Thursday, December 12, 2019

राजगड - तोरणा - रायलिंग पठार- लिंगाणा भाग-३ अंतिम


लिंगाणा 
 
रंगोत्सव 

       अब्जावधी चांदण्यांच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेल्या रायलिंग पठारावर रात्र घालवणे म्हणजे सुखच. गप्पा मारता मारता रात्री डोळ्याला डोळा कधी लागला ते कळलंच नाही आणि पहाटे जी काही जाग आली ती या अशा पवित्र वातावरणात. एखाद्या तपस्वी साधू पुरुषा सारखा किल्ले लिंगाणा ध्यान लावून बसला आहे मागे स्वराज्याचा मानबिंदू किल्ले रायगड जणू त्यावर आशीर्वादांचा शिडकाव करत आहे, तर पूर्वेला हळुवार रंगांची लकेर पसरताना पाहून वातावरणात पसरलेली चैतन्याची चाहूल पक्षी पाखरांना जागे करताना दिसत होती. आजचा टप्पा होता बोराट्याच्या नाळेने खाली उतरून लिंगाणा किल्ला करायचा आणि लिंगाणा माची गावात उतरायचे तिथून पुढे चालत वाळणकोंड डोह बघून ट्रेकची सांगता करायची आणि परतीचा प्रवास. काल संध्याकाळी अप्पांशी बोलत असताना आप्पांनी आम्हाला लिंगाणा माचीवरील बबन कडू यांची भेट घ्या असं सांगितलं होतं, लिंगाण्याची दरड कोसळून माचीवरील बरीच घरे गाडली गेली, खूप नुकसान झालं होतं, त्यावेळी महाडचे डॉ. राहुल वारंगे(राहुल दादा) आणि अप्पा व इतरांनी मिळून त्यांना घर बांधायला मदत केली होती. 

           पाण्याची कमी असल्याने पठारावर फक्त चहा बिस्कीट खाल्ले आणि पोहे बनवायला पाण्याच्या ठिकाणी जाऊ तिथेच पाणी भरून, फ्रेश वगैरे होऊन पुढच्या वाटेला लागू अस ठरवून वाफळलेल्या चहाने पोटातली आतडी गरम केली.
अमृत 
सर्व पसारा आटपून जागा पूर्ववत केली बॅगा पाठीला लावल्या आणि काल जो बोराट्याची नाळ सुरू व्हायच्या अगोदर पाणवठा पाहिला होता त्याच्या दिशेने निघालो, लिंगाण्याला पाठमोरे होऊन वाट धरली. दहा बारा मिनिटांच्या चालीनंतर पाणवठ्याच्या इथे पोचलो. हा पाणवठा बाकी तिघांना कसा दिसला नाही याचे हर्षल दादा आणि मला नवलच वाटत होते. पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याचा कालपासून जपून वापर केला होता, आता मात्र पुरेसं पाणी असल्यामुळे जवळ सगळ्यांनी पाणी भरून घेतलं. फ्रेश वगैरे होऊन पोटभर पाणी पिऊन घेतलं, ठरवलं होत की इथे नाश्ता करायचा पण चहा बिस्कीट आणि इतर सुका खाऊ खादाडल्याने नाश्त्याची काही गरज नव्हती, म्हणून तसाच पुढचा टप्पा चालू केला. नऊ च्या आसपास तो पाणवठा सोडला आणि आता आमचा तिसऱ्या दिवसाचा ट्रेक सुरू झाला. मोहरी मधून रायलिंग पठाराकडे जाताना पठाराच्या दहा मिनिटे अगोदर एक छोटी वाट डावीकडे घळीत उतरते ही खूणगाठ लक्षात ठेऊनच काल संध्याकाळी जात असतानाच आम्हाला ही वाट कुठे आहे ते माहीत झालं होत. तरी देखील पाणवठ्याच्या इथून निघताना वेगळी वाट पकडून शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला, जो की फसला आणि परत बाहेर येऊन आहे त्या मूळ वाटेने आम्ही मुख्य वाटेला लागलो. 

बोराट्याची नाळ 
         नाळेच्या सुरुवातीला उतार एकदम तीव्र त्यामुळे पुढे नाळेत काय वाढून ठेवलं असेल याची बऱ्यापैकी कल्पना होती. त्यात पाठीला लावलेल्या बॅगा या वजनदार त्यामुळे रस्ता अजूनच खडतर असणार यात वादच नाही. नाळेला लागलो आणि आता आमच्या या जंबो ट्रेक मधला अजून एक नवीन टप्पा चालू झाला.राजगड तोरणा धारेवरची चाल म्हणा, तेथे भरकटलेला रस्ता म्हणा, रात्रीच्या अंधारात उतरलेली कारवीमध्ये लपलेली भट्टी गावाची वाट म्हणा किंवा गेळगाणी पर्यंतचा कच्चा तार रोड तर मोहरीपर्यंत डोंगररांगा न्याहाळत केलेली पायपीट सार सार काही नाविन्यपूर्ण आणि त्यात अजून या बोराट्याच्या नाळेची नवीन वाट. वाटेला लागलो हर्षल दादा पुढे तर मी सर्वात मागे होतो, मी पुढे जाणार तर इतक्यात प्रिसी वजनामुळे गडबडलेली दिसत होती, तिने तिच्याजवलील रोप माझ्याकडे दिला त्यामुळे थोडंफार का होईना वजन कमी झाल्यामुळे तिला चालायला बर पडत होत. नाळेतून उतरताना अंगावर येणारे मोठमोठाले प्रस्तराचे कडे नाळेची भीषणता दाखवत होते. चालताना पायाखाली येणारे सुटावलेले दगड पुढे जाण्यास जणू मज्जाव करत होते. त्यात माझ्याकडून एक दगड सरकलाच दोन ते तीन टप्प्यातच तो थांबला पण त्याच्या टप्प्यांचा आवाज असा काही त्या नाळेत घुमला की बास! अंगावर येणारी ती नाळ, तो तीव्र उतार, मोठमोठाले दगड, तर पूर्ण वाटेमध्ये असणारे लूज दगड सार एकदम भयंकर होत. पावलामागून पाऊल जपून टाकत आमची पायगाडी चालली होती. सागर आणि हर्षल दादा आता इतके खाली उतरले होते की आम्हाला दिसतही नव्हते, मी मध्ये तर मागे प्रिसी एकदम सावकाश येत होती, मनोज तिच्या सोबतच चालत होता. एकंदरीत सारे जण थकले असून सुद्धा बऱ्यापैकी चालत होते. 
           उतरत असताना एका ठिकाणी रोप लावलेला दिसला, त्यावरून लक्षात आलं की लिंगाण्याला एक ग्रुप आला आहे, त्यांनी हा रोप लावून ठेवला असावा, या रोप मुळे आम्हाला देखील मदत झाली, रोपच्या सहाय्याने खाली आलो तर थोड पुढेच सागर आणि दादा आमच्यासाठी थांबले होते. मागे मनोज आणि प्रिसीला जपून या सांगून मी पुढे झालो. ही दोघ जिथे थांबली होती तिथे देखील चांगला रॉक पॅच होता, हे दोघे तिथे आम्हाला मदत करायलाच थांबले होते, बॅग अगोदर खाली देऊन नंतर एक एक करून आम्ही उतरते झालो आणि तिथेच जरा विश्रांती घेऊया म्हणत बुड टेकवल.आतापर्यंत तासभर जास्त चाल होऊन सव्वादाह झाले होते. अप्पा आणि राहुल दादाने अस सांगितलं होतं की नाळेतून उतरताना एका ठिकाणी उजवीकडे वळावं लागत ही वाट लिंगाणा आणि रायलिंग पठार यांच्या घळीत जाते, अजून एक खूण म्हणून या ठिकाणी बोल्ट मारलेला आहे हे मला माहीत होतं.
थोड्याच वेळात आपण इथे पोचू अस सर्वाना सांगितलं, चिक्की खाऊन पाणी पिऊन पुढची वाट धरली. आणि खरंच अवघ्या पाच सात मिनिटांच्या चालीने तो बोल्ट दिसला आणि ती वाट देखील समजली. हा ट्रॅव्हर्स जरा धोकादायकच होता. पाऊल जपून जपून पुढे सरकवत जाव लागणार होतं. एक चांगलं झालं की इथे देखील रोप लावला होता, त्यामुळे आम्हाला रोप लावण्याची गरजच भासली नाही आणि आमचा वेळ देखील वाचला. एक एक करून सर्वांनी तो ट्रॅव्हर्स पार केला आणि पुढे वाटेला लागलो. हा ट्रॅव्हर्स मारल्यानंतर खाली पूर्ण घळ आणि कोकण प्रांत दिसत होता. अखेर घाटावरचा प्रवास संपून आम्ही कोकणात प्रवेश केला होता. खाली दापोली गाव दिसत होत. घाटावरच्या सिंगापूर गावातून उतरणारी सिंगापुरची नाळ ही कोकणातील या दापोली गावातच उतरते. वाट पुढे एकूण कशी आहे हे कुणालाच माहीत नव्हतं आतापर्यंत तरी आपण नीट सर्व केलंय असच प्रत्येकाचं अंतर्मन सांगत असावं.
ट्रॅव्हर्स मारल्यानंतर समोर दिसणारा कोकण प्रांत 
पुढे जसे चालू लागलो तसे त्या ट्रॅव्हर्सवर एक ठळक पायवाट दिसू लागली. नाळेत जो वेग कमी होता, तो या वाटेमुळे आता दुणावला होता. एका मागून एक मुंग्यांची जशी रांग जाते, तसेच आम्ही पाच जण त्या वाटेवरून चाललो होतो. 
           आता एका ठिकाणी परत एक कातळावरून जाणारा ट्रॅव्हर्स आला पण तिथून जायचं की खालून कळत नव्हतं कारण त्याच्या दहा एक फूट खालून पायवाटही जाणवत होती तर काही जण कातळावरून गेलेलंही कळत होतं. हर्षल दादा खालून तर मी वरून अस आम्ही दोन्ही वाटांना लागलो, मी पोचलो पुढच्या टप्प्याला लगेच तर हर्षल दादाला यायला जरा प्रयत्न करावे लागले, त्यामुळे बाकीच्यांना मी आलेल्या वाटेने यायला सांगितलं.

१ अवघड ट्रॅव्हर्स २. ट्रॅव्हर्स मारल्यानंतर समोर दिसणारा लिंगाणा ३. लिंगाण्याच्या घळीत पोचायची वाट 

या वाटेने मी जसा ट्रॅव्हर्स मारून पुढे आलो तस जणूकाही पाताळातून धरणी भेदून वर आलेल्या लिंगण्याचं भेदक रूप अंगावरच येत होतं. याचसाठी केला होता अट्टाहास याची आता पावलोपावली जाणीव होत होती. रायलिंग पठार आणि लिंगाणा यांच्यामधील ती खिंड देखील दिसत होती आणि संपूर्ण लिंगाणा सुळका देखील नजरेत भरत होता. त्या खिंडीत टेंट लावलेले दिसत होते, लिंगाण्यावर आलेल्या ग्रुपचे ते टेंट होते.लिंगाणा आणि रायलिंग पठाराच्या खिंडीच्या अगदी काही मिनिटांवरच आम्ही होतो, इथून वळसा मारत वाट खाली उतरून त्या खिंडीत पोचणार पण या वाटेवर घसरण इतकी होती की पाच पायाने सरकत म्हणा सावरत म्हणा एक एक करत खिंडीत पोहोचलो. बॅगा पाठीवरून उतरवल्या आणि बोराट्याच्या नाळेच्या त्या खडतर टप्प्यातून सुटका झाली अशा अविर्भावाने खाली बैठक मारली.
लिंगाणा चढताना 
सर्वजण आले, मस्त कोकम सरबताचे घोट घेत घसा ओला करून घेतला. लिंगाण्याला एक ग्रुप अगोदरच आला असल्याने त्यांनी रोप लावूनच ठेवले होते, एकंदरीत आम्ही आणलेला रोप कुठे काढायची गरजच भासली नाही. तिथे जे रोप लावलेत तेच वापरूया तर त्याच्या अगोदर हे रोप ज्यांनी लावलेत त्यांच्याशी बोलावं म्हणून टेंट मध्ये असलेल्या दोघांना आम्ही आवाज दिला, त्यांनी आम्हाला लगेच परवानगी दिली. त्यांच्याशी बोलता बोलता कळलं की शिलेदार म्हणून त्यांचा ग्रुप आहे आणि लिंगाणा आरोहण अशी मोहीम त्यांनी ठेवली होती. आता पुढचं ध्येय होत लिंगाणा चढणे. रोप असल्यामुळे मार्ग सुकर होता, वाटेला लागलो आणि जसे चढू लागलो तसे लिंगाण्याची भीषणता समोर दिसू लागली. लिंगाणा चढताना प्रस्तरारोहणच करावे लागते, आणि त्याची माहिती असणे गरजेचं आहे हे माहीत होत आणि त्यामुळेच आम्ही रोपदेखील जवळ बाळगला होता. सत्तर ऐशी फूट वर चढल्यानंतर एका रॉकपॅचला वर चढताना जरा कसरत करावी लागत होती.मी चढलो असतो वर की नाही माहीत नाही, नंतर हर्षल दादा पुढे झाला, त्याला जमत होतं, पण सगळी तीन दिवस चालून चालून थकली होती, सेफ्टी इक्विपमेंट जवळ काहीही नव्हतं, त्यामुळे उतरताना पाचावर धार बसली असती, न जाणे साहस करता करता वेडं साहस होऊ नये, म्हणून तिथूनच सर्वांनी खाली उतरायचं ठरवलं. आल्या पावली माघारी वळलो, खिंडीत पोचलो, बॅगा पाठीला लावल्या आणि साडेअकराच्या सुमारास खाली उतरायची सुरुवात केली.
           लिंगाण्याचा त्या खिंडीतून खाली पाने गावात जाणारी वाट ही पूर्ण कारवीनेच भरलेली आहे, तोरण्यावरून भट्टीच्या वाटेइतकी भयानक नव्हती, पण तरी होती. एक विचित्र गोष्ट म्हणजे लिंगाणा आरोहणाची मोहीम लावणारे जे कोणी या खिंडीत थांबतात त्यांनी या वाटेवर कचरा टाकून टाकून एक प्रकारे डम्पिंग ग्राउंडच केलं आहे, त्या घाणीतून माग काढत समोर येत असलेली कारवी बाजूला सारून वाट उतरू लागलो.
करवीत वेटोळे करून बसलेला चापड्या 
चार पाच पावले उतरलो असेन तर उजव्या हाताला मानेच्या इथे असलेल्या कारवीला काय तरी लुसलुशीत लागलं, हाताचा स्पर्श झाला तसा कीड वगैरे असेल अशा अविर्भावात कशाला हात लागला तिकडे पाहिलं आणि खाडकन खाली बसलो. कारवीवर मस्त वेटोळे करून चापड्या(Bamboo Pit Viper) तिथे बसला होता. अगदी माझ्या मानेच्या इथे असताना माझा हात त्याला लागला होता. अगोदरच वर्षभरापूर्वी घोणस(Russel viper) चा मिळालेला अनुभव तेवढा पुरेसा होता. त्यामुळे माझं काय झालं होतं हे मलाच माहीत होतं. मी चार पावले उतरून हे सगळं झालं, तर मागे यांनी अजून उतरायला सुरवात केली नव्हती, पाहिलं तर सागर येत होता, हर्षल दादाला आवाज देऊन पुढे बोलवलं. दादाला अगोदर कळलं नाही काय झालं म्हणून पण त्याने जेव्हा तो वेटोळे घातलेला चापड्या बघितला तर त्याची पण बोलती बंद झाली. अगोदर मला तोंड न दिसल्यामुळे हरणटोळ वाटला होता पण नंतर तो दादाने ओळखला. चापड्या आहे आणि माझा त्याला हात लागलाय आणि तो माझ्या मानेच्या इथेच होता समजल्यावर त्याची तर बोलतीच बंद झाली. वाटेच्या दोन्ही बाजूंची कारवी एकमेकांना टेकली होती, आणि आता या वाटेने मला परत जाणे शक्य नव्हते, आणि त्यांना देखील खाली उतरणं साधं काम नव्हतं. दादाने आणि मी मग त्या चापड्याच्या अटॅकिंग रेंज पासून थोडी लांब अशी कारवी आडवी करून  वाट बनवली. सागर आला, आला कसला थेट धावतच सुटला पार मला देखील क्रॉस करून खाली असलेली घाण वगैरे न बघताच, त्याच्या मागे मनोज देखील सावकाश आला. प्रिसिलिया यायला घाबरत होती, आकांडतांडव करून तिने जणू ती लिंगाण्याची खिंड उठवली होती. घाबरण्याचं कारण साहजिकच आहे म्हणा. तिचं तर म्हणणं एकच पनवेल ते कन्याकुमारी सायकलने सोलो राईडला नाही घाबरले पण आता मला नाही पुढे जायचं, भीती वाटते मला, मी नाही उतरणार. तिच्या या अशा वागण्याने हसूही येत होतं, आणि काळजीही वाटत होती. हो नाही, हो नाही करून हर्षल दादाने अखेर तिला कसबस आणलं. या सर्वाना समजावताना मी सांगत होतो, "अरे माझा हात लागलाय, माझं काय झालं असेल विचार करा, मी ओके आहे" दिसायला मी ओके दिसत असलो तरी आत जी घालमेल चालू होती, ती बाहेर काढुच शकत नव्हतो. पुढे चालताना आता ठरवलं, आता जर पुढे कुठे साप किंवा काही दिसला तर शक्यतो कुणालाच सांगायचं नाही. 
           बोराट्याच्या नाळेतली पुढची वाट धरली आणि चालू लागलो, आता काय बोलायला आम्हाला विषयच भेटला होता, चांगला त्यावर एखाद कथानक बसेल अशा मागे चर्चा चालू होत्या, मी आपला भरभर पावलं टाकून मागच्यांना भरभर येण्यास प्रवृत्त करत होतो. आता वाटेचा उतार तीव्र घसारा असलेला आणि दोन्ही बाजूला कारवी त्यात त्या चापड्यामुळे कारवीला हात लावून उतरायची कुणाचीच हिम्मत नव्हती,त्यामुळे त्या घसाऱ्यावरून चालताना घसरून पडायला व्हायचं. एकंदरीत चालताना सर्वांनी बुड जमिनीला टेकवलं होतं. ही तीव्र उताराची छोट्या घळीतील वाट उतरताना आणि त्या विषयामुळे आमचा जरा जास्तच गोंगाट चालू होता. आमचा गोंगाट ऐकून, एक ग्रुप घेऊन लिंगाण्यावर गेलेले गृहस्थ आमच्या आवाजाचा माग काढून आमच्या मागे आले आणि त्यांनी आम्हाला गाठलं. त्यांच्याकडून असं कळलं की आम्ही वाट चुकलोत.
बोराट्याची नाळ उतरताना 
"अरे यार! त्या चापड्यामुळे वाट भरभर कापायच्या नादात  वाट कुठे वळलीय हे कळलंच नाही, आणि आपण सरळ घळीचा रस्ता धरला, त्यामुळेच ही वाट इतकी घसाऱ्याची आणि अवघड होती, इथून मागे फिरुया असं त्या मामांना म्हटलं तर "नको, म्होर त्याच वाटेला लागते ही वाट" अस मामांनी सांगितल्यामुळे परत फिरायचं या विचाराने पोटात जो गोळा आला होता तो लगेच गेला देखील. आता सोबत गावकरी असल्यामुळे चालताना धीर आला होता. मामांना सापाचा विषय सांगितला तर मामांनी सांगितलं की ते त्याला मारून आलेत. झाला विषय सोडून पुढची वाट धरली, धडपड करत अखेर जी मुख्य वाट होती त्या वाटेला लागलो आणि दोन क्षण विश्रांतीचे म्हणून तिथे थांबलो.आतापर्यंत मामा मागे होते म्हणून त्यांच्याशी काही बोलता आलं नाही, मामांना त्यांचं नाव विचारलं असता बबन कडू हे सांगितलं, डोक्यात लगेच तार झंकारली प्रिसीला अप्पांनी आपल्याला ज्यांना भेटायला सांगितलं त्यांचं नाव विचारलं असता जेव्हा ती बबन कडू असं बोलली. आणि देव भेटला असं माझं अंतर्मन सांगितलं. त्या बसल्या जागीच मग मामांना आम्ही कोण हे सांगितलं. अप्पा आणि राहुल दादाच नाव सांगितल्यावर आणि खुद्द अप्पांची पोरगी आमच्यासोबत आहे म्हटल्यावर त्यांना देखील इतक्या वर्षांनी ही माणसं आपल्याला विसरली नाहीत याच बरं वाटलं. आता काय पुढच्या संबंध वाटेला मामांशी बोलताना ते अप्पा, चारू काकू(प्रिसिलियाची आई), राहुल दादा यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. ध्यानीमनी नसताना ज्या माणसाकडे आपण फक्त आवाज द्यायला जाणार आहोत, तो माणूस वाट चुकलेली माणसं आहेत त्यांचा आवाज घेऊन पाठीमागे येतात आणि पुढे संपूर्ण वाट आपल्यासोबत चालतात याच्यासारख भाग्य आमचंच. 


         मुख्य वाटेल लागलो आणि बोराट्याच्या नाळेची दगड भरली वाट परत चालू झाली, उतरताना जपून जपून उतरत असताना दोन्ही बाजूना जंगल असल्यामुळे ती नाळ चिंचोळी भासत होती. रॉकपॅच असल्यामुळे आमची पायगाडी हळूहळू चालत होती. नाळेत काही ठिकाणी पाणी झिरपत असल्यामुळे दगडावर शेवाळ लागलेली दिसत होती, तर काही ठिकाणी पाणी देखील साठलेल होतं. दोन चार ठिकाणी पाण्याच्या बॉटल, प्लॅस्टिक कागदाचे कपटे असा काही काही मानवनिर्मित कचरा दिसत होता. अशा सुंदर निसर्गाच्या या अनवट वाटांची ज्यांनी कोणी घाण केली असेल त्यांचा मनोमन उद्धार करत पुढे वाट चालूच ठेवली. कातळावरून उतरताना एका ठिकाणी उतार इतका होता आणि आधाराला जागा नसल्याने बॅगा अगोदर उतरवून नंतर आम्ही उतरलो. बोराट्याची नाळ ही थेट पाने गावात उतरते, कडसरी लिंगाणा(लिंगाणा माची) या गावात जायचे झाल्यास वाट एका ठिकाणी वळते हे आम्हाला माहीत नव्हतं. मामांनी एकाएकी आम्हाला नाळेच्या वाटेला काटकोनात वळून वर चढायला सांगितलं. 
गवताने भरलेली वाट 

इथे वाट आहे? असा काही प्रश्नच उद्भवत नव्हता, कारण आम्हाला माहीतही नव्हता की असा काही वळण असेल, त्यामुळे ही वाट आम्हाला मिळाली असती असा विचार देखील आमच्या मनाला शिवला नाही. तो वळणच इतका वाकडा होता आणि तिथे काहीच खूण नव्हती, त्यामुळे काहीतरी खूण करावी या हेतून तिथे एक दगडाचा कॅरन रचला आणि पुढची वाट धरली. गवताने अजून जोम धरलेला असल्याने वाट काही झाली नव्हती, गवत आडवं झालं होत पण ते देखील हिरवंच असल्याने या वाटेवरून कुणाचा राबता नसल्याचे कळत होते. त्यात हल्ली शिकारीवर बंदी असल्यामुळे शिकऱ्यांचा देखील वावर नव्हता. मामा सोबत असल्याने धास्ती, भीती हे काही राहील नव्हतं. सुखरूपपणे आपण गावात पोचू हे नक्की झालं होत. घड्याळाच्या काट्यांनी देखील आता वेग घेतला होता, काटे एकच्या पार गेले होते.   गवत वाढलेलं आणि राबता नसलेली वाट आमच्या चालीमुळे आता बऱ्यापैकी ओळखेल अशी होत होती. 
उध्वस्त झालेलं जुनं लिंगाणा माची गाव 

ट्रॅव्हर्स मारत वळण घेत गवतातून चाललेली वाट बोराट्याच्या नाळेच्या दगडांच्या खडतर प्रवसापेक्षा खूप सुखावणारी वाटत होती. जंगल दाट असल्यामुळे सावली देखील होती. वाट चालता चालता पडक्या घरांच्या इथे आलो, हेच ते जुनं लिंगाणा माची(कडसरी लिंगाणा) गाव. दरड कोसळल्याने संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं. अगदी वीजेचे पोल होते, ते देखील वाकून जमिनीला टेकले होते, यावरून त्यावेळेस काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. प्रत्येक घराची ढासळलेली भिंत खूप काही सांगू इच्छित होती. मामा तर त्या गावचे रहिवाशी, प्रत्येक वेळी या वाटेवरून जाताना त्यांना काय वाटत असेल हा विचार सुद्धा मन हेलावून काढतो. मामांकडून कळलं की होळीच्या वेळेस पाच दिवस सगळे ग्रामस्थ इथे राहायला येतात आणि इथेच शिमगा साजरा करतात, ते पाच दिवस इकडेच मुक्काम ठोकून राहतात, यामुळेच काही घरांची डागडुजी झालेली दिसत होती. मामांची परिस्थती तशी बेताची असल्यामुळे त्यांनी काही त्यांचं घर नीट केलं नव्हतं, त्यांचं ढासळलेल घर त्यांनी आम्हाला बोट करून दाखवलं आणि आम्ही पुढे वाट चालू लागलो. पुढे अजून काही वीजेचे खांब पडलेले दिसत होते.
मामांना आता आमच्यामुळे किती तरी उशीर झाला होता, त्यांना मगाशीच बोललो होतो की तुम्ही जा पूढे आम्ही येतो मागून पण त्यांना उशीर झाला तरी चालणार होतं,आणि त्यांच्या हट्टापुढे आम्ही माघार घेऊन त्यांच्या आमच्याबरोबर थांबण्यास राजी झालो. 
           पुढची वाट कापू लागलो, पाय देखील आता बोंबलत होते. त्यात सकाळी फक्त चहा आणि सुका खाऊ खाल्ला होता, त्यामुळे पोटात भुकेचा कल्लोळ माजला होता. पोट म्हणत होत मी, पाय म्हणत होते मी, पाठीवरची बॅग देखील चांगलीच बोलत होती. चालता चालता वाटेत एक ओढा लागला त्यात आडवे होऊनच पाणी पिऊन पाण्याने पोटाला आधार दिला. डोंगरतल्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे वाटेत एका ठिकाणी छोटा धबधबा दिसला तेव्हा त्याखाली भिजण्याचा मोह होत होता, पण वेळेच गणित बघता पुढे चालू लागलो. सकाळी नऊ च्या आसपास चालू केलेली तंगडतोड दुपारच्या दोनच्या पल्याड गेली,थांबणं नव्हतं ना काही पोटाला आधार,त्यात बोराट्याची नाळ उतरून जे काही थकलो होतो त्यामुळे एक सावलीची जागा पाहून बसलोच.
 
१. चेहऱ्यावरचे भाव सारं काही सांगून जातात २. दूर दिसणारा लिंगाणा 
परवा रात्री भट्टीत उतरलो तेव्हा अंघोळ केली होती, त्यानंतर तोंडाला काही पाणी लागलं नव्हतं, त्यामुळे चेहरे जे काही रापले होते की काय बोलू नका. हर्षलदादाच्या बॅग मधून चिक्की काढून जरा पोटाला आधार दिला. गाव जवळ आलं होत पण थकवाही इतका होता की त्या झाडाखालून आता हलायची देखील इच्छा नव्हती. परत पुढची वाट चालू लागलो वाट चालता चालता एकाकी चढ लागला, अनपेक्षित असा चढ लागल्याने गाड्या जणू काही ढेपाळायला लागल्या होत्या, बरं झालं अगदी काही मिनिटांपूर्वी जरा थांबा घेतला होता, नाहीतर आता हा चढ चढताना आमची पुरती हौस झाली असती.
काळ नदीचं पात्र 
चढ चढत चढत एक माळरान गाठलं पुढे आलो आणि उतरणीला लागलो उतार उतरून थोडं पुढे आलो आणि खाली दूर आम्हाला वाळणकोंड डोह, काळ नदीच पात्र आणि मध्येमध्ये डांबरी रस्ता दिसत होता. वाटेला आता उतार लागला, समोर नवीन लिंगाणा माची गाव दिसू लागलं, गाव जस जवळ येत होतं तसे पायांचे सूर देखील जास्त जोरात आळवीत होते. वळणावळणांचा उतार उतरत एका मागून एका असे उतरत अखेर अडीच पावणे तीन च्या सुमारास आम्ही नवीन लिंगाणामाची गावात प्रवेश केला. आम्ही आलेल्या वाटेवरून उतरल्यावर बबन मामाचं घर लगेच लागलं. सारवलेल्या अंगणात प्रवेश केला आणि एकच सुटकेचा निःश्वास सोडला. 
           भूक इतकी प्रचंड लागली होती की अंगणात बसल्या बसल्या शूज वगैरे काढून मोकळे झालो, बबन मामांच्या घरातून पाणी मागितलं, बबन मामांचा मुलगा नरेशने एवढ्यात आमच्यासाठी चटई देखील अंथरली. हर्षल दादाने आणलेल्या पराठ्यांवर आणि बॅगेत उरल्या सुरल्या सुक्या खाऊवर बकासुरासारखे सगळे तुटून पडलो होतो, पोटात जसे ते पराठे गेले तशी पोटातली आग शांत झाली, अंगण्यात बसल्यामुळे पायांना सुख मिळालं तर पोटात अन्न गेल्याने आतड्यांच्या आनंदाला देखील पारावर उरला नव्हता.
बबन मामांचं घर 
इतक्या तंगडतोडी नंतर निवांत बसून जेवताना "आता विसाव्याचे क्षण,माझे सोनियाचे मणी, सुखे ओवीत ओवीत, त्याची ओढतो स्मरणी" हे लतादीदींच्या गाण्याचे स्वर ओठी येऊ लागले. पोटातला आगडोंब आता शांत झाला होता, विश्रामही झाला होता, आता पाय काढता घेण्याची गरज होती, तीन वाजून गेले होते, मामांसोबत एक फोटो काढून त्यांचा आणि लिंगाणा माची गावाचा निरोप घेऊन गावाबाहेर पडलो. गावाच्या बाहेरपर्यंत सोडायला देखील मामा आले होते, त्यांच्या त्या पाहुणचाराने आम्ही अगदी कृतकृत्य झालो. गावाच्या बाहेर आल्यावर डांबरी रस्त्याला यायला काळ नदीचं पात्र ओलांडून बाहेर जावं लागत.
जलक्रीडा 
अरे बापरे दोन दिवसांनी इतकं पाणी पाहिल्यावर आता त्या पाण्यात उतरण्यापासून आम्हाला कोणीही आवरू शकत नव्हतं. पाण्यात उतरण्यायोग्य जागा पहिली आणि आम्ही पाण्यात उतरलो देखील. नदीच पात्र पूर्णत: दगडगोट्यानी भरलेले होत, परिणामतः पाणी इतकं नितळ की खालचा तळ दिसत होता.दहा मिनिटांच्या ऐवजी अर्धा पाऊण तास जास्त वेळ पाण्यात कधी गेला हे कळलं देखील नाही, यथेच्छ डुंबून शरीर आता एकदम हलकं झालं होत. आता ट्रेकच्या एकदम शेवटच्या टप्प्यात होतो, डांबरी रस्त्याला लागून वाळणकोंडपर्यंत जायचं, तिथून काय मिळेल ती गाडी पकडून महाड गाठायचं. 
           नदीच्या पात्रातून दगड गोट्यांची कसरत करत पात्राबाहेर आलो आणि डांबरी रस्त्याला लागलो. पुन्हा एकदा डांबरी रस्त्याची कंटाळवाणी चाल अस असलं तरी आता ट्रेक यथोचित पार पडल्यामुळे एक समाधानाची लकेर सर्वांच्या चेहऱ्यावर होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी असल्यामुळे आणि सूर्य देखील पश्चिमेला कलला असल्याने रस्त्यात आता सावली होती, त्या थंडगार सावलीतून चालताना हायस वाटत होतं. आता परत आमचे दोन ग्रुप झाले, मी आणि हर्षल दादा पुढे तर उर्वरीत तिघे मागे. नदीपात्रापासून दोनएक किलोमीटर चालून आम्ही वाळणकोंड डोहाजवळ आलो.


रांजणखळग्यांमुळे तयार झालेलं हे वाळणकोंड डोह म्हणजे निसर्ग नामक किमयागाराने केलेली एक अद्भुत किमयाच होती. त्या ठिकाणी नदीपात्र ओलांडण्यासाठी केलेला पूल आणि खाली डोहात शेकड्यांनी विहंग करणारे मासे, येथील स्थानिक लोकांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे ही लोक या पुलावरून चपला घालून जात नाहीत. पात्राच्या बाजूला देवाचं मंदिर देखील आहे. तिथली फेरी आटोपती घेतली आणि आम्ही निघालो आम्ही निघतोय तर हे तिघे तिथे आले, त्यांना देखील लवकर निघायचं सांगून काही टमटम किंवा कुठली गाडी मिळेल या आशेने वाट चालू लागलो. इथे आता टमटम फक्त मांगरुण गावाच्या इथे मिळेल अस वाळणकोंडच्या इथे एका मावशींनी सांगितलं. म्हणजे अजून तीन चार किमीचा फेरा. काही आढेवेढे न घेता निघालो. मजल दरमजल करत चालतोय. सावली असल्यामुळे खरंच बरं वाटत होतं. नाहीतर या एवढ्या चालीला ऊन असत तर चांगलीच हालत झाली असती आमची.
महाड दापोली रस्त्याला दापोलीच्या अलीकडे एक फाटा फुटून हा रस्ता पाने गावात येतो, याच रस्त्याने चालत आम्ही पुढे चाललो होतो, तर दापोली कडे जाणारे रस्त्यावरून दापोली वरून एक टमटम येताना दिसली, ही टमटम आपल्याला भेटली पाहिजे म्हणून पाठीवर वजन असून देखील मी आणि हर्षल दादा असे काही धावलो होतो आणि ती टमटम आता जाणार म्हणून जीवाच्या आकांताने दोघ एकसाथ "रिक्षाsss..." अस जोरात ओरडलो की तो रिक्षावाला पुढे गेलेला थांबला आणि आम्ही धावत येतोय हे पाहून त्याने रिक्षा मागे आमच्यापर्यंत आणली. रिक्षावाल्या दादांशी बोलता ते बोलले की ते महाड ला नाही येऊ शकत, बिरवाडीला सोडायचे पाचशे रुपये घेऊ. मांगरूण ते बिरवाडी एवढ्या अंतराचे 20 रुपये घेतात हे मला माहीत होत, आणि मी हे हर्षल दादाला देखील सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्या रिक्षावाल्याला कमी वगैरे न करता थेट नको बोलून टाकलं. परत पुढे पायगाडी धरली, मांगरूण गावाच्या हद्दीत आलो, तीन पोर भेटली, तर त्यांनी आपणहून आमची चौकशी केली तर त्यांना घडला वृत्तांत सांगितला तर ते बोलले एवढे पैसे कोणी सांगत नाही, जरा जास्तच पैसे सांगितले त्याने. मिळेल तुम्हाला काहीतरी गाडी हा विश्वास देखील त्यांनी दिला त्यांना निरोप देऊन पुढे चालतोय, तोच मागून एक टेम्पो आला. टेम्पोवाल्याला हात केल्या केल्या तो थांबला देखील, त्यांनी कुठे चाललात विचारलं तर पटदिशी महाड, बिरवाडी दोन नाव सांगून मोकळा झालो. बिरवाडी सांगायचं कारण म्हणजे मांगरूण वरून बिरवाडी व नंतर महाड असा प्रवास करावा लागतो, आणि बिरवाडीला खूप उशिरापर्यंत गाड्या असतात. टेम्पोवाले दादा महाडला चालले होते पण त्यांचा खिडक्यांचा धंदा असल्याने त्यांना दोन ठिकाणी खिडक्या लावायला थांबावं लागणार होतं. त्यांनी सांगितलं या आमच्यासोबत वाटेत काही गाडी मिळाली तर जा. आम्ही दोघ आता गाडीत बसलो, मागच्या तिघांना मेसेज टाकून ठेवला जो काही त्यांना गेलाच नाही. आणि अपेक्षेनुसार एका ठिकाणी टेम्पो थांबला तिथे उतरून ते दादा काम करायला गेले, तर आम्ही रस्त्यात थांबलो.आमच्या टेम्पोच्या मागून एक टेम्पो गेला आम्हाला वाटलं की हे सर्व त्या टेम्पोने गेले असणार. नंतर एक रिक्षा आली, त्या रिक्षाला हात केला ती रिक्षा थांबल्यावर आत डोकावून बघतोय तर आत आमचीच जत्रा होती. एकंदरीत सगळे एकत्र आलो आणि पुढचा प्रवास एकत्र चालू झाला. बिरवाडीला पोचलो, तिथून लगेच महाडला यायला पण रिक्षा मिळाली. महाडमध्ये पोचलो तर तिथे राहुल दादाचा भाऊ अमोल वारंगे भेटला. काळोख पडला होता आणि महाड स्टँड मध्ये गर्दी पण होती त्यामुळे अमोलने गाडी शोधून आम्हाला त्यात बसवलं आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. हर्षल दादाला उशिराने बस होती पण अमोलची कंपनी असल्यामुळे त्याचदेखील आता काही टेन्शन नव्हतं. एकंदरीत तीन दिवसांचा भन्नाट जंबो ट्रेक खूप काही आठवणी गोळा करून यशस्वीरीत्या संपन्न झाला. 
           
           समाप्त.
           कसा वाटलं ब्लॉग नक्की सांगा, वाट पाहतोय तुमच्या कमेंट्सची. 

सह्याद्रीचा भटकभवान्या

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

10 comments:

  1. सुरेख वर्णन.
    हुश्श संपला एकदाचा ट्रेक दमलो डांबरी रस्ता चालून चालून.
    आता आतुरता पुढील ट्रेक ची.....

    ReplyDelete
  2. जबरदस्त भावा 👌👍
    एक नंबर

    ReplyDelete
  3. उत्कृष्टतेच्या पलीकडे! खूप छान वर्णन :)

    ReplyDelete
  4. मस्त लिहिलंय भावा ...

    ReplyDelete