Tuesday, February 21, 2023

*वेगळा विचार करायला लावणारा, क्षमतांची कसोटी बघणारा आणि पार्टीसिपंट्सचा अंत पाहणारा ट्रेक

रेकी करताना आणि नंतर आलेल्या अनंत अडचणी त्यात गाईड म्हणा, ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा जेवण यावर मात करत एकमेकांवर असलेला विश्वास आणि जी काही वर्षे ट्रेक केलेत त्यामुळे आलेले अनुभव पाठीशी घेऊन ज्या आत्मविश्वासाने राहुल आणि मी आम्ही दोघांनी निर्णय घेतले, त्याला आपल्या टीम मधील बऱ्याच जणांनी पाठींबा देऊन आमच्यातील आत्मविश्वास वाढवला या सर्वांमुळेच *दाऱ्या घाट - ढाकोबा - दुर्ग - डोणीदार घाट* हा रेंज ट्रेक वेळेत आणि सुरक्षित संपन्न झाला. त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना धन्यवाद.
लोकल ट्रान्सपोर्ट महाग होतंय म्हणून अलंकार ने *मी माझी गाडी घेऊन येतो, मला ते पैसे दे* असं म्हणत आपल्याच गाड्या घेऊन जाण्याचा जो प्रस्ताव मांडला आणि त्याला जोड दिली हर्षल भट याने. अक्षय ने देखील कानिटकर काकांची गाडी सुचवली आणि ती देखील मिळाली, आणि पराग सुद्धा त्याचा लाल रथ घेऊन हजर झाला.त्यामुळे 1300 फी मधील 300 रुपये सर्वांना परत देऊ शकलो. रेकीच्या वेळी असलेले गाईड अव्वाच्या सव्वा पैसे मागू लागल्याने, राहुल ज्या विश्वासाने बोलला होता की ऑन दि स्पॉट माणूस बघू वाटेच्या सुरुवातीपर्यंत आणि पुढे आपण नेऊ. त्यामुळेच फर्स्ट मॅन म्हणून माझ्या आतापर्यंतच्या ट्रेकच्या अनुभवांची कसोटी पाहणारा ट्रेक होता हे नक्की. राहुल च्या या विश्वासाला सार्थ करत वेळेत आणि सुखरूप सर्वांचा ट्रेक झाला. दाऱ्या घाटाची सुरुवात तर झाली , दीड-दोन तासात चढू आपण असा जो त्याचा व्ह्यूव होता तो आत चढतोय तसा मारुतीच्या शेपटासारखा लांबतच होता. दोनाचे तीन, तीनाचे चार तास झाले फक्त दाऱ्या घाटाची घळ चढायला. आता आडवा पट्टा असणार हा सर्वांचा भ्रमाचा भोपळा दोन-अडीच तासांच्या रणरणत्या उन्हात खाली-वर आणि पुन्हा घळ आणि शेवटी आडव्या चालीने फोडला. ढाकोबाच्या पायथ्याच्या मंदिरात भाजी भाकरी खाऊन थोडी वामकुक्षी घेऊन कूच करणार तोवर, आम्ही काही खरं सांगत नाही, म्हणून बाळा(हेमंत वैद्य) याला फोन करून पुढे अजून किती चालायचं आहे हे कुणीतरी विचारलं आणि तो सहज बोलून गेला, "काही सपाट चाल वगैरे नाही, तीन डोंगर चढून उतरायचे आहेत". प्रत्येकाची नजर आता मस्त बोलत होती. जेवणानंतर तो दीड-दोन तासांचा टप्पा पार करून सूर्यास्ताचा नजारा बघायला टीम दुर्ग च्या मंदिरात पोचली. अंघोळी झाल्या, सूर्यास्त अनुभवला. चहा होईपर्यंत काळोखाची चादर आली. चूल पेटवून मस्त खिचडी भात, लोणचा, पापड, रायता, खीर दिवसभराचा थकवा घालवायला बेतच दमदार होता. चांदण्यांनी न्हाऊन निघालेला दुर्गचा कोकणकडा तिथली नाईट फोटोग्राफी आणि गार वाऱ्याची शिरशिरी सार काही छान होत. स्लीपिंग बॅगमध्ये घुसून पाठ टेकवल्यावर जी काय एक-एक बॉडी पडली की सकाळच्या आमच्या सहाच्या वेकअप ला कोणी ढुंकून देखील प्रतिसाद दिला नाही. मोबाईल अलार्म आणि मंदिरातल्या घंटा बडवत सगळ्यांच्या शिव्या ऐकत सगळ्यांना उठवले. रात्रीचीच खिचडी गरम करून तोच नाश्ता देऊन दुर्ग चा माथा जवळ केला. माथ्यावरून दिसणार दृश्य प्रसन्न करणार होतं. सकाळची सुरवात मस्त झाली होती. मंदिराजवळ येऊन आवरून 10 वाजता पुढची वाट सुरू केली जणू काही न संपण्यासाठीच. दीड तासाची पहिली आडवी चाल(नक्की आडवी का ते पार्टीसिपंट्स ना विचारा) डोणीदार घाटाच्या सुरुवातीला घेऊन गेली. इथून खरी झाली उतरणीची वाट. आता वाटेला चढ नव्हताच, होती ती फक्त उतरण, उतरण आणि उतरणच! यात होते मोठे दगड, त्यांच्यावरून उड्या मारत जाणं. स्क्री, घसारा जिथे कधी कधी पार्श्वभाग देखील टेकवावा लागत होता. आणि एक दोन ठिकाणी घसरगुंडीच. याच घळीत रेकीच्या वेळेस जिथे पाणी पाहिलं होतं, तिथे ब्रेक घेऊ असं ठरवलं होतं, पण तिथे पोचल्यावर पाहतोय तर पाणीच नाही. पुढे देखील असच असणार म्हणून त्याच जागी ब्रेक घेऊन आजूबाजूला शोधाशोध केल्यावर एका ठिकाणी दगड बाजूला करून खाली असलेलं पाणी चहाच्या कपाने काढुन 7-8 लिटर पाणी जमा करून एक आधार मिळवला. चपाती भाजी, आणि सोबत दही साखर दुपारची पोटपूजा चांगलीच झाली होती. या दही साखरेतील साखरेची मजा सागर बामणेला नक्की विचारा. रेकीच्या वेळी या ठिकाणी आम्ही 6:15 च्या आसपास होतं आणि गावात पोचलो होतो पावणे नऊ ला. पराग ने लगेच हिशोब लावून अजुन अडीच तास चालायचं आहे हे सांगून अलमोस्ट सगळ्यांची विकेट उडवली होती. दगड-गोटे आणि स्क्री यातून पुढची चाल चालू झाली. वाटेत परत एका ठिकाणी थांबल्यावर आदिती हातात दगड घेऊनच आली, "दादा, खरं खरं सांग, अजून किती उतरायचं आहे". तिला तसं बघून बाकी सगळे पण तिला फूस लावू लागले," घाल घाल त्याच्या डोक्यात दगड". घळ संपली आणि तिरकी आडवी चाल चालू झाली, तिथे सुषमा चे आता चेहऱ्यावरील हावभाव पार बदलून गेले होते. वेग देखील मंदावला होता. एव्हाना सहा तासांची चाल झाली होती. एका ठिकाणी दरड कोसळून, वाट मोडली होती, तिथे थोडा वेळ घेत वेली-काट्या-कुट्यातून आणि घसरणीच्या वाटेने पुढे येत पठार गाठलं. आता कुठे सर्वांना हायस वाटू लागलं. उतार मात्र अजून संपला नव्हता. पुन्हा उतार, जंगल, झाडी यातून मार्गक्रमण करत मढवाडी मधील पाहिलं घर दिसलं आणि जीवात जीव आला. समोरच्या घरात राम राम करत गाड्या जिथे पार्क केल्या होत्या ते अंतर चालून 10 वाजता चालू केलेली चाल 5 वाजता संपवली. मी किंवा राहुल या ट्रेकबद्दल जास्त काहीच बोलणार नाही, पण आपले आलेले सहभागी एक एक जण एक एक किस्सा असा काही रंगवून रंगवून सांगतील ना की त्याला कसलीच तोड नसेल. त्यांच्याकडून ते किस्से जरूर ऐका, आणि पुढच्या वेळी ट्रेकला तुम्ही पण नक्की या. ट्रेक यशस्वी पूर्ण केल्याबद्दल आणि चांगली साथ दिल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद सह्याद्रीचा भटकभवान्या
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

12 comments:

  1. khup सुंदर मित्र आम्हाला पण घेऊन चला ना कधीतरी

    ReplyDelete
  2. खूप सुंदर ब्लॉग लिहिलास आणि ब्लॉग वाचताना ट्रेक दिसतो...आणि ट्रेक दिसला की हे ही कळतंय की असे ट्रेक सामान्य वाटसरूंच्या आवाक्यातले नसतात म्हणून ट्रेक झाल्यावर तुझ्याकडून किंवा अलंकार कडून समजतं.... लिखाण सम्पूच नये असं वाटतं होत आणखी लिह...सुंदर

    ReplyDelete
  3. Khupach sundar vachatana aasa vatala jasa swatahach anubhav kartye

    ReplyDelete
  4. प्रत्यक्ष ट्रेक अनुभवत असल्याचा भास होतोय.. सुरेख शब्द मांडणी..
    पणं आम्हाला पणं कळवत जा.. अशा रेंज ट्रेक साठी

    ReplyDelete
  5. छानच...एक दमदार ट्रेक..

    ReplyDelete
  6. खुप दिवसांनी विशाल तुझा ब्लॉग वाचायला मिळाला.
    नेहमी सोबत नाही नेत ते ठिक आहे रे पण असे ब्लॉग लिहीत जा म्हणजे वाचताना भटकंतीचा अनुभव घेता येतो तुझ्या लिखाणातून.
    मज्जा आली ब्लॉग वाचुन.
    असाच भटकत रहा आणि लिहीत रहा.

    ReplyDelete
  7. मस्तच👍

    ReplyDelete
  8. जेवणाच्या वेळेला दही साखर अनुभवले नर्मदा परिक्रमेला …. बाकि नेहमी प्रमाणे अप्रतिम लिखाण 👌

    ReplyDelete
  9. अप्रतिम

    ReplyDelete
  10. सुंदर !!!!

    ReplyDelete
  11. Altimate range trek, thnx vishal fr keeping everyone's courage throughout d trek, also serving nice foods. Keep in touch fr nxt trek

    ReplyDelete