![]() |
| सातमाळा डोंगररांग |
कांचनाच्या चढाने आणि त्याच्या अगोदरच्या घसाऱ्यामुळे कालचा दिवस लवकर आटोपता घ्यावा लागला आणि त्याच्या थकव्यामुळे रात्री डोळा लागला तो लवकर जाग न येण्यासाठीच, रात्री अचानक अंगावरून काहीतरी उडून गेल्याची चाहूल लागली, पण स्लीपिंग बॅगच्या बाहेर यायचं सोडा, डोळे उघडायची पण इच्छा झाली नाही, काय गेलं असेल उडून ते उद्या समजेल. साडेपाचच्या अलार्मने जाग आली, डोळे चोळीत उठलो आणि सर्वांना उठवण्याचं पाप देखील मस्तकी घेतलं. सकाळचा विधी उरकायला गेलेल्या प्रमोदला आम्ही ज्या पठारावर थांबलो होतो तिथून अवघ्या एक मिनिटांवर असलेलं पाण्याच टाकं दिसलं, काल पाण्यासाठी केलेली वणवण, त्या हंडाभर आकाराच्या डोहातून तासभर थांबून भरलेलं ते पाणी, पाणी नसल्यामुळे जी अंघोळ करायची इच्छा मारली होती, हे सार चित्र ते टाक्यातील पाणी पाहून झरझर नजरेसमोरून गेलं.
![]() |
| पाण्याचं टाकं |
आजच्या दिवसासाठी लागणार पाणी देखील कालच भरून आणलं असल्याने या टाक्यातील पाण्याला स्पर्श करण्याची देखील कुणाची इच्छा झाली नाही. चहा-नाश्ता उरकून बरोबर सुर्यनारायणाच्या त्या तांबूस गोळ्याचे दर्शन व्हायला आणि आम्ही मुक्काम सोडायला एकच घटका झाली.
![]() |
| सूर्यासोबत आमचा देखील ट्रेक चालू झाला. |
सकाळी सात वाजता आजच्या दिवसाचा ट्रेक सुरू झाला, एकंदरीत शनिवारची सुरुवात तर चांगली झाली होती. आजचा टप्पा कांचना-मंचना वरून निघून कोळधेर करून पुढे राजधेरवर जायच आणि मुक्कामाला राजधेरवाडीत जायचं जे की इंद्राई किल्ल्याचं देखील पायथ्याचं गाव आहे. रविवारी इंद्राई करून पुढे परतीचा प्रवास करता येईल अस अपेक्षित समीकरण जुळवल होतं.
रात्री चांगला आराम करून सकाळी लवकर सुरू झाल्याने सगळ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. काल मी आणि प्रमोद थोडी वाट बघून आलो होतो. कांचनाला ट्रॅव्हर्स मारून कांचना किल्ल्याच्या मागे आलो आणि इथून एक डोंगरधार खाली उतरून घळीत जाते आणि तिथून समोरच्या बाफळ्या डोंगरावर चढून डांबरी रस्त्याला येऊन उतरते. येथून खिंडीतील चढ चढून कोळधेर साठी वाट वर चढते. कांचनाचा सुरुवातीचा उतार उतरायला लागलो, पूर्वेला पसरलेल्या रंगछटा जणू आमच्यावर रंगांचा शिडकाव करत होत्या, त्या सोनपिवळ्या रंगांत चालत असताना एक प्रसन्नतेची लकेर आमच्या चेहऱ्यावरडून वाहत होती.
![]() |
| कांचनाचा उतार |
उतारावर मध्ये मध्ये स्क्री होती पण ती कालच्या सारखी भयानक नव्हती. सांभाळत सावरत एकएक जण उतरत होते. पाऊणएक तासात तो उतार संपवून पहिल्या खिंडीत उतरलो. इथे खिंडीत एक शेंदूर फासलेला देव होता, त्याच्या चाहुबाजूने नारळाच्या करवंट्या पडल्या होत्या, झाडाला लावलेला भगवा ध्वज देखील होता. इथून समोर असलेला बाफळ्या डोंगर आम्हाला चढायचा होता. उजवीकडे एक वस्ती होती आणि वाट तिकडूनच वर चढते हे कांचनाचा उतार उतरत असताना पाहिले होते. वस्ती म्हणजे अवघी पाच-सहा माळावरची घरे, तिथे विचारलं असता त्यांनी समोरचा बाफळ्या डोंगर न चढता खालून एक मातीचा गाडीरस्ता बाफळ्या डोंगराच्या पलीकडे खिंडीत उतरणाऱ्या रस्त्याला जाऊन मिळत असल्याचे सांगितले. डोंगर चढून उतरायचं या कामात वेळ आणि श्रम दोन्हीही जास्त खर्ची पडले असते, पर्यायाने खालून जो मातीरस्ता दिसत होता त्याने जाणं जास्त सोईस्कर पडणार होतं. माळावरची वाट पकडली, वाट कुठे हा तर हायवे होता. दुरदूरवर पसरलेला माळ समोर दूरवर एक दोन शेती दिसत होती, मागे कांचना मंचना जोडगोळी आमच्या कडे पाहत होती, डाव्या बाजूला बाफळ्या डोंगर तर समोर शिंगमाळ डोंगर आणि त्याच्या पलीकडे डाव्या बाजूला कोळधेरच अवाढव्य रूप नजरेस येत होतं.
![]() |
| बाफळ्या डोंगराच्या खालून जाणारा मातीचा रस्ता |
सकाळच्या कोवळ्या उन्हातील माळरानावरची चाल बऱ्यापैकी वेगात होती. त्या माळावर जागोजागी माती काढून भरपूर ठिकाणी खड्डे खणले होते, त्यातील काही खड्ड्यांत पाणी देखील होतं. डाव्या बाजूच्या बाफळ्या डोंगरावरून उतरणारी धार दिसत होती पण डांबरी रस्ता काही दिसत नव्हता याचा अर्थ त्या खिंडीत पोचायला अजून बऱ्यापैकी तंगडतोड बाकी होती.
चालता चालता त्या दोन हिरव्यागार शेतांजवळ पोचलो. नजरेच्या समोर पाहिलं असता आम्हाला खर तर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जायचं होतं, पण तिकडे जायला वाट नव्हती, शेतीमधून जायला काही वाट दिसत नव्हती. उजव्या बाजूने जी वाट होती ती बहुधा पूर्ण शेतीला वळसा मारून जाणारी होती.
![]() |
| हिरवीगार शेती आणि मागे उठवलेला कांचना -मंचना |
तेवढ्यात उजव्या बाजूच्या वाटेवर एक मामा दिसले त्यांना विचारुया म्हणजे सर्व प्रश्नांची खल होऊन जाईल. पूर्ण शेताला वळसा मारून जाणाऱ्या वाटेबद्दलच त्यांनी सांगितलं. हा वळसा जरा बऱ्यापैकी होता, जिथे सरळ जायचं तिथे उजव्या बाजूने पूर्णतः वळसा घालणारी ही चाल होती. हा वळसा मारून शेतीच्या पलीकडे गेल्यावर दूरवर गाड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले, आणि हळूहळू डांबरी रस्त्यावरील गाड्या देखील दृष्टीपथात येऊ लागल्या. शेती पार केल्यानंतरच्या वाटेच खास आकर्षण म्हणजे या वाटेच्या दोन्ही बाजूला फिकट गुलाबी पांढरी फुल असलेल्या झाडांनी ही वाट पूर्ण आच्छादली होती, आणि फुलांचा बहर चांगलाच आला होता. बघता बघता ही वाट संपून त्या खिंडीत पोचलो देखील, खिंडीत पोचायला पावणे नऊ झाले, खिंडीत एक दर्गा आहे, खिंडीतील हा मार्ग म्हणजे चांदवड-सटाणा मार्ग. या रस्त्याला लागल्यावर डाव्या बाजूला थोडं जाऊन तिकडून वर चढायला रस्ता आहे, तिथे भेटलेल्या एका बाईकस्वाराला कोळधेरचा रस्ता विचारून खिंड चढायला सुरुवात केली.
![]() |
| चांदवड-सटाणा रस्त्यावरील खिंड, मागे बाफळ्या आणि कांचन-मंचना |
खिंडीत जागीच सावली नसल्याने वर जाऊन थांबतो असा निरोप देऊन मी आणि प्रमोदने खिंडीच्या वरती बुड टेकवल. मागोमाग अलंकार आणि आकाश आले, सागर आणि प्रिसिने यायला जरा वेळ घेतला. इथे जरा विसावा घेऊन गुळ-शेंगदाण्यांवर ताव मारून नऊच्या ठोक्याला पुढची वाट धरली, इथे माझी वजनदार सॅक प्रमोद कडे दिली तर प्रमोदची हलकी सॅक घेऊन मी पुढे चालू लागलो. कांचना उतरून पहिल्या खिंडीत उतरून नंतर पुढची चाल धरून चांदवड-सटाणा मार्गाच्या खिंडीतून कोळधेर साठी वाट वर चढते या प्रमाणे आम्ही बरोबर वाट धरून योग्य प्रकारे चाललोय याची पुष्टी झाली.खिंडीच्या अलीकडे असताना तीन जण कोळधेरच्या बाजूने जाताना दिसली, वाटेवर कोणीतरी सोबत आहे हे लगेच प्रमोद आणि माझ्या लक्षात आलं.
अंदाजे दोन तासाच्या चालीनंतर जरा विसावून कोळधेरची योग्य वाट धरली. शिंगमाळ डोंगरावरून येणाऱ्या या धारेने वर चढताना शिंगमाळ डोंगराला उजवीकडे ठेऊन वळसा मारताना कोळधेरच्या उजव्या बाजूस असलेल्या खिंडीत आपण पोचतो हे माहीत होत, आता चालताना शिंगमाळ समोर असल्याने ती खिंड दिसत नव्हती, मात्र कोळधेरचा उजवीकडचा उतार समजत असल्याने त्या खिंडीचा अंदाज येत होता.
![]() |
| उंच टोक दिसणारा कोळधेर किल्ला |
शिंगमाळची धार चढत असताना समोर दिसत असणाऱ्या विजेच्या दोन लोखंडी खांबांपाशी येऊन पोचलो, इथून एक वाट डावीकडे जाते, तर एक पुसटशी वाट वर जाते. पुढे होतो म्हणून त्या पुसटश्या वाटेने दहा एक पावले वर गेलो असता या वाटेच्या तुलनेत डाव्या बाजूला जाणारी वाट जास्त मळलेली असल्याचे वरून मला दिसले. त्यामुळे ती वाट योग्य असणार आणि कोळधेरच्या उजव्या खिंडीत घेऊन जाणार म्हणून सर्वांना तिकडे वळायला सांगितलं.शिंगमाळ डोंगराला ट्रॅव्हर्स मारत जाणारी ही वाट समोर कोळधेर किल्ल्याचं दर्शन घडवीत होती, तर मागे बाफळ्या डोंगर आणि कांचना किल्ल्याचं टोक देखील दाखवत होती. त्या ओसाड भागात डांबरी सडक विशेष उठून दिसत होती. मध्ये मध्ये असणारी हिरवीगार शेती आणि शेततळी देखील चांगली चमकत होती. पावलांनी आज जरा चांगलाच वेग घेत असल्याने कालच्या सारख्याच आज देखील जोड्या पडल्या होत्या, मध्ये कुठे स्क्रीचा टप्पा किंवा झाडोरा वा इतर अडसर आल्यास एकमेकांना हात देत वाट पादाक्रांत करत होतो. शिंगमाळ डोंगराचा ट्रॅव्हर्स संपून खिंडीत पोचलो खरे... पण आम्ही खिंडीच्या खालच्या भागात पोचलो होतो, सावलीत थांबून बॅग ठेऊन पुढची वाट बघत होतो, केलेल्या अभ्यासानुसार वाट इथून वर चढणारी पाहिजे होती, पण तस काहीच चित्र नव्हतं. खिंडीतून खाली उतरणाऱ्या घळीत आम्ही होतो पण घळ चढायला वाट नव्हती, घळ गवत आणि काट्या-कुट्यानी भरली होती.सर्वांना आपण वाट चुकलोय असं सांगितलं आणि परत फिरायला लागेल हे देखील सांगितलं, पण इतकं चालून आल्यावर माघारी फिरायला नको, इथून कुठून तरी वाट असणार म्हणून तिथूनच पुढची वाट शोधण्याच ठरवलं. वाट निश्चित वर जाणारी पाहिजे म्हणून घळ चढून वर काही आहे का हे पहायला घळीत शिरलो, वाकून-ओणवा होऊन पाठीवरची छोटी बॅग सावरत, मिळेल त्या झाडांच्या फांदीचा, मुळांचा एका ठिकाणी तर निवडुंगाच्या सहाय्याने आधार घेऊन घुसाघुशी करत होतो. या घुसाघुशीत त्या घळीत पडलेले तंबाखूचे पॅकेट, पाण्याची बाटली, तुटलेली चप्पल ही वाट असावी अशा खुणा सांगत होते आणि म्हणूनच त्यांचा माग काढत मी पुढे पुढे जात होतो. एक दोन ठिकाणी घळीतल्या सुटावलेल्या दगडांना खाली न सरकू देता हळुवार कसरत करत मी चाललो होतो, घळ बऱ्यापैकी चढलो होतो,एवढ्यात खालून प्रमोदने आवाज दिला, तो देखील वाट शोधत गेला होता, त्याला पुढे जाणारी वाट मिळाली अस त्याच म्हणणं होत. मी ज्या घळीत शिरलो होतो तिथे सध्या माझ्याकडे सर्वांच्या तुलनेत छोटी सॅक असल्याने मी बऱ्यापैकी सहज चढलो होतो, पण मोठी बॅग घेऊन चढताना पाचावर धारण बसली असती हे काही वेगळे सांगायला नको, आता तसंही खाली वाट आहे म्हटल्यावर का उगीच वर चढून स्वताचा घाम काढून घ्या, म्हणून माघारी फिरून आलो. ती तंबाखू पुडी, बॉटल, चप्पल यांच्या कडे बघून एक अंदाज बांधला की पावसाच्या पाण्यामुळे बहुधा या गोष्टी घळीत वाहून आल्या असणार, आणि तिथेच मध्ये मध्ये अडकुन राहिल्या असणार.
अखेर कसरत करत ती घळ उतरून टीमजवळ पोचलो, घामाने अंग पार निथळत होतं, पाच मिनिटे मी बसतो तुम्ही व्हा पुढे अस सांगून मी सर्वांना वाट धरायला सांगितली, मी येईपर्यंतच्या वेळात प्रिसिलियाने मंदार कर्वेला फोनवर आमचा वृत्तांत दिला होता, बहुतेक आठ नऊ वर्षांपूर्वी त्याने जेव्हा हा ट्रेक केला होता तो बहुधा याच वाटेने केला होता, त्याने त्याला जस आठवतंय तसं वाटेच वर्णन केलं आणि प्रमोद ने धरलेल्या वाटेबरोबर याची वाट मिळत होती,म्हणजे आपण बरोबर वाट पकडलीय. खिंडीच्या पुढे आलो आणि ही वाट आता कोळधेरलाच डाव्या बाजूने ट्रॅव्हर्स मारत होती. मंदार दादाच्या म्हणण्याप्रमाणे डांबरी रस्ता पहिला दिसतो नंतर पुढे गेल्यावर डांबरी रस्ता दिसेनासा होईल, पायाखालची वाट चांगलीच मळलेली होती पण ही सांगातीप्रमाणे नव्हती ना की अगोदर कोणी या वाटेने गेलेलं माझ्या माहितीत होत.
![]() |
| कोळधेर किल्ल्याला वळसा मारत चाललेली वाट |
चालताना खाली दूर गावातील एका शाळेतल्या मुलांचा ग्राउंडवर चाललेला कल्ला गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. हा ट्रॅव्हर्स मारत असताना एक छोटी टेकडी आमच्या डाव्या बाजूला आली परिणामतः तो डांबरी रस्ता दिसेनासा झाला. कोळधेर किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या शिंगमाळ डोंगरधारेवरून सुरू झालेली चाल कोळधेरच्या उत्तरेला आली, उत्तरेला येऊन जसा वळसा मारला तसा समोर राजधेर किल्ला आ वासून आमच्या कडे बघतोय असाच काहीसा राजधेर आमच्या समोर दिसू लागला.
![]() |
| वळसा मारल्यावर अचानक दिसू लागेलला राजधेर |
घड्याळाच्या काट्यांनी देखील उसळी मारून अकराचा आकडा पार केला होता. वळसा मारतोय खरा पण पूढे वाट कुठे चढतेय याचा काही थांगपत्ता लागत नव्हता, वाटेवर सावली असं काहीच नव्हतं, उन्हाची तीव्रता देखील चांगलीच जाणवत होती. मध्ये मध्ये काटे असलेल्या गवतातून जाताना सार अंग ओरबाडून निघत होतं. राजधेर आता समोर दिसत असला तरी राजधेरला इकडून कुठून वाट नाही हे पक्क ठाऊक होत. जर का आता इकडून कोळधेरला जाणारी वाटच नसेल तर काय या विचाराने पोटात भीतीने गोळा देखील आला होता.
कोळधेर चा हा कायच्या काय ट्रॅव्हर्स चांगलाच कस बघत होता, चालण्याचे कष्ट नव्हते, पण बरोबर वाटेवर आहोत की नाही याची खातरजमा आता कोळधेरला पोचल्यावरच होणार याची सर्वांना जाणीव झाली होती, त्यामुळे डोकं भंडावून निघत होतं. चालतोय चालतोय कोळधेरच्या उत्तरेकडून पूर्वेला येऊ लागलो, राजधेर तर समोर होताच. त्या रखरखत्या उन्हात आमच्या व्यतिरिक्त दुसरं चिटपाखरूही नव्हतं, मध्ये एक दोन ठिकाणी प्राण्यांची विष्ठा दिसली पण ती ओळखण्या इतपत आमचा अभ्यास नव्हता.सावलीला एक झाड देखील नव्हतं, एकाएकी दूर सुकलेल्या झाडावर लावलेल्या छोट्या भगव्याकडे डोळे खिळले. मनुष्यप्राण्याच्या अशा खुणेमुळे जरा हायस वाटलं. पुढे जातोय तर अजून एका झाडावर भगवा दिसला, आता ही शृंखला अशीच चालू असणार अस वाटलं.
![]() |
| दुरूनच नजरेत भरलेला भगवा |
या भगव्यामुळे प्रत्येकाच्या थकल्या चेहऱ्याला एक चांगलीच उभारी मिळाली होती. वाट तर पायाखाली एकच होती आणि ती सोडली नव्हतीच कोळधेरच्या पश्चिमेकडून सुरु केलेला ट्रॅव्हर्स पश्चिमेकडून उत्तर फिरून आग्नेय दिशेला आला,एकाएकी काटेरी झुडपे गवत यांनी वाट पूर्णतः बंद झाली, त्या दोन झेंड्यांव्यतिरिक्त पुढे काही दिसल नाहीच. खाली झोपून सुद्धा तिथून जाऊ शकलो नसतो, इतकी त्या काट्याकुट्यांची दाटी होती, आता काय करावं? इथून वर आता घुसायचच, मरमर का होईना चढायचं पण मागे फिरणं नाही. सर्व जण आले, त्या झाडोऱ्यात बसण्याइतपत सावली होती, बॅग काढून चिंतातुर होऊनच विसावलो होतो. वाट पुढे नव्हतीच, पण तरी मंदार दादाने जेवढं आतापर्यंत सांगितलं होतं त्याप्रमाणे बरोबर आलो, झाडांवर झेंडे कशासाठी असणार मग, इतकी मळलेली वाट एकदम बंद कशी काय? या आणि अशा असंख्य प्रश्नांनी डोक्यात वावटळ उठवलं होतं. मंदार दादाला फोन करून सांगितलं, त्याला आम्ही कुठे आहोत हे कळत नव्हतं, नेटवर्क असल्याने गूगल मॅपच लोकेशन पाठवलं पण तरी ते देखील नीट ट्रेस होत नव्हतं, त्याच म्हणणं होत तुम्ही शिव नदी उगमस्थान आहे तिथे आहात, तिथून वाट आहे आणि खर तर घळीत आम्ही एका बाजूला होतो तर ते उगमस्थान घळ चढून पलीकडे उतरल्यावर दुसऱ्या बाजूला होतं. पण तरी मग ते थोड्या वेळापूर्वी दिसलेले झेंडे, मंदार दादाला देखील प्रश्नांची उकल होत नव्हती, त्याने देखील सांगितलं वर चढून बघा कुठे तरी वाट असणार. बॅग ठेवल्या तिथेच आणि निघालो अलंकार आणि मी एकीकडे तर सागर-प्रमोद दुसऱ्या बाजूने वाटेच्या शोधात निघालो. मी आणि अलंकार घळीच्या चढाला भिडलो खरे पण घसऱ्यामुळे चढायला जमत नव्हतं पण तिथे असलेल्या वाळलेल्या झाडांच्या फांद्यांचा आधार घेत आम्ही चाललो होतो, तिकडे सागर आणि प्रमोद जे झेंडे दिसले होते तिकडे गेले होते. इतक्यात त्या दोघांना एक वाट दिसली म्हणून त्यांनी आवाज दिला, प्रमोद त्या वाटेने वर चढत गेला, मी आणि अलंकार देखील वर चढत होतो, मी जसा वर जातोय तसा प्रमोदच्या आवाजावरून तो जवळ येत असल्याचं कळलं, अलंकारला तिथेच थांबवून प्रमोद ला पुढे वाट कुठवर जाते बघून यायला सांगितलं, मागोमाग मी देखील गेलो. पाठीवर बॅग नाही तर जाऊन पाहू शकतो उगाच माघारी फिरणं झालंच तर हा चढ बॅग घेऊन चढायची मेहनत तरी कमी होईल. वाट बारीकशी पण मळलेली होती, आणि चांगल्याच चढाची होती, घळीच्या बाजूने जाणारी वाट अलगद घळीत आली, घळ देखील अर्ध्यापर्यंत चढून बऱ्यापैकी वर आलो होतो, ही वाट नक्की असणार अशा इराद्याने मागे फिरलो, अर्ध्या वाटेत आल्यावर खालच्याना वर येण्यास सांगितल आणि आम्ही देखील बॅगा आणायला गेलो. वाटेची सुरुवात मला माहीत नव्हती, कारण मी मध्यातूनच वाटेला लागलो होतो, पण आता उतरताना जसा वाटेच्या सुरुवातीला पोचलो तेव्हा मला मघाशी ही वाट दिसल्याचे लक्षात आले, पण वाट छोटी असल्याने मी तिच्याकडे कानाडोळा केल्याचे लक्षात आले.
वाटेला लागलो असलो तरी पुढच्या टप्प्याबद्दल काहीच शाश्वती नव्हती, चढ देखील आमचा कस बघत होता, उंची गाठत असलो तरी घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत होती. मध्ये थांबायला काही जागा नाही, चढावरच कुठे सावली दिसली की तिथेच बसायचो. वेग तर पार मंदावला होता. धापा टाकत टाकत वर सरकत होतो, सागर आणि मी पुढे होतो, आकाश आणि प्रिसी आमच्या मागे तर प्रमोद अलंकार सर्वात शेवटी असे सगळे त्या चढाला भिडलो होतो, घळ लागली घळीत तर अजून बिकट अवस्था, मध्ये मध्ये सावली होती म्हणून हायस वाटत होतं. आकाश आणि प्रिसी साठी थांबावं लागलं म्हणून सागरला पुढे जायला सांगितलं. मीही थोड्यावेळात पुढे सरकलो तर एका ठिकाणी दोन वाटा फुटलेल्या असल्याने सागर तिथे थांबला होता. गूगल मॅप बघून त्याला एक दिशा दिली आणि त्याला वर पोचल्यावर सावलीत बॅग ठेऊन पाणी कुठे आहे का शोध अस सांगून मी मागे थांबलो. घळ चढून वर सपाटीला आलो, सागर ने सावली कुठे आहे ते सांगितलं, तिकडेच जाऊन विसावलो, अलंकारला इथे येण्यास जरा उशीर लागला, त्याचाच काय एकंदरीत सर्वांचाच घाम निघाला होता. वर सपाटीला आल्यावर जी वाट होती ती कोळधेर वरून राजधेरला जाणारी वाट आहे हे पक्क लक्षात आलं. मरमर करत म्हणा वा अजून काही योग्य वाटेला लागलो हे खर, आता डावीकडे राजधेर तर उजवीकडे कोळधेर, कोळधेरला जायच्या उद्देशाने उजवीकडची वाट धरून सावलीत येऊन बसलो. घड्याळात सव्वा एक वाजले होते, भूक लागली असली तरी किल्ला पाहण्याची भूक आणि वेळेत सर्व साध्य करण्याची इच्छा मोठी होती. सकाळपासूनच्या चालीत पाण्याची पातळी जास्तच खाली झाली होती, सहा जणांकडे मिळून अवघ तीन लिटर पाणी शिल्लक होतं, अरे बापरे पुढे जर पाणी मिळालं नाही तर... कोळधेर किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही हे माहीत होत, म्हणूनच हा विचार मनात आला. कोळधेर करून राजधेरकडे जाताना देखील चांगलीच चाल मारायची होती, त्यामुळे पाणी हवंच. जर कोळधेर वर पाणी नाही हे समजलं तर कोळधेर न करताच राकधेर कडे कूच करू शकतो, तिकडे पाणी आहे हे माहीत होत. मंदार दादाला फोन करून विचारलं असता त्याला नीटस आठवत नव्हतं पाणी आहे की नाही ते, ओंकार ओकला फोन केला असता त्याने पाणी आहे हे सांगितलं, पण कुठे हे त्याच्या देखील लक्षात येत नव्हतं. पाणी आहे हे मात्र तो खात्रीने बोलला होता. ब्लॉगर्स ग्रुप मधील नाशिकचे संजय अमृतकर तसेच ओंकारने दिलेल्या राजधेरवाडीतील जाधव मामांना फोन करून बघितलं पण दोघांचे फोन लागले नाही, आता ओंकार बोललाय पाणी आहे, तर जाऊया, असणार पाणी, या उद्देशाने बॅगा एका कोपऱ्यात दडवून कोळधेर कडे कूच केली.
पाठीवर वजन नसल्याने चाल जरा जोमात होती, दहाएक मिनिटांच्या चालीतच कोळधेरच्या पठारावर पोचलो, किल्ला पाहणं हे उद्दिष्ट असलं तरी आता पाणी शोधण्याला आमचं प्राधान्य होतं. वाटेला फुटलेल्या फाट्यावर आम्ही देखील दोन ग्रुप मध्ये विभागलो गेलो, एका वाटेवर मी तर एका वाटेवर बाकी सगळे चालू लागलो. फेब्रुवारी असला तरी मातीमध्ये ओल जाणवत होती, आणि त्याच्यावर आलेल्या बारीक गवताने त्या उजाड पठारावर मध्ये मध्ये हिरवाई दिसत होती. पावणेदोन वगैरे झाले होते, त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता, पठार होतं, त्यात थोडं वर आल्यावर भरपूर ढोरवाटा फुटल्या होत्या, पायाखालची वाट पकडून चाहुबाजूने नजर फिरवत चालत असताना एका दगडावर नजर गेली, त्याच्या मागे गवतात अडकलेला, उन्हामुळे रंग उडून, फाटलेला भगवा ध्वज होता, मी त्या दगडाच्या मागच्या बाजूस होतो, मागून पुढे आलो तर त्या दगडावर मारुतीची मूर्ती कोरलेली होती बाजूलाच सळई लावून एक घंटा देखील लावण्यात आली होती.
![]() |
| महाबलींच्या दर्शनाने किल्ल्यावर अवशेष आहेत याची प्रचिती आली |
किल्ल्यावर काही तरी पाहायला मिळालं याच समाधान मिळालं, बाकीचे मागे होते, त्यांना आवाज देऊन बोलावलं. उभ्या-उभ्याच मारुतीचं दर्शन घेतलं,आता आमचा मोर्चा पाण्याच्या शोधात तसेच किल्ल्यावर जायच्या बेतात होता, दोघा-दोघांच्या जोड्या विभागल्या आणि चालू लागलो. गवत हिरवं आणि मातीत ओल होती म्हणजे पाणी असणारच, अलंकार आणि मी चालत असताना एका ठिकाणी चिखल झालेलं दिसलं त्या चिखलात म्हशींच्या चालण्याने पायांचे ठसे उमटले होते, त्या ठशांमध्ये पाणी साचलं होतं, गाळ सगळा खाली थांबून नितळ पाणी होतं, पण हे पाणी काढताना जास्त हलवून जमणार नव्हतं आणि हात देखील तिथे टाकता येणार नव्हता. जवळ असलेल्या रिकाम्या बाटलीचं झाकण काढून त्या झाकणाने एक बाटली भरून घेतली.
![]() |
| म्हशींच्या पावलाचं पाणी |
इतक्यात सागर देखील तिथे आला, तिघांनी आम्ही पाणी पिऊन घेतलं, तोपर्यंत बाकीच्यांना "काहीच नाही पेक्षा काहीतरी आहे" असा निरोप देऊन पाणी मिळालंय असं सांगितलं. तरी देखील ते पुढे शोधायला गेले तोवर इकडे आम्ही आमच्या जवळ असलेल्या बाटल्या भरून घेतल्या. पुढे गेलो असता आकाश आणि प्रिसी थांबले होते, त्यांच्या पुढे एक म्हशींचा तांडा एकाच जागी भरपूर वेळ थांबून होता, तिथे बहुधा पाणी असणार, म्हणून म्हशी तिथे थांबल्यात अशी दाट शंका होती. सगळे एकत्र जमल्यावर त्या म्हशींना हाकलल तर खरंच तिथे पाण्याचं टाकं होतं परंतु म्हशी त्यात डुंबल्यामुळे वगैरे ते पाणी राखाडी काळ्या रंगाचं झाल्याने पिण्यालायक नव्हतं, त्यामानाने आम्ही जे पाणी प्यायल होतं ते किती तरी पटींनी चांगलं होतं. पुढे पाणी असेल अस काही वाटत नव्हतंच त्यामुळे ते म्हशींच्या पावलांचच पाणी आपल्याला आहे, पाणी पिऊन घेऊन आता किल्ला वर पाहूया म्हणत पाण्याच टाकं सोडलं.
किल्ल्याकडे जाणारी वाट नीट काही दिसत नव्हती त्यात आम्हाला बसलेला फेरा, चालत चालत आम्ही त्या पठाराच्या पश्चिमेला आलो, इथे समोर शिंगमाळ डोंगर आणि त्या डोंगराला ट्रॅव्हर्स मारून येणारी वाट दिसली, सकाळी याच डोंगराची धार चढत असताना कुठे चुकलो आणि त्यामुळे मूळ वाट आणि आम्ही चौऱ्याऐंशीचा फेरा मारून चाललेली वाट याच्या अंतरातील तफावत आणि आमची झालेली मरमर सार काही क्षणार्धात आठवलं. इथून पार बाफळ्या डोंगर कांचना-मंचना आणि मागचा सारा भाग दिसत होता.
![]() |
| आम्ही पकडलेली पायवाट, डांबरी रस्त्यावरील खिंड, मागे कांचना |
किल्ल्यावर जाणारी वाट दिसत नव्हतीच तरी आम्ही जिथे होतो तिथून कोळधेर च्या डाव्या बाजूला असलेल्या चढावरून वर जाऊन वर काय वाट आहे का बघून सांगतो मग तुम्ही मागून या अस म्हणून मी वर चढू लागलो, गवताची बारीक काटेरी झाड होती, त्यामुळे स्क्री वरून कसरत करून चढताना कातळाला लागलो तिथून लगेच वर चढून गेलो, चढताना चढलो, पण उतरताना काय फरफट होईल हे ध्यानात घेऊन दुसरी वाट शोधायचीच या वाटेने नाहीच उतरायचं हे ठरवून वरच्या कातळ टप्प्याला ट्रॅव्हर्स मारत उजव्या बाजूला सरकू लागलो, बाकीचे माझ्या निरोपाची वाट पाहत होते, ही वाट नाही हे निश्चित झालं होत, त्यामुळे त्यांना माझ्याच मार्गाला समांतर खालून त्या पाण्याच्या टाक्याच्या इथून यायला सांगितलं. ते दिसू लागले तसा मी वरून चालतोय, स्क्री होती, गवत होत आणि त्यात देखील चालता येईल अशी वाट होती. पाठीवर बॅग नसल्याचा फायदा जाणवत होता. कातळाला धरून चालत असताना मी थेट कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचलो, कोळधेर किल्ल्याला पायऱ्या आहेत की नाही हे देखील माहीत नव्हतं, त्यामुळे खालून पायऱ्या बघायचा प्रयत्न केलाच नव्हता, पायऱ्यांपाशी पोचलो आणि तिथून खाली जाणारी वाट देखील दिसली, या सर्वांना ही आनंदाची बातमी देऊन वर येण्यास सांगितलं, ही वाट कुठे खाली आहे माहित नाही म्हणून मी देखील थोडा खाली उतरलो.
![]() |
| कोळधेर किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या |
सर्वांना बोलवून पायऱ्यांपाशी सावलीमध्ये वाऱ्याचे झोत अंगावर घेऊन विसावलो, त्या सावलीमध्ये असताना इथून निघूच नये अशा स्थितीत सारे होतो, बाटलीतल्या पाण्याचे घोट रिचवत पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या चढून झाल्यानंतर परत घसऱ्याचा चढ लागला इथे मी, प्रमोद, सागर पुढे आलो, तर बाकीचे तिघे पायऱ्यांच्या वरच्या भागालाच थांबले. सकाळी सातला कांचना-मंचना किल्ल्यावरून निघून वाटांचा फेरा घेऊन तीनच्या ठोक्याला कोळधेर किल्ल्याच्या गुहेत आम्ही पोचलो, गुहेमध्ये खूप सारी छोटी-छोटी पाखरे लागली होती तर ताज्या संत्र्याच्या साली देखील पडल्या होत्या, जी पोर आपल्याला सकाळी कोळधेरची वाट चढताना दिसली होती, त्यांनीच ही सालं टाकली असणार असा अंदाज वर्तवला आणि अजून काही विशेषतः पाणी आहे का पाहायला निघालो.
![]() |
| कोळधेर किल्ल्यावरील गुहा आणि त्या गुहेत कोरलेली मूर्ती |
आता प्रमोद सागर गुहेच्या डावीकडे गेले तर मी उजवीकडून निघालो, गुहेच्या डावीकडे एक पाण्याच टाकं आहे व ते पूर्णतः बुजून गेलं होतं. उजवीकडची वाट धरली,सुरुवातीला स्क्री होती पुढे भरपूर सारे दगड निखळून पडल्याने वाट चांगलीच मोडली होती, त्यात मध्ये मध्ये असलेली काट्यांची झाडे पुढे जाण्यास मज्जाव करत होती. किल्ल्याच्या मागच्या बाजूस कधी पोचलो हे कळलं देखील नाही, इथून पुढे चालताना पश्चिमेस आलो, इथे एक शेंदुर लावलेला दगडाचा देव होता.
![]() |
| कोळधेर वर मागच्या बाजूला असलेला शेंदूर लावलेला देव |
मी आता मगाशी ज्या घसाऱ्याने वर आलो होतो, त्याच्या अजून वरच्या अंगाला होतो. इथून तर मला पश्चिमेकडची सातमाळा रांग छानपैकी नजरेत येत होती. इथून पुढे जायला वाटच नव्हती, पाण्याचं टाकं देखील नाही म्हणून आल्या पावली माघारी फिरताना हे तिघे पायऱ्यांपाशी थांबलेत त्यांना फोन करून जे म्हशींच्या पावलांचं पाणी होत, तिथे पाणी भरायला पाठवलं. आम्ही तिघे देखील उतरायला लागलो. या स्क्री वरून पायऱ्यापर्यंत पोचताना चांगलीच तारांबळ चालू होती, पायऱ्या उतरलो खालची वाट आता माहीत होती आणि पाणी कुठे आहे ते देखील माहीत होतं, पावलांना वेग देऊन उतार उतरून पाण्याजवळ पोचलो. आता मात्र खरी मजा होती, ज्याला जशी जागा मिळेल तशी एक एक पावलातील पाणी झाकणाने काढून जवळच्या बॉटल भरणे,त्यात महत्वाचं गाळ अजिबात वर येऊ न देणं आणि त्या चिखलात चुकून पण आपला पाय न पडणे. तोल सावरत, वेडेवाकडे बसून अर्ध्या तासात सहा-सात लिटर पाणी जमा केलं, हा वेळ घालवणं गरजेचं होतं कारण राजधेरकडे जाताना कधी पाणी मिळेल माहीत नाही, त्यामुळे सर्वांकडे पुरेस पाणी असणं गरजेचं होतं.
![]() |
| अमृत |
आता मात्र वेग घेणं गरजेचं होतं, कारण राजधेरवर जायला चाल बऱ्यापैकी होती आणि चार वाजायला आले होते, कोळधेर उतरायला सुरुवात केली, बॅगा ठेवलेल्या तिथे आलो, बॅगा उचलल्या आणि राजधेर कडे प्रस्थान केलं. पहिल्या दिवशी जी वेळ आमच्या सोबत होती आणि ठरल्या पेक्षा जास्त पुढे जाऊ हे आम्ही ठरवलं असताना ते झालं नाही आणि आज कोळधेरने उडवलेली भांबेरी, एकंदरीत या सर्वांचा विचार करून उद्या जो इंद्राई किल्ला करायचा होता तो न करता राजधेर किल्ला करूनच परतीचा प्रवास करायचा अस सर्वानुमते ठरलं, कारण प्रवास देखील लांबचा करायचा होता आणि महत्वाचं इंद्राई किल्ला देखील मोठा असल्याने धावत पळत किल्ला बघण्यात अर्थ नव्हता.
![]() |
| कोळधेर वरून राजधेर कडे जाणारी वाट |
इंद्राई जरी रद्द केला असला तरी राजधेर गाठणं गरजेचं होत, त्यात राजधेरकडे जाणारी वाट आता स्पष्ट झाली असली तरी वेळेचं गणित मात्र आमच्या हातात नव्हतं. एकंदरीतच राजधेरवर पोचायला उशीर होणार हे नक्की, पण तरी देखील कोळधेर वरून राजधेर कडे जाताना राजधेरवाडीच्या वरून वाट जाते आणि एका ठिकाणी वाटेला फाटे फुटतात खाली उतरलो तर राजधेरवाडीत आणि वर गेलो तर किल्ल्यावर. सगळे थकलेलो असल्या कारणाने आणि आपण पोचेपर्यंत अंधार होणार त्यामुळे त्या फाट्यापर्यंत जाऊनच पुढे काय करायचं हे ठरवूया अस म्हणून आता सध्याचं उद्दिष्ट तो वाटेवरचा फाटाच ठेवला,आणि चालू लागलो, कोळधेर उतरून समोरच्या पठारावर पोचलो, इथून मागे पाहिलं असता मागे असलेल्या शिंगमाळ आणि कोळधेर मधली ती खिंड दिसत होती आणि त्या खिंडीच्या पलीकडे डोके वर काढल्यासारखी कांचना, बाफळ्या, लेकुरवाळी, इखारा, धोडप ही सातमाळा रांग दिसत होती.
![]() |
| खिंडीच्या पलीकडे दिसणारे कांचन मंचना, धोडप, लेकुरवाळी |
पठारावर एक मोठं तळं होतं पण त्यातलं पाणी गढूळ असल्याकरण्याने त्याच्याकडे फिरकलो देखील नाही. इतक्यात गुरांना घेऊन आलेले एक मामा दिसले, किती तरी तासानंतर आमच्या व्यतिरिक्त नवीन व्यक्ती दिसली होती,मामांना पुढच्या वाटेबद्दल विचारलं असता त्यांनी पुढे जाऊन खाली वाडीत उतरा, तिथे माणसं भेटतील वाट दाखवायला अस सांगितलं. मामांना रामराम करून वाडीच्या दिशेने निघालो, अस वाटलं होत की इथे जवळपास वाडी असणार पण पठाराच्या कडेला आल्यानंतर कळलं की मामा राजधेरवाडीबद्दलच बोलत होते. इतका उतार उतरल्यानंतर परत चढण्यापेक्षा जी वरच्या वर वाट आहे ती पकडून जाऊया म्हणून पठाराच्या डावीकडच्या घळीत जाऊन समोरच्या छोट्या टेकाडाला वळसा मारून पलीकडे आलो असता इथे अजून एक मामा भेटले. एव्हाना घड्याळात साडेपाच वाजले होते, टप्पा बराच मारला असला तरी अजून बराच मारायचा होता,इथून राजधेरच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि नवीन बसवलेली शिडी नजरेत येत होती, पण तिथपर्यंत पोचायला अजून चांगलाच वळसा होता. मामांना पुढची वाट विचारली असता तुमच्या चालीने अजून दीड तास लागेल किल्ला चढायला असे बोलले, मामांचा दीड तास म्हणजे आमची सकाळपासून झालेली तंगडतोड बघता दोन तास लागतील अस मी सर्वांना बोललो, यावर प्रिसीने दोन नका अडीच तास पकडूया कारण माझा स्पीड तुमच्यासारखा नाही. ठीक आहे, अस म्हणून आता किल्ल्यावरच जायचं अस ठरलं, मामांनी पुढे पाणी लागेल हे सांगितलं त्या पाण्याच्या इथे जरा विसावून लगेच पुढे निघालो.
![]() |
| पाणी दिसलं की तिथून पायच हलत नसे |
दिवसभर आग ओकणाऱ्या सुर्यदेवाने देखील आता आमचा निरोप घेतला होता, पश्चिमेला त्याचा निरोपाचा सोहळा चांगलाच रंगला होता. त्याच्या रंगाविष्काराकडे बघत पुढची वाट कापत होतो, इतक्यात अजून एक मामा भेटले ते आम्हाला एक शॉर्टकट दाखवत होते, त्या शॉर्टकटला असलेला चढ बघून आणि आमची दिवसभर झालेली हालत बघून मनात धडकीच भरली, तरी देखील मामा इतक्या पोटतिडकीने सांगत होते, म्हणून न राहवून माघारी फिरून त्या मामांजवळ आलो त्यांना आमची दिवसभराची वणवण विशेषतः वाटांचा गुंता सांगितला आणि आता बर आम्हाला नवीन वाटेचा प्रयोग नाही झेपणार, चांगल्या वाटेने थोडा उशीर लागला तरी चालेल पण तीच वाट पकडू दे. मामांना निरोप दिला आणि पुढे निघालो.
![]() |
| राजधेरच्या वाटेवरील मारुतीचं स्थान |
दुरून झाडीत एक भगवा दिसला तिथे मारुती कोरलेला दगड होता, तिथे कोणीतरी ठेवलेला नारळ उचलला बाहेर येऊन त्या नारळाचा सोक्षमोक्ष लावून त्या फाट्याकडे निघालो, तो फाटा काही आता जास्त दूर नव्हता, किल्ल्यावरून उतरणारी डोकी मध्ये मध्ये दिसत होती. त्या फाट्यापर्यंत पोचलो, आम्ही आता बरोबर राजधेरवाडीच्या वर होतो, पूर्ण गाव आणि एक मोठा जलाशय आणि आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती मन प्रसन्न करत होती.
![]() |
| शेतीने समृद्ध राजधेरवाडी परिसर |
वेळ घालवून जमणार नव्हता म्हणून लगेच वर चढायला सुरुवात केली सहा वाजले होते, चढावर एका मामांनी सोबत केली ते त्यांची गुर आणायला वर चालले होते, चढ जरा दम बघणाराच होता, या चढावर अलंकारचा वेग चांगलाच मंदावला, चढ संपताना त्याच्यासाठी थांबलो असता तो बोलला माझा स्पीड आता हाच पण काय काळजी नको करूस मी येईन आपण जातोय वरती. सगळे थकलो असलो तरी सर्वांना आता चांगल्या ठिकाणीच मुक्काम करायचा होता त्यामुळे इतका चाललोय तर अजून चालूया या मतावर सर्वजण आले होते. तो उभा चढ चढायला अर्धा तास लागला होता, मध्ये एका ठिकाणी पायऱ्या देखील लागल्या, चढ चढून बसल्यानंतर वाऱ्याच्या झोतासरशी आणि समोर दिसणाऱ्या केशरी पिवळ्या छटा बघून आपणही आता आपल्या आजच्या चालीचा निरोप घ्यायला हवं अस वाटत होत.
![]() |
| सूर्यदेवाने घेतलेला आमचा निरोप |
पठारावरची हळुवार चढाची चाल चालताना बरं वाटत होतं, अलंकारचा वेग कमी झालेला म्हणून प्रमोदला त्याची बॅग घ्यायला सांगून पुढचा टप्पा गाठू लागलो. हलकी बॅग आल्यामुळे अलंकारला देखील थोडं सुखकर वाटलं होत. पठाराची बारीक चढाची चाल संपून लोखंडी जिन्याजवळ पोचलो देखील, एकंदरीत टॉर्च लावण्याची गरज भासायच्या अगोदरच आम्ही जिना गाठला होता, जिना चढलो, अगोदर जी राजधेरला शिडी होती ती ओव्हरहँग असलेली शिडी बाजूला ठेऊन हा मजबूत जीना केला होता.
![]() |
| जुनी ओव्हरहँग वाली शिडी, नवीन केलेला जिना, आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या |
या शिडीच्या अगोदर इथे प्रस्तरारोहणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लोखंडी जीना संपला आणि कातळात कोरलेल्या पायऱ्यांवर प्रवेश केला, बाजूला आधाराला काहीच नसल्याने अंधारात चालताना भीती वाटत होती, पायऱ्या चढत चढत उध्वस्त दरवाजात आणि लगेच किल्ल्यावर प्रवेश केला होता. अंग अक्षरशः घामाने निथळत होते, पाठवरची बॅग मोकळी केली आणि बाकीचे येण्याची वाट पाहू लागलो, त्या मामांनी संगीतल्यापासून बरोबर दोन तासात म्हणजे साडेसात वाजता आम्ही किल्ल्यात प्रवेश केला होता.
![]() |
| घामाने निथळणारे अंग |
सकाळी सात वाजता सोडलेला कांचना किल्ला, नंतर गाठलेली खिंड, कोळधेरचा मारलेला चौऱ्याऐंशीचा फेरा, राजधेरवाडीत जायचं की राजधेर किल्ला हा पडलेला प्रश्न या सर्वांवर मात करून रात्री साडेसात वाजता आम्ही किल्ल्याच्या प्रांगणात पोचलो होतो. सर्वजण आले, थकलो असलो तरी उत्साह होताच, प्रमोद आणि मी पाणी आहे तिकडे बघायला गेलो, एका मामांनी पाण्याची जागा सांगितली होती, तर अलंकार एका बाजूला गेला राहायचं कुठं ती जागा पाहण्यासाठी. आम्हाला पाणी मिळालं, अलंकारला मोकळी जागा मिळाली, त्या जागेवर जाऊया म्हणून तिकडे निघालो, वाटेत इतके सारे उंदीर होते की टेंट लावून सामान सर्व त्यात ठेवूया बाहेर काही सामान राहता कामा नये याची दक्षता सर्वानी घेतली होती. बेसकॅम्प सेट करून आता अंघोळीसाठी मोर्चा निघाला. काल कांचना किल्ल्यावर पाण्याअभावी अंघोळ करता आली नव्हती ती कसर इकडे भरून काढायची होती. टाक्यातील ते थंडगार पाणी अंगावर घेताना आणि त्याच वेळी येणारा वाऱ्याचा झोत सार अंग थंडीने शहारून टाकायचा. कुडकुडत कुडकुडत अंघोळ वगैरे उरकून पावले बेसकॅम्पवर आली. ट्रेक संपून पुरेपूर पाणी आणि अंघोळ हे तर झालं आता प्रश्न सोडवायचा होता तो पोटाचा. राजवाड्याच्या समोरच आम्ही आमचा कॅम्प सेट केला होता, त्या राजवाड्यात हवा लागत नव्हती म्हणून त्याच्या बाहेर राहू आणि जेवण आत बनवू असा निर्णय घेतला होता. आता बघायला आलो तर एक दोन उंदीर पळताना पाहिले आणि छतावर बॅटरी मारून बघितलं तर छतावर एक इंगळी दिसली, बास! बाहेर किती हवा लागली तरी चालेल पण रात्री इकडे फिरकण नाही आणि बाहेरच टेंट च्या जवळ गॅस पेटवून जेवण बनवायला सुरवात केली. थकवा असला तरी तो तेवढा वाटत नव्हता, चहा, सूप, बटाट्याच्या काचऱ्या,डाळ-भात, कोशिंबीर, लोणचं पापड, पोटातला बकसुर जो काय चवताळला होता त्याला शांत करण्यासाठी यज्ञात जशा समिधा टाकतो तस पोटात एक एक पदार्थ ढकलण्याच काम चालू होत, सोबतीला सुका खाऊ देखील होताच. जठराग्नी शांत केला सगळी काही आवराआवर करून शांतपणे बसून सह्याद्रीतल्या गप्पा गोष्टी सांगता सांगता आकाशाच्या छताखाली मांडलेल्या बिऱ्हाडासमोर कधी झोप लागली कळलंच नाही.
![]() |
| वाड्याची चांगल्या स्थितीतली वास्तू |
इंद्राई किल्ला पाहायचा बेत रद्द केला असल्याने राजधेरवरचा निवांतपणा खूप चांगल्या प्रकारे अनुभवता आला, झोप देखील चांगली घेऊनच सकाळी जाग आली, जाग आली पण तरी लोळण्याची मजा सगळे घेत होते, पहाटे हवेत आलेला गारवा स्लीपिंग बॅग मधून बाहेरच येऊ देत नव्हता.
![]() |
| किल्ल्यावरची हवीहवीशी वाटणारी सकाळ |
साडेसातच्या सुमारास एक माकड आमच्या बाजूला घुटमळत असलेलं पाहिलं आणि उडली ना त्रेधातिरपीट. एक आलाय म्हणजे हा सगळी टोळी घेऊनच येणार आणि त्यात आमचा हा उघड्यावर मांडलेला बिऱ्हाड, एक वस्तू जरी नेली तरी वाट. पटापट स्लीपिंग बॅग मधून बाहेर येऊन पुढच्या सगळ्या तयारीला लागलो. सकाळचा विधी, फ्रेश होऊन ते नाश्ता करेपर्यंत आळीपाळीने दोन जण फक्त माकडांवरच ठेऊन बाकीचे त्यांचा त्यांचा काम करत होते. आजचा नाश्ता हा एकदम राजस होता. चहा-बिस्कीट, मॅगी, बोंबील-भात, हे सगळं करून आळीपाळीने खाऊन त्या माकडांना हाकलवून पूर्ण पॅकअप करायला साडेनऊ झाले. या सगळ्या गडबडीत प्रमोदने त्याचं कालच ताट घासायच तसच ठेवलं होतं ते देखील माकड घेऊन गेले होते. पोटपूजा तर चांगलीच झाली होती, झोप देखील उत्तम त्यामुळे काल जरा झालेली चिडचिड आज कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हती. घरी लवकर जायचं असलं तरी किल्ला देखील आरामात पाहायचा हे देखील तितकंच महत्वाच होतं. काल किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडची वाट धरुन राजवाड्याच्या इथे मुक्काम केला होता, इथून पुढे जाऊन पार किल्ल्याच्या पूर्व टोकावर आलो, इथे लावलेले भगवे आणि खाली विस्तीर्ण पसरलेला राजधेरवाडीतील जलाशय, तेथील शेती आणि समोर असणारा इंद्राई किल्ला नाही म्हटला तरी आम्हाला खुणावू पाहत होता.
![]() |
| राजधेर वरील पूर्व टोकावरील ध्वज |
आम्ही आता किल्याच्या एकदम पूर्व टोकाला होतो आणि आम्हाला किल्ला बघत बघत पश्चिमेला जायचं होतं, एकंदरितच गडफेरी खऱ्या अर्थाने आता चालू झाली होती. इथून माघारी दरवाजापर्यंत येताना वाटेत गवत-झाडोऱ्याने भरलेले अवशेष दिसत होते, मध्ये मध्ये इकडून तिकडे पळणाऱ्या छोट्या उंदरांचे देखील दर्शन होत होते. त्या तुटक्या दरवाजापाशी आलो इथूनच काल उजवीकडे वळलो होतो, आता डावीकडचा भाग बघण्यासाठी चालू लागलो समोर आलेला कातळ त्यात असलेल्या पायऱ्यांच्या मुळे सहज चढता आला, इथे वर कातळात कोरलेली गुहा आहे, गुहा खोल असल्याने उतरायला शिडी लावली होती, एक कोणीतरी साधुबाबा इथे वास्तव्यास होते अस ऐकीव होत, त्यांचं सामान गुहेत एका बाजूला पडलं होत. गुहेच्या बाहेर वर बऱ्यापैकी जागा असल्याने ही जागा देखील आम्ही मुक्कामासाठी विचारात आणली होती. इथेच पुढे एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे.
काल एका मामांना पाण्याच विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की दरवाज्यातून डाव्या बाजूला गेल्यावर दर्गा लागेल त्या दर्ग्याच्या मागे थोडं वर चढल्यावर पाण्याचं टाकं आहे, काल काळोखात पाणी शोधताना ही घुमटाकार विहीर म्हणजे दर्गाच आहे अस मला आणि प्रमोदला वाटलं होत. मात्र आता येताना गुहेच्या खालीच कातळातील पायऱ्यांच्या अगोदर तो दर्गा दिसला होता.
![]() |
| किल्ल्यावरील दर्गा |
घुमटाकार विहिरीच्या बाजूलाच खाली पाण्याच टाकं देखील होत. या टाक्याजवळ भांडी घासून जवळच्या पाण्याच्या बॉटल भरून बॅग तिथेच एका कोपऱ्यात दडवल्या आणि पुढची गडफेरी सुरू केली. पाण्याच्या टाक्याच्या इथून पुढे गेलो आणि कातळात परत पायऱ्या लागल्या या पायऱ्या चढून समोर गेलो तर समोर एक मोठ्ठं तळं पाण्यानं तुडुंब भरलं होत.
![]() |
| पाण्याने तुडुंब भरलेलं राजधेरवरील तलाव |
काल प्रमोद आणि मी या तळ्यापर्यंत आलो होतो, पण मुद्दामून कुणालाच सांगितलं नाही, सगळे येतील तेव्हा त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे. रेखीव चिरा लावून केलेला तलाव पाहून सर्वांना त्यात उतरायचा मोह होत होता, काल का आपण त्या टाक्यातल्या पाण्यात पाणी बाहेर काढून अंघोळ केली असा रागेभरला स्वर प्रत्येकाने आम्हाला दोघांना ऐकवला. तळ्याच्या कडेलाच एका गुहेत शिवलिंग आणि नंदी होते, इथे देखील कोणीतरी एक नारळ ठेवला होता, प्रसाद म्हणून तो देखील आमच्या बॅग मध्ये टाकला आणि पुढे मार्गस्थ झालो.
![]() |
| तलावाच्या बाजूला असलेल शिवमंदिर |
तळ्याच्या पुढे आलो, किल्ल्याच्या कडेकडेने चालतोय पुढे काही असेल अस वाटत नव्हतं, म्हणून प्रमोद आणि अलंकार वरच्या बाजूला चढले तर आम्ही बाकीचे सरळ चालत पश्चिम टोक गाठलं. इथून दिसणारा सातमाळा रांगेचा पश्चिम भाग विशेषतः कोळधेर किल्ल्याला मारलेला प्रदक्षिणा मार्ग चांगलाच नजरेत भरत होता.शुक्रवार, शनिवार आणि आज उगवलेला रविवार तीन दिवसांची सारी भटकंती डोळ्यासमोर उभी राहिली.
![]() |
| राजधेरच्या पश्चिम टोकावरून दिसणारी सातमाळा रांग |
कोळधेरची प्रदक्षिणा, कांचना किल्ल्याचा वाटांचा चकवा, हंड्या-लेकुरवाळी डोंगर, इखारा सुळका, धोडप आणि त्याची खाच सार सार काही दिसत होत. नजर एकटक खिळवून बसलो असताना अचानक मागे किल्ल्याच्या वरच्या बाजूने प्रमोदचा आवाज आला आणि त्या तिथल्या विश्वात मग्न झालेले आम्ही पावले माघारी वळवून किल्ल्याच्या उर्वरित भागाकडे गेलो,आता इथे आम्ही सगळे वेगवेगळे झालो होतो. किल्ल्याच्या एकदम वरच्या भागात आल्यावर इथे एक पाण्याचं टाकं आणि तुटकी तटबंदी होती.या टाक्याच एक विशेष होतं की याच्यामध्ये एक चौकोनी दगड होता, तो का आणि कशासाठी या प्रश्नाची उकल काही झाली नाही.
![]() |
| टाक्याच्या मध्ये चौकोनी दगड |
तिथून पुढे आल्यावर पाण्याच्या अजून टाक्या आहेत तिथे आलो, काल रात्री मी आणि प्रमोद राहण्यासाठी जागा शोधत इथे या टाक्यांपर्यंत आलो होतो. आता मात्र टाक्यांच्या इथे खूप साऱ्या मधमाशा घोंगावत असलेल्या पाहून इथे थांबणं सोईस्कर नाही, आणि सर्वजण माघारी पोचून माझीच वाट पाहत असणार या विचाराने मी देखील माझी गडफेरी आवरती घेतली. आणि पहिल्या टाक्याच्या इथे जिथे बॅग ठेवल्यात तिथे पोचलो पाहतोय तर या सर्वांचा पत्ताच नाही. आता यांची वाट बघण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
टाक्याच्या बाजूला वर असलेल्या घुमटाकार विहिरीच्या एका बाजूला सावली असणार तिथे थांबण्यासाठी गेलो तर ज्या दरवाजाने रात्री किल्ल्यात प्रवेश केला आणि दरवाजात थांबलो होतो त्याच्या डाव्या बाजूला अगदी दहा फुटांवर एक विहीर देखील होती. पण ती फुटून त्यात एका झाडाने चांगलाच तग धरला होता.
![]() |
| विहिरीत उगवलेलं झाड |
इतक्यात गडावर कोण तरी येत असल्याचे आवाज येऊ लागले. सहा-सात मुला-मुलींच्या एका ग्रुपने गडावर प्रवेश केला. इतक्यात अलंकार आणि प्रमोद देखील आले, थोडा अवधी घेऊन प्रिसी, सागर, आकाश देखील आले, पाण्याच्या टाक्याच्या इथे आत ठेवलेल्या बॅग बाहेर काढल्या तो दुसरा ग्रुप देखील आमच्या इथेच आला. सर्वांसाठी कोकम सरबत बनवून थोडाफार खाऊ आणि शंकराच्या मंदिरात सापडलेल्या नारळाचा आस्वाद घेऊन, त्या ग्रुप सोबत चर्चा करून साडेबारा वाजता आम्ही राजधेर किल्ल्या वरून निरोप घेतला. कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि जिना उतरून तिथे असलेल्या गुहा बघून गावाच्या दिशेने वेग घेतला.
![]() |
| गुहेत असलेले जुन्या बांधकामाचे अवशेष |
काल दिवसभराच्या चालीमुळे किल्ला चढताना जरा श्रम लागले होते पण आत्ता काहीच वाटत नव्हते, अवघ्या तासाभरात चालत मध्ये एका झाडाखाली थोडं विसावून राजधेरवाडी जवळ केली होती. राजधेरवाडीतून चांदवड साठी दुपारी बाराची एसटी असते हे आम्हाला माहीत होतं पण किल्ला नीट पाहिल्याशिवाय खाली उतरायचं नाही त्यामुळे ही बस आपल्याला मिळणार नाही हेही तेवढेच निश्चित होतं. दीड-पावणेदोन च्या सुमारास खाली गावात आलो ओंकारने एका स्थानिकांचा नंबर दिला होता, त्यांना गाठून जायची दुसरी काय सोय आहे का बघावी म्हणून वसंत मामांच घर इतर गावकऱ्यांना विचारत गाठलं. वसंत मामा इंद्राई किल्ल्यावर दुसरा ग्रुप घेऊन गेले असल्याने त्यांची आमची भेट झाली नाही. गावात एसटीखेरीज टमटम वा दुसरं कुठलंच वाहन येत नाही हे एव्हाना माहीत झालं होतं आणि आता पुढच्या गावापर्यंत चाल मारावी लागणार हे मी पक्क केलं होत. एवढ्यात एका अंगण्यात बसलेल्या आजींनी समोर लागलेल्या टेंपो कडे बोट दाखवून तो घेऊन जातोय का विचारा, त्याच घर तिथे आत आहे, घरीच असेल तो. एक आशेचा किरण पल्लवीत झाला होता. टेंपो वाल्या दादाला विचारलं असता त्याने यायची तयारी दाखवली मात्र चांदवडला सोडायचं भाडं किती घेणार हे सर्व आल्यावर सांगतो, चला तिकडं, त्याच्या बायकोच्या हावभावावरून त्यानं जाऊ नये असच वाटत होत. तरी देखील दादांनी शर्ट चढवला आणि आले माझ्या सोबत, एव्हाना सगळी खाली उतरून गावात आली होती, येताना त्यांनी एक दुकान गाठून दुकानातून खायला चोकोबार आईस्क्रीम आणलं होतं. त्यांना टेंपो वाला आपण सगळे भेटल्यावरच भाडं सांगणार हे सांगितलं. राजधेरवाडी ते चांदवड हे अंतर अकरा किमी होतं त्या अनुषंगाने आम्ही भाडं किती सांगेल याचा अंदाज बांधून ठेवला होता, दादांनी भाडं डायरेक्ट तीनशे रुपये सांगितल्यावर काय घासाघीस करण्याचा प्रश्नच आला नाही, दादांना लगेच होकार देऊन त्यांना टेंपो काढायला सांगितलं आम्ही देखील बॅगा टेंपोत टाकून टेंपो निघाला देखील. हे सार इतक्या घाईत झालं की ट्रेक संपला म्हणून फ्रेश होऊन घामाने भिजलेले कपडे बदलावे हे सुद्धा लक्षात आलं नाही, आणि तशाच मळकट अवतारात घरी जाणार अस सर्वांना वाटू लागलं. टेंपो वाल्या दादाला मध्ये फ्रेश होण्यासाठी थांबव अस सांगितलं पण ती जागा येईपर्यंत सगळ्यांचा डोळा लागला होता.
![]() |
| टेंपोतच लागलेला डोळा |
चांदवडच्या अलीकडे इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या इथे टेंपो थांबवून आम्हाला फ्रेश व्हायला सांगितलं. अरे वा! फ्रेश होण्यासोबत अजून एक मंदिर पाहायला मिळालं हे आमच्या साठी सुखच होत. नव्याने जिर्णोद्धार केलेलं हे मंदिर पाहायला आलेल्या लोकांच्या संख्येवरून हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे याच भान आलं होत.
![]() |
| इच्छापूर्ती गणेश मंदिर |
मंदिरात एक विशेष गोष्ट नजरेस आली ती म्हणजे मंदिरात गणपतीच्या मूर्तीसमोर लोकांनी बांधलेले धागे. जास्त वेळ मंदिरात विसावून जमणार नाही म्हणून दर्शन घेऊन लगेच निघालो. निघता निघता टेंपो वाल्या दादाशी चांदवड मधल्या रेणुका माता मंदिराबद्दल विचारणा केली असता "अहो चला, रस्त्यालाच आहे, थांबतो तिथे पण". आपल्याला उशीर तर होणार नाही ना, अगोदरच भाड्याचा आकडा बघता त्याला इतका वेळ थांबवणं योग्य आहे का? बघूया थांबला तर थांबला अस म्हणून चांदवडच्या दिशेने टेंपो निघाला, आणि हायवेच्या कडेला असलेल्या मंदिराच्या इथे टेंपो थांबला देखील. जास्त उशीर करायचा नाही अस ठरवून गेलो खरे पण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच एकदम थबकायला झालं. अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिरात हायवेवरून खाली पायऱ्या उतरून मंदिरात प्रवेश करता येतो तसेच गावातून यायचं झाल्याचं पायऱ्या चढून मोठ्या दरवाजातून मंदिर प्रांगणात प्रवेश करता येतो. दरवाजाच्या बाजूला दोन दीपमाळा, तुळशी वृंदावन, होम कुंड यांनी सजलेल्या या मंदिराच्या भिंतीवर बारीक नक्षीकाम केलेलं दिसून येतं.
![]() |
| चांदवड रेणुका माता मंदिर |
पौराणिक आख्यायिकेनुसार परशुरामांनी त्यांच्या आईचा वध केल्यानंतर साडेतीन शक्तीपीठ असलेल्या माहूरला त्यांचं धड आहे तर शीर या चांदवड नगरीत, तेच हे मंदिर. देवीचं दर्शन घेऊन मंदिर परिसर न्याहाळून उसाच्या रसाचे घोट जिरवत टेंपोत येऊन चांदवड बस स्टँड कडे मार्गस्थ झालो. चांदवड नगरीत वळण्याअगोदरच हायवेला टेंपो थांबवून इथून तुम्हाला कसारा गाठणं जास्त सोईस्कर पडेल हे टेंपोवाल्या दादाने सांगितल्यावर तिथे उतरलो, तर तिथे लगेच जीप मिळाली पहिल्या दिवशी येताना जे एका गाडीत सहा जण आरामात आलो होतो तशाच जीप मध्ये आज अठरा जण बसून प्रवास करत होतो. घड्याळात तीन वाजून गेले होते, दुपारची पोटपूजा असं काहीच झालं नव्हतं त्यामुळे आता सगळ्यांचे चेहरे कासावीस झाले होते. साडेचार च्या आसपास नाशिक ला पोचून इथून आता दुसरी जीप पकडायची पटकन जाता जाता वडापाव, आकाशच्या बॅग ला लागलेली रिकामी बॉटल घेऊन त्यात ज्यूस भरून घेतलं, पेरू, द्राक्ष जे मिळेल ते घेतलं आणि गाडीत जाऊन बसलो. हे सगळं भेटल्यामुळे आता सगळे खुश कसऱ्याच्या दिशेने गाडी पण सुटली होती, सहाची ट्रेन मिळणार हाही आनंद होता आणि समोर चालू झालेले सर्वांचे बकासुर रूप. कसारा गाठलं चहा पाहिजे होता, पण थांबणं कितपत योग्य माहीत नव्हतं म्हणून चहाला तिलांजली दिली आणि स्टेशन गाठलं.
![]() |
| परतीचा प्रवास |
थोड्याच वेळात ट्रेन आली आणि ट्रेन मध्ये बसलो. जो काही सुका खाऊ होता थोडाफार त्याचा देखील फडशा पडायला घेतला. इतक्यात लक्षात आलं की अरे सकाळी थर्मास मध्ये चहा भरून ठेवलाय. जी गोष्ट मनापासून मागतो ती पूर्ण होतेच असच काहीसं माझं झालं होत.
![]() |
| सुख |
थर्मास उघडून पाहिलं तर चहा बऱ्यापैकी गरम होता, थर्मासाचे थेट घोट घेत संपूर्ण ट्रेक डोळ्यांसमोरून झरझरत गेला. इंद्राई किल्ला झाला नाही ही रुखरुख असली तरी सातमाळा रांगेतील धोडप-इखारा-कांचना-मंचना-कोळधेर-राजधेर एवढा झालेला टप्पा कायमचा आठवणीत राहिला.
तुमच्या प्रतिक्रियांशिवाय माझ्या ब्लॉगला पूर्णत्व नाही. काही चुकत असेल किंवा काही सूचना असतील त्या जरून कळवा, त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन.
समाप्त.
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.









































Great.....
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमस्त. कोळधेरला ह्या वाटेने गेलेलो नसल्याने त्या बाजूने view बघायला मिळाला. राजधेरची नवीन शिडी पण बघायला मिळाली.
ReplyDeleteधन्यवाद...मी जायच्या अगोदर तुझा ब्लॉग वाचला होता...☺️
Deleteझक्कास ब्लॉग. तांबूस गोळा, रंगांचा शिडकाव, प्रसन्नतेची लकेर, घुसाघुशी वगैरे शब्दांनी जादू केली आहे.
ReplyDeleteतुम्ही खूप मोठा पट्टा कव्हर केलात.
आम्ही जेव्हा कण्हेरा ला होतो तेव्हा पाण्याची अशीच अवस्था झालेली. आम्ही तेव्हा हिरवे पाणी प्यायलो होतो. तो रंग दिसू नये म्हणून फक्त कलरच्या बॉटल मध्येच पाणी भरले होते.
ब्लॉग मोठा झालाय. अजून पार्ट करता आले असते. आजकाल बरेचजण वाचण्याचा कंटाळा करतात त्यात आपली ऍडव्हेंचर रिलेटेड लिखाण गिर्यारोहणशी संबंधित नसलेल्या वाचकाला द्यायचा असल्यास लिखाण कमीत कमी असायला हवे. अर्थात वरील माझे मत आहे. प्रत्येकाशी लिखाणाची शैली वेगळी आहे ती त्याने त्याने जपावी.
पुढील दर्जेदार भटकंती ब्लॉग च्या प्रतीक्षेत.
धन्यवाद दादा, तुम्हा सर्वांचेच ब्लॉग वाचून शिकतोय..., यापुढे पोस्ट च्या मर्यादेवर भान ठेवेन...😊
ReplyDeleteआम्हीपण आत्ताच्या सिझन मध्ये कांचन, राजधेर, इंद्राई आणि चांदवड केला..अजून लिहिला नाहीये, लवकरच लिहीन..छान वर्णन केलंय तुम्ही प्रत्येक बारीक गोष्टीचं!!👌👌
ReplyDeleteधन्यवाद @भटका श्रेयस... तुमचा ब्लॉग देखील येऊ दे लवकर...
Delete