Saturday, January 2, 2021

बागलाण भ्रमंती - भाग ३(किल्ले लळींग, सोनगीर, गाळणा)

बागलाण भ्रमंती - भाग १ (किल्ले बिष्टा, कऱ्हा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा 

बागलाण भ्रमंती - भाग २ (किल्ले अजमेरा, दुंधा, कंक्राळा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा 

दिवस तिसरा 

लळींग किल्ला

  एखाद्या किल्ल्याच्या कुशीत झोपणं यासारखं सुख नाही, कारण रात्री चांदण्यात न्हाऊन निघालेल्या किल्ल्याकडे बघत डोळे कधी मिटतात कळत देखील नाही आणि पहाटे जाग येताच समोर स्वप्नवत वाटावं असं किल्ल्याचं रांगड रूप आपल्याला हाक मारत असतं. आम्ही जिथे थांबलो होतो तिथून लळींग किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदीवरील चर्या बघून त्या स्वप्नांना लवकरच अलिंगण देणार यात तिळमात्र शंका नव्हती. सकाळच सर्व काही उरकून आजच्या म्हणजे शनिवारची सुरुवात झाली.बागलाण सोडून गाळणा टेकड्या या डोंगररांगेतील भटकंती कडे आम्ही कूच केली होती.सकाळच्या पोटापाण्याची व्यवस्था चांगलीच झाली होती. लळींग हा बागलाण भ्रमंतीतला सहावा किल्ला होता, ट्रेक सुरू झाला, नव्याने बांधलेल्या पायरी मार्गाने चढताना पुरती दमछाक होणार हे नक्की. गवत सुकल्यामुळे सगळीकडे पिवळट सोनेरी छटा दिसत होत्या.

लळींग किल्ल्यावर नव्याने बांधलेली प्रवेशद्वारासारखी कमान 

महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज कानात गुंजत होते. तर सुर्यनारायणाची कोवळी किरणे देखील जरा आवेशात असल्यासारखी भासत होती. नव्याने बांधलेली दरवाजा रूपी कमान ओलांडून पायऱ्या चढायचा कंटाळा म्हणून पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून चालत होतो. या मोहिमेतील हा पहिलाच किल्ला ज्याला इतक्या पायऱ्या होत्या, त्यामुळे नको वाटत होतं.

पीर 
पायरी पायरी चढताना घामाने पार निथळून निघालो होतो, मध्येच कुठे लागणाऱ्या निवडुंगाच्या सावलीत उभ्या उभ्याच उसासे टाकत पुढची वाट धरत होतो. अर्ध्या तासाच्या चालीत एका पिराच्या थडग्यापाशी आलो, इथून एक कमी मळलेली वाट उजवीकडे जात होती तिच्याकडे लक्ष न देता मूळ वाटेवरच चालू लागलो.थोडं पुढे गेल्यावर जुन्या पायऱ्यांचा मार्ग आला. त्या पायऱ्यांवर एका ठिकाणी नक्षीदार दगड देखील लावला होता.
जुन्या पायऱ्या 
पायऱ्या चढून वर आल्यावर गुहा टाकं आणि आजूबाजूला गुहा लागल्या. गुहा टाक्याची खोली बघून अवाक व्हायला होतं होत. एव्हाना घामाने अंघोळ झाली होती, त्यामुळे टाक्याच्या इथेच वाटेवर निवडुंगाच्या सावलीत पाठीवरची बॅग मोकळी केली आणि पाण्याचे घोट घेत जमिनीवर विसावलो.
गुहा आणि पाण्याची टाकी 
एक एक करत सगळे आले, इथून गुहा टाक्याच्या डावीकडे जाणारी वाट कुठे जाते म्हणून अलंकार आणि मी तिकडे वळलो, तिकडे अजून काही गुहा होत्या तर पुढे किल्ल्याची अर्धी तुटलेली तटबंदी होती. तटबंदीच्या पुढे गेल्यावर किल्ल्यावर चालू असलेल्या संवर्धनाच्या कामासाठी खालच्या गावातून सामान वर पोचवण्यासाठी लावलेला रोपवे दिसत होता. माघारी वळून पुन्हा मूळ वाटेवर आलो, इथे गडावर काम करण्यासाठी रोजंदारीवर येणारी माणसे त्यांची शिदोरी घेऊन वर चढत असलेलं चित्र पाहण्यास मिळालं. पुन्हा नव्याने बांधलेल्या पायऱ्या आल्या या पायऱ्या आम्हाला किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी घेऊन गेल्या,प्रवेशद्वाराच्या बाजूचे बुरुज नव्याने बांधले गेलेले होते.पाऊण तासाच्या चालीत खड्या पायऱ्या चढताना घामाने चिंब भिजून अखेर गडावर आमचा प्रवेश झाला होता.
प्रवेशद्वार आणि बुरुज
भग्न प्रवेशद्वारातून प्रवेश केला असता समोर छोट्या देवळी होत्या तर उजवी कडे वर गेल्यावर महिरपी कमान केलेली दिसते, तिथे बसून दुरवर गेलेला महामार्ग आणि लळींग गाव व आजूबाजूचा परिसर एकदम विहंगम वाटत होता.
तोफ ठेवण्याचा उंचवटा 

वाऱ्याचे येणारे झोत घामाने भरलेल्या पूर्ण शरीराला सुखावून सोडत होते. पुढे असलेल्या बुरुजावर तोफे ठेवण्यासाठी उंचवटा केला होत्या याच्यामध्ये लोखंडी दांडा होता जेणेकरून तोफेचा मारा सर्व दिशांना करता येईल. बुरुजाच्या पुढे असलेली तटबंदी आणि त्या तटबंदीवरील चर्या सुस्थित होत्या. तटबंदीवरून माघारी वळून प्रवेशद्वार जवळ केलं आणि डाव्या बाजूला वळलो. इथे काही पाण्याची टाकी आहेत इथून पुढे गेल्यावर मोठं पाण्याचं टाकं, त्या टाक्याची रचना विशेष आवडली. आतमध्ये अशा खिडक्या आणि त्याच्यामध्ये दालन अशा स्वरूपातील हे पाण्याच टाकं. त्यातल्या काही भागात गाळ साचलाय तर काही दालनात पाणी आहे.
पाण्याचं आकर्षक टाकं 
पुढे तटबंदीवरुन चर्यांची नक्षीदार वळणे पाहत चालताना नजर हलत नाही. लळींग किल्ल्याचे संवर्धनाचे काम जोरात चालू असल्याचा हा पुरावा होता. पुढे गेल्यावर हे काम डोळ्यांनी पाहता आलं. खूप सारी माणसं काम करताना दिसली त्यातली काही छिन्नी हातोड्याने दगडाला आकार देत होते तर काही जण चुन्याच्या घाण्याच्या यंत्राजवळ काम करत होते तर काही जण सामान ने आण करण्यात व्यस्त होते.
नक्षीदार चर्या 
महिलावर्ग चुली पेटवून सकाळच्या न्याहारीची तयारी करतानाचे चित्र पाहायला मिळत होते. या संवर्धनाच्या कामामुळे त्या परिसरात दगड विटांचे तुकडे इतस्ततः पडलेले दिसत होते, त्यातून वाट काढत पुढचा टेकाड चढलो, इथे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत उभी असलेली दारू कोठराची वास्तू होती तर त्याच्या मागे अजून काही पाण्याची टाकी होती.
दारुकोठार आणि पाण्याची टाकी 
दारुकोठराच्या वरच्या अंगाला असलेल्या ललिता मातेच्या मंदिराजवळ जाऊन सावलीत बसलो,किल्ल्यावरून देवीला नाव पडलं की देवीवरून किल्ल्याला हे आम्हाला अज्ञातच आहे.
ललिता देवी मंदिर आणि आतील देवीची मूर्ती 

इथेच पोटात थोडाफार सुका खाऊ ढकलून ललिता मातेचं दर्शन घेऊन किल्ल्यासंदर्भात असलेल्या माहितीच पठण करून उर्वरित गडफेरी आरंभली.
जोत्याचे अवशेष 
मंदिराच्या बाजूलाच राजवाड्याच्या जोत्याचे अवशेष आहेत, गवताला आग लावल्या कारणाने ते अवशेष मोकळे झाले होते. गडमाथा असा फार मोठा नसला तरी बऱ्यापैकी दृश्य वरून पाहायला मिळतं, पण आम्ही गेलो तेव्हा धुक असल्याने जास्त दूरवरचं काही ओळखू येत नव्हतं. किल्ल्याला चोर दरवाजा आहे हे वाचलं होतं पण तो कुठे आहे हे अजून आम्हाला समजलं नव्हतं त्यामुळे त्याच्या शोधात आम्ही किल्ला फिरत होतो. एका ठिकाणी गवतात झाकलेले भुयारवजा काहीतरी दिसलं तिथे आत उतरण्याच्या पायऱ्या देखील गवताने भरल्या होत्या आणि आत कचऱ्याच साम्राज्य पसरलं होत. इथे गडाच्या संवर्धनाच काम करणाऱ्या लोकांनी याची कचराकुंडीच करून टाकली होती. आत अंधार दिसत असल्याने डोक्याला टॉर्च लावून खाली उतरलो, तर ते एक भुयारी टाकं होतं. गाळ, पाणी आणि वरून पडणारा कचरा यामुळे त्या सुंदर टाक्याची रयाच गेली होती. हा तर काही चोर दरवाजा नाही म्हणून पुन्हा त्या चोर दरवाजाच्या शोधात निघालो. त्या भुयारी टाक्याच्या इथून वर निघाल्यावर तटबंदी वरून खाली डोकावून पाहताना तटबंदीत असलेला दरवाजा दिसला आणि आपली शोधमोहीम सार्थक झाल्याचं समाधान मिळालं. पायऱ्या उतरून चोरदरवाजातून बाहेर उतरताना खालच्या टप्प्याला आधारासाठी एक लोखंडी वायर लावून ठेवली आहे.
चोर दरवाजा 
खांब  टाकं 
चोरदरवाजाच्या खालचा टप्पा काळजीपूर्वक उतरून पुढची वाट धरली इथे एक स्वच्छ पाण्याने भरलेलं खांब टाकं होतं. टाक्यातील थंडगार पाण्याने घसा ओला करून पुढे असलेल्या देवीच्या उध्वस्त मंदिरापाशी आलो. मंदिराच्या समोर असलेल्या भिंतीवर असलेल्या कमानी आणि मंदिर सार काही गवताने व्यापून टाकलं होतं.
उध्वस्त मंदिर 
आहे तीच वाट सरळ पकडून आम्ही लळींग किल्ल्याच्या माचीवर प्रवेश केला इथे एक मोठा कोरडा तलाव आणि तलावाच्या बाजूला एक घुमटी आहे. इथेच डावीकडे दूर एक मशीद देखील दिसत होती.
माचीवरील तलाव आणि बाजूची घुमटी 

तलावाला उजवीकडे ठेवून तशीच पुढची चाल धरून माचीवरून चालत छोट्या पायवाटेवरून पिराच्या थडग्यापाशी आलो. किल्ला चढताना थडग्यापाशी आल्यावर हीच वाट दिसली होती. एकंदरीत गडफेरी उत्तमरीत्या पूर्ण झाली होती,पावले आता गडउतार होत वेगाने खाली सरकत होती, पायऱ्या उतरताना गुडघे जरा बोलत होते. तीन तासात पूर्ण गडाचे दर्शन घेऊन गाडीत बसून पुढच्या किल्ल्याच्या दिशेने निघालो देखील.
पुढचा किल्ला होता लळींग पासून चाळीस किमी अंतरावरील सोनगीर किल्ला, धुळ्यावरून पुढे जाताना मध्ये नगावे इथे थांबून दोन-दोन नारळपाणी रिचवून सोनगीर गावात दाखल झालो. एखाद्या घराच्या पायऱ्या वाटाव्या अशा पद्धतीने सोनगीर किल्ल्याच्या पायऱ्यांची सुरुवात घरांच्या दाटीवाटीत गावातल्या रस्त्यावरून झालेली दिसते.
सोनगीर किल्ल्याच्या पायऱ्या 
गाडी पायऱ्यांपाशी जाते खरी पण घरांची गर्दी बघता गाडी कुठे लावावी आणि आपण लावलेल्या गाडीची इतरांना अडचण होणार नाही ना असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. दगडी पायऱ्यांची वाट बाजूला असलेले लाईटचे खांब आणि समोर दिसणारी किल्ल्याची भरभक्कम तटबंदी हे सर्व पाहताना अवघ्या पाच-सात मिनिटांच्या चढाईत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो देखील.
प्रवेशद्वार आणि ढासळलेले नक्षीदार खांब 
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची कमान नीट असली तरी बाजूचा भाग ढासळला आहे, इथेच काही नक्षीदार खांबांचे भाग उभे आहेत तरी काहींची पडझड झालेली दिसते. प्रवेशद्वारातून पुढे येऊन कातळकोरीव पायऱ्या चढून गडमाथा गाठला.उत्तर-दक्षिण पसरलेला गडमाथा उत्तरेच्या बाजूने फिरुया म्हणत उजव्या हाताच्या वाटेने चालू लागलो. दुरूनच एक खोलगट भाग दिसला त्या दिशेनेच उतरताना ती खोली जरा जास्तच भयानक भासू लागली. जपत जपत पावले टाकत जवळ गेल्यावर समजल की ती एक आयताकृती विहीर होती.पन्नासेक फुटांवर त्यात पाणी होत.
विहीर 
रांजण 
अजून खाली किती खोल असेल याचा काहीही मागमूस नव्हता. न जाणो जर चुकून कोणी यात पडलाच तर वर येण्यासाठी काहीही पर्याय नव्हता. या विहिरीच्या पुढेच एका वास्तूचे अवशेष होते, त्याच्या पुढे जात किल्ल्याचं उत्तर टोक गाठलं, उत्तर टोकावर असलेला बुरुज देखील पडलेला होता, तिथे असणारे काही चिरे त्या बुरुजाचे अस्तित्व दाखवत होते. गडाचा उत्तर भाग फिरून झालो होतो आता दक्षिणेकडे जाताना वाटेत दोन ठिकाणी दगडी रांजण दिसले. किल्ल्यावर अजून काही फारसे अवशेष दिसले नाही त्यामुळे दक्षिण टोक देखील लगेच गाठलं, तेथील बुरुज देखील नामशेष झाल्यात जमा होता.
उद्धवस्त बुरुज 
गडफेरी उरकून आल्या मार्गाने माघारी फिरून पायथा गाठला.चार दोन अवशेष का असेना पण वेगळं काहीतरी पाहण्यात आलं आणि भटकंतीच्या कप्प्यात अजून एका नव्या किल्ल्याची भर पडली हे आमच्या सारख्या भटक्यांसाठी सोन्याहून पिवळं असतं.
भटकंतीचा तिसरा दिवस असून देखील वेळेच्या बाबतीत एकदम काटेकोर होतो. तिसऱ्या दिवसाच्या दोन किल्ल्याचं दान पदरात पाडून आता तिसरा किल्ला गाळण्याच्या दिशेने आम्ही प्रस्थान केलं. धुळे-लळींग-अजनाळे-डोंगराळे-गाळणा असा साठ-पासष्ट किमीचा पल्ला ओलांडून दुपारच्या जेवणासाठी गाळणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गुरू गोरक्षनाथ आश्रम गाठलं. दुपारचं जेवण जरा रेंगाळत केल्याने किल्ल्याच्या वाटेवर लागायला जरा उशीरच झाला.
गाळणा किल्ला 
गुरू गोरक्षनाथ आश्रमाच्या उजव्या बाजूने किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत सिमेंट रस्ता जातो आणि नंतर चालू होतात त्या गाळणा किल्ल्याच्या प्रशस्त पायऱ्या. लळींग, सोनगीर यांच्या पायऱ्या चढून हैराण झालो होतो, त्यात अजून ही भर बहुधा. किल्ला चढताना दुरूनच दिसणारी भरभक्कम आणि अभेद्य तटबंदी,देखणे बुरुज आणि त्यावरील चर्या हे सर्व गाळणा किल्ला किती वैभवशाली आहे याची ओळख दुरूनच पटवून देत होते. अवघ्या दहा मिनिटांच्या चढाईत पहिला दरवाजा गाठला देखील,या दरवाजाच नाव परकोट दरवाजा, दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत.
परकोट दरवाजा 
इथून पुढे पाच एक मिनिटे पायरी मार्गाने चढाई केली असता आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोचतो. दरवाजाची तिहेरी कमान,वरच्या बाजूला असलेले कमळ आणि सार बांधकाम सुस्थितीत असल्यामुळे या दरवाजा वरून नजर हटत नाही. लोखंडी दरवाजा अस या दुसऱ्या दरवाजाचं नाव.याच दरवाजाच्या वर एक पर्शियन भाषेतील शिलालेख देखील लावलेला आहे.
लोखंडी दरवाजा 
एक एक पायरी वर चढतोय तस गाळणा किल्ला त्याच्या पोतडीतून एक नजराणा आमच्या समोर पेश करतोय असच काहीसं आम्हाला वाटत होतं.
बघता बघता तिसऱ्या दरवाजापाशी पोचलो देखील, इथे येताना आता तटबंदीच्या फांजीवरून चालत खालचं दृश्य बघत जात असताना तटबंदीत लावलेला एक शिलालेख पहावयास मिळाला, हा देखील पर्शियन भाषेतच होता.
तटबंदीवरील शिलालेख 
तिसऱ्या दरवाजा जवळ आलो, हा कोतवाल पीर दरवाजा.
कोतवाल पीर दरवाजा 
या दरवाजात चढायच्या अगोदर डाव्या बाजूला एक वाट जाते, ही वाट छोटी आणि कमी वाहिवाटीची होती. त्या वाटेवर गेलो असता वाटेच्या शेवटी तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा होता.
चोर दरवाजा 
या दरवाजातून पुढे जायला वाट नव्हती त्यामुळे माघारी फिरून कोतवाल पीर दरवाजातून प्रवेश केला. या दरवाजातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भिंतीत एक नव्यानेच केलेलं पीराच थडगं दिसून आलं. आणि तटबंदीच्या वर जशी नजर फेकली तस तोंडात आ वासून पाहतच राहावं अस दृश्य समोर आलं.
नक्षीदार सज्जे 
तटबंदी वर केलेले नक्षीदार सज्जे त्यांच्यावर केलेल्या बारीक कालाकुसरीमुळे लक्ष वेधून घेत होते. त्या सज्जांकडे बघत पुढचा दरवाजा गाठला, हा होता लाखा दरवाजा.
लाखा दरवाजा
आतापर्यंत परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा आणि हा लाखा दरवाजा असे मोठे आणि सुस्थितीतील दरवाजे तर एक चोर दरवाजा या अशा एकशे एक वास्तू बघून गाळण्यासाठी मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा तयार होत होती. लाखा दरवाजात प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या होत्या. या दरवाजाचं जीर्णोद्धार झालं असल्याच दिसत होतं, तसेच देवड्यांमध्ये देखील लाकडी खांब लावले होते.
लाखा दरवाजात पोचेपर्यंत पाच वाजले होते. गाळणा किल्ल्याचं वैभव बघून आमचा प्लॅन कोलमडल्यात जमा झाला होता, आणि महत्वाचं म्हणजे हा किल्ला धावत पळत बघण्यातला नव्हताच. आणि म्हणूनच आज फक्त सुर्यास्तासाठी मोक्याची जागा बघून ते कातरक्षण अनुभवावे, आणि किल्ला पाहण्यासाठी उद्या सकाळी परत यायचे, या मतावर कोणीही आढेवेढे न घेता सहमती दर्शवली.लाखा दरवाजातून पुढे आल्यावर तीन वाट फुटतात डावी-उजवी-सरळ यापैकी उजवीकडच्या वाटेवर जे सज्जे लक्ष वेधून घेत होते त्यांच्यावर धावती नजर टाकून ते दुसऱ्या दिवसासाठी राखीव ठेवले आणि सरळ वर जाणारी वाट पकडून किल्ल्याचा माथा गाठण्याच लक्ष निश्चित केले.
उद्धवस्त सज्जा 
पाण्याचं टाकं आणि दर्गा 
वर आल्यावर काही उध्वस्त वस्तूंचे अवशेष नजरेस पडत होते,तर एक पाण्याच टाकं देखील होत, त्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना होती, तर त्याच्या बाजूलाच एक दर्गा होता. तिथूनच गवतातून वर जाणारी छोटी वाट पकडून किल्ल्याच्या सर्वोच्च टेपाडावर आलो. पण झाडीने भरलेलं असल्यामुळे आम्हाला आता पश्चिम बाजू गाठायची होती. इथे बहुधा लोकांचा राबता कमी असावा म्हणूनच वाट बारीक, गवताने भरलेली आणि कमी मळलेली होती. या वाटेवरून चालत पश्चिमेकडे जाताना बऱ्याच ठिकाणी गवतात लपलेले थडग्यांचे अवशेष दिसत होते,काही मोठे थडगे देखील होते.
थडगी 
झाडीतून येणारी सूर्याची किरणे गवतावर जणू काही सुवर्णाभिषेक करत होते, सूर्याचे ते बदललेले तांबूस रूप आता एखादी जागा शोधा आणि बुड टेका असाच इशारा देत होते. एव्हाना किल्ल्याच्या पश्चिमेला आलो होतो, तिथे बैठक मारून समोर दिसणारं दृश्य आठवणींच्या कप्प्यात जपण्यासाठी सारे सज्ज झालो होतो. झाडीतून दिसणारं समोरच मोकळ दृश्य, मध्ये मध्ये उठावलेले छोटे छोटे डोंगर, सुर्यकिरणात चमकून निघणारे जलसाठे, त्यातील प्रतिबिंब, निळ्या निरभ्र आकाशात केशरी पिवळ्या रंगाचा पडलेला सडा आणि घराकडे निघालेले पाखरांचे थवे, सारं काही स्वप्नवत!

सोबत आणलेला छोटा गॅस पेटवून मस्त चहाला आधण आणलं, सूर्यास्ताचे ते कातर क्षण अनुभवत चहाचे घोट घेत आशाबाईंच्या आवाजातील सांज ये गोकुळी सावळी सावळी या गीतपंक्ती पुटपुटत तिथेच तल्लीन झालो होतो. एव्हाना सूर्यबिंब कधीच गुडूप झालं होतं, चहाचा कपदेखील रिता झाला होता, पश्चिमेचा रंगाविष्कार त्याचे पसरलेले रंग आवरत चंद्राकडे जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत होते. आम्हाला देखील आता पाय काढणं जरुरीचं होतं. अंधार पडायला लागल्यामुळे डोक्यावरच्या टोप्यांची जागा हेडटॉर्चने घेतली. आल्या वाटेने पावले माघारी वळली होती, वाट नीट असल्यामुळे अंधारात चाचपडण्याचा प्रश्नच नव्हता. वर चढताना बघितलेल्या वास्तूंकडे आता उतरताना बघताना एक प्रकारे उजळणीच चालू होती. वीस मिनिटात पायथ्याच आश्रम गाठलं होत. डोंगरभटकंती मुळे जुळलेली नाती कधी कुठे कशी उपयोगी पडतील याचा नेम नाही, ओंकार ओक याच्या एका फोनवर या आश्रमाचे विश्वस्त अप्पा चिंचोरे यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी व्यंकट महाराज यांना सांगून आमची आश्रमात राहण्यासाठी सोय केली. ऐसपैस रूम आणि पुरेपूर पाणी यामुळे आजच्या दिवसाची सांगता देखील यथोचित होणार यात शंका नव्हती. अंघोळ करून आश्रमात दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर पाहून रात्रीच जेवणं उरकली. आजचा मुक्काम भारी असल्यामुळे जेवणात देखील कांदा भजीचा बेत केला होता. जेवणानंतर सारेच पेंगले होते, त्या मुळे जो तो लगेच स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आडवा झाला. लळींग, सोनगीर आणि गाळण्याच्या अविस्मरणीय भटकंतीचा आजचा दिवस सार्थकी लागला होता.
          क्रमश:

फोटो साभार : अलंकार म्हात्रे, पुष्कर घरत, विशाल पाटील

धन्यवाद,
सह्याद्रीचा भटकभवान्या
(विशाल पाटील)

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

1 comment:

  1. Surekh varnan, good one. keep it up. visit educational site.: https://smartschool.infolips.com/

    ReplyDelete