिरात कार्यक्रम आहे हे त्यावरून निश्चित झालं होतं. आवाजाच्या दिशेने पावले टाकत असताना त्या टाक्याच्या वरच्या बाजूलाच दोन मोठ्या कढई ठेवलेल्या दिसल्या, बाजूलाच एक घर होत तर वाटेच्या दुसऱ्या बाजूला पत्र्याच केलेलं मोठं बांधकाम होतं, ते काय होत ते काही कळलं नाही. मंदिराकडे जाणारी ही वाट दगड टाकून राजमार्गासारखी केली होती. वाटेत एक पाण्याचं टाक आणि मारुतीचं मंदिर लागलं आणि समोरच्या मंदिरातील विजेचा दिवा आमच्या नजरेत भरला. मंदिर जवळ केलं, भजन चालू होत, एक ताई मंदिरात शिवलिंगाची पूजा करत होती. एका बाबांचा मुक्काम इथे असतो त्यांचं घरवजा आश्रम देखील मंदिराला लागून होत. मंदिराच्या मागे शिवलिंगाकृती टाकं होतं त्यात उतरायला पायरी मार्ग आहे. घड्याळात सव्वा सहा झाले होते. बॅगा पाठीवरून खाली उतरवल्या, महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गडावरील शिवलिंगाच दर्शन घेणं ही गोष्ट भारीच होती. दर्शन घेऊन बाहेर आलो तर त्या ताई रांगोळी काढत होत्या आणि हा मोह काही मला आवरता आला नाही, हो नाही हो नाही करून रांगोळी घेतली हातात आणि मी देखील तिथे रांगोळी काढू लागलो. रांगोळी काढून होते न होते तोच त्यांनी आम्हाला चहासाठी आग्रह केला, आता तसंही तांबडं फुटू लागलं होतं आणि नभोमंडळी पसरलेलं लोभस चांदणं प्रातःकाळच्या रंगछटांमध्ये विरळ होत चाललं होतं. चुलीवरचा गरमागरम उकळता चहा कपात आणि कपातून घशाखाली उतरल्यावर डोळ्यांवरची झोप कुठल्या कुठे पळून गेली. जवळ असलेली बिस्किटे खाऊन पोटातील आतडी गरम करून मंदिराला आणि मंदिरातील माणसांना निरोप देऊन किल्ल्याची वाट धरली.
किल्ल्याची वाट ही परत मागे त्या गणेश टाक्याच्या इथून वाडीत जाते, या वाटेने चालत असता हनुमान मंदिर दिसलेलं तिथं वाटेच्या दुसऱ्या बाजूला उघड्यावर शंकराची पिंडी आणि टाकं देखील दिसलं, थोड्या वेळापूर्वी काळोखात आल्यामुळे हे काही आम्हाला दिसलं नव्हतं. हे सर्व काही पाहत वाट चालत असताना डावीकडे उठावलेला धोडपचा अजस्त्र सुळका आम्हाला त्याच्याकडे खेचून घेत होता. वाडीत पोहोचलो, इथून एक वाट गडाकडे जाते तर एक वाट सरळ चाललेली दिसली ही वाट कुठे जाते बघूया म्हणून तिकडे चाल धरली तर वाडी संपून आम्ही महादरवाजापाशी येऊन पोचलो. रात्री चालताना कुठला तरी शॉर्टकट घेतल्यामुळे आमची जी वाट या दरवाजातून येणार होती ती गणेश टाक्याच्या इथून आली. दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे, दोन्ही बाजूचे बुरुज देखील भक्कम उभे आहेत. आल्या वाटेने परत फिरत वाडीत घरांच्या बाजूला एका झुडपात बॅगा ठेऊन किल्ल्याची वाट धरली.
दगडांनी फरसबंदी केलेली वाट 

वाडीमध्ये माणसं असावीत असा अंदाज होता, पण मनुष्यप्राण्याचा इथे अभावच होता. काही घरांना कुलूप लावलं होतं पण तरी तेथील आजूबाजूच्या स्थितीवरून इथे कोणीच राहत नाही हे निश्चित. वाडीतून किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला लागलोच तर डाव्या बाजूला बांधकाम सदृश दिसलं पाहायला गेलो तर ते बांधकाम म्हणजे एक दुमजली विहीर होती. काटकोनात वळणाऱ्या पायऱ्या, रेखीव कमान आणि आत असलेलं थंडगार पाणी, किल्ल्याचं किल्लेपण खूप काही सांगून जात होतं. किल्ल्याची पायऱ्यांची वाट धरली इथे देखील सारी वाट दगडांनी शाकारली होती. त्या दगडांवरून चालताना कंटाळा येत होता. चढ देखील चांगलाच छातीचा असल्याने घामाच्या धारा निघत होत्या. हा चढ चढत असताना वर खाचेच्या इथे दिमाखाने फडकत असलेला भगवा, किल्ल्याच्या कडेला लावलेले रेलिंग, आकाशाशी भिडलेला सुळका आणि अशीच नजर फिरवत असता नजर एकाकी खिळली ती पायऱ्या चढत असताना किल्ल्याच्या उत्तर टोकाला चऱ्या(बुरुजावर लावलेले पाकळीच्या आकाराचे दगड) असलेल्या बुरुजाने. खूप कमी किल्ल्यांवर अशा चऱ्या असलेले बुरुज पहावयास मिळतात. तासाभराच्या चालीत लोखंडी जीना गाठला होता, दगडात कोरलेल्या पायऱ्या देखील तेथे होत्याच.
दुरून नजरेत भरणारा चऱ्या असलेला बुरुज  
जुन्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि आताचा लोखंडी जीना 
तिथून लगेच पुढचा चढ चढू लागलो आणि अवघ्या काही मिनिटात पुढच्या दरवाजापाशी येऊन पोचलो, इथे दरवाजा आणि बाजूच्या बुरुजांवर माकडांची टोळी आमच्या स्वागताला उभी होतीच.त्या दरवाजातून पुढे जपून जात आम्ही आता चऱ्या असलेल्या बुरुजाच्या वरच्या अंगाला पोचलो होतो.
कातळकोरीव पायऱ्या आणि बालेकिल्ला प्रवेशद्वार 
इथे दरवाजात असताना एक वाट डावीकडे जात होती, आणि तीच वाट किल्ल्याच्या वरच्या भागात घेऊन जाणारी असावी असा आमचा समज होता, म्हणून अगोदर दरवाजाच्या पुढे काय आहे ते बघून येऊया म्हणून ही वाट धरली आणि वाट आम्हाला पुढे पुढे घेऊन जाऊ लागली तस पाण्याचे टाके दिसले आणि किल्ल्याच्या वरच्या भागाच्या बुरुजावर झेंडूच्या फुलांची केलेली सजावट दिसली, तिकडे काहीतरी असणार या आशेने मोर्चा तिकडे वळवला. कातळावरून चढून एकदम मी कातळ कापून कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचलो, बाकीच्यांना देखील आवाज देऊन येण्यास सांगितलं. इथे लावलेली झेंडूची फुले माकड सेना खात होती, त्यामुळे ती तोरणं तुटून सगळीकडे फुलांचा सडा पडला होता. पायरीमार्गाने वर चढून दरवाजात प्रवेश केला. दरवाजाच्या अलीकडे भिंतीवर दोन फारसी भाषेतील शिलालेख आहेत,तर दरवाजाच्या इथे सैनिकांसाठी देवड्या देखील आहेत. दरवाजात प्रवेश केला तर पुढे असलेल्या चोकोने पुढे थांबलेली माकडसेना बघून माघार घेतली आणि अजून कोणीतरी पुढे जा अस सांगितलं. दरवाजातून पुढे आल्यानंतर एक शेंदूर फासलेला दगड होता, त्याचा बाजूला सिमेंटचा कोबा केला होता. पाण्याच कोरडं टाकं देखील होत.
पडके अवशेष 
एकच पायवाट असल्याने तीच धरून चढ चढलो तर समोर पडक्या वाड्याचे अवशेष होता, वाड्याचा काही भाग चांगला उभा होता. बाजूलाच पाण्याचं टाकं देखील होतं. किल्ल्याच्या वरच्या भागात पोचलो होतो, त्यामुळे टाक्याच्या इथेच पाणी पिऊन आणि जरा विसावून लगेच पुढच्या गडफेरीला आरंभ केला. इथून सुळक्याच्या दिशेने जाताना सुळक्याच ते अभाळस्पर्शी, अभेद्य रूप त्याच्या रौद्रावताराची जाणीव करून देत होता.

धोडपचा अजस्त्र सुळका, उजव्या
बाजूला सुळक्याच्या पोटातील गुहा 
या सुळक्याच्या पोटात कोरलेली गुहा लक्ष वेधून घेत होती. पुढचं लक्ष हे ती गुहाच होती. गुहेपर्यंत जाणारी पहिली पायवाट ही घसाऱ्याची आणि नंतर कातळचढाईची होती. सरकत सावरत ही चढाई संपून गुहेत पोचलो. जणू काही कातळ कापून अलगद तुकडा बाहेर काढावा अशी २ खांब असलेली ही बैठी गुहा प्रशस्त आहे. या गुहेतून समोर पूर्वेला नजर भिरकावली असता इखारा सुळका आणि समोरची डोंगररांग थेट नजरेत भरते.
गुहेतून समोर दिसणारा इखारा 
गुहेतून खाली उतरून सुळक्याला उजवीकडे ठेवत किल्ल्याच्या मागच्या भागाकडे चालत असताना सुळक्याच्या पोटात खूप साऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या लागतात. यातील एका गुहेत धोडंबादेवीचं मंदिर देखील बांधण्यात आलं आहे. गडदुर्गेचं दर्शन घेऊन आमची स्वारी आता किल्ल्याचं खास आकर्षण असलेल्या खाचेच्या इकडे म्हणजे पश्चिम टोकाकडे वळवली. धोडप हा सातमाळा डोंगररांगेच्या मध्ये आहे त्यामुळे त्याच्या पूर्वेला असताना इखारा, हंड्या, लेकुरवाळी, कांचना-मंचना हे डोंगरकिल्ले दिसतात तर पश्चिमेला रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या, कण्हेरगड, सप्तशृंगी हे गडकोट दिसतात. हा सर्व सह्याद्री डोळ्यात सामावून घेता घेता कधी त्या खाचेपर्यंत आलो ते समजलं देखील नाही. इथलाच भगवा २ तासांपूर्वी आम्हाला त्याच्याकडे बोलवत होता आणि आम्ही पोचलो देखील होतो. समोर डोलणारा भगवा, ती खाच, लांबच लांब पसरत गेलेली खाचे पलीकडील धोडपची माची आणि मागे बेलाग सुळका, धोडपच ते अद्वितीय रूप मनात घर करत होतं.
इथपर्यंत पोचायला आम्हाला साडेनऊ झाले होतो, एकंदरीत गडफेरी झाली होती आता त्या खाली लोखंडी जीना चढून आल्यावर डाव्या बाजूला काय आहे ते बघून गडउतार व्हायचं होतं. आता भूक देखील लागली होती म्हणून खाली जो दरवाजा पहिला होता तिथेच थांबून नाश्ता करू, पाण्यासाठी विहिरही बाजूला आहे आणि तिथूनच पुढची वाट इखाऱ्याकडे जाते म्हणजे तीच जागा सोईस्कर पडेल यावर सर्वांच एकमत झालं. खाली उतरून त्या रेलिंग च्या डाव्या बाजूला गेलो, रेलिंगच्या पार टोकापर्यंत गेलो, पण तिकडे पाहण्यासारखं अस काहीच नाही. पावले माघारी फिरवून वेगाने खाली उतरलो बॅग जिथे ठेवल्या होत्या तिथून बॅग बाहेर काढल्या प्रमोद,सागरला पाणी आणायला पाठवलं तर मी प्रिसी आणि आकाश दरवाज्यात जाऊन नाश्ता बनवायला लागलो. ब्रेड आणि गरमागरम शेवभाजीवर यथेच्छ ताव मारून आणि त्या दरवाजात फोटोशूटच्या झालेला मोहाला आवर घालून सव्वाअकराच्या सुमारास आम्ही इखारा सुळक्याच्या खाली असलेल्या आश्रमाकडे कूच केली.
सांगाती मध्ये वाचल्याप्रमाणे इथून आम्हाला आश्रमापर्यंत पोचायला दोन तास लागतील, पण गूगल मॅप वर हे अंतर बघता इतका वेळ नाही लागणार हे कळत होतं, पण सांगू नाही शकत पुढचा रस्ता कसा आहे, त्यामुळे दोन तासांचं गणित पकडून वाट धरली, रस्त्यात एक मामा भेटले त्यांना विचारलं असता ते बोलले २५-३० मिनिटात पोचाल तुम्ही आश्रमात. मामांची ही गुगली आम्हाला कोड्यात टाकणारी होती. एवढं मात्र नक्की २०-२५ मिनिटं नक्कीच नाही पण दोन तास देखील नाही. धोडपच्या उत्तरेला असलेल्या हनुमंतपाड्यातुन एक वाट दरवाजाच्या पुढे येऊन मिळते त्या वाटेवरून काही गावकरी स्त्री-पुरुष, लहान मुलं असा सगळा गोतावळा येत असताना दिसला त्यांच्याशी बोलता बोलत कळलं की ते देखील आश्रमात चालले आहेत, त्यांची नेहमीची वाट त्यामुळे त्यांची चालण्याची गती भारीच होती, आपण जर यांच्यासोबत राहिलो तर लवकर पोचू. या सर्वांत पुढे असलेल्या दत्ताभाऊंशी मी बोलू लागलो आणि त्याच्याच सोबत चालत असताना कळलं की हा सगळा त्यांच्या परिवार आणि शेजारच्या चार-पाच बाया-बापड्या महाशिवरात्रीनिमित्त आश्रमात चाललेत. दत्ताभाऊ इथल्या एकएक गावाची ओळख सांगत होते, धोडांबे गावात असलेल्या प्राचीन शिवमंदिराबद्दल पण त्यांनी सांगितलं. पण येताना रात्र असल्यामुळे आम्हाला ते पाहता आलं नाही. त्यांच्यासोबत आलेली बच्चेकंपनी देखील एकमेकांची मजा मस्ती करत चालली होती. धोडपची तटबंदी आणि बुरुज पार करून छोट्याश्या घळीत उतरून समोरच्या इखाऱ्याच्या डोंगराला लागलो देखील.
धोडप माचीवरील तटबंदी,दरवाजा,आणि धोडप सुळका व खाच आणि गावकरी 
पठारावरून चाललेली चाल समोर दिसत असलेला इखारा सुळका डाव्या बाजूला दरी दूरवर दिसणार हनुमंतपाडा गाव मागे दूर होत चाललेला धोडप तर उजव्या बाजूला खाली हट्टी गाव...आणि मध्ये मध्ये दिसणारी हिरवीगार शेती आणि शेततळी इथल्या शेतकऱ्यांच्या समृद्धतेची जाणीव करून देत होते. दत्ताभाऊ आणि त्यांच्या परिवाराशी बोलता बोलता आणि छोट्या बच्चेकंपनीची मजा घेत घेत चाळीसाव्या मिनिटाला आम्ही आश्रमात पोचलो देखील. इथे आम्हाला खालून येणारा मातीचा रस्ता देखील लागला, या मार्गाने गाडी देखील आश्रमापर्यंत आणली जाते.
गोरक्षनाथ मंदिर 
गोरक्षनाथांच मंदिर आणि बाजूला असलेलं आश्रम पाण्यासाठी विहीर आणि आजूबाजूला बहरलेली हिरवाई त्यामुळे मुक्कामासाठी ही जागा खरंच खूप सुंदर आहे. इथे दुपारचं जेवण उरकू अस ठरवलं होतं, पण तासाभरापूर्वीच केलेला पोटभर नाश्ता अजून तरी गरम होता,म्हणून पुढची चाल धरूया अस ठरलं. मंदिरात दर्शन वगैरे घेऊन पुढची वाट विचारू लागलो. दत्ताभाऊ पुढे कधी गेले नव्हते म्हणून त्यांनी अगोदरच हात वर केले, त्यांच्यासोबत असलेल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं पण ते खूप वर्षांपूर्वी गेले होते त्यामुळे त्यांच्याकडून पण हवी तशी माहिती मिळाली नाही, एक दोन जणांना अजून विचारल पण ते देखील फक्त आश्रमात दर्शनासाठी आलेले असल्याने त्यांच्याकडून पण माहिती मिळाली नाही. सांगाती हे पुस्तक काढून पंचवीस पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, त्यामुळे ती माहिती असली तरी स्थानिकांचा सल्ला घ्यायचाच हे मनाशी पक्क केलेलं होतं. एवढ्यात एक म्हातारे आजोबा आश्रमात आले, त्यांना कांचना किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेबद्दल विचारलं असता ते सांगू लागले.

एव्हाना आम्हाला तिथल्या लोकांनी आश्रमाच्या पुढे दहा मिनिटांवर असलेल्या गरुड टाकल्याबद्दल सांगितलं होतं. पुढची वाट ते सांगू लागले आणि त्यांनी पुढे एक मंदिर वाटेत लागेल अस ते म्हणाले, मी सांगाती मध्ये पुढच्या दोन्ही डोंगरांची नावे वाचली होती, म्हणून त्यांना बोललो की हंड्या डोंगराला की लेकुरवाळी डोंगराला ते मंदिर आहे. स्थानिक नाव घेतल्यावर ते आजोबा देखील चकित झाले आणि मग ते अजून नीट पणे समजावू लागले. आमची ही चर्चा ऐकायला आम्ही सगळे तर होतोच त्या बरोबर आश्रमात आलेले इतर लोकही आमच्या चर्चेत सामील झाले.आजोबा असे मस्त दरवाजाला रेलून पायावर पाय ठेऊन सर्व सांगत होते. माझ्यादेखील एक एक प्रश्नाची उकल होत चालली होती. पुढचा प्रवास लक्षात घेऊन जो काही गप्पांचा फड रंगला होता त्याला विराम देऊन आश्रमातील सर्वांना निरोप दिला आणि आता पुढचा टप्पा होता हंड्या, लेकुरवाळी या डोंगरांना वळसा घालून कांचना किल्ल्यावर पोहोचणे.
गरुड टाकं 
घड्याळाच्या काट्यांनी बाराचा आकडा पार केल्यानंतर आम्ही आश्रम सोडलं, आता पुढची चाल ही लेकुरवाळी आणि हंड्या या डोंगरांना वळसा घालत सपाटीवरून जाणारी असली तरी या भागात झाडांचं प्रमाण नगण्य सगळा बोडका भाग त्यामुळे रखरखीत उन्हातून जाण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता. चाल धरली अगदी बाराव्या मिनिटाला आम्ही गरुड टाक्याच्या इथे पोहोचलो. आश्रमात येणारे बरेच लोक इथे येऊन अंघोळ करून आश्रमात दर्शनासाठी जातात, अस केल्याने आपली इच्छा पूर्ण होते असा समज इथे रूढ झाला आहे. तिथल्या लोकांना चालता चालताच पुढची वाट विचारून पुढे मार्गस्थ झालो.

टाक्याच्या पुढे थोड्याच अंतरावर एक घोडा मरून पडला होता. इथून पुढे वाट पठारावर गेली पठारावर भरपूर सारी गुर चरत होती. त्या गुरांपैकी एखादं दुसरं उधळल तर आपल्यापैकी एकाची गेम अशा विचाराने अंगावर एकदम काटा आला. लवकरात लवकर तिथून निसटून पुढे वाटेला लागलो, त्या कडक उन्हात मोकळ्या पठारावरून जात असलो तरी वाऱ्याची झुळूक हळूच स्पर्शून जायची त्यामुळे हायस वाटत होतं.
ही वाट समोर पठारावर जाणारी असली तरी मध्येच एका घळीत उतरली,घळीत उतरायच्या अगोदर इथे तटबंदी देखील पहावयास मिळाली, घळीत असलेल्या छोट्या टेकाडांना वळसा घालून पुढच्या पठारावर चढली. याच पठारावर दोन्ही लेकुरवाळी आणि हंड्या या डोंगरांना वळसा मारत पुढचा पल्ला गाठायचा होता. इखाऱ्याकडून पहिला आणि मोठा लागतो तो लेकुरवाळी डोंगर तर दुसरा आणि लेकुरवाळीच्या तुलनेत छोटा आहे तो हंड्या डोंगर अशी दोन्ही डोंगरांची नाव आहेत. आणि या दोहोंच्या मागे कांचना-मंचना ही जोडगोळी देखील आता नजरेत भरत होती. पठारावरची ही चाल मात्र एकदम रुक्ष होती, कारण समोर दिसणारे डोंगर सोडले तर विशेष अस काहीच नव्हतं. झाड तर नव्हतंच त्यामुळे सावली म्हणजे काय हे आम्हाला न विचारलेलंच बरं. आमचं नशीब म्हणून वाऱ्याची गार झुळूक या सबंध मार्गावर आमच्या सोबत होती, नाहीतर या उष्म्याने काय झालं असतं कुणास ठाऊक. झाड नाहीच शिवाय गवतही सगळीकडे सुकलेल आणि हा पठार दूरवर पसरलेला आणि आमच्याशिवाय तिथे दुसरं चिटपाखरूही नव्हतं. आमची अकरा नंबरची गाडी पाठीवर ओझी मिरवत चालू होती.
पठारावरच्या चालीचा आम्हा प्रत्येकाचा वेग वेगवेगळा होता आणि त्यातूनच मी प्रमोद पुढे, आकाश-अलंकार मध्ये तर प्रिसी-सागर मागे अशा आमच्या तीन जोड्या चालल्या होत्या. लेकुरवाळी डोंगर उजवीकडे ठेऊन वळसा मारत असताना एक ठिकाणी गवताच्या झाडोऱ्याने सावली झाली होती तिथे पाचेक मिनिटांचा विसावा घेऊन पुढची पायपीट लगेच चालू केली. वेळ आमच्या हातात खूप बऱ्यापैकी होता आणि कांचना-मंचना किल्ले देखील आता टप्प्यात आलेले दिसत होते. त्यामुळे कांचना किल्ल्यावर जाऊन इथे राहायचं की खाली हे कांचनावर जाऊन ठरवणार होतो ते आता खाली उतरून तांगडी गावाच्या देखील पुढे जाऊ अस गणित आम्हाला वाटू लागलं. तसही या तीन दिवसात आजच्याच दिवशीची चाल जरा मजबूत होणार होती, सकाळपासून आमची चाल बघता आम्ही वेळेच्या पुढेच होतो. त्यामुळे तांगडी गाव गाठून तिथे किंवा त्याच्याही पुढे मुक्काम करू यावर सर्वांनी होकारार्थी मान डोलवली आणि पुढे निघालो, बघता बघता लेकुरवाळी डोंगर मागे पडला आणि हंड्या डोंगराचा वळसा चालू झाला, इथे देखील हंड्या डोंगर उजवीकडे ठेऊन डाव्या बाजूने वळसा मारू लागलो, इखाऱ्याच्या खाली आश्रमात सांगितलेल्या बाबांनी हंड्या डोंगराच्या उजव्या बाजूने गेले असता सप्तश्रृंगी देवीचं मंदिर लागणार होतं पण आम्ही सांगातीप्रमाणे डाव्या बाजूची वाट धरली. एकमेकांच्यात अंतर असलं तरी सगळे हाकेच्या अंतरात आणि सर्वांची पावले एका लयीत होती. डोक्यावर ऊन देखील होतंच पण आपलं गंतव्य समोर दिसत असल्यामुळे त्या उन्हाची कुणाला फिकीर नव्हती. हंड्या डोंगर देखील पार केलं आणि परत पठारावरची चाल. या पठारावरून चालताना कांचना-मंचना अगदी समोर दिसत होते.
नजरेच्या टप्प्यातील कांचना -मंचना आणि खाली दिसणारा डांबरी रस्ता 
पावलागणिक कांचना-मंचना जसे जवळ येत होते तसे मागे पाहिलं असता हंड्या, लेकुरवाळी, इखारा आमच्यापासून लांब होत होते. पठारावरून खाली डाव्या बाजूला डांबरी रस्ता दिसत होता आणि कांचना गावातील घरे देखील नजरेत भरत होती. कांचना किल्ला समोर दिसत असला तरी ही पायपीट खाली थेट त्या डांबरी रस्त्याला खिंडीत नेणार होती आणि तिथून वर कांचना किल्ल्यावर चढवणार होती किंवा डांबरी रस्त्यावरून कांचना गावाकडे वाट वाकडी करून गावाच्या जवळून जाणारी वाट वर गडावर नेणार होती. पठाराच्या टोकाला पोचलो खालची ती खिंड,डांबरी रस्ता, त्या खिंडीतून वर चढणारी वाट तसेच कांचना गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर लावलेला भगवा, आणि समोर कांचना-मंचना पल्ला अवघा दोन तासांचा देखील वाटत नव्हता. घडाळ्यात पाहतोय तर दोन वाजलेत, सकाळचे ब्रेड आणि शेवभाजी अजूनही पोटात तरतरीत होते त्यामुळे खाण्यासाठी थांबण्याची इच्छा नव्हती आणि त्याहून महत्वाचं थांबण्यासाठी सावली नावाचा काही प्रकारच नव्हता.
पठार सोडलं खाली उतरायची वाट धरली, आणि वाटेने रूपच बदललं. पूर्ण वाट घसऱ्याने(स्क्री) भरली होती. गुर चालून चालून त्या बारीक मुरुमाचा वाटेवर पडलेला सडा पाय वाटेवर थांबूच देत नव्हता. पुढे पाऊल टाकायचं सोडा, ठेवलेलं पाऊल उचलायची देखील हिंमत नव्हती. आणि खाली लगेच तीव्र उतार त्यात आधाराला क्वचितच काही ठिकाणी एखादं-दुसरं झाड होतं.
घसाऱ्याची वाट 
चुकून जरी पाय घसरला आणि पायातील अंतर वाढलं की गटांगळ्या खाल्ल्याच म्हणून समजा. भरीस भर म्हणून पाठीवरच्या सॅक होत्याच. अकरा नंबरची चाल आता बाजूला हात टेकून कुठे आधार घेऊन चालली होती. मी पुढे, माझ्या मागे प्रमोद, सागर प्रिसीची बॅग घेऊन उतरतोय प्रमोद त्याला गाईड करतोय,त्याच्या मागे प्रिसी हळू हळू सरकत सरकत खाली उतरत होती, तर मागे अलंकार आकाशचा हात धरून त्याला उतरवत होता. घसाऱ्याचा पहिला टप्पा पार झाला आणि झाडांच्या मध्ये आलो वाटलं संपली स्क्री आता चांगला रस्ता असणार, पाहतोय तर आताच समीकरण अजून बदललं होतं. आगीतून फुफाट्यात असं झालं होत. पाच पायांनी चालण्यावाचून आता पर्याय नव्हता, त्या घसऱ्यावरून जणू काही आम्ही रेंगाळत चाललो होतो, सगळं अंग धुळीने भरलं होत पण याची कुणालाच परवा नव्हती. घड्याळाच्या काट्यांनी इथे वेग घेतला होता, वाट जर नीट असती तर हा उतार उतरून खिंडीत पोचायला पंधरा मिनिटे देखील फार झाली असती पण या स्क्रीने आमचा तासाभरापेक्षा जास्त वेळ खाल्ला. सरकत-रेंगाळत का होईना पण सगळे सुखरूप पणे त्या खिंडीत पोचलो. खिंडीतून वर जाणारी वाट दिसली मात्र आता सर्वांना प्रचंड भूक लागली होती अंगातुन घाम देखील चांगलाच निघाला होता, परिणामतः विसाव्याचीदेखील गरज होती. खिंडीत झाड होतं तिथे पोचलो पण तिथे कुठला तरी मेलेला प्राणी टाकला असल्याने त्याच्या दुर्गंधीने खिंड सगळी दुमदुमली होती. त्यामुळे तिथे थांबणं शक्य नव्हतं. पुढे वाट चढायला घेतोय तर थकलोत भरपूर आणि भूकही लागलीय, आणि वर चढायला जातोय तर वर देखील थांबायला काही नसणार म्हणजे त्या वाटेने चढायचा सोडून कांचना गावाकडे जो भगवा ध्वज दिसला होता तिकडे जाऊन बघूया, सावलीच माहीत नाही पण या दुर्गंधीपासून तर सुटका मिळेल.
डांबरी रस्त्याची चाल म्हणजे अजून किचकीच, त्यात वरून आग ओकणारा सूर्य, पोटात उसळलेला भुकेचा कल्लोळ आणि या सर्वात सावलीचा मागमूस देखील नव्हता, त्यामुळे थांबाव तर कुठे या सर्व विचाराने डोकं भनभणत होत. भगव्यापाशी पोचलो, पण तिथे देखील थांबायला काहीच नव्हतं, गाव आमच्यापासून चार-पाच मिनिटांवर होतं पण आहे ती वाट सोडून दुसरीकडे जाऊन वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता, एक छोटं झाड दिसलं त्याच्या खालीच बस्तान मांडून भाकरी काढल्या, सोबतीला सुका खाऊ देखील होताच. जेवणं उरकली, पाणी बऱ्यापैकी संपलं होतं, वर किल्ल्यावर गेल्यावर पाणी आहे हे माहीत होतं, तरी देखील जवळ पाणी असावं या उद्देशाने प्रमोद नको म्हणत असताना देखील सागरला गावात पाठवून चार-पाच बॉटल भरून आणायला सांगितल्या, तोवर आम्ही इथलं सर्व आवरून घेतलं, सागर आला आणि आम्ही कांचनाच्या दिशेने पावले टाकली, वाट दिसत होती ती धरली तरी देखील माघारी फिरून एका गावकऱ्याकडून वाटेची पुष्टी केली. मामांनी सांगितल्या प्रमाणे वाट धरली खरी, पण वाट इतकी काही मळलेली नव्हती, मात्र सध्या दुसरी कुठलीच वाट दिसत नव्हती म्हणजे आहे ती वाट योग्य असं समजून चाल धरली. चढ जरा छातीचा असल्याने गती जरा कमी होती. मघाशी घसाऱ्यावरून उतरताना आकाशचा वेग कमी होता त्यामुळे तो स्वतः मला येऊन बोलला आता नाही मागे थांबणार आता बरोबर चालेल विशाल. त्याचा हा दांडगा उत्साह बघून मला देखील बरं वाटलं. चढ चढत असताना पोटात जे काही ढकललं होतं ते छातीवरच राहील होतं, मध्ये थांबे घेत घेत उन्हाची तिरीप सहन करत गवतातून वाटेचा मागोवा घेत आमची पायपीट चालू होती. हा चढ चढून झाल्यानंतर एकाएकी भरपूर साऱ्या ढोरवाटा फुटलेल्या दिसल्या, आता झाली गच्छंती. कांचना-मंचनाची खिंड आम्हाला दिसत होती, पण गवत इतकं फोफावलं होत आणि ढोरवाटा इतक्या होत्या त्यात योग्य वाट मिळत नव्हती. आणि या वाटांपैकी वर जाणारी वाट दिसतच नव्हती किंबहुना नव्हतीच, सगळे शोधाशोध करायला लागलो पण काही नाही. शेवटी प्रमोदने एका ठिकाणी बोलावलं तिथे जाऊन पुढे वाट काही आहे का बघावं म्हणून घुसलो तर पायाखालची वाट कधी गुडूप झाली कळलं देखील नाही आणि हे इथे कितीतरी वेळा झालं. जायचय कुठे हे दिसत असून देखील कसं जायचं काही कळायला मार्ग नव्हता. कारण कुठूनही घुसलो आणि नंतर कडा लागला तर परत उतरण्याची पंचाईत. घुसूया अस मनाशी निर्धार केला आणि माहीत नाही कुठून कसा सरकत सरकत गेलो पण गेलो तो पहिल्या कड्याच्या वरच गेलो आणि तिथून वर जाऊन पाहिलं तर एक चांगली मळलेली वाट दिसली. कांचना वर जायचा पहिला टप्पा तर पार केलाय आणि आता वाट ही मिळालीय(बहुतेक तरी) म्हणून सर्वांना वर यायला सांगितलं. निरोप देताना इतकाच दिला -"ऐका रे! मी जिथे आहे... या दगडावरच तुम्हाला यायचं आहे, वाट काहीच नाही, पण पुढे वाट आहे चांगली मळलेली, मी ती बघतो पुढे, तुम्ही इथपर्यंत या,मी पुढे जाऊन येतो".
कांचना मंचना या दोहोंच्या खिंडीच्या बरोबर खाली मी होतो, आणि माझ्यासमोर जी वाट होती ती त्या खिंडीच्या बरोबर खाली या जोडकिल्ल्यांना समांतर चालली होती, कुठे तरी वाट वळून वर जाणार अस समजून सुरुवातीला मी खिंडीकडे बघताना डाव्या बाजूला चालू लागलो, चालतोय चालतोय वर जाणारी वाट काहीच दिसत नाही आणि खिंडीच्या तर भरपूर पुढे आलो होतो पार कांचना किल्ल्याच्या ईशान्येला असलेल्या पठारावर मी येऊन धडकलो, इकडे येताना परत माघारी फिरायचं आहे म्हणून बॅग एका ठिकाणी ठेऊन चालत होतो. पाणी प्यायला बघतोय तर ब्लॅडर मधलं पाणी संपलं होतं. वाट शोधण्यात इतका वेळ गेला आणि पाणी कधी संपलं ते कळलंच नाही.(बॅकअप वाली बॉटल होती, पण होता होईस्तोवर ते पाणी काढायचं नाही,म्हणून जवळच पाणी संपलय या अविर्भावतच मी पुढचा रस्ता धरला). पठारावरून पुढे त्या वाटेवरून गेलो असता किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाऊन खाली उतरणारी वाट दिसली, एवढा वाटेचा गोंधळ उडाला होता, किल्ल्यावर कसे जाणार आणि त्याहून महत्वाच पुढच्या वाटेला कसं लागणार याच उत्तर ती समोर दिसणारी वाट देऊन गेली होती. पुढे जाणाऱ्या पावलांना माघारी खेचून घेतलं आणि योग्य वाट सापडली याचा मनात जल्लोष करत बाकी टीम गाठली. खालून सगळे चढत होते, पुरते दमून गेले होते, छातीचा चढ आणि त्यात पूर्णतः गवताने भरलेला डोंगर यामुळे एकंदरीतच सर्वांची हौस झाली होती. म्हणजे मलासुद्धा आश्चर्य वाटत होतं की या वाटेने मी वर चढलो होतो. आकाश पार थकला होता तरी तो असा काही त्या चढाला भिडला होता की जर तो पटकन घसरला तर काय होईल या विचाराने मी त्याला सावकाश रे, बस थोडावेळ आणि मग ये अस सांगितलं, त्याच्यामागे सागर होता, तर बाकीचे तिघे दुसऱ्या बाजूने चढत होते. आकाशला जसा मी सावकाश ये बोललो तसा त्यावर तो -"अरे विशाल, थांबलो तर संपलो" एवढंच बोलला आणि घोरपड जशी सरसर जाते तसा हा भाऊ वर यायला लागला, गवत-काट्यांची कोणतीही तमा न बाळगता. थोड्यावेळापूर्वी तो जे बोलला होता, की आता नाही मागे राहणार हे शब्द मला आठवले. सागर ला त्याच्या मागेच राहायला सांगून या सर्वांकडे मी वरून लक्ष देऊ लागलो. आकाश आला, सागर आला, मागोमाग अलंकार, प्रमोद आणि प्रिसी पण मी असलेल्या खडकपाशी येऊन पोचले. आकाशने तर आल्या आल्याचं बॉडी आडवी टाकून दिली. पाणी पिण्याचं देखील त्याच्यात अवसान नव्हतं. सर्वांना बसायला सांगितलं, आता इथे किल्ल्यावर जाणारी वाट शोधण्याबरोबरच पाण्याचा साठा बघणं जास्त गरजेचं होतं. सागरने जर ते गावातून पाणी आणलं नसत तर आमची एव्हाना पुरती वाट लागली असती. प्रमोद, मी, सागर पाणी आणि वाट दोन्ही शोधायला निघालो, मला जी चांगली मळलेली पायवाट दिसली होती तिच्या डाव्या बाजूला मी जाऊन आलो होतो, आता उजव्या बाजूला मोर्चा नेला होता.
गवत वगैरे हिरवळ दिसत होती पण पाण्याचा काही मागमूस नव्हता, किल्ल्यावर घळीत पोचल्यावर टाकं असणार हे माहीत होत पण तिकडे जायलाही काही मार्ग नव्हता आता मागे फिरणार होतो तरी अजून पन्नास शंभर पावलं पुढे जाऊन बघतो असं म्हणून पुढे गेलो तर एक खोदीव टाक्यासरशी दिसलं पण ते गवताने आणि मातीने भरलं होतं, पुढे बघूया काहीतरी असणार. शोधण्याचा उत्साह म्हणण्यापेक्षा इथवर आलोय तर अजून शोधुय कारण ज्या वाटेवर थोड्या वेळापूर्वी जाऊन आलो होतो तिकडे काहीच नाही हे निश्चित होतं. पावले पुढे टाकतोय, इतक्यात एका खडकात हंड्या एवढ्या आकाराचा डोह होता आणि त्यात पाणी पाझरत होत. पाणी पाझरून त्या हंडाभर डोहात साठत असल्याने स्वच्छ होत, गाळ होता त्यात पण तो तळाला होता.सागर आणि प्रमोदला आवाज देऊन सोबत आणलेल्या बॉटल आणि ब्लॅडर भरून घेतले, आम्ही देखील पोटभर पाणी पिऊन मागे थांबलेल्यांसाठी ही वार्ता घेऊन गेलो. उजेड असला तरी घड्याळाच्या काट्यांनी सहाचा आकडा पार केला होता. आकाशात देखील मावळतीला रंगछटा पसरत चालल्या होत्या.

दुपारी दोन वाजता समोरच्या पठारावर असताना एक भाकीत केलं होत की दोन तासात आपण कांचना वर पोचू आणि किल्ला पाहून आपण पुढे तांगडी गाव देखील गाठू. पण पठार उतरताना लागलेल्या घसाऱ्याने आणि नंतर कांचनाच्या चढावर वाटांच्या गुंत्यामुळे दोनाचे चार तास कधी झाले समजले नाही आणि दिवसभराचे श्रम देखील आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. विशेषतः आकाशची झालेली हालत. आता जर पुढे ट्रेक सुरू ठेवतोय आणि आपल्या टीम पैकी एकाला जरी काही झालं तर पुढचं दोन दिवसाच गणित कोलमडणार त्यापेक्षा आज जर नीट आराम केला तर पुढचे दोन दिवस नीट जातील, तसही हा ट्रेक ठरवताना आजच्या दिवशीचा मुक्काम शक्यतो कांचनावर करायचा किंवा वेळ असल्यास तिथे जाऊन पुढे जायचं की नाही ते ठरवायचं असं ठरलं होत.
छोटा का होईना पण पाण्याचा साठा जवळ होता त्यामुळे उजेड आहे तरच त्या ईशान्येला असलेल्या पठारावर आपण मुक्काम करू शकतो, तिथून सात-आठ मिनिटांवरच पाणी असल्याने चिंतेच कारण नव्हतं. बॅगा पाठीला लावल्या आणि चाल धरली पठाराची, त्याचवेळी आम्ही जिथे बसलो होतो त्याच्या मागेच अलंकारला गवतात बसलेला फुरसे(saw scaled viper) दिसला, तोच विषय चघळत पुढची वाट धरली. आता देखील वर घळीत कुठून रस्ता जातोय का याकडे नजर भिरभिरत होती. पठारावर पोचलो, नीट जागा बघून ताडपत्री अंथरली आणि एकंदरीत गंतव्यावर पोचलो असं म्हणून पाठीवरून बॅग मोकळी केली आणि आजच्या दिवसापूरता सुटकेचा निश्वास टाकला. प्रमोद आणि मी पुढे जाऊन चक्कर मारून आलो.
मावळती
पाण्याच्या सगळ्या बॉटल कॅन काढून प्रिसी ला मुक्कामाच्या इथे थांबवून आम्ही सगळे पाण्याच्या इथे गेलो. पाण्याच्या त्या हंडाभर आकाराच्या डोहातून हळुवार पाणी काढत असताना त्या डोहात असलेला बेडूक मध्येच उधळायचा आणि म सगळा गाळ वर यायचं की थांबायचं, पाणी पाझरत असल्याने डोहात पुरेस पाणी साचायला वेळ लागायचा एकंदरीत हात पाय धुवून सर्व पाणी भरून होईपर्यंत अंधार पडला होता. खरंतर दिवसभराच्या इतक्या तंगडतोडीनंतर अंघोळीची गरज होती, पण पाण्याची कमतरता बघून हा मोह सर्वांनी टाळला. मुक्कामाच्या ठिकाणी आलो, फ्रेश झाल्यामुळे बरं वाटत होतं, गरमागरम सूप, चहा, आणि लगेच डाळ-भात पापड लोणचं कोशिंबीर अस साग्रसंगीत जेवण आणि हे सार महाशिवरात्रीच्या रात्री अब्जावधी चांदण्यांखाली कांचना किल्ल्याच्या कुशीत आम्ही अनुभवत होतो. दिवसभराच्या पायपीटीचा केव्हाच विसर पडला होता, हे अस काही आता आम्ही अनुभवत होतो की ते शब्दात सांगता येत नव्हतं. थकली भागली शरीरं आता विसाव्याच्या जागी असल्याने निवांत होती. कांचना किल्ला हा तिथे झालेल्या कांचनबारीच्या लढाईसाठी प्रसिद्ध होता. ऑक्टोबर १६७० मध्ये दुसऱ्या सुरत लुटीच्या वेळी महाराजांनी बागलाणकडे कूच केली असता दाऊदखान बऱ्हाणपूर वरून महाराजांना गाठण्यासाठी चांदवडला येऊन थांबला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळा रांग ओलांडणे गरजेचे होते आणि दाऊदखान मध्ये येण्याची भीती होती, त्यामुळे महाराजांनी सेनेची दोन भागात विभागणी करून ५००० सेनेसह लुटीचा माल पुढे पाठवला तर १०००० सेनेसोबत महाराज त्यांच्या मागेच राहिले. १७ ऑक्टोबर १६७० साली सकाळीच कांचन बारीत युद्धाला तोंड फुटले, सहा तासांच्या या युद्धात प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव,भिकाजी दत्तो यांच्यासह मोगलांवर आक्रमण करून ३००० मोगलांना कापून काढून मोगलांचा दारुण पराभव केला. गनिमी कावा न वापरता मैदानात उतरून मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे ही कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धाच्या परिणामामुळे दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल महाराजांना येऊन मिळाला पुढे या भागातील सर्व किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले. ही गोष्ट आणि इतर गप्पा ठोकत आडवे होऊन डोळ्याला डोळा कधी लागला हे समजलं देखील नाही.
क्रमशः

साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

No comments:

Post a Comment