Thursday, January 7, 2021

बागलाण भ्रमंती - भाग ४ अंतिम (गाळणा किल्ला, मालेगाव भुईकोट)

बागलाण भ्रमंती - भाग १ (किल्ले बिष्टा, कऱ्हा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा 

बागलाण भ्रमंती - भाग २ (किल्ले अजमेरा, दुंधा, कंक्राळा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा

बागलाण भ्रमंती - भाग ३(किल्ले लळींग, सोनगीर, गाळणा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा 

दिवस चौथा
गाळणा किल्ल्यावरील अप्रतिम सूर्योदय 
प्रत्येक किल्ल्याला काही तरी विशेषतः आहे जी तो मिरवू शकतो व तिचा अभिमान बाळगू शकतो, जस की हरिश्चंद्रगडाने कोकणकड्याच्या मुकुटमणी परिधान केला आहे, राजगडाला महाराजांच सर्वाधिक वास्तव्य राहिलं आहे, रायगडाने राजधानीचा मान पटकावला, जंजिऱ्याची अभेद्यता, माहुलीचा बेलाग सुळक्यांचा समूह, अलंग-मदन-कुलंगची धडकी भरवणारी चढाई, रतनगडाचं मनोहारी रूप, प्रतापगडावरचा शिवप्रताप तर साल्हेरचा उच्चतम बालेकिल्ला. या सर्वांसोबत गाळणा किल्ला देखील त्याच्यावर असलेल्या दुर्गश्रीमंतीचा गर्व करू शकतो,आणि म्हणूनच गाळण्याला नाशिकच नाक अस देखील म्हटलं जातं. याचा थोडासा परिचय कालच्या गाळणा चढाईत आला, आणि म्हणूनच पुढच्या प्लॅन मध्ये बदल करून आज देखील गाळणा फिरायचं ठरवलं होतं आणि त्यातही सूर्योदय बघायला किल्ल्यावर असलोच पाहिजे ही अट होती. आश्रमात मुक्कामाची सोय व्यवस्थित झाल्याने सर्वांना उत्तम आराम मिळाला होता यामुळेच सकाळी सव्वा सहा वाजता आश्रमातून निघून गाळण्याच्या दिशेने आमचा ट्रेक सुरू देखील झाला.
परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा,लाख दरवाजा असे एक एक दरवाजे मागे टाकत गार झुळूक अंगावर घेत आमची वाटचाल चालू होती. लाखा दरवाजातून प्रवेश केल्यावर ज्या तीन वाटा फुटतात त्यातील सरळ वाट पकडून काल गडमाथा धुंडाळला होता. आज त्यातलीच उजवीकडे वळून पूर्ण गडाला तटबंदी वरून वळसा मारणार होतो. तुर्तास सूर्योदय पाहणं हे उद्दिष्ट असल्याने डावीकडची वाट पकडून किल्ल्याच्या पूर्व भागात जाण्यासाठी निघालो. इकडे तटबंदीवरुन चालताना एका ठिकाणी पाण्याचा टाका दिसून आला. बहुधा या वाटेवर फिरणारे कमी लोकं असावेत म्हणूनच वाट छोटी आणि गवताने वेढलेली होती, पूर्व दिशेला असलेल्या बुरुजावर पोचलो आणि थकलो नसलो तरी बुड टेकवून खाली बसलो. पूर्वेच्या आसमंतात जो सहस्त्ररश्मी विलक्षण अशा रंगछटा उधळत होता की त्या पाहण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही एका जागेवर असणं गरजेचं होतं. बुरुजावर पोचायला सकाळचे पावणेसात झाले होते. या बुरुजाच्या मध्यभागी तोफेचा मारा सर्व दिशांना करता यावा यासाठी लोखंडी दांडा ठेवला होता. सूर्योदय पाहत असतानाच किल्ल्याची माहिती वाचून आणि पुन्हा एकदा नकाशा समजून घेतला.
पूर्वेकडील बुरुज 
चोर दरवाजा 
बुरुजाच्या पुढे तटबंदीवरुन फोटोंसाठी चांगला अँगल मिळेल म्हणून मी आणि पुष्कर जरा पुढे निघालो तर बाकीचे त्या बुरुजवरूनच आजूबाजूचा परिसर न्याहाळत राहिले, या बुरुजावर येताना काही ठिकाणी तटबंदी ढासळली होती त्यामुळे सावधपणे चालावं लागत होतं. त्या बुरुजावर पोचून पुष्कर फोटोग्राफी करत होता तर मी किल्ल्याची तटबंदी न्याहाळत होतो. या बाजूला एक चोर दरवाजा आहे पण तिकडे जायला वाट नाही हे वाचून होतो आणि ज्या अर्थी आता जिथे आहोत तिथपर्यंत वाटेत वाढलेलं गवत आणि तटबंदीवरून चालताना ढासळलेले दगड यावरून पुढे वाट नसणारच यावर शिक्कामोर्तब झाला होता. बुरुजावरून खाली बघताना एका ठिकाणी दरवाजा दिसला आणि तिथे सहज जाऊ शकतो हे देखील कळत होतं. अरे वा! हे तर एक सरप्राईजच मिळालं, मागच्याना काहीही न सांगता काय आहे ते आधी आपणच पाहुया म्हणून पुष्कर आणि मी तिकडे गेलो, जाताना उजवीकडे कड्यात खोदलेले पाण्याचे टाके होते, तटबंदीतून पायऱ्या उतरून तटबंदीच्या बाहेर आलो आणि आजच्या भटकंतीची सुरवात भन्नाट झालीय याची तो दरवाजा पाहून पोचपावती मिळवली. बाकीच्यांना पण लगेच आवाज देऊ बोलवलं, तटबंदीवरुन पुढे बघताना अजून एक दरवाजा लागला, पण तिकडे जायची वाट झाडीने भरलेली दिसत होती. बहुधा हा तोच दरवाजा असावा जिथे जायला वाट नाही. झाडीतून वाकून-ओणवे होऊन चोर दरवाजाच्या दिशेने गेलो असता लागलं ते नितळ पाण्याचं टाकं,टाक्यात उतरायला जागा नव्हती आणि त्या टाक्याच्या पलिकडेच चोर दरवाजा दिसत होता, तटबंदीवरुन जाणारी वाट असावी तर टाक्याच्या डाव्या बाजूचा तटबंदीचा पूर्ण भाग ढासळलेला दिसत होता. माघारी येऊन तटबंदीवर चढून त्या ढासळलेल्या भागाच्या इथे आलो पण निष्फळ!
पाण्याचं टाकं आणि पलीकडील चोर दरवाजा ,डाव्या बाजूला ढासळलेली तटबंदी 
आता मागे लाखा दरवाजाकडे जाऊन उजवीकडून तटबंदीवरुन गडफेरी करण्यापेक्षा आहे इकडूनच करूया म्हणत पावले पुढच्या दिशेनेच चालू लागली. वरच्या बाजूला पाहताना तटबंदीत कमानीसारखे बांधकाम नजरेस पडले बाजूलाच कड्यात खोदलेली पाण्याची टाकी दिसत होती. त्या कमानींपाशी गेल्यावर समजले कि त्या सैनिकांसाठीच्या देवड्या आहेत, वर परत अशाच देवड्या दिसल्या.
तटबंदीतील देवडी 
वरच्या टप्प्यात चढलो असता बांधकाम असलेली वास्तू दिसली त्याच्या अंतर्रचनेवरून ते बहुधा स्नानगृह असावं.
पर्शियन शिलालेख 
इथूनच किल्ल्याच्या वरच्या भागात जायला वाट होती, पण काल गडमाथा पाहून झाला असल्याने तिकडे न चढता डाव्या बाजूने गडफेरीच सुरु ठेवली. आम्ही आता किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे असू, तटबंदीवरुन चालताना इथल्या एका बुरुजावर पर्शियन भाषेतील शिलालेख आणि त्याच्या दोन्ही बाजूला व्याल कोरलेले लावलेले दिसले.दरवाजे आणि तटबंदीसोबत शिलालेखांची मालिका देखील चांगलीच चालू झाली होती, बाकी दिसणाऱ्या अवशेषांची तर काही गणतीच नव्हती. तटबंदीवरुन चालताना नक्षीदार चर्यांमध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी केलेल्या जंग्यादेखील दिसत होत्या. जशी तटबंदी किल्ल्याच्या समोरच्या म्हणजे दक्षिण भागात आहे तशी किल्ल्याच्या उत्तरेच्या भागात नाही, कारण या दिशेला डोंगराच्या उभ्या कड्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. त्यामुळे आता तटबंदीही नाही आणि फांजीही(तटबंदीवरुन चालायची जागा) नाही. वाट आता वाळलेल्या गवतातून पुढे जाऊ लागली, वाळलेल्या गवतावरून चालताना पाय सरकत असल्याने कड्यापासून अंतर ठेऊनच चालत होतो. वरच्या बाजूला उजवीकडे दिसणारा गडमाथा तर डावीकडे खाली दिसणारी गावे आणि समोरून आम्ही तुडवत असलेली पुसटशी वाट.
तटबंदी आणि बुरुज 
मध्येमध्ये काही ठिकाणी जिथे संरक्षक कडे नसतील तिथे तटबंदीचे अवशेष दिसत होते. काही ठिकाणी तटबंदी तुटली देखील होती आणि त्यातील सुटावलेल्या दगडांचा ढीग खाली काही ठिकाणी दिसत होता.
गवतातून वाट काढताना काही अवशेष नजरेतून सुटत असणार याची खंत होती. किल्ल्याच्या वायव्येस एक बुरुज दिसू लागला, इतक्या वेळानंतर एक बऱ्यापैकी चांगली वास्तू गवतातून डोकं वर काढून बघत असल्यासारखं भासत होतं.
गवतात लपलेला बुरुज 
देवडी

या बुरुजात कमानी असलेल्या देवड्या होत्या ज्यात आतून देखील कमानी होत्या. या बुरुजावर चढायला पायऱ्या होत्या. गवतातून वाट काढत त्या बुरुजावर चढलो इथून पश्चिमेला पाहिलं असता वाट खाली उतरते आणि त्या बाजूची तटबंदी आणि बुरुज शाबूत असलेले समजत होतं. त्या बाजूने जसजस चालू लागलो, तसा आमचा सामना पुन्हा गवताशी झाला, गवतातून तर काही ठिकाणी झाडोऱ्यातून वाट काढताना वाकून-ओणवे होत कसरत करत वाट चालावी लागत होती. इथे आता पुष्कर गवताचा शिकार झाला होती, त्याची पॅन्ट आता पूर्ण भरून निघाली होती. पश्चिम दिशेच्या तटबंदीवर देखील एक पर्शियन शिलालेख होता, या शिलालेखा खाली एक तोंडाच्या आकाराची शिल्पाकृती होती, थोडंच पुढे अजून एक शिलालेख तटबंदीच्या चर्येवर आढळून आला.
शिलालेख आणि खालील शिल्प 
तटबंदीवरुन चालताना आता ज्या चर्या होत्या त्यांची उंची साधारण आठ-नऊ फूट इतकी प्रचंड होती. जंजिरा, धोडप या किल्ल्यांवर ज्या चर्या बघितल्या होत्या त्या मानाने इथल्या कितीतरी पटीने मोठ्या होत्या.
चर्या 
गडफेरी आता होत आली होती कारण पश्चिम-नैऋत्य दिशेने जसे आणखी पुढे आलो तसा गाळण किल्ल्याचा समोरचा भाग आणि खालचं गाळणा गाव व आम्ही मुक्काम केलेला आश्रम इत्यादी पायथ्याचे दृश्य आम्हाला दिसू लागले.
गवताची वाट देखील आता बऱ्यापैकी चांगली मळलेली आली, इतक्या वेळानंतर पाण्याच्या टाक्याचे दर्शन झाले आणि वर असलेला रंग लावलेला दर्गा देखील आता वरच्या अंगाला दिसत होता. तटबंदीवरुन चालत असताना गाळणा किल्ल्याच्या खोदीव गुहांपाशी आलो. इथे गुहांची शृंखला चालू झाली होती, इतक्यात तटबंदीवरील चर्यांकडे लक्ष वेधलं गेलं, एका चर्येवर परत एकदा पर्शियन भाषेतील शिलालेख होता तर बाजूच्या दोन चर्यांवर व्याल शिल्प होते.
तटबंदीवरील चर्येवरील शिलालेख आणि व्याल शिल्प 
ते पाहून पुन्हा गुहा पाहत पुढे सरकू लागलो, यातील एक मंदिरवजा गुहा आहे, त्या गुहेच्या बाह्य भागावर वरच्या बाजूला मंदिराच्या कळसासारखं कोरीव शिखर केला आहे, आत मध्ये गणपती, शंकराची पिंड आणि मारुती आहेत.
गडदेवता 
गडदेवतांचं दर्शन घेऊन बाहेर आलो इथे तटबंदीवर लावलेला मराठा साम्राज्याचा भगवा निशाण डौलाने फडकत होता.
डौलाने फडकणारा भगवा 
थोड्याच पुढे आता ज्या ठिकाणाचे काल पासून दुरून दर्शन घेत होतो आणि आत्मीयतेने तेथे कधी पोचतोय अस झालं होतं, त्या नक्षीदार सज्जां जवळ आम्ही येऊन दाखल झालो. कमानीतून आत प्रवेश केल्यावर चार बाजूनी चार कमानी तर वर घुमटी, तटबंदीच्या दिशेने कमानीतून बाहेर निघाल्यावर समोर मोठी कमान तर डाव्या-उजव्या बाजूला छोट्या कमानी होती, या सर्व कमानी महिरपी आकारातील होत्या.
नक्षीदार सज्जा 
त्या सज्जात बसून घोंघावत येणाऱ्या वाऱ्याचे झोत अंगावर घेत समोरचा परिसर न्याहाळण्यात मजा येत होती. हा सज्जा किल्ल्याच्या दक्षिण भागात होता, जर उगवतीला किंवा मावळतीला असता तर प्रातःकाळी किंवा सांजवेळी होणाऱ्या केशरी पिवळ्या रंगांच्या उधळणीत याचं सौंदर्य अजून कित्येक पटीने वाढलं असत यात तिळमात्र शंका नव्हती. त्या सज्जाच्या इथे प्रत्येकाने आपली फोटो काढायची हौस भागवून घेतली. पुढे आल्यावर अजून एक वास्तू समोर आली. ही होती तटबंदीवरील सज्जा सारखीच पण जरा वेगळी वास्तू, यातील फक्त एकच कमान उभी होती बाकी सगळे अवशेष ढासळले होते. येथील एका खांबाच्या पायाला असलेला दगड लोखंडी दरवाजात पहिला होता. उघड्यावर असलेली ती कमान आणि दूरवर दिसणार निळं क्षितिज एक भन्नाट फ्रेम गाळणा किल्ल्याने आम्हाला बहाल केली होती.
उध्वस्त सज्जा 
हे सर्व पाहून आम्ही लाखा दरवाजात पोचलो आणि आमची गडफेरी यथासांग पूर्ण झाली.
गाळणा किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचं ठरवलं तर या किल्ल्याचा लिखित इतिहास तेराव्या शतकापासून मिळतो. १३ व्या शतकात गाळणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते. याच बागुल राजांमुळे या भागाला बागलाण असे नाव मिळाले होते. सोळव्या शतकात (इसवीसन १५१० ते १५२६) गाळणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन १५२६ मध्ये बागलाणचा राजा बहिरजी याने निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १५५५ मध्ये निजामशहाने गाळणा पुन्हा जिंकून घेतला. पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवी सन १७५२ मध्ये भालकीचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा किल्ला होळकरांच्या ताब्यात होता. इसवी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी गाळणा किल्ला जिंकून घेतला. (इतिहास :आंतरजाल)
गाळणा किल्ल्याची गडफेरी यथोचित पूर्ण झाली होती. खूप साऱ्या वास्तू आणि दृश्य डोळ्यात साठवून आणि आठवणींच्या पसाऱ्याच गाठोडं बांधून भरल्या मनाने एक एक पायरी उतरत पायथा जवळ केला. गाळण्याच्या पायथ्याला एक टाकं आहे ज्यामध्ये किल्ल्याची छोटेखानी प्रतिकृती कोरलेली आहे, अस ऐकलं होतं, पण इथे कुणाला विचारल्यास नीट कुणालाच सांगता येत नव्हतं. नशिबाने त्या जागेचा फोटो असल्याने तो फोटो दाखवत त्या टाक्यापाशी गेलो, पण ते टाकं पूर्ण भरलेलं असल्याने आमची निराशा झाली.
१.पाण्याने भरलेलं टाकं २.रिकामं असताना खाली दिसणारी किल्ल्याची प्रतिकृती (फोटो आंतरजाल)
आश्रमाच्या दिशेने परत माघारी फिरून आश्रमाच्या बाहेरच एका टपरीत चहा नाश्ता उरकून आश्रमाच्या खोलीतून बॅगा उचलून गाडीत टाकल्या. मी तोवर आश्रमाचे व्यवस्थापक आणि विश्वस्त यांचे आभार मानून आम्ही पुढच्या मार्गाला रवाना झालो.एव्हाना घड्याळात साडेदहा वाजले होते.
गाळणा-डोंगराळे-टिंगरी-झोडगे असा पंचवीस किमीचा प्रवास करून झोडगे येथे पोचलो. मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव पासून तीस किलोमीटरवर असलेल्या झोडगे येथे भूमीज शैलीतील यादवकालीन शिवमंदिर आहे, माणकेश्वर मंदिर अस त्या मंदिराचं नाव.
माणकेश्वर मंदिर,झोडगे 
या मंदिराकडे पाहून तीन वर्षांपूर्वी पाहिलेल्या सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची आठवण झाली, फक्त सिन्नरच्या मानाने या मंदिराचा आवाका लहान आहे. बाहेरील नंदीचं दर्शन घेऊन पश्चिमाभिमुख द्वारातून मंदिरात प्रवेश केला. मुखमंडप, अंतराळ व गर्भगृह अशी त्रिदळ गर्भगृह असलेली मंदिराची रचना असून शिवपिंडीचा वारी मार्ग हा उत्तरेकडे आहे. शैव प्रकारातील मंदिर असल्यामुळे शिवाची विविध रूपे मंदिरात कोरलेली दिसतात.मंदिराच्या शिखरावर असलेलं किर्तीमुख हे देखील विशेष पाहण्यासारखं आहे. मंदिराभोवती फिरताना मंदिरावरील कोरीव काम बघताना हरवून जायला होत होतं.

मुख्य मंदिराच्या नैऋत्येस अजून एक मंदिर होतं जे की पूर्ण उध्वस्त केलेलं होत. त्या मंदिराच्या इतस्ततः पडलेल्या नक्षीदार शिळा हे मंदिर देखील किती सुंदर असेल याची प्रचिती देत होत्या.
उध्वस्त मंदिर 
नंदी
आजचा भटकंतीचा शेवटचा दिवस असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत काय होईल तितकं भटकून घ्यायचं आणि मग परतीच्या प्रवासाला लागायचं अस ठरलं होतं. गाळण्याची भटकंती कालच्या दिवसात झाली नाही आणि आजची सकाळ देखील गाळणा पाहण्यात गेली, त्यामुळे आज जी ठिकाणं होती त्यातल्या काहींवर पाणी सोडायला लागणार हे नक्की होतं. झोडगेचं माणकेश्वर मंदिर बघून आता पुढचा मोर्चा मालेगाव किल्ल्याच्या दिशेने वळवला. कल्पेशच्या एका मित्राने वाटेत एका हॉटेलवर पुरणपोळी छान मिळते अस सांगितलं होतं, मग काय कल्पेशने काल पासून लावलेल्या धोशा मुळे ते हॉटेल गाठून पुरणपोळी आणि दही खाण्यात पाऊणएक-तासांनी घडाळ्याचा काटा अजून पुढे ढकलला. इथे हॉटेलच्या मागे असलेल्या मंदिरातील नंदी एकदम देखणा होता. पुढे आता मालेगावचा किल्ला गाठताना शहराच्या मध्यवर्ती हा किल्ला असल्याने या किल्ल्यापर्यंत पोचणंच एक दिव्य असतं. गिरणा आणि मोसम नद्यांच्या संगमावर अठराव्या शतकात नारोशंकर यांनी या किल्ल्याची उभारणी केली. तिहेरी तटबंदी असलेल्या किल्ल्याची बाहेरची तटबंदी आणि खंदक किल्ल्याच्या बाजूला झपाट्याने वाढलेल्या वस्तीने केव्हाच गिळंकृत केला आहे.
मालेगावचा किल्ला 
सध्या किल्ल्यात शाळा भरते आणि त्यांच्या सोईसाठीच पश्चिमेची तटबंदी फोडून प्रवेशमार्ग केला आहे, आम्ही देखील याच बाजूने किल्ल्यात प्रवेश केला. मुख्य भुईकोटात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला तीन तोफा ठेवलेल्या दिसतात.
तटबंदीतील देवड्या 
तिथे असलेल्या काकांनी डावीकडची वाट बंद आहे उजवीकडे जा असं सांगितलं. उजवीकडे जाताना एका ठिकाणी तटबंदीत असलेल्या देवड्यांमध्ये स्वच्छतागृह केलेले दिसले. त्यांच्या वर देखील देवड्या दिसत होत्या त्यातील एका देवडीत पाण्याची टाकी ठेवली होती. पुढच्या दिशेने चालत किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीवर वर जाण्यासाठी सोपान होता, तिथून वर जाऊन फांजीवरून किल्ल्याचे वेगवेगळे भाग पाहू लागलो.
फांजीवरून चालत नैऋत्य बुरुजाकडे आलो येथील बुरुजात दर्गा बांधला आहे, तिथून अजून पुढे जाऊन पुन्हा माघारी आलो आणि किल्ल्याच्या आग्नेय टोकाकडे चालू लागले, इथे तटबंदीबर बंदुकांचा मारा करण्यासाठी जागोजागी केलेल्या जंग्या दिसत होत्या. मध्ये काही ठिकाणी कॉलेजच्या मुलांचा ग्रुप फोटोशूट करण्यात दंग होता. बुरुजावरील सुस्थितीत असलेल्या चर्या किल्ल्याच्या अभेद्य तटबंदीतील गोलाकार बुरुजाला नाजुकपणाचा साज चढवीत होत्या. या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्याचा घेरा नजरेत येत होता.
किल्ल्याच्या आत बांधलेली शाळेची इमारत, पलीकडे दिसणारे मनोरे 
ज्या बाजूची वाट बंद आहे तिकडे अजून भरभक्क्मम अवशेष असणार याची खात्री दुरूनच पटत होती. मुख्य म्हणजे जे दोन मनोरे दिसत होते, त्यात कधी जातोय असं झालं होतं. तटबंदीवरुन चालत जाऊ शकतो असं वाटलं होत पण पूर्वेकडच्या तटबंदीच्या भागातून पुढे जायला तटबंदी ढासळली असल्याने वाट नव्हती. आल्या पावली माघारी फिरून पायऱ्या उतरून खालून काही वाट आहे का बघू लागलो, पण तिथे देखील निराशा झाली. त्यात त्या काकांनी सांगितलं होत डाव्या बाजूला जायला वाट नाही, म्हणजे तो भाग आता फिरता येणार नाही, यामुळे जरा वाईट वाटत होतं. तरी देखील थोडस धाडस करून त्या माणसाच्या समोरूनच किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या दिशेने गेलो. शाळेच्या बाजूने जात उत्तरेच्या भागात आलो आणि एखाद घबाड मिळावं असा दरवाजा समोर आला. यातील लाकडी दरवाजा देखील व्यवस्थित होता. दरवाजातून बाहेर येऊन दरवाजाकडे बघताना उत्तराभिमुख असलेला दरवाजा, दरवाजावरील दोन्ही बाजूला असलेले कमळ पुष्प त्याच्या वर असलेली नक्षीदार पट्टी आणि त्याच्या वर असलेल्या तीन खिडक्या. दरवाजात बसवलेला लाकडी दरवाजा त्याला असलेला छोटेखानी दरवाजा सार काही इतिहासाची पाने पलटून भूतकाळात नेत होता.
सुस्थितीतील दरवाजा 
या दरवाजाच्या अलीकडे वर तटबंदीवर चढायला सोपान होता पण त्याच्या इथे लोखंडी गेट बसवून कुलूप लावला होता,त्यामुळे वर जाता येणार नाही हे नक्की झालं होतं.
दरवाजातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला अजून एक दरवाजा होता आणि हा दरवाजा काटकोनात वळून उत्तराभिमुख होत होता.या उत्तराभिमुख दरवाजातील एका बाजूच्या लाकडी दरवाजाचा अर्धा भाग अजूनही तग धरून उभा आहे.
महादरवाजा 
हा किल्ल्याचा महादरवाजा असल्याने याची रचना विशेषच होती. महिरपी कमान, नंतर वक्राकार आकारांची महिरपी कमान. त्याच्या बाजूला आणि वर असलेले कमळपुष्प आणि वर असलेलं फुल, त्याच्या वर असलेली नक्षीदार पट्टी. त्याच्यावर असलेल्या पुन्हा तीन खिडक्या. या तिन्ही खिडक्या महादरवाजाच्याच छोट्या स्वरूपातील कलाकृती असल्याचे कळत होते,अगदी त्यावरील फुलं सुद्धा. त्याच्यावर अजून सुद्धा दोन नक्षीदार पट्ट्यांच्या वर असलेल्या चर्या महाद्वाराच्या भरभक्कमतेची ग्वाही देत होत्या. त्याच्याही वरती दोन्ही बाजूंच्या बुरुजांवरील घुमटी लक्ष वेधून घेत होत्या, आठ खांबावर तोलू धरलेल्या या घुमटी दुरून मनमोहक दिसत होत्या, परंतु मागे जो कुलूप लावलेला गेट दिसला त्यावरून तिथे काही पोचता येणार नाही याची शाश्वती झाली होतीच. कित्येक वर्ष ऊन-पाऊस सोसून देखील हा दरवाजा आणि त्यावरील काम अजूनही व्यवस्थित होतं. या दरवाजाच्या बाहेर तटबंदीत अजून एक दरवाजा होता पण तो आता बांधून बुजवून टाकला होता.
मालेगाव शहराच्या मध्यवर्ती हा भुईकोट असल्याने आणि आजूबाजूच्या वस्तीमुळे किल्ल्याचं किल्लेपण किती बघता येईल याबाबत अगोदर साशंक होतो, पण त्या सर्व शंका-कुशंकांच उत्तर किल्ला बघताना मिळालं होतं. आल्या वाटेने माघारी फिरून जो मुख्य कोट आहे त्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी तटबंदी फोडून केलेल्या दरवाजाच्या बाहेर आलो. किल्ल्याकडे बघताना डाव्या बाजूने प्रदक्षिणेला सुरुवात केली. अवाढव्य आणि सुस्थितीत असलेली तटबंदी आणि जागोजागी असलेले गोलाकार बुरुज हे सारे दुर्गावशेष किल्ल्याच रांगडं रूप आमच्या सारख्या भटक्यांना दाखवत होतं .
किल्ल्याचे भरभक्कम बुरुज आणि तटबंदी 
इथे किल्ल्याच्या आवारात तिथली स्थानिक पोरं क्रिकेटच्या खेळात रमली होती. त्यांच्या कोलाहलापासून दूर होत किल्ल्याच्या मागच्या म्हणजेच पूर्व भागात आलो, उजवीकडे मुख्य भुईकोट आणि त्याची अवाढव्य तटबंदी तर डावीकडे दुसरी तटबंदी होती, या तटबंदीत जागोजागी कोनाडे केले होते, ते कशासाठी हे काही समजलं नाही, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तटबंदीत असलेले कोनाडे पाहण्याची हि पहिलीच वेळ होती.
तटबंदीतील छोट्या देवळ्या/कोनाडे 
किल्ल्याचा आवाका छोटा असल्याने आणि काही भागात जाता न आल्याने पाऊण तासात पूर्ण किल्ला फिरून झाला.
घड्याळात दोन वाजून गेले होते. अपेक्षित वेळेच्या पुढे सरकलो होतो, त्यामुळे पुष्करने आता गाडी कुठेच थांबणार नाही याची तंबी देत गाडीचं सारथ्य स्वतःच्या हातात घेतलं, यावर अलंकार आणि मी एकमेकांकडे फक्त बघत राहिलो, कारण कौळाने येथील राजवाडा आणि चांदवडचं रेणुका माता मंदिर आणि अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा यावर पाणी सोडाव लागणार आता हे आम्हाला पुरतं कळलं होतं. तरी देखील गाडीत चकाट्या पिटताना आम्ही चांदवडच्या मंदिराबद्दल बोलत होतो, आपण चाललोय त्याच रस्त्याला लागूनच मंदिर आहे, या अशा गोष्टी आम्ही करत होतो आणि त्याचा फायदा झाला. पुष्करने मंदिर जवळ आलं की सांग रे अस म्हटल्याबरोबर मी त्याला डायरेक्शन सांगून मंदिराच्या प्रांगणात दाखल झालो सुद्धा.
रेणुका माता मंदिर,चांदवड 
मागे फेब्रुवारी महिन्यात सातमाळा रांगेतील रेंज ट्रेक करताना हे मंदिर पाहिलं होतं त्या जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. मंदिराबद्दल देखील तेव्हा लिहिलं आहे, त्या भटकंतीचा ब्लॉग वाचण्यासाठी खालील दुव्यावर जा...
घड्याळाकडे जरा कानाडोळा करून चांदवडच्या मंदिराचं दर्शन घेतलं होतं. आता मात्र पुष्करने लवकर घरी पोचायचं आहे असं म्हणत जणू काही आम्हाला धारेवरच धरलं, जेवायला पण आता थांबायचं नाही, अस त्याने सांगितलं. आम्हाला देखील त्याचं म्हणणं मुकाट्याने ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. शांतपणे गाडीत बसलो आणि घराच्या दिशेने मार्गस्थ झालो. चांदवड सोडून नाशिक सोडून नंतर अर्ध्या पाऊण तासात एका हॉटेल वर पुष्कर थांबलाच. पोटातल्या आतड्यांना मटण-चिकनची आहुती देऊन त्यांची शांती केली आणि मावळतीला जाणाऱ्या दिनकाराच्या साक्षीने खऱ्या अर्थाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. चार दिवसांसाठी अगोदर कित्येक दिवस चालू असलेली तयारी-फोनाफोनी सार चित्र डोळ्यात तरळत होतं. नव्या भिडूंच्या सोबत बिष्टा,कऱ्हा,अजमेरा,दुंधा, कंक्राळा, लळींग, सोनगीर, गाळणा,मालेगाव भुईकोट हे किल्ले तर देवळाणे येथील जोगेश्वरी शिल्प मंदिर, झोडगेचं माणकेश्वर मंदिर आणि चांदवडचं रेणुका माता मंदिर ही मंदिरं एवढा सारा आठवणींचा पसारा घेऊन ही बागलाण भ्रमंतीची वारी सुफळ-संपूर्ण झाली. ओंकार ओक आणि स्वप्नील खोत यांनी प्लॅनिंग साठी केलेली मदत, महत्वाचं म्हणजे ओंकारने फोर्सफुली सांगितल्यामुळेच लळींग आणि सोनगीर हे अधिकचे दोन किल्ले देखील एकदम योग्य वेळेत झाले. प्रत्येक ठिकाणी भेटलेली माणसे देखील मनात कायम घर करून गेली. लॉकडाऊन नंतर चार दिवस सह्याद्रीच्या कुशीत कसे गेले कळलं देखील नाही. कळव्याच्या इथे सुशांतला निरोप देऊन पनवेल गाठलं. पुष्करचा निरोप घेऊन मला देखील रात्री दहा वाजता घराजवळ सोडून अलंकार आणि कल्पेश त्यांच्या घराकडे रवाना झाले.
ट्रेक ठरवल्यापासून त्याची प्लॅनिंग आणि केलेलं प्लॅनिंग सगळं वेळेत बसवून अंमलात आणण यापेक्षा जर मोठी कोणती जबाबदारी असेल तर ती ही. हो हीच! हे चार दिवसांचं सार काही शब्दबद्ध करून ब्लॉग स्वरूपात मांडणं. ट्रेक वरून आल्यापासून मागचे चार आठवडे याच व्यापात अडकलो होतो. आणि अखेर हा महायज्ञ आज तडीस गेला.
फोटो क्रेडिट : अलंकार म्हात्रे, पुष्कर घरत आणि स्वतः अस्मादिक
कसा वाटतोय ब्लॉग तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून जरूर कळवाच, हेच काय ते तुम्हा सगळ्यांपुढे मागणं. कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळेच अजून नवनवीन ब्लॉग लिहिण्याची उर्मी मला मिळत राहील.
समाप्त.

धन्यवाद
सह्याद्रीचा भटकभवान्या
(विशाल पाटील)

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

5 comments:

  1. खुप छान लेख लिहिला आहे विशाल, तुझं मनापासून कौतुक.वाचताना प्रत्येक गोष्ट अगदी डोळ्यासमोर येते.

    ReplyDelete
  2. उत्तम.
    गाळणा किल्ला प्रचंड आहे, लिहिताना जास्ती दम काढतो हा माझा अनुभव आहे. माझाही लेख वाचून त्यात काही त्रुटी राहुल गेल्या असतील तर नक्की कळवा.
    https://omkarkelkar.blogspot.com/2020/12/blog-post.html

    ReplyDelete
    Replies
    1. विशाल तूझी लेखणी अप्रतिम आहे.खुप छान वाटले तूझा लेख वाचताना.

      Delete
    2. @ओंकार केळकर तुझा ब्लॉग देखील सुंदर झालाय...आणि खरंच गाळणा किल्ल्यावर लिहिण्यासाठी भरपूर आहे...वास्तुवैभव प्रचंड आहे या किल्ल्यावर।।।

      Delete
  3. सर्व भटकंतीच खूप छान वर्णन केल आहे. वाचताना व फोटो बघताना वाटत होतो कि जानू आपण आता त्या ठिकाणी फिरत आहोत व समोर दिसणाऱ्या दृशांचा आनंद घेत आहोत.
    तुझं मनापासून कौतुक

    ReplyDelete