दिवस दुसरा
पहिल्या दिवसाची सांगता योग्य वेळेत झाली होती, मुक्कामासाठी निवडलेली जागा देखील उत्तम होती. पहाडेश्वर मंदिर आणि वनराईने नटलेला आजुबाजूचा परिसर आणि हवेतील गारवा यामुळे रात्रीची जेवणं उरकून कधी स्लीपिंग बॅग मध्ये गेलो ते समजलच नाही. पहाटे लवकर उठून चहा नाश्ता उरकून घेतला. पहाडेश्वर मंदिराच्या पुढे एक मारुती मंदिर होत यात मारुती समोर नंदी आणि कासव होते परंतु शंकराची पिंडी कुठे नजरेस आली नाही, हे अस पहिल्यांदाच पाहण्यात आलं होतं. आजच्या दिवसाचं गणित जरा मोठं असल्याने सकाळी सात वाजताच ट्रेक ची सुरुवात झाली.
![]() |
| पहाडेश्वर मंदिर आणि मागे अजमेरा किल्ला |
![]() |
| माऊली |
पहाडेश्वर मंदिराच्या बाजूनेच अजमेरा किल्ला डावीकडे ठेवत सरळ चालत जाणारी वाट गडाकडे जाते. पण स्थानिक लोक त्यांच्या सोईनुसार पहाडेश्वर मंदिराच्या इथूनच सरळ वर चढतात, आम्हाला देखील तिथल्या स्थानिकांनी ती वाट सांगितली परंतु आम्ही आपले मुख्य वाटेनेच जायचं ठरवलं. अजमेरा किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालत पंधरा मिनिटांच्या चालीने एका शेंदूर लावलेल्या मोठ्या दगडापाशी आलो याला माऊली म्हणतात,असं वाचनात आले होतं, याच्यासाठी पत्र्याचं शेड देखील उभारलं आहे, तसेच इथे खडकावर त्रिशुळ देखील दिसून येतो.
![]() |
| अजमेरा किल्ल्याच्या वाटेवर |
माऊलीच्या स्थानापासून पुढची वाट झाडीत शिरते, इथे देखील वाटेवर राबता नसल्याने गवताच रान माजलं होतं, दगडांची शाकारणी केली असली तरी गवत होतंच, परिणामतः माझा आणि कुसळांचा सामना आज देखील रंगणार याची पुरती जाणीव मला झाली होती. वाट नीट समजत नसल्याने अलंकार सुशांत कड्याच्या बाजूने तर पुष्कर कल्पेश झाडीतून वाट काढत चालले होते, तर मी आपला मागे कुसळं काढत ज्यांची वाट योग्य असेल त्यांच्या दिशेने जाऊ अस ठरवून हळू हळू चालत होतो. पुष्कर ने वाट असल्याची पुष्टी दिली आणि मी तिकडे निघालो, तर इकडे अलंकार कड्याला भिडतच वर चढला, त्याच्या मागावर सुशांत देखील तिकडूनच वर चढला. मी पुष्कर आमची वाट अजमेरा किल्ला आणि बाजूच्या डोंगऱ्या देवाच्या डोंगराच्या घळीतून वर सरकत मोकळ्या पठारावर पोचली. पाऊण तासात एवढा पल्ला गाठला होता. बऱ्यापैकी चढ संपला असला तरी माथा गाठला नव्हता आणि आता वाट देखील नीट दिसत नसल्याने त्या गवतातून वाट काढत हळू हळू वर चढत होतो. सुकलेलं गवत आणी घसारा यामुळे चढण्यापेक्षा उतरताना काय होईल याचे विचार येत होते. वाट चढताना समोर काही तटबंदीचे अवशेष समोर आले, एकंदरीत गडावर आमचा प्रवेश झाला होता. समोर दिसणाऱ्या टेपाडावर न जाता त्याला डाव्या बाजूने वळसा मारून पुढे गेलो असता समोर भगवा ध्वज फडकताना दिसला. पावले आपोआप झेंड्याच्या दिशेने वळली, झेंड्याच्या अगोदर डाव्या बाजूला खाली एक सुकलेला तलाव दृष्टीस पडला. तसाच पुढे जाऊन झेंड्याच्या इथे गेल्यावर तिथे शिव मंदिर असल्याच्या खुणा स्पष्ट होत होत्या. उघड्यावर असलेला नंदी समोर शंकराची पिंडी त्यावर वेटोळे घालून लावलेला तांब्याचा नाग आणि वर अभिषेकासाठी अडकवलेला तांब्या आणि ध्वजाला लावलेल्या काही घंटा आणि पिंडीच्या आजूबाजूला पसरलेली धोत्र्याची फळे हे सार पाहून मन चलबिचल झाले. कधी काळी या मंदिराचा काय रुबाब असेल आणि आता काय परिस्थिती आहे.
![]() |
| शिवाचं स्थान |
![]() |
| भग्न जात्यासदृश्य अवशेष |
ज्या उंचावट्याला वळसा घातला होता त्याच भागावर अगोदर जाऊ म्हणत वाट उजवीकडे वळवली हा किल्ल्याचा पश्चिम भाग होता. येथे झुडुपांमध्ये काही जुने अवशेष लपलेले दिसत होते गवतात एका ठिकाणी भंग झालेल्या जात्याचे तुकडे देखील नजरेस दिसले. गडमाथा छोटा असल्याने गडफेरी लवकर होणार हे साहजिकच होतं, किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाताना दोन टाकी लागतात. लांबवर पसरलेलं किल्ल्याच पठार, सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे पिवळट सोनेरी रंगाच दिसणार सुकलेल गवत, आणि वर पसरलेली निळ्याशार आकाशाची छटा आणि या सर्वात ते पाण्याने भरलेलं टाकं यामुळे नेत्रकमळ सुखावून जात होते. दुरून दिसणाऱ्या या अशा नजाऱ्यामुळे कधी पावले त्या पाण्याच्या टाक्याजवळ पोचली आणि त्या पाण्याचे घोट घशाखाली उतरवले हे आता इथे मांडता देखील येत नाही.
![]() |
| किल्ल्यावरील पाण्याचं एकमेव टाकं |
इथे दोन टाकी आहेत, परंतु एक बुजलेल आहे. इथूनच पुढे असणाऱ्या किल्ल्याच्या दक्षिण टोकाच्या उंचवट्यावर भगवा ध्वज फडकताना दिसत होता, त्याच्याकडे मोर्चा वळवला. त्या ध्वजाची जागा ही अजमेरा किल्ल्यावरील सर्वात उंच जागा होती, इथून सरळ खाली पाहिले असता पहाडेश्वर मंदिर दिसत होतं, याच घसाऱ्यावरून गावातील लोक येतात. वातावरण एकदम मोकळं नसलं तरी बऱ्यापैकी दूरवरचे डोंगर नजरेत येत होते. काल केलेले बिष्टा, कऱ्हा हे किल्ले आणि फोफिर डोंगर एवढेच काय ते ओळखू येत होते.
![]() |
| अजमेरा माथा |
माझ्या पायातील शूज सॉक्स एव्हाना निघाले होते, कारण पूर्ण गवतातून चालताना कुसळांमुळे आज देखील माझा पुरता सत्कार समारंभ झाला होता. बाजूला असणाऱ्या एका झाडाखाली जरा विश्रांती साठी थांबलो. झाडाची पडलेली थंडगार सावली आणि उंचवट्यावर असल्यामुळे वाऱ्याचा आवेग असा काही होता की बस्स! पूर्ण किल्ल्यावर आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हत, त्यामुळे आणखीनच भारी वाटत होतं. सकाळी नाश्ता केला असला तरी आता परत आतड्यांना शांत करण्यासाठी गुळ-शेंगदाणे, संत्री, खजूर यांची आहुती दिली.
वातावरणातील प्रसन्नता अगदी मनाला मोहून टाकणारी होती, त्यात अजून भर म्हणून लता दिदींच्या आवाजातील रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा हे गीत मोबाईलवर लावलं आणि त्या गीतात इतकं गुरफटून गेलो की हातात बूट घेऊन कुसळ काढतोय आणि त्या गीतपंक्ती गुणगुणतोय आणि हे सर्व पुष्कर ने मोबाईल मध्ये शूट केलं.
त्या गार वाऱ्याचे झोत, आणि ती सावली तिथून हलू देत नव्हती, पण पुढचा सारा टप्पा लक्षात घेता पाय काढणं जरुरी होतं. किल्ल्याच्या पूर्वेकडे जाताना अजून एक कोरडं तलाव लागलं. गडफेरी आता झाली होती. उतरताना पुन्हा आलो त्याच वाटेने उतरण्यापेक्षा आता असलेल्या पूर्व टोकावरून खाली वाट उतरत असल्याचं दिसलं तीच वाट धरून स्क्री वरून चालत अर्ध्या पाऊण तासात पहाडेश्वर मंदिरात पोचलो देखील. स्क्री असली तरी कुसळं नव्हती त्यामुळे मला ही वाट विशेष आवडली. साडेतीन तासात पूर्ण गडदर्शन झालं होतं. मंदिराच्या आवारात जाऊन दत्तू दादांचे आभार मानून गाडीत बसलो आणि आता पुढचा टप्पा देवळाने येथील जोगेश्वरी शिल्प मंदिर.
पहाडेश्वर पासून देवळाने गाव आठ किलोमीटर अंतरावर, गावात पोचून मंदिराचं ठिकाण विचारून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. तेराव्या शतकातील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली, त्यातीलच हे एक मंदिर.
![]() |
| जोगेश्वरी शिल्प मंदिर,देवळाणे |
महाराष्ट्रातील खजुराहो अशी या मंदिराची ओळख आहे. कळसाचं नंतर पुन्हा बांधकाम करून त्याला शेंद्री पिवळ्या रंगाने रंगवला आहे. आपला पुरातन ठेवा खूप दिवसांनी पाहताना अगदी स्तिमित व्हायला होत होतं. सुरुवातीला मंदिराच्या बाहेर बसूनच मंदिराची बाह्यरचना बघत होतो. मैथुनशिल्पे, नागशिल्पे, मकरशिल्प, भार पेलणारे यक्ष, कृष्ण-गोपिका मिलाप, वाद्य वाजवणारे वाजंत्री, शंकर पार्वती, गणपती, खांबांची नक्षीदार रचना, अंतराळ, सभामंडप,गर्भगृह,उप गर्भगृह या सर्वांवर अक्षरशः बारीक आणि नक्षीदार कलाकुसरीची रेलचेल होती. सभामंडपात कोरलेला सारीपाटाचा खेळ असो, युद्धाचे प्रसंग असो किंवा पाना-फुलांचे अथवा भौमितिक नक्षीकाम सार काही अद्भुत आणि विलोभनीय.
![]() |
| १.मकरशिल्प २.कृष्ण आणि गोपिका ३.मैथुनशिल्प ४.मैथुनशिल्प आणि नागशिल्प |
![]() |
| नक्षीदार काम |
या मंदिराच्या साऱ्या रचनेवर बोलताना एक पूर्ण ब्लॉग होईल. याच मंदिरावरील दुर्गविहारी यांची एक अभ्यासपूर्ण पोस्ट वाचनात आली होती ती या दुव्यावर वाचा
बारा वाजून गेले होते, आता पुढचं ठिकाण होतं दुंधा किल्ला. आठ किमी च्या रस्त्याऐवजी गुगल मॅप ने दाखवलेला चार किमीचा शॉर्टकट घेतला आणि लागलेल्या कच्च्या रस्त्याने जे काय बारा वाजवले की बास. रस्ता संपता संपत नव्हता, मध्ये कुणाला वाटेत विचारायला चिटपाखरूही नव्हतं. एका ठिकाणी एक घर लागलं तिथे विचारलं असता त्यांनी समोरच असलेला दुंधा किल्ला दाखवला, ही किल्ल्याची वायव्य बाजू होती. या बाजूने देखील किल्ल्यावर चढायला वाट आहे हे तेथील माणसांकडून कळलं. परंतु मी या वाटेने जायचं नाकारलं आणि त्यांना दुंधेश्वर महाराजांच्या मठाकडून जाणारी वाट कुठे आहे हे विचारला.
![]() |
| रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीरगळी |
किल्ल्याला अर्धा वळसा मारून तिकडे रस्ता जातो हे त्यांनी सांगितलं आणि पुढच्या दहा मिनिटात मठाच्या जवळ होतो. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक एक वीरगळ ठेवली होती, अस दोन ठिकाणी होतं. मठाजवळ अंगणात कुठली तरी फळे ठेवली होती, विचारलं असता समजलं की ती गोरखचिंचेची फळं आहेत, त्याच्यापुढे असंही आम्हाला सांगितलं की किल्ल्यावरच्या झाडावरची फळे काढू नका ती कच्ची आहेत. मठाजवळ थांबून कलिंगडावर यथेच्छ ताव मारून किल्ल्याची वाट धरली.
![]() |
| पायऱ्या |
झाडीतून जाणारी वाट भर दुपारच्या उन्हातून चालताना उन्हाची झळ लागू देत नव्हती, दहा मिनिटांच्या चालीने कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी आलो इथे कातळाला बोल्ट मारून आधारासाठी साखळ्या लावलेल्या होत्या. एक वाजता चालू केलेली चढाई वीसेक मिनिटात गडावरील महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन आली. इथे मंदिराच्या बाहेर पितळेच्या आवरणाने वेष्टित नंदी होता बाहेर घंटा देखील लावलेल्या होत्या, तर मागे मोठं गोरखचिंचेचं झाड होतं.
![]() |
| शंकराचं मंदिर बाहेर नंदी, भांडी घासायचं टाकं |
![]() |
| किल्ल्यावरील घर |
मंदिराच्या उजवीकडेच एक मठ होता. भामेश्वर महाराज मठ अस त्या मठाचं नाव, त्या मठात आता कोणी राहत नाही, परंतु येथे राहणाऱ्यांनी त्यांच्या सोईनुसार पाण्याच्या टाक्यांना नावे दिली होती. मंदिराच्या मागे एक टाकं होत ते भांडी घासायच टाकं. हे सगळं पाहून उजवीकडून गडफेरी करायला सुरुवात केली. निवडुंगाच्या झाडाचं अक्षरशः जंगल झालं होतं. बारा-पंधरा फूट उंच आणि तेवढ्याच घेऱ्याने निवडुंगाची झाडे वाढल्याने काही ठिकाणी जायला देखील रस्ता नव्हता. पुढे एक घर लागलं. घराच्या इथून पुढे जाताना एका ठिकाणी अर्धवट टाक्यासारखं काहीतरी कातळात खोदलेल दिसलं.
![]() |
| अर्धवट सोडलेलं टाकं |
इथून पुढे येऊन आम्ही किल्ल्याच्या वायव्य टोकाला पोचलो. तासाभरापूर्वी ज्या घराच्या इथे आम्ही किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेबद्दल विचारलं होत, ते घर आम्हाला दिसत होतं.
![]() |
| दुंधा किल्ल्यावरून दिसणारा परिसर |
इथेच पुढे खाली उतरणाऱ्या पायऱ्या देखील लागल्या, बहुधा ती माणसे जी वाट सांगत होते त्याच या पायऱ्या असाव्यात आणि ही वाट आता खालीच उतरते अस समजून आम्ही परत माघारी वळून त्या मंदिराजवळून डावी कडे जाऊ म्हणत मंदिरापाशी आलो. तर तिथे आम्ही ज्या घरात विचारलं होत तिथला एक वीस-बावीशीच्या आसपासचा मुलगा आणि त्यांच्या घरात काम करणारा गडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात कामानिमित्त आले होते, तर तिथून आम्हाला गड दाखवण्यासाठी म्हणून खास वर आले होते, अशी माणसे भेटणे म्हणजे भाग्यच! गडावर निवडुंग इतकं वाढलं होत आणि वाटा काही कळत नसल्यामुळे इथे काही आपल्याला दिसेल की नाही ही जी काही शंका होती ती या दोघांच्या येण्याने नाहीशी झाली होती. त्या मुलाच नाव सुनील, सुनीलने गड फेरी करताना सुरुवातीलाच गोरखचिंचेच्या झाडाची फळे दाखवत ही औषधासाठी वापरात डायरेक्ट खात नाहीत असं सांगून पुष्करने जो काही ही फळे काढायचीच असा निश्चय केला होता तो हाणून पाडला.
आता आमचा म्होरक्या सुनील असल्याने त्याच्या पावलांकडे लक्ष देत आम्ही पुढची वाट काढत होतो, वाट कुठून कशी निघते कुठे शिरते काही कळत नव्हतं.
![]() |
| अंघोळीचं टाकं |
पाच सात मिनिटात आम्ही अंघोळीच्या टाक्यापाशी पोहोचलो. तोंडावर पाण्याचा हबकारा मारून तसाच पुढे चालू लागलो, एका ठिकाणी खाली उतरून पुढे जायचं होतं. गवत वाळलेलं असल्याने पाय थांबायचं नावच घेत नव्हते त्यामुळे जपुन सावरत तिथून उतरत किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या शेवाळी टाक्याजवळ पोचलो, खाली पाणी नितळ असलं तरी वर पूर्ण शेवाळीचा थर जमा झाला होता. कितीही पाऊस पडला, टाकं उलटून वाहू लागल तरी यात शेवाळ येतेच, इति: सुनील.
![]() |
| शेवाळी टाकं |
शेवाळी टाक्याच्या पुढून वाट किल्ल्याच्या मागच्या पायऱ्यांपाशी आली ज्या पायऱ्या बघून आम्ही माघारी फिरलो होतो. हीच वाट खाली उतरते अस म्हणत त्या काही पायऱ्या खाली उतरलो तिथे निवडुंगाने गिळंकृत केलेल्या एका चौथऱ्याचे अवशेष दिसले. पुन्हा मूळ मार्गावर येऊन सुनील खाली उतरला आणि आम्हाला देखील बोलवलं, तिथं होती थंडगार पाण्याने भरलेली जोडटाकी नाव देव टाकं/पिण्याच्या पाण्याचं टाकं.
![]() |
| देव टाकं /पिण्याच्या पाण्याचं टाकं |
याच टाक्याच्या वरून आम्ही मघाशी माघारी फिरून गेलो होतो. त्या थंडगार पाण्याच्या इथे जरा विसावून थोडाफार सुका खाऊ पोटात ढकलून पुढची गडफेरी आटोपून महादेव मंदिरापाशी आलो. सुनीलचे मनोमन आभार मानून त्याला काही देण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्याला सपशेल नकार दिला. इतक्या लांबून तुम्ही आमचा किल्ला बघायला आलात मग तो दाखवायचे कसले पैसे, उलट आम्हाला भारी वाटतय की इतक्या लांबून कोणी तरी येतंय इकडे.
![]() |
| सुनील सोबत |
सुनील ला तिथेच निरोप देऊन त्याला त्याच्या स्पीड ने पुढे व्हायला सांगितलं आणि आम्ही त्याच्या मागून आमची पायगाडी पिटाळली. पायऱ्यांच्या इथे एका ठिकाणी असलेली गुहा माझ्या नजरेस आली नव्हती ती गुहा पाहून पावले विसावली ती थेट गाडीजवळच. लिंबू सरबताच्या घोटांनी घसा ओला करून मठाच्या बाजूला असलेली अष्टकोनी विहिर बघून सव्वातीन वाजता दुंधा किल्ल्याला पाठमोरा होऊन कंकराळा किल्ल्याच्या मार्गाने रवाना झालो.
![]() |
| अष्टकोनी विहीर |
रावळगाव, अजेंग असा कंक्राळा किल्ल्याच्या दिशेने प्रवास करताना रावळगाव मध्ये खाल्लेले खव्याने भरलेले आणि तुपात तळलेले गोड समोसे खाताना मजा आली. विशेष म्हणजे तो समोसा तोंडात टाकून चावताना तुपाची धार अशी काही रेळायची की त्या आतल्या सारणातील खव्यावर जणू तुपाचा अभिषेक होतोय आणि ते सारं तोंडात विरघळताना, एका वेगळ्याच विश्वात जाऊन एकदम तृप्त झाल्याची भावना येत होती. किल्ले पाहण्याची भूक एवढी होती की साडेतीन वाजले होते तरी दुपारच्या जेवणाचा पत्ता नव्हता, शेवटी एका ठिकाणी थांबून अंडा भुर्जी आणि पावांवर ताव मारून लोकांना विचारत विचारत कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गरबड वस्तीत विसावलो.
![]() |
| गरबड वस्तीतून दिसणारा कंक्राळा किल्ला |
किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात पांढरा रंग लावल्याने ते पार रस्त्यावरूनच ओळखू येतात. वस्तीतीलच माळी मामांनी वाट दाखवतो म्हणत पार घळी पर्यंत आणून सोडलं. इथे घळीत लागायच्या अगोदर एक हरणांचा कळप दृष्टीस पडला आणि हे भाग्य आमच्या पाच जणांच्यात फक्त मलाच लाभलं.
किल्ला चढायला सुरुवात केली तेव्हा साडेपाच वाजून गेले होते त्यामुळे सूर्य कलायला आला होता. घळीत पोचल्यामुळे सूर्यास्ताचे सोनेरी क्षण काही आठवणींच्या कुपीत बंद नसले करता आले तरी उजेडात वर पोचायचं म्हणून पावलांना वेग दिला होता.
किल्ला चढायला सुरुवात केली तेव्हा साडेपाच वाजून गेले होते त्यामुळे सूर्य कलायला आला होता. घळीत पोचल्यामुळे सूर्यास्ताचे सोनेरी क्षण काही आठवणींच्या कुपीत बंद नसले करता आले तरी उजेडात वर पोचायचं म्हणून पावलांना वेग दिला होता.
सीताफळाच्या झाडांनी भरलेली घळ सीताफळांच्या मोसमात आलो तर पिशव्या भरून सीताफळं घरी नेता येतील, असे विचार आमच्या मनात येत होते.
![]() |
| पांढरा रंग लावलाय तिथे असलेली पाण्याची टाकी आणि पीर |
अर्ध्या तासाच्या चढाईनंतर त्या पांढऱ्या रंगापाशी आलो तिथे एक बुजलेलं पाण्याचं टाकं, आणि दोन चांगली पाण्याची टाकी होती, खाली अजून एक टाकं दिसत होतं तिथे फक्त आम्ही पोचलो नाही. इथेच एका टाक्याच्या इथे नव्याने केलेला पीर देखील होता. घळीत पुन्हा न जाता बुजलेल्या टाक्याच्या इथूनच वर चढून गेलो असता तिथे कातळात खोदलेली अजून तीन पाण्याची टाकी होती तिथून अजून वर चढलो असता आम्ही गडमाथा जवळ केला होता. डिसेंबर महिना असल्याने सव्वा सहा वाजले असतानाच अंधारायला सुरुवात झाली होती. उजवीकडे वळून किल्ल्याच्या आग्नेय टोकाकडे पावले वळवली इथे एक पाण्याच टाकं होत.
![]() |
| पाण्याचं टाकं |
तिथून पुढे आग्नेय टोकावर गेलो, खालच्या गावात दिवेलागण चालू होती तर अंधारल्यामुळे दूरचा असा प्रदेश नजरेत येत नव्हता. पुढे किल्ल्याच्या उत्तरेकडे जाताना पाच टाक्यांच्या समुहापाशी आलो, काठोकाठ भरलेल्या त्या पाण्याचे घोट घेऊन तृषा क्षमवली.
![]() |
| पाच टाक्यांचा समूह (अंधारामुळे फोटो नीट नाही काढता आला ) |
वाऱ्याचे थंडगार झोत तिथेच बसायला सांगत होते, परंतु काळोख होत असल्याने पाय उचलावे लागले. पुढे आल्यावर एक काळ्या रंगाची तेल लावलेली शिळा आढळली, ते काय होत हे काही कळू शकलं नाही. पुढेच उघड्यावर एक मारुती, शंकराची पिंडी आणि भग्न नंदी होते.
![]() |
| किल्ल्यावरील देव |
![]() |
| तटबंदी |
किल्ल्यावर चढताना घळीतून वर येऊन उजव्या बाजूच्या पठारावर आमची फेरी झाली होती, डाव्या बाजूच्या पठारावर थोडेच दूर जाऊन अंधार झाला असल्याने पावले माघारी वळवली. टाक्याच्या इथून वर चढल्यामुळे दरवाजाचे आणि तटबंदीचे अवशेष दिसले नव्हते ते पाहत घळीतून खाली उतरायची सुरुवात केली. टॉर्चच्या उजेडात उतरताना ज्या मामांनी आम्हाला किल्ल्याच्या वाटेवर लावलं होत, ते सारखे टॉर्च मारून इशारा देत होते, त्यामुळे पावलांना गती देत किल्ला उतरलो. आता माळावरून चालताना जिथे गाडी लावली होती त्या मामांचं घर शोधणं जिकरीच काम होतं. गाडी लावलेली दिशा ठरवून त्या दिशेकडे जाताना एक छोटी लाईट दिसत होती, मामांनी ती आमच्या साठीच लावली होती हे आम्हाला तिथे गेल्यावर कळलं.
![]() |
| माळावरून चालताना |
घड्याळात सात वाजले होते पण अंधार असा झाला होता की जणू काही रात्रीचे दहा वाजून गेले असावे. मामा चहा घेण्यासाठी आग्रह करत होते परंतु पुढचा टप्पा बघता जड मनाने त्यांना निरोप दिला. गावरहाळातल्या माणसांचं हे प्रेम बघून खरंच थिजल्यासारखं होतं.
![]() |
| कंक्राळा किल्ला आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश |
आजच्या दिवसाचा कोठा जरी संपला असला तरी उद्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं म्हणून लळींग किल्ल्याच्या पायथ्याच्या लळींग गावात कुठे तरी मुक्काम करू अस अगोदरच ठरवलं होतं आणि म्हणूनच कंकराळ्याच्या पायथ्याची गरबड वस्ती सोडून करांजगव्हाण-टोकोडे-झोडगे-लळींग असा पन्नासएक किलोमीटरचा प्रवास करून लळींग किल्ल्याच्या पायऱ्या जिथून सुरू होतात तिथे पोचलो. जाताना रस्त्यातील एका पेट्रोल पंपात पाण्याच्या बॉटल आणि गाडीत असलेला कॅन भरून घेतल्याचा इथे फायदा झाला. लळींग किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याने पन्नास साठ पायऱ्या चढल्यानंतर एक गोलाकार बुरुजासारखा भाग केला आहे तिथे आपण मुक्काम करू शकतो आणि पाण्याचा देखील प्रश्न सोडवला होता.
![]() |
| लळींगच्या पायऱ्यांवर मुक्कामी |
त्यामुळे गाडी हायवेच्या कडेलाच लावून लळींग किल्ल्याच्या इथे मुक्काम करण्याचं ठरवलं. टेंट वगैरे लावून मस्त चिकन वर आडवा हात मारून आजच्या दिवसाचा आढावा घेताना पहाडेश्वर मंदिर-अजमेरा किल्ला-देवळाने येथील विस्मयकारक शिल्प मंदिर-दुंधा किल्ल्यावर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील धुंडाळलेली पाण्याची टाकी-संध्यासमयी कंक्राळा किल्ल्यावर केलेली थोड्या अंधारातील भटकंती-हरणांचा कळप-वेगवेगळ्या ठिकाणी मनात कायम घर करून बसलेली माणसे हे सर्व आठवताना कधी निद्रादेवीच्या अधीन झालो हे कळलं देखील नाही.
क्रमश:
फोटो साभार : अलंकार म्हात्रे, पुष्कर घरत, विशाल पाटील
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या
(विशाल पाटील)
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.
![]() |
































Khupach chhan....
ReplyDeleteNice blog👌
ReplyDeleteMast ❤️
ReplyDeleteजोगेश्वरी शिल्प मंदिर,देवळाणे अप्रतिम शिल्पकला.
ReplyDeleteट्रेकला हरणांचे दर्शन म्हणजे एक सुंदर योगच म्हणावा लागेल.