जांबूद्वीप अर्थात भारतवर्ष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारत भूमीला खूप जुना इतिहास तसेच पौराणिक संदर्भ सुद्धा आहेत. जोपर्यंत कला, इतिहास, पुरातत्व आणि धर्माचा संबंध आहे, तोपर्यंत प्रत्येकापेक्षा दुर्मिळ आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना इथे आहे.
मराठवाड्या पलीकडचा मराठवाडा ही सफर करताना वाट वाकडी करून विदर्भातील पेनगंगा नदी तीरावर असलेल्या मेहकर या पुरातन ठिकाणी भेट दिली. मेघणकर या नावाने या शहराचे उल्लेख स्कंद पुराण, मत्स्य पुराण आणि पद्म पुराणात आढळून येतात.एका यज्ञ प्रसंगी ब्रम्हदेवाने या पेनगंगा नदीची उत्पत्ती केली अशी पौराणिक कथा आहे. यामुळेच या नदीत स्नान करणे, तर्पण करणे यासाठीच बरेच भाविकभक्त पूर्वी पासून इथे येत. ऋषीमुनींनी देखील आपल्या ज्ञानसाधना करण्यासाठी या भूमीचा आधार घेतला आहे. वनवासाच्या काळात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
मेघणकर नावाच्या दैत्याने इथे उत्पात मांडला त्यावेळी येथील ऋषीमुनींनी श्रीविष्णूची प्रार्थना करून या दैत्याच्या अत्याचारापासून वाचवण्याची विनंती केली. शारंग नावाचा धनुष्य धारण करून श्री विष्णूंनी मेघणकर दैत्याचा पराभव केला. परास्त मेघणकर दैत्याने श्री विष्णूंना या नगरीला आपल्या नावाने येथे उल्लेखण्याची तसेच येथे वास्तव्य करण्याची विनंती केली आणि म्हणूनच चतुर्भुज विष्णूंनी पद्म, गदा, चक्र, शंख(पगजश) या क्रमाने आयुधे धारण करून त्रिविक्रम स्वरूपात येथे वास्तव्य केले. या त्रिविक्रम विष्णूच्या मुकुटात शारंग धनुष्य घेऊन विष्णू स्थानापन्न आहेत त्यामुळे याला शारंगधर बालाजी हे नाव पडले. मेघणकरचा पुढे अपभ्रंश होऊन मेहकर हे नाव प्रचलित झाले.
एकाच शाळीग्राम शिळेतील ११.५ फूट एवढी भव्य विष्णूची मूर्ती ही एकमेव आहे, आणि मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव अक्षरशः तरळत आहेत. इतकी सुंदर आणि देखणी मूर्ती मात्र मूर्तीला वस्त्र लावलेले असल्याने पूर्ण मूर्ती पाहता येत नाही ही खेदाची गोष्ट आहे. या मूर्तीच्या शोधाची गोष्ट रहस्यमय आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, ७ डिसेंबर १८८८या दिवशी स्थानिक गावकरी रामभाऊ भिसे पाटील यांच्या जमिनीत खोदकाम करताना एक तळघर सापडले त्यात एका पंधरा फुटी पेटी मध्ये चंदनाच्या सालीमध्ये गुंडाळलेली ही ११.५ फूट भव्य शारंगधर बालाजीची मूर्ती आणि केशवराज,गरुड, बालाजीची लहान मूर्ती,ताम्रपट तसेच काही मौल्यवान वस्तूही सापडल्या. हाच दिवस आजतागायत या मूर्तीचा प्रकट दिन म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. भव्य मूर्ती सापडल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली सोबत ब्रिटिशांना देखील कळली. तत्कालीन ब्रिटिश डेप्युटी कलेक्टर सर रिचर्ड टेंपल यांनी ताम्रपट, शिलालेख व मौल्यवान वस्तू ताब्यात घेऊन त्या लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये पाठवल्या. शारंगधर बालाजीची मूर्ती देखील त्यांना लंडन ला पाठवायची होती याची कुणकुण ग्रामस्थांना लागताच मुहूर्त नसताना देखील पहाटे चार वाजता स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याने मूर्ती लंडन ला घेऊन जाता येणार नव्हती , ब्रिटिश अधिकाऱ्याला ही बातमी कळताच त्यांच्या रागाला सीमा उरली नाही, यामुळे त्यांनी कित्येक गावकऱ्यांना तुरुंगात टाकले.
पुढे ग्रामस्थांनी निधी गोळा करून तात्पुरते मंदिर बांधले, हळू हळू या मूर्तीची ख्याती ऐकून बऱ्याच दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करून आता जे मंदिर आहे ते उभारण्यास सहकार्य केले. मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कुंभाची स्थापना १९१३ मध्ये मेहकर येथील निवासी वारकरी संत श्री बाळाभाऊ पितळे यांच्या आश्रयाने करण्यात आली आणि मंदिर पूर्ण झाले. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना असून पद्म,गदा, चक्र, शंख या त्रिविक्रम स्वरूपातील विष्णूच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. रथीकेत ब्रम्हा,विष्णू, महेशाच्या मूर्ती आहेत. किरीट मुकुटात धनुष्यबाण हाती घेऊन शारंगधर विष्णू स्थानापन्न आहेत. मूर्तीच्या चरणाजवळ जय-विजय यांच्या समवेत डावीकडे लक्ष्मी तर उजवीकडे भुदेवीची मूर्ती आढळून येते.
१२व्या ते १४/१५व्या शतकातील मुस्लिम आक्रमणांच्या काळात या राजकर्त्यांची हिंदु धार्मिक स्थळांबद्दलची घृणा बघता बऱ्याच मूर्ती जमिनीखाली, विहिरीत अथवा पाण्याच्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्या. शारंगधराच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं असावं...
Offbeat प्रवासवारीच्या या हेरिटेज सहलीत इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर यांच्या मार्गदर्शनामुळे या मंदिराचा, मूर्तीचा इतिहास ज्ञात होण्यास खूप मदत झाली आणि ही भटकंती खऱ्या अर्थाने डोळस झाली,याची प्रचिती या पोस्ट वरून नक्की येते.
-विशाल पाटील
Offbeat प्रवासवारी
भेटुयात पुढच्या हेरिटेज भटकंतीला







No comments:
Post a Comment