अखेर ओंकार ओक, स्वप्नील खोत यांसारख्या सह्याद्री पिंजून काढलेल्या दिग्गजांची मदत घेऊन दोद्धेश्वर रांगेतील बिष्टा,कऱ्हा,अजमेरा, दुंधा तर गाळणा टेकड्यांतील कंकराळा, गाळणा, सोनगीर, लळींग हे किल्ले आणि या सर्वांवर तुपाची धार म्हणून देवळाणे येथील जोगेश्वरी शिल्प मंदिर, दोद्धेश्वर मंदिर, तर झोडगे येथील माणकेश्वर मंदिर,चांदवडचं रेणुका माता मंदिर आणि मालेगावचा भुईकोट यांची भर घातली, आणि फायनल प्लॅन रेडी केला. इतक्या महिन्यांनी बाहेर पडतोय म्हणून प्लॅन जरा मोठाच बनवला होता. सुट्ट्यांचं समीकरण जुळवताना अखेर मी, अलंकार, पुष्कर, कल्पेश आणि सुशांत अशी टीम तयार झाली.कोरोनाच्या सावटामुळे आमच्या भटकंतीवर बंधने असणार होती, कारण किती काही झाले तरी आपण शहराकडचे, एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावर समोर येणारी व्यक्ती आपल्याला कशी सामोरी जाणार याबद्दल थोडे साशंकच होतो.
 |
| बिष्टा किल्ला |
इतक्या महिन्यांनी बाहेर पडत असल्यामुळे सामानावर अक्षरशः धूळ पडली होती, ती धूळ झटकत बुधवारी 2 डिसेंबरच्या रात्री बॅगेत सामान कोंबून घरातून प्रस्थान केलं. प्रस्थान केल्यानंतर देखील रवी प्रिसिलिया यांच्याकडून सामान गोळा करून रात्री सव्वा दहाच्या आसपास पनवेल सोडलं. पनवेल वरून निघून कळव्याच्या इथे सुशांतला उचलून पुढे नाशिक-सटाणा-कोटबेल असा प्रवास करून बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याशी कोटबेल गावातील राम मंदिरात पहाटे साडेचार वाजता पोचलो. सटाण्याच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला गाडी लावून काळोखात दिसणारी सातमाळा रांग नजरेत भरून घेताना मागे फेब्रुवारी मध्ये केलेला रेंज ट्रेक डोळ्यांसमोर आला. ती सातमाळा रांग न्याहाळताना मध्येच पडणाऱ्या उल्का विशेष आकर्षण ठरल्या. गावात पहाटे पोचल्यामुळे गावातल्या कुणालाही त्रास द्यायची तसदी न घेता मंदिरातच शांतपणे पथारी पसरून डोळे मिटून घेतले. जास्त नसली तरी बऱ्यापैकी थंडी जाणवत होती, आणि म्हणूनच मी आणि पुष्कर सोडून बाकीच्यांनी गाडीतच झोपायचा निर्णय घेतला.
 |
| मंदिराच्या बाजूला असलेल्या वीरगळी |
मोबाईलच्या अलार्मला दिलेला साडेसहाचा ठेका त्याने यथोचित पार केला आणि कानाजवळ किर्रर्र अशा आवाजाने साखरझोपेचा बट्ट्याबोळ करून टाकला. बाकीच्यांना देखील आवाज देऊन पुढची तयारी करायला सांगून वाट दाखवण्यासाठी अविनाश खैरनार यांच्याशी अगोदरच संपर्क केला होता, त्यांच्या दुकानात जाऊन त्यांनी सांगितलेल्या वामन दादांशी भेट घेऊन आलो. इकडे मंदिरात येईपर्यंत कल्पेशने चहा नाश्ता करून ठेवला होता,त्याचा समारोप घेऊन बॅगा पाठीला लावून वामन दादाचं घर गाठलं आणि बिष्टा किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. एक नमूद करायचं राहील या राम मंदिराजवळच रस्त्याच्या बाजूला काही विरगळी अस्थाव्यस्थ पडलेल्या दिसल्या.
 |
| धरण आणि त्याचे दरवाजे |
काही वर्षांपूर्वी ओंकार जेव्हा या किल्ल्यावर आला होता तेव्हा त्याने कोटबेल मधूनच ट्रेक सुरू केला होता, परंतु अलीकडेच काही वर्षांपूर्वी बिष्टा किल्ल्याच्या बाजूच्या डोंगरावर दत्ताच मंदिर आणि मठ झाला असल्याने किल्ल्याच्या बऱ्यापैकी पायथ्यापर्यंत गाडी रस्ता जातो, ज्याचा आम्हाला फायदा झाला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याश्या धरणाच्या अलीकडे असलेल्या धनगर वस्तीपर्यंत हा कच्चा रस्ता जातो, तिथे एका झापाच्या शेजारी गाडी लावून पावणे नऊच्या सुमारास वामन दादा पुढे आणि त्याच्यामागे आम्ही पाच जण अशी पायगाडी चालू झाली. ट्रेकच्या सुरुवातीलाच लागलेल ते छोटंसं बंधारावजा धरण, त्याचे छोटे दरवाजे आणि त्या धरणाच्या पाण्यावर आजूबाजूला बहरलेली शेती यातून मार्ग काढताना सुखकर वाटत होते. वस्ती पार करून पुढची वाट एका सुक्या ओहोळातून होती, ओहोळ जरी सुकलेला असला तरी पूर्ण वाळूने भरला होता त्यामुळे पायांचा वेग वाढवण्यास मर्यादा येत होती.
 |
| बिष्टा किल्ल्याच्या वाटेवर |
ओहोळ संपून वाट आता वर चढून एका डोंगर धारेवर आली, इथून समोर बिष्टा किल्ला तर डावीकडे दत्त मंदिर आणि मठ असलेला डोंगर दिसत होता, त्या डोंगरावरील पांढऱ्या रंगातील मंदिर आणि पत्र्याचं उभारलेलं शेड देखील ओळखू येत होतं. किल्ल्यावर जास्त लोकांचा राबता नसल्याने वाट जास्त मळलेली नव्हती, परिणामतः सुक्या गवतातून वाट काढताना माझ्या बुटांच्या जाळीतून गवतातील कुसळ माझ्या पायांना टोचत होते, आणि ट्रेक सुरू होऊन अवघ्या अर्ध्या तासातच मला पहिल्या टेकडीवर थांबून बूट काढून त्यातील कुसळ काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. बाकीच्यांना मी माझ्यासाठी न थांबता पुढे जाण्यास सांगितले. वामन दादा त्या सर्वांना घेऊन बिष्टा किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याला एका झाडाखाली सावलीत थांबले होते, तिथे पोचेपर्यंत माझे बूट परत कुसळांनी भरले होते.

एकंदरीत तो धनगरवाडा, नंतर लागलेल धरण, पुढे वाळूने भरलेली ओढ्याची वाट आणि पहिला टेपाड चढून बिष्टा किल्ल्याच्या मुख्य चढाला लागलो. वाटेवरती बऱ्यापैकी स्क्री होती आणि वाट देखील मळलेली नव्हती, फक्त वामन दादांच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही चाललो होतो. बिष्टा किल्ल्याला डाव्या बाजूने वळसा मारत वाट वर चढली,चढ बऱ्यापैकी चांगलाच होता, ही वाट पुढे बिष्टा किल्ला आणि त्याच्या बाजूच्या डोंगराच्या घळीतून जाऊ लागली.
 |
मध्ये असलेल्या निवडुंगाच्या इथे गुहा आहे, डावीकडे झाडी वाढलीय तिथे देखील गुहा आहे |
एका ठिकाणी थांबून वामन दादाने एक झाड दाखवलं, दहिखुडी अस त्या झाडाचं नाव, या झाडाचं विशेष म्हणजे दुधात या झाडाचं चीक टाकलं की थोड्याच वेळात त्याच दही बनत. सव्वा तासाच्या चालीत मुख्य वाटेच्या उजव्या बाजूच्या कातळात असलेल्या गुहेपाशी पोचलो, यातील दोन गुहा निवडुंगांनी भरलेल्या होत्या. या गुहा चढताना कातळकडा काळजीपूर्वक चढावा लागतो. या गुहांमध्ये उतरण्यासाठी इथल्याच स्थानिकांनी गुहेच्या एका भागात दगडांची रास करून पायरीसारखं करून ठेवलं आहे. गुहा पाहून परत मूळ वाटेला येऊन पुढची चाल धरली आणि साडे दहाच्या सुमारास गडावरच्या टाक्याजवळ आम्ही पोहोचलो. टाक्यातून पाणी काढण्यासाठी पोहरा ठेवला होता.

पाण्याचे घोट घेत वामन दादा आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होता, मी तोवर माझे बूट कुसळातून मोकळे करत होते. किल्ल्यावर आम्ही पोचलो होतो,किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत, त्यांचा धांडोळा घेत गडमाथा जवळ केला. गडमाथा गाठल्यावर त्या पठारावर पसरलेलं ते गवत आणि मला झालेली कुसळांची जाणीव मी गडफेरी नाही करत, तुम्हींच करून या असच काहीसं सांगत होती, पण मला तिथे थांबण्यासाठी एखादा खडक देखील नव्हता. अखेर आलिया भोगासी म्हणत वाट धरली खरी, पण जी काय वाट लागली काय सांगू? किल्ला फिरायचा आहे, गवतातल्या वास्तू शोधायच्या आहेत पण पायांना टोचणारे कुसळ पूर्ण ब्रह्मांड दाखवत होते.
 |
बिष्टा किल्ल्याच्या माथ्यावर डावीकडून मी, वामन, सुशांत, पुष्कर, कल्पेश, अलंकार |
गडाच्या उत्तर टोकावर कमी गवत आणि मोकळी जागा होती तिथे जाऊन बुड टेकवल आणि पहिला बूट-सॉक्स काढले. सुशांत मागून बोलतोय अरे माझ्या ते एक कुसळ लागलं पायाला म्हणून मी हळू चालतोय. त्याला एक टोचलाय तर अस, माझ्या इथे पन्नास-शंभर लागून पाय भरले होते अक्षरशः. गडमाथ्यावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना भारी वाटत होतं, इतक्या महिन्यांनी पुन्हा ट्रेक झाल्याचा आनंद होता. वामन दादा आजुबाजूच्या परिसराची माहिती सांगत होते. किल्ल्यावरून फोफिर डोंगर, बाजूचा दत्त मंदिर आणि मठ असलेला डोंगर, कऱ्हा किल्ला, तर पार दूरवर साल्हेर देखील नजरेच्या टप्प्यात दिसत होता. याच किल्ल्यावर येणारी बिजोटे गावातील वाट कुठून कशी येते, हे देखील वामन दादाने दाखवून दिलं.
 |
| माथ्यावरून दिसणारं दृश्य |
एखाद्या किल्ल्याला स्थानिक सोबत घेतल्याचा हा फायदा असतो, स्थानिकांशिवाय त्या परिसराची इत्यंभूत माहिती आपल्याला कोणीच नाही देऊ शकत.
आणलेल्या सुक्या खाऊ वर ताव मारत आणि माझ्या बूट आणि सॉक्समधील कुसळं काढायचा सामूहिक कार्यक्रम होऊन उर्वरीत गडफेरी करत टाक्याजवळ आलो. एक एक करून गवतात लपलेले अवशेष वामन दादा आम्हाला दाखवत होते. कुसळांमुळे इतका हैराण झालो होतो की बूट हातात घेऊनच मी गडफेरी केली, उतरताना शूज घातले खरे, पण नंतर परत सॉक्स काढून बॅगेत टाकले आणि तसाच उतरत होतो, चढताना स्क्रीवरून बऱ्यापैकी वेगात चढलो असलो तरी उतरताना आता गंमत होती. सुशांत चा वेग जरा कमी झाला होता, त्याच्यासाठी मी थांबून बाकीच्यांना पुढे जायला सांगितलं, एव्हाना मी माझ्या पायांभोवती प्लास्टिक च्या पिशव्या गुंडाळल्या होत्या😂, आणि ट्रेक करत होतो. बिष्टा किल्ला उतरून खालच्या टेपाडावर पोचून पुढे ओढ्याची वाट धरली.
 |
|
त्या ओढ्यातून येताना एका ठिकाणी बोकडांचा कळप होता, त्यातला एक जरी अंगावर आला तर आपलं काही खर नाही, त्यांना घाबरत घाबरत पुढे आलो. हे सर्व जण धरणाच्या अलीकडे फ्रेश होऊन थांबले होते. तिथून लगोलग निघून गाडीजवळ आलो आणि कोटबेल गाव जवळ केलं. येताना वाटेत एका ठिकाणी पत्र्याची शेड केलेलं मारुतीचं मंदिर लागलं, या मारुतीला लावलेले रंग खास आकर्षित करत होते, थांबून त्याचा फोटो काढला. साधारणत: देवापुढे नारळ ठेवला जातो, पण इथे कांदे ठेवले होते.
कोटबेल गावात पोचलो, वामन दादांची बिदागी दिली आणि ज्या अविनाश दादांशी संपर्क होऊन त्यांनी आमच्यासोबत वामन दादांना पाठवलं होतं त्यांचे सुद्धा आभार मानून कोटबेल गावाचा निरोप घेतला. घडाळ्यात एक वाजले होते, पद्धतशीर जेवायची वेळ झाली होती. कऱ्हा किल्ल्याचा पायथा असलेल्या कोळीपाड्याच्या पुढे दोधेश्वर मंदिर गाठून दुपारची पोटपूजा आटोपली.
 |
| दोधेश्वर मंदिर,बाहेरील गोमुख असलेली पुष्करणी, शंकराची पिंडी व नंदी |
या मंदिराच्या नावावरूनच या रांगेला दोधेश्वर हे नाव पडलं आहे. मंदिराचा परिसर एकदम आल्हाददायक होता. मंदिराच्या खांबावरून मंदिर पुरातन असल्याची खात्री पटत असली तरी त्याचा जीर्णोद्धार करून त्याला नवीन साज चढवला होता जो की आपल्या डोळ्यांना कधीच आवडत नाही. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना मोठ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर सुरुवातीला नंदीसाठी वेगळं मंदिर उभारलं आहे. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या आवारात एक साधू महाराज वास्तव्यास होते. मंदिराच्या बाहेर एक गोमुख असलेली पुष्करणी आणि बाजूला शंकराची पिंडी आणि नंदीदेखील आहे. इथेच एक पडी मारावी असा मनात आलेला विचार मनातच ठेवून गाडी कऱ्हा किल्ल्याच्या दिशेने पळवली.
 |
| कऱ्हा किल्ला |
कोळीपाडा गावाच्या इथे असलेल्या डॅमच्या कडेनेच कऱ्हा किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी जाते. तिथे भेटलेल्या एका गावकऱ्याकडून वाट समजून घेऊन किल्ल्याची वाट धरली. ढोरवाटा भरपूर फुटल्या असल्या कारणाने योग्य वाट कोणती हे निश्चित करणे अवघड असल्याने नकाशाच्या आधारे वर जायची दिशा ठरवून मार्गक्रमण चालू होते. ट्रेकक्षितिज संस्थेचे यासाठी खास आभार कारण त्यांनी http://trekshitiz.com/ या संकेतस्थळाद्वारे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहीत आणि नकाशे तमाम भटक्यांसाठी उपलब्ध करून दिले, आनंद पाळंदे यांच्या डोंगरयात्रा तसेच सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकांची देखील मदत होते.  |
| वाटेत लागलेल्या पायऱ्या,तटबंदी, पडकी गुहा |
अर्धा तास पायपीट करतोय पण गडाचं गडपण दाखवणारी एकही वास्तू नजरेस पडत नसल्याने बरोबर वाटेवर आहोत की नाही याबद्दल साशंकच होतो, त्यामुळे मी वेगळ्या वाटेने आणि बाकीचे वेगळ्या वाटेने चालले होते. नकाशा हातात घेऊन ट्रेक करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नकाशावरील प्रत्येक वास्तू डोळ्यांखालून घातलीच पाहिजे अस आमचं एकमत झालं होतं.या सर्वांना वाट चढताना एका ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या आणि एकंदरीतच योग्य वाटेवर असल्याची पुष्टी देखील झाली,नकाशातील पहिली गडवास्तू दिसल्याचा आनंद काही वेगळाच होता. थोडेच वर गेल्यावर तटबंदी आणि पुढे पुन्हा पायऱ्या आणि परत एक तुटलेली गुहा अशी मालिकाच चालू झाली. मी देखील आता त्याच वाटेवरून एक एक अवशेषांचे फोटो काढत पुढे पाय रेटत होतो. इतिहासाच्या पाऊलखुणांची नोंद घेता घेता पायथ्यापासून तासाभराच्या चालीत गडमाथा गाठला देखील.
 |
| भवानी माता मंदीर |
माथ्यावर भवानीमातेचं नव्यानं बांधलेलं मंदिर आहे, बाजूलाच असलेल्या कठड्यावर बॅग मोकळी करून वारा अनुभवण्यात वेगळीच मजा होती.
 |
| मंदीरामागील पाण्याची टाकी |
मंदिराच्या मागेच दोन पाण्याची टाकी आहेत त्यातली एका टाक्यात पाणवनस्पतींची दाटी झाली होती तर दुसऱ्या टाक्यातील पाणी स्वच्छ आणि थंडगार होतं, फक्त त्यातून पाणी काढताना कसरत करावी लागत होती. टाक्यांच्या इथून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकापाशी पोहोचतो,इथे खाली गुहा आहेत असं वाचनात आलं होतं पण तो कातळ उतरण्यासाठी प्रस्तरारोहणाचं साहित्य असणं आवश्यक आहे. माथ्यावरून दिसणारा फोफिर डोंगर लक्षवेधी होता तर अजमेरा आणि बिष्टा हे किल्ले देखील माना काढून आपली ओळख पटवत होते. बाकी दिसणाऱ्या डोंगरांची नाव माहीत नसली तरी नजरेच्या टप्प्यात होती. माघारी येऊन टाक्यांपाशी येऊन पडी मारली, अन त्या भर्राट वाऱ्याच्या झोकात कधी डोळा लागला कळलंच नाही. अलंकार ने आवाज देऊन जागं केलं खर पण ते जे काही मिनिटांचं सुख होत अगदी अवर्णनीय!
आंतरजालावरून प्रत्येक किल्ल्याची माहिती मिळते, त्या त्या किल्ल्यावर जाऊन ती माहिती वाचून इतिहासात डोकावण्याचा थोडाफार प्रयत्न आम्ही करत असतो, मंदिरापाशी येऊन इथे देखील माहिती वाचन केलं असता एक टाकं आपल्याला दिसलं नाही याची रुखरुख लागली आणि आता गडउतार व्हायच्या अगोदर ते टाकं बघायचं ठरवलं. तोवर मंदिराच्या इथेच बसून आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवून घेण्याची जणू स्पर्धाच लागली होती, मंदिरातील देवीच्या जवळ ठेवलेला नारळ फोडून त्याला आमच्या पोटात स्थान दिलं होतं. घडाळ्यात पाहिलं तर काटा साडेपाच वर आला होता, आता मात्र निघायला हवं म्हणत शूजच्या लेस आवळल्या आणि परतीच्या वाटेवर लागलो. आता पहिला वेध होते ते न पाहिलेला टाका पाहण्याचे, मंदिराजवळून उतरताना आता उतरायची योग्य वाट गवसल्यामुळे ते पाण्याचं टाकं देखील लगेच दिसलं, हे टाकं देखील पाणवनस्पतींनी पूर्ण भरलं होत. संध्याकाळ झाली होती आणि योग्य वाटेवर लागलो होतो त्यामुळे पायांनी आपसूकच वेग घेतला होता, वेळेच्या बाबतीत काटेकोर चालत असल्याने खाली असणारा जलाशय आम्हाला आता खुणावत होता.
 |
| मावळतीच्या रंगानी न्हाऊन निघालेला जलाशय आणि आजूबाजूचा परिसर |
आज मस्त अंघोळ मिळणार या विचारानेच मन प्रसन्न होत होत. उतरत असताना एक दगड बघून पाय स्थिरावले, त्या दगडावर कोरीव काम केलेलं दिसत होतं, विशेषतः त्यातील गणपतीची प्रतिमा नीट स्पष्ट होत होती, इतर बाजूच्या प्रतिमा नीट ओळखू येत नव्हत्या. इतकी वर्षे ऊन वारा पाऊस झेलल्याने साहजिकच त्या अस्पष्ट झाल्या होत्या पण अशा पुरातन अवशेषांचे योग्य रीतीने जतन आणि संवर्धन होणे गरजेचं आहे. तिथे दरवाजा असावा आणि त्यातीलच ते एक शिल्प आहे हे घरी आल्यानंतर कळलं होतं. पश्चिमेला आता रंग सोहळा सुरू झाला होता. भास्कररावांची आणि निळ्या नभाची अशी काही मैफिल भरली होती की ते रंग डोळ्यात साठवत पायांनी असा काही फेर धरला की थांबायला डायरेक्ट खालच्या त्या धरणाचा आधार घ्यावा लागला. अंगावर शिरशिरी आणणाऱ्या गार पाण्याचा स्पर्श झाल्यावर दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळाला. शक्तीचा तो स्रोत जरी दिसेनासा झाला असला तरी त्याच्या रंगरूपी संवेदना सर्व चराचराला घराकडे परतण्याचा इशारा देत होता.
 |
| रंगोत्सव |
आम्ही देखील आमची अंघोळ आटोपून गाडीत बसलो आणि थर्मास मध्ये आणलेल्या चहाचे घोट घेत मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झालो. आजचा मुक्काम हा अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पहाडेश्वर मंदिरात होता. मंदिराजवळ पोचून तिथे असणाऱ्या दत्ता भामरे यांच्याशी बोलून मंदिरात आमचा डेरा टाकला.
रात्रभर केलेला पनवेल ते कोटबेल प्रवास, कुसळांमुळे कायम लक्षात राहिलेला बिष्टा किल्ला, दोधेश्वर मंदिर, कऱ्हा किल्ला आणि मावळत्या दिनकराच्या साक्षीने धरणात केलेली अंघोळ आणि पहाडेश्वर मंदिरात येऊन ट्रेकच्या पहिल्या दिवसाची योग्य प्रकारे सांगता झाली होती.
क्रमशः
फोटो सौजन्य : अलंकार म्हात्रे, पुष्कर घरत, विशाल पाटील
तुमच्या प्रतिक्रियांशिवाय माझ्या ब्लॉगला पूर्णत्व नाही. काही चुकत असेल किंवा काही सूचना असतील त्या जरून कळवा, त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन.
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या
(विशाल पाटील)
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.
छान लिहितोस.
ReplyDeleteनारीक सारीक निरीक्षण उत्तम टिपली आहेत, जसे मारुतीपुढे ठेवलेले कांदे, वाटेतील शिळेवरील गणपतीचा आकार ई. आणि, देवीपुढील नारळ खाऊन त्याला पोटात स्थान दिले, हे वाचले आणि लिखाणात प्रांजळपणाही आहे हेही जाणवले.
-- धनंजय मदन
भटकंती तर छानच पण लिखाण तितकेच सुंदर.
ReplyDeleteनेहमप्रमाणेच खूपच सुंदर वर्णन केलं आहेस, अप्रतिम. ट्रेक ला नसलो तरी प्रत्यक्षपणे आपणच ट्रेक ला आहोत याचा भास होतो, उत्तम शब्दरचना आणि मांडणी, keep it up.
ReplyDeleteमस्त विशाल पुन्हा ट्रेक सुरू झाला, अगदी गवताच कुशळ ही पुन्हा टोचल😁
ReplyDeleteउत्तम ..💝
ReplyDeleteसुंदर लिखाण.प्रत्यक्ष तुझ्या सोबत असल्याचा प्रत्यय आला. तुझे पुढील blog वाचायला नक्कीच आवडेल.
ReplyDeleteछान लिहिलंय. प्रत्यक्ष ट्रेक ला जाऊन आल्याची अनुभुती आली..
ReplyDelete👌❤️ खूप छान वाटल वाचून...
ReplyDelete